अनुभव क्रमांक – १ – राकेश कुरणे

ही गोष्ट मला माझ्या आजोबांनी सांगितली होती. गोष्ट जवळपास ४० वर्षांपूर्वीची आहे. आजोबा त्यांच्या वडिलांसोबत म्हणजे माझ्या पणजोबांसोबत शेतात कामाला जायचे. त्या काळी शेती हा मुख्य व्यवसाय होता. तसे आमचे गाव ही डोंगराळ भागात असल्याने वस्तीही अगदी तुरळक होती. अश्याच एका दिवशी घरी पाहुणे आले होते. ते सकाळी आले होते आणि रात्री जेवण करून लगेच निघायचे म्हणत होते. आमच्या घरच्यांनी खूप आग्रह केला पण ते राहायला तयार नव्हते. 

त्यामुळे माझ्या पणाजो बानी माझ्या आजोबांना त्यांना तालुक्याला सोडून यायला सांगितले. पाहुणे नको नको म्हणत होते पण माझे आजोबा त्याच्या सोबत जाणार च होते. रात्री जेवण वैगरे आटोपले आणि ते निरोप घेऊन घराबाहेर पडले. त्या काळी रात्री जास्त वाहने नसायची आणि त्यात गावाकडचा परिसर. वस्ती पासून एस टी स्टँड वर चालत जायला लागायचं. साधारण २ किलोमीटर चा रस्ता होता. गावात शेवटची एस टी ९ ला सुटायची. तुम्ही येऊ नका आम्हाला सोडायला आम्ही जाऊ असे पाहुणे सतत म्हणत होते पण आजोबा त्यांचे काही ऐकायला तयार नव्हते. 

ती शेवटची एस टी तालुक्याला जाऊन पुन्हा लगेच गावात यायची आणि मग रात्री गावात च थांबून पहाटे पुन्हा निघायची. त्यामुळे आजोबांनी ठरवले होते की आहे त्याच बस ने तालुक्याला जायचे आणि पाहुण्यांना सोडून त्याच बस ने पुन्हा गावात यायचे. तसे आजोबा त्यांच्या सोबत निघाले. त्यांना सोडून ते पुन्हा बस ने गावात आले. यायला ११-११.३० झाले. संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेले होते. एस टी स्टँड पासून पुन्हा वस्ती पर्यंत त्यांना एकट्याला पायपीट करत जावे लागणार होते. 

आजोबा तसे एकदम धीट होते. आणि त्यांना असे रात्री अपरात्री फिरायची सवय होती. साधारण १ किलोमीटर चे अंतर पार केल्यावर ते माळावर येऊन पोहोचले. निर्मनुष्य परिसर. थंडगार वारा सुटला होता. अचानक त्यांच्या लक्षात आले की या वाटेवरून जाताना स्मशान लागते. एक वेगळीच भीती त्यांच्या मनात घर करू लागली. ते झपाझप पावले टाकत पुढे जाऊ लागले. तसे त्यांना चित्र विचित्र आवाज यायला सुरुवात झाली. आजूबाजूच्या परिसरात दूर वर एकही घर किंवा साधी झोपडी ही दृष्टीस पडत नव्हती. पण तरीही कसले तरी आवाज कानावर पडत होते. 

काही अंतर पुढे गेल्यावर त्या वाटेवर एका झुडुपात शेजारी त्यांना कोणी तरी बसलेले दिसले. तसे त्यांना थोडे आश्चर्य वाटले. इतक्या रात्री या अश्या परिसरात कोण बसले आहे ते पहायला गेले. ती एक बाई होती. मान खाली घालून बसली होती. आजोबांनी तिची विचारपूस केली पण काही न बोलता ती अचानक रडू लागली. तसे आजोबा तिला समजावू लागले की शांत व्हा.. रडू नका.. तुम्ही वाट चुकला आहात का.. मी तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडतो.. काळजी करू नका.. तुम्ही नक्की कोणत्या गावात राहता.. घर कुठे आहे तुमचे.. 

त्या बाईने फक्त हाताने इशारा करून दाखवला तसे ते त्या दिशेने पाहू लागले. ती बाई स्मशानात कडे बोट दाखवून सांगत होती की ते तिचे घर आहे. आजोबांना सगळा प्रकार लक्षात आला आणि काही न बोलता त्यांनी सरळ चाल मांडली. पुन्हा चित्र विचित्र आवाज येऊ लागले. पण आजोबांनी एकदाही मागे वळून पाहिले नाही. ती त्यांना सतत आवाज देत म्हणत होती की मला मुक्ती द्या.. मला सोडवा यातून.. पण आजोबा वस्तीच्या दिशेने चालतच राहिले. त्यांना तिच्या घेऱ्या तून जमेल तितक्या लवकर बाहेर पडायचे होते. 

