अनुभव – अतुल मर्दे
आमचा एक गडप्रेमी डहाणू हा ग्रुप आहे आणि प्रत्येक महिन्यात शनिवार रविवारी आम्ही जवळपासच्या एखाद्या गड किल्ल्यावर ट्रेकिंग साठी जात असतो. यावेळी आम्ही निवडला होता तो नाशिकचा हरिहर गड. इंटरनेट वर गडा बद्दल ची सगळी माहिती काढून आम्ही २८ सप्टेंबर २०१८ रोजी शनिवारी दुपारी निघायचे ठरवले. हरिहर गडाच्या पायथ्याशी मुक्काम करायचे आणि आणि रविवारी सकाळी ७ वाजता हरिहर गड सर करून संध्याकाळी घरी परतायचे असा बेत पक्का केला.
सर्व गोष्टींचे व्यवस्थित नियोजन केले. रात्री राहायचे असल्याने नाश्ता, जेवण यासाठी लागणारे पुरेसे साहित्य वैगरे घेऊन निघालो. डहाणू हून दुपारी २.३० ला निघालो. आम्ही एकूण २० जण होतो. डहाणू – चारोटी – जव्हार – मोखाडा असा प्रवास करत आम्ही हरिहर गडाच्या जवळ पोहोचलो. गड अगदी समोर दिसत होता पण रस्ता अगदी अनोळखी होता आणि त्यात जंगल पट्टीचा परिसर त्यामुळे गुगल मॅप चालू करून आम्ही गडाच्या दिशेने जात होतो. सप्टेंबर महिना असल्यामुळे लवकरच अंधार पडायला सुरुवात झाली होती. संध्याकाळचे ६ वाजत आले होते.
काही वेळात आम्ही कच्च्या रस्त्याला लागलो. तो रस्ता अगदी निर्मनुष्य होता. आसपास कोणतीही वस्ती नव्हती त्यात त्या रस्त्यावर आमच्या वाहना शिवाय एकही वाहन दिसत नव्हते. मोबाईल GPS मधला बाण लुकलुकत होता तर मध्येच थांबत होता. सेट केलेले ठिकाण अजुन ५ किलोमीटर आहे असे दाखवत होता. आमची गाडी खूप पुढे आली होती. बाकी ३ गाड्या चहा नाश्ता करण्यासाठी थांबल्यामुळे बऱ्याच मागे पडल्या होत्या. मी त्यांना फोन करायचा प्रयत्न केला पण त्या भागात नेटवर्क अगदी लो असल्याने कोणत्याच मित्राला फोन लागत नव्हता.
हळू हळू अंधार अधिकच गडद होऊ लागला होता. रातकिड्यांची किर्र ऐकू येऊ लागली होती. आमच्यातला एक मित्र म्हणाला “आपण थांबू त्यांच्यासाठी”. पण त्या निर्मनुष्य रस्त्यावर थांबणे मला योग्य वाटले नाही तसे मी म्हणालो “मला वाटतं आपण इथे थांबणे बरे नाही, आपण हळू हळू पुढे जात राहू, एखादे गाव किंवा वस्ती दिसली की मग थांबू हवे तर.” हरिहर गडाचा पायथा तसा आम्हाला अगदी समोर दिसत होता पण तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्यामुळे आम्ही बरेच गोंधळलो होतो.
निरगुड पाडा गावाला वस्तीसाठी थांबण्यास ठरले होते. आम्हा सगळ्यांसाठी तो परिसर अनोळखी होता त्यामुळे कधी एकदा गावात येऊन पोहोचतो असे झाले होते. साधारण १० मिनिटांनी आम्हाला निरगुडपाडा गावाचा फलक दृष्टीस पडला. परंतु आसपास कोणतीही वस्ती दिसत नव्हती. आम्ही गाडी रस्त्याच्या थोड्या आतल्या बाजूला उतरवून पार्क केली. अगदी छोटे खेडेगाव असल्यामुळे हॉटेल किंवा लॉज मिळणे अशक्य होते. त्यामुळे राहण्यासाठी एखादी सुरक्षित जागा शोधू लागलो. सप्टेंबर महिना असल्यामुळे पाऊस भरपूर पडून गेला होता आणि त्यामुळे झाडी झुडूप बरीच वाढलेली दिसत होती. समोर भाताची शे ते चांगलीच बहरली होती.
