अनुभव – अतुल ओव्हाळ

ही गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. जी माझ्या पणजोबांची आहे. माझ्या आई चे आजोबा. पूर्वीच्या काळी दळवळणासाठी साधने नव्हती. तेव्हा तर एस टी ही नसायच्या त्यामुळे कुठे प्रवास करायचे म्हंटले तर पायीच जावे लागायचे. माझे आजोबा ६ महिने एका शहरात तर ६ महिने दुसऱ्या शहरात जाऊन येऊन असायचे. त्यांचे काम च तसे होते. त्यांचं नाव गेनू  होत पण त्यांना सगळेच ग्यानबा म्हणायचे. मी तर त्यांना पाहिले नव्हते पण त्यांची शरीर यष्टी खूप चांगली होती असे सगळे म्हणायचे. आम्ही ज्या गावात राहायचो तिथल्या जवळच्या शहरात ते असले की नेहमी गावात घरी भेटायला यायचे. त्यावेळी ही असाच एक योग जुळून आला होता. सगळ्या लहान मुलांसाठी ते खेळणी, खाऊ घेऊन शहरातून गावाकडे यायला निघाले. रेल्वे जिथं पर्यंत होती तिथे आले पण तिथून पुढे त्यांना बराच प्रवास पायीच करायचा होता. त्या काळात रस्त्याकडे ला दिवे ही नसायचे त्यामुळे मग कधी कंदील तर कधी एक मशाल घेऊन वाट काढत पुढे जावे लागायचे. त्या रात्री ही ते अश्याच एका अंधाऱ्या वाटेने चालत घरी जात होते. वेळेचे भान ही त्यांना नव्हते. बऱ्याच महिन्यांनी घरी मुलांना भेटणार होते त्यामुळे खूप खुश होते. कधी एकदा घरी पोहोचतो असे त्यांना झाले होते. बरीच रात्र झाल्यामुळे रस्ता अगदीच सामसूम होता. तितक्यात त्यांना मागून एक हाक ऐकू आली ” काय रे ग्यानबा, कुठे चालला य..” ते एकदम जागीच स्तब्ध झाले. 

आवाज ओळखीचा होता पण त्यांना आठवत नव्हतं. ते मागे वळून पाहणार तितक्यात त्यांना परत आवाज आला. पण या वेळेस आवाज वेगळा होता आणि तो ही त्यांच्या पत्नीचा ” मालक बघा ना मला काय झालं आहे..?”. आता मात्र त्यांना कळून चुकले की हा काही तरी विचित्र प्रकार आहे. कारण माझ्या पणजी चे असे येणे शक्य नव्हते. तितक्यात त्यांना लक्षात आले की ते ज्या भागातून जात आहेत त्या भागात हाकामारी आहे. म्हणजे आता आपण ही तिच्या तावडीत सापडलो आहोत हे त्यांना कळायला वेळ लागला नाही. त्यांनी जसे पुढे चालायला सुरुवात केली तसे त्यांना पुन्हा एक हाक ऐकू आली ” आबा मी आहे प्रमिला, बघा ना माझ्याकडे..” आपल्या मुलीचा आवाज ऐकून त्यांच्या अंगावर सरसरून काटा येऊन गेला. त्यांना भीती तर वाटत होतीच पण त्याच सोबत राग ही येत होता. कारण ती हाकामारी त्यांच्या मुलीचे नाव वापरत होती. त्यांनी चालण्याचा वेग वाढवला. पण तितक्यात त्यांना जाणवू लागले की एक काळपट सावली सारखी भासणारी आकृती त्यांच्या सोबत चालत आहे. त्यांनी किती ही वेग वाढवला तरी ती त्याच वेगाने येत होती. त्यांना एव्हाना कळले होते की ही हकामारी आपला पाठलाग साहजा सहजी सोडणार नाही. ते लमाण बाबा यांना खूप मानायचे. ते आमच्या घराचे रक्षण करता आहेत असे नेहमी म्हणायचे. म्हणून त्यांनी त्यांचा जप करायला सुरुवात केली. पुढच्या क्षणी त्यांना मागून कसलीशी चाहूल जाणवली आणि त्यांची भीती अगदी क्षणार्धात नाहीशी झाली. 

त्यांना अगदी प्रसन्न वाटू लागले. मागून चालत येणाऱ्या व्यक्तीकडे एक काठी असावी बहुतेक, कारण तसा आवाज त्यांना येत होता. एव्हाना बरीच पायपीट झाली होती. समोर त्यांना गाव दिसू लागले तसे मागून आवाज आला ” जा लेका.. ” तो आवाज ऐकून त्यांना एक दिलासा मिळाला. ते पुढच्या काही वेळात सुखरूप घरी पोहोचले.

Leave a Reply