काही वेळा नंतर तो आवाज हळु हळू कमी होत एकदाचा बंद झाला. ते धावत च घरी आले आणि जोर जोरात दार वाजवू लागले. घरचे सगळे जागे झाले आणि त्यांना विचारू लागले की काय झाले. पण भीतीने त्यांच्या तोंडातून शब्द च फुटत नव्हता. रात्री त्यांना खूप ताप भरला होता. काही दिवसानंतर त्यांची तब्येत सुधारली तसे त्यांनी त्या रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्या रात्री अमावस्या होती. आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून त्यांच्याच गावातली कमला नावाची एक बाई होती. तिच्या नवऱ्याने विष देऊन तिला मारून टाकले होते. तेव्हा पासून गावातल्या कित्येकांना ती त्या माळावर दिसते..

अनुभव क्रमांक २

गोष्ट साधारण ४ वर्षांपूर्वीची म्हणजे २०१६ ची आहे. डिसेंबर महिन्यातली. माझी आत्या. मनाने खूप चांगली, स्वभावाने अगदी प्रेमळ. नेहमी सगळयांना मदत करायची, सुखात दुःखात नेहमी असायची. पण एके दिवशी अचानक हृदय विकाराच्या झटक्याने ती गेली. तिचे जाणे अकस्मात होते त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. काही दिवस नात्यातले सगळेच खूप दुखी होते. पण हळु हळू सगळे यातून सावरले. 

माझ्या आत्याचे घर शेजारी च होते. पण आत्याकडे अगदी कमी जायचो. माझ्या घरच्यांचे तिच्या घरी नेहमी येणे जाणे असायचे. त्या दिवशी माझ्या घरातले सगळे बाहेर गावी गेले होते. म्हणून आत्याचा मोठा मुलगा माझ्या घरी होता. दुपारी तो मला म्हणाला की माझ्या घरून एक डायरी आणून देशील का. तसे मी त्याला हो म्हणालो आणि शेजारी त्याच्या म्हणजे माझ्या आत्याच्या घरी गेलो. त्याने ती डायरी कुठे ठेवली आहे ते सांगितले होते.

का कोण जाणे पण मला त्या घरात गेल्यावर खूप भीती वाटत होती. कदाचित आत्त्या गेल्यावर मी घरी पहिल्यांदाच आलो होतो म्हणजे घरात कोणीही नसताना. समोर आत्त्याचा फोटो लावला होता. सांगितल्याप्रमाणे मी डायरी शोधू लागलो तसे मला जाणवले की घराचा दरवाजा आपोआप बंद होतोय. पण मी दुर्लक्ष केलं आणि डायरी शोधत राहिलो. ४-५ मिनिटांत मला ती डायरी सापडली तसे मी बाहेर जायला निघालो. पण समोर पाहतोय तर काय घराचा दरवाजा अगदी पूर्ण बंद झाला होता. जुन्या घराचा दरवाजा वाऱ्याने बंद झाला असता तरी असा इतका घट्ट कधीच लागला नसता.

मी कसलाही विचार न करता आत्याच्या फोटो समोर उभा राहिलो आणि हात जोडून म्हणालो “मला खूप भीती वाटतेय.. माझे काही चुकले असेल तर मला माफ करा”.. तितक्यात मला माझा केसांवर कसलासा स्पर्श जाणवला तसे मी मागे वळून पाहिले पण कोणीही नव्हते. मी पुन्हा वळलो आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. समोर माझी आत्या उभी होती. माझ्या कडे पाहत एक गोड स्मित हास्य करत नजरे समोरून दिसेनाशी झाली. मी तिथेच भोवळ येऊन बेशद्ध पडलो. 

बऱ्याच वेळाने आत्याचा मुलगा तिथे आला आणि मला त्याने शुध्दीवर आणले आणि पुन्हा माझ्या घरी घेऊन आला. दुसऱ्या दिवशी मी सगळ्यांना हा प्रकार सांगितला पण कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. नंतर मला आठवले की ती जाण्याच्या एक दिवस आधी मला घरी बोलवत होती. तिने खाण्यासाठी काही तरी बनवले होते. पण खेळण्याच्या नादात मी तिच्याकडे जाणे विसरूनच गेलो. मी तिचा सगळ्यात लहान लाडका भाचा होतो. कदाचित तिची शेवटची इच्छा मला पाहण्याची, मला भेटण्याची होती आणि ती अखेर पूर्ण झाली. 

Leave a Reply