माझे दोन मित्र रविभाऊ आणि रामदास भाऊ गाडीच्या बाहेर पडून राहण्यासाठी जागा शोधत होते तर बाकी आम्ही गाडीत बसून इतरांशी संपर्क करण्यासाठी प्रयत्न करत होतो. तितक्यात रविभाऊना नदीकिनारी गावाच्या बाहेर एक गोशाळा नजरेस पडली. आम्ही तिथेच राहायचे नक्की केले. लागलीच आम्ही त्या गोषाळे जवळ झाडा शेजारी गाडी पार्क केली. गोषाळेभोवती काटेरी कुंपण घातले होते. आम्ही कुंपणाचा गेट उघडला तसा करर कन आवाज आला. असे वाटले की या ठिकाणी कोणी येत नसावे किंवा हा अगदी कमी वापरतला असावा. गेट चा आवाज ऐकून एक चाळिशी ओलांडलेला माणूस बाहेर आला.
रामदास भाऊंनी त्याच्या जवळ चौकशी केली की “दादा आम्ही सकाळी हरिहर गडावर जाणार आहोत तर आजची रात्र इथे राहू शकतो का?” तसे तो माणूस म्हणाला “हो.. हो.. अगदी आरामात रहा. मी या गावचा सरपंच आहे. माझं नाव कृष्णा गुरव.” आम्हाला जरा शंका आली की इथे आसपास कोणतीही वस्ती नसताना हा एकटा या गोषाळेत काय करतोय. पण नंतर विचार केला की जाऊदे ना आपल्याला काय फरक पडतोय, एका रात्रीचा प्रश्न आहे, आजची रात्र संपली की आपण आपल्या मार्गाला तो त्याच्या मार्गाला.
आम्ही सगळे खुश होतो कारण मनासारखी जागा मिळाली होती. बाजूला
गोड्या पाण्याची विहीर होती. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नव्हते. तितक्यात आमच्या सोबत असलेल्या ३ गाड्या ही मार्ग काढत त्या ठिकाणी येऊन पोहोचल्या. आम्ही गाडीतले सामान काढले आणि सामानाची आवरा आवर करू लागलो. आमच्यातल्या एका मित्राने म्हणजेच तुषार भाऊने तर तिथे असलेल्या खाटेवर मस्त ताणून दिली. बाकी सर्व जण जेवणाच्या तयारीला लागलो. तितक्यात रामदास भाऊंनी त्या माणसाला म्हणजेच कृष्णा गुरव यांना जेवणासाठी कुठे लाकडे मिळतील का हे विचारले. तसे ते म्हणाले “हो.. हो.. मिळतील की”. त्यांनी कुठून कसे जायचे ते सांगितले. तसे आमच्यातल्या विकास आणि अमोल ला गावात पाठवले.
आम्ही चूल पेटवण्यासाठी तयारी करू लागलो. काही वेळातच ते दोघे परतले. साधारण ८ वाजत आले होते. आमच्या गप्पा सुरूच होत्या. तासाभरात सगळे जेवण तयार झाले. ९.३० च्या दरम्यान आम्ही सगळ्यांनी जेवणावर ताव मारला. आमच्या सोबत सरपंच कृष्णा भाऊ ही जेवायला बसले. आता वातावरणात चांगलीच गूढता आली होती. मी आजूबाजूला नजर फिरवली. सगळी कडे गडद अंधार दाटला होता आणि त्यातच वाऱ्यामुळे झुडपांची होणारी सळसळ अंगावर शहारे उभे करत होती. नदीच्या पलिकडे गावातील स्मशान होते आणि तिथे चितेवर एक प्रेत जळत होते. त्यातच नदीच्या पाण्याचा खळ खळ नारा आवाज.
आम्ही शेकोटी भोवती बसलो होतो. तितक्यात सरपंच कृष्णाजी यांनी हरिहर गदाबद्दल एक एक भयानक किस्से सांगायला सुरुवात केली. तसे आमच्यातले काही जण भलतेच घाबरले. तितक्यात माझ्या बाजूला काही मित्र आप आपसात कुजबुजत होते की कृष्णाजी कोणी मनुष्य नसून एक प्रेतात्मा आहेत. एका कडून दुसऱ्या कडे असे करत करत सगळ्यांना ही गोष्ट कळली. कोणी हसण्यावर नेल तर काही जणांची टरकली. साधारण एक दीड तास गोष्टी केल्यावर आमच्यातल्या एक एक जण काढता पाय घेऊ लागला. तसे कृष्णा भाऊंसोबत आम्ही फक्त ३ जण उरलो. मी, रवी आणि रामदास भाऊ..
एव्हाना १२ वाजून गेले होते. तितक्यात आमच्या गेट जवळ कसलीशी चाहूल जाणवली. मी पाठमोरा बसलो होतो त्यामुळे मागे वळून पाहिले. पण अंधार असल्यामुळे नीटसे काही दृष्टीस पडले नाही. पुढच्या क्षणी त्यांच्या हातात असलेल्या मशालींमुळे आम्हाला दिसले की ते २-३ जण खाकी वर्दीतील होते, हातात अगदी जुन्या काळातल्या बंदुका होत्या. गोरापान वर्ण. ते इंग्रजीत ओरडू लागले “अरेस्ट हिम, कील हिम”. त्यांचा आवाज ऐकताच कृष्णा भाऊ उठून धावत शेतात पळून गेले. काही क्षणासाठी काय घडतेय हेच कळत नव्हते. ते दोघे तिघे आमच्या समोरून धावत त्यांच्या मागे शेतात निघून गेले. जसे त्यांनी आम्हाला तिथे बसलेले पहिलेच नाही.
