अनुभव – ओंकार कांबळे

गोष्ट जवळपास दीड ते दोन वर्षांपूर्वीची आहे. माझ्या मामा सोबत आणि मावशी सोबत घडली होती. मामा, मावशी आणि तिची मुलं असे सगळे त्यांच्या गावाला चालले होते. बेत तर लवकर निघायचा ठरला होता पण सगळे आवरता आवरता त्यांना निघायला बराच उशीर झाला. संध्याकाळी ६ वाजता त्यांनी प्रवास सुरू केला. अंतर तसे जास्त नव्हते. तीन साडे तीन तासात ते गावाला पोहोचणार होते. खूप दिवसांनी गावाला जात असल्यामुळे सगळे खुश होते आणि प्रवास ही छान सुरू होता. साडे सात वाजत आले होते. एव्हाना शहराचा परिसर मागे पडला होता. गावा कडे जाणारा रस्ता असल्यामुळे लवकर सामसूम झाला होता. अधून मधून एखादे वाहन दिसायचे जे बाजूने वाऱ्याच्या वेगात निघून जायचे. त्या रस्त्याला आजूबाजूला स्ट्रीट लाईट ही नव्हते त्यामुळे गाडीच्या हेड लाईटच्या प्रकशात च पुढचा रस्ता दृष्टीस पडत होता. तितक्यात अचानक एक ससा दिसला जो अगदी गाडीच्या पुढे धावू लागला. पांढरा शुभ्र.. ते सगळेच पाहू लागले. काही मीटर तो त्यांच्या गाडी सोबत धावत राहिला आणि मग झुडपात निघून गेला. त्यांना जरा आश्चर्य च वाटले कारण या आधी त्यांना असा अनुभव कधी आला नव्हता. पण खर तर पुढे येणाऱ्या संकटाची ही एक चाहूल होती. ज्यापासून ते सगळेच अनभिज्ञ होते. अचानक हवेत गारवा जाणवू लागला. सगळे जण शांत बसले होते. हळु हळु तो गारवा वाढू लागला आणि असह्य होऊ लागला. 

संपूर्ण निर्मनुष्य रस्ता, त्यावर त्यांची गाडी सामान्य वेगात पुढे जात होती. गाडीच्या काचा उघड्याच होत्या. मध्येच एखादी वाऱ्याची झुळूक यायची आणि त्या गारव्याची प्रकर्षाने जाणीव करून द्यायची. त्याच सोबत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची सळसळ ही कानावर पडायची. तितक्यात मामा ला लक्षात आले की बराच वेळ झाला आपण गाडी चालवतोय पण अजून गावाच्या वेशीपर्यंत ही पोहोचलो नाही. मामा ने झटकन मोबाईल पाहिला तर ९ वाजून गेले होते. एव्हाना आपण पोहोचायला हवे होते असा विचार मनात डोकावून गेला. तो गोंधळाला, त्याला काही सुचेनासे झाले म्हणून त्याने त्याच्या बहिणीला म्हणजे माझी मावशीला सांगितले. ती ही जरा विचारातच पडली की घरातून निघून बराच वेळ झालाय, एव्हाना पोहोचायला च हवे. तितक्यात मामा ला जाणवले की रस्त्याच्या उजव्या बाजूला वडाची झाडे दिसत आहेत. त्याने मावशीला ला लक्ष ठेवायला सांगितले. पण जवळपास १०-१२ मिनिटांनंतर त्यांना लक्षात आले की ही वेगळी झाडे नाहीत तर ते एकच झाड आहे जिथे ते फिरून फिरून पुन्हा येत होते. एकदा, दोनदा, तीनदा ते पुन्हा त्याच जागी येत होते. मामा आता खूप घाबरला होता. त्याने गुगल मॅप सुरू केला पण तिथे एकच रस्ता दिसत होता. त्याने गाडीचा वेग कमी केला आणि तो निरखून पाहू लागला. तसे त्याला एक कच्चा रस्ता असल्याचे जाणवले. या रस्त्याने जाऊन काही उपयोग नाही म्हणून हिम्मत करून त्याने त्या कच्च्या रस्त्यावर गाडी घेतली. अगदीच लहान आणि अरुंद रस्ता. 

म्हणजे समोरून एखादी दुचाकी जरी आली तरी सुद्धा जायला जागा नव्हती. काही अंतर त्या रस्त्याने पुढे गेल्यावर त्यांना एक पूल दिसला. विचित्र गोष्ट म्हणजे त्या पुलाला बाजूचे दोन कठडे च नव्हते. आता आल्या मार्गे परत जाणे जवळ जवळ अशक्य होते म्हणून नाईलाजाने त्याने गाडी पुलावरून घेतली. वेग अगदीच कमी होता. चुकूनही गाडीचे टायर त्या पुलाच्या बाहेर गेले तर गाडी वरचा ताबा सुटेल आणि थेट खाली कोसळू या भीती ने हळु हळू गाडी पुढे नेत होता. त्या परिसरात कोणताच आवाज नव्हता. होती ती फक्त भयाण शांतता आणि त्या शांत तेला चिरत जाणारा गाडीच्या इंजिन चा आवाज. जेमतेम त्याने गाडी तिथून बाहेर काढली. जसा तो पुल संपला तसे मावशीच्या मुलीचे लक्ष रस्त्याकडे ला गेले तर तिथे एक बाई बसलेली दिसली. तिचा चेहरा रस्त्याच्या विरुद्ध बाजूला होता. तिला कळले नाही की ही बाई अशी अंधाऱ्या रात्री इथे का बसली असेल. तिने पटकन तिच्या आई ला म्हणजे माझ्या मावशीला सांगितले. पण जेव्हा मावशीने तिथे पाहिले तेव्हा तिथे कोणीही नव्हते. ती खूप घाबरली होती म्हणून मावशीला बिलगून बसली. पुन्हा तेच घडू लागले. किती ही अंतर पार करून पुढे गेले तरी ते त्याच पुलाजवळच्या भागात येत होते. वेळेचे भान राहिले नव्हते पण ४ तास उलटून गेले असावेत अंदाजे. सगळ्यांनी स्वामी समर्थांच्या नावाचा धावा सुरू केला. सगळ काही अगदी पूर्ववत झाले आणि पुढच्या क्षणी त्यांना एक फलक दिसला. मामा विचारत पडला की इतक्या वेळा आपण या रस्त्यावरून गेलो पण हा फलक दिसला नाही पण आता मात्र त्यावर नजर गेली. 

ती त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी मार्ग दाखवणारा फलक होता. तिथून ते थेट गावी घरी गेले. तिला सगळा घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा कळले की तो रस्ता खूप सामसूम असतो, तिथून रात्री जास्त कोणी प्रवास करत नाही. कारण खूप लोकांना विचित्र अनुभव येतात. मावशी ने मनात केले की स्वामींच्या कृपेनेच ते यातून सुखरूप पाने बाहेर पडू शकले. तेव्हापासून त्यांनी रात्री अपरात्री प्रवास करणे टाळले आणि स्वामींचे सदैव ऋणी झाले. 

Leave a Reply