आम्ही एकमेकांकडे घाबरत पाहू लागलो तितक्यात गोळी झाडण्या च्या आवजासोबत एक वेदनेने भरलेली किंचाळी ऐकू लागली. बहुतेक त्या वर्दीतल्या लोकांनी कृष्णा भाऊंना जिवानिशी मारले. आता मात्र आमची अवस्था बिकट झाली. समोर नदिपलीकडे जळणारी चीता आता शांत झाली होती फक्त निखाऱ्याचा उजेड दिसत होता. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्या दोन्ही आवाजामुळे सगळे उठतील असे वाटले पण तसे काहीच झाले नाही. आमच्या तिघांव्यातिरिक्त सगळे गाढ झोपले होते जसे काही झालेच नाही. त्या शेतात जाऊन नक्की काय झाले हे पहायची कोणाचीही हिम्मत होत नव्हती.
घडलेल्या प्रकारामुळे झोप लागणे अशक्य होते. शेवटी आम्ही सकाळ व्हायची वाट पाहत तसेच डोळे मिटून पडून राहिलो. पहाटे अर्ध्या तासापूर्ती झोप लागली असावी तितक्यात मित्राच्या हाकेने जाग आली. ६ वाजले होते. सगळे जण गड चाधायच्या तयारीला लागले होते. माझे डोळे उघडले आणि पुन्हा रात्रीचा प्रसंग आठवला तसे मन सुन्न झाले. मी, रवी आणि रामदास भाऊ आम्ही तिघे मात्र एकमेकांकडे बघून शांत होतो. घडलेला प्रकार सांगावा की नाही याच विचारत होतो. पण आम्ही तो विषय तेवढ्यापुरता टाळला.
सकाळी ७ वाजता सगळे आटोपून आम्ही गड चढायला सुरुवात केली. पायवाटेने चालताना एका वस्तीजवळ येऊन थांबलो आणि चौकशी केली. त्यांनी आम्हाला कुठून आलात वैगरे माहिती विचारली तसे आम्ही म्हणालो की काल संध्याकाळी आम्ही डहाणू हून इथे आलो आणि त्या पडीक गो शाळेत राहिलो. तेव्हा गावकऱ्यांनी जे सांगितले ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले की तुम्हाला रात्री भेटलेला कृष्णा गुरव हा कोणी सरपंच वैगरे नाही. त्यांनी गावातल्या सरपंचांना बोलवून त्यांची ओळख करून दिली की हे बापूजी गुहे हे या गावचे सरपंच आहेत. तुम्हाला भेटलेला कृष्णा गुरव हा हरिहर गडाचा किल्लेदार होता. त्याला गड वर परिसर सांभाळण्याची जबाबदारी होती. पण १८१९ साली इंग्रजांनी हरिहर किल्ल्याचा ताबा मिळवला आणि किल्लेदार कृष्णा गुरव ला शोधत गावात आले. पळत असताना तुम्ही काल राहिलेल्या गो शाळेच्या परिसरात त्यांना जिवानिशी मारले. तेव्हा पासून त्या ठिकाणी त्याचा आत्मा फिरतो. तुम्ही गड प्रेमी आहात त्यामुळे शिवाजी महाराजांचे मावळे समजून त्याने तुम्हाला काहीही केले नाही. उलट तुम्हाला मदत केली. यापूर्वी गो शाळेत राहिलेली व्यक्ती आजपर्यंत कोणाला दिसली नाही.
आता मात्र मला रात्री घडलेल्या प्रसंगाचा उलगडा झाला होता. जे खाकी वर्दित दिसले ते इंग्रज अधिकारी होते जे त्यांना मारायला आले होते. आमचे इतर मित्र सगळे विसरून पुढे चालत जात होते. पण आम्ही तिघे मात्र अजुन त्याच विचारात होतो. हरिहर गडावर महादेवाचे मंदिर आहे. तिथे आम्ही कृष्णा गुरव यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली व संध्याकाळी गड उतरून डहाणू ला रवाना झालो. आजही हरिहर गडाच्या पायथ्याशी नदीकिनारी ती पडीक गोशाळा अस्तिवात आहे पण तिथे रात्री कृष्णा गुरव चा आत्मा फिरतो की नाही हे तपासायला पुन्हा कोण जाणार ??..
Katha khup Sundar prakare madali aahe
Chan👌