गोष्ट आहे डिसेंबर २०२० मधली, माझ्या एका मित्राच्या बहिणीचे लग्न होते. जे गावाला होते. तेव्हा लॉक डाऊन शिथिल झाले होते त्यामुळे आम्हाला लग्नाला जाणे शक्य झाले. आम्ही सर्व मित्र मैत्रीण मिळून लग्नासाठी ३-४ दिवस गावी जाण्याचा प्लॅन केला. इ पास वैगरे तोपर्यंत मिळाला होता. आम्ही जाण्याची सोय केली कारण सगळे मिळून आम्ही जवळपास १२ जण होतो. आमच्या सोबत एक जोडप ही होत – सतीश आणि प्रिया. नियोजनाप्रमाने आम्ही सगळी तयारी करून लग्नाच्या २ दिवस आधी त्याच्या गावी पोहोचलो. लग्न घरात सगळ्यांना राहणे शक्य नसल्यामुळे आम्ही सगळी मित्र मंडळी शेजारच्या एका घरात वरच्या मोठ्या खोलीत राहायला होतो. खोली बरीच मोकळी आणि प्रशस्त होती. गावाचा परिसर असल्यामुळे आजूबाजूला घर अगदी तुरळक होती. पण लग्न कार्य असल्यामुळे तो परिसर गजबजून गेला होता. मित्र मंडळी सोबत असल्यामुळे २ दिवस कसे निघून गेले कळलेच नाही. लग्न कार्य, सगळे विधी सुरळीत पार पडले. आम्ही अजून १-२ दिवस राहायचा प्लॅन करूनच आलो होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वांनी रात्री जागून गप्पा मारायचा बेत आखला. जेवणं आटोपल्यावर बाहेर आलो आणि शेकोटी पेटवली. डिसेंबर चा महिना आणि त्यात गावाकडचे वातावरण त्यामुळे हवेत बराच गारवा पसरला होता. आणि अश्या वेळी शेकोटी करून त्याची ऊब घेणं म्हणजे एक वेगळीच मजा. ज्यांनी हा अनुभव घेतला असेल त्यांनाच त्याचे महत्त्व कळेल. जवळपास रात्री १ पर्यंत आमच्या गप्पा सुरू होत्या. 

लॉक डाऊन च्या काळात जास्त भेटी गाठी होत नसल्यामुळे त्या गप्पा खूपच रंगल्या होत्या. १ वाजे नंतर आम्ही वर खोलीत आलो पण तरीही आमच्या गोष्टी सुरूच होत्या. आमच्यातल्या एकालाही झोप आली नव्हती. त्यामुळे एका मागोमाग एक विषय निघत होते, कधी हशा पिकत होता तर कधी सगळे गंभीर होत. तितक्यात सतीश म्हणाला की मी जरा बाथरूम ला जाऊन येतो. गावातले घर असल्यामुळे घराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर ते टॉयलेट वजा बाथरूम होते. आणि एक विचित्र गोष्ट सांगायची झाली तर तो परिसर गडद अंधाराने व्यापला होता. म्हणजे त्या घराच्या वरच्या खिडकीतून खाली डोकावून पाहिले तर मागे काही आहे की नाही ते ही दिसणार नाही इतका अंधार. आजूबाजूला झाडी झुडूप होती. सतीश आम्हाला सांगून एकटाच निघून गेला. त्यावेळी आम्हाला काही इतके वाटले नाही. गप्पा गोष्टी करता करता पाऊण तास झाला पण सतीश काही आला नाही. त्याच्या प्रेयसीला म्हणजे प्रिया ला त्याची काळजी वाटू लागली. म्हणून तिने आम्हाला विचारले “अरे सतीश कधीचा गेला आहे, अजुन आला नाही, तुम्ही खाली जाऊन बघून येता का, मला त्याची खूप काळजी वाटतेय..” तिला हो म्हणत माझे ३-४ मित्र खाली जायला निघाले. बाहेरचा मिट्ट अंधार पाहून त्यांची ही जरा तंतरली. अनोळखी परिसर असल्यामुळे त्यांना भीती वाटणे साहजिक होते. पण तरीही ते गेले. टॉयलेट जवळ जाऊन बाहेर थांबले आणि त्याला हाक दिली. “सतीश.. अरे किती वेळ.. प्रिया वाट बघतेय तुझी..”. त्याचा आतून काहीच प्रतिसाद आला नाही. 

तसे मित्रांनी पुन्हा हाक दिली “अरे सतीश आहेस की नाही आत.. हाकेला ओ तर दे.. आम्हाला कसे कळेल.. बराच वेळ झाला यार..” वातावरणात एक वेगळीच शांतता पसरली होती. मित्र त्याच्या प्रतिसादाची वाट पाहत तिथेच अंधारात उभे होते. तितक्यात त्याने आतून आवाज दिला तसे ते मित्र वर आले. अवघ्या ५ मिनिटात ते खाली जाऊन त्याला विचारून वर आले. आम्हाला म्हणाले “अरे टॉयलेट मध्येच आहे तो, आम्ही त्याला आवाज दिला, काही काळजीच कारण नाही..” तसे आम्ही रिलॅक्स झालो. काही वेळानंतर तो वर आला. आल्या आल्या आम्ही त्याला विचारले “अरे इतका वेळ काय करत होतास आत..” आणि त्याची मजा घेऊ लागलो, टर उडवू लागलो. पण तो तोंडातून एक शब्दही काढत नव्हता. अतिशय शांत, गंभीर आणि चेहऱ्यावर कसलेच हावभाव दाखवत नव्हता. रागात होता असे वाटत होते. तेवढ्यात माझे लक्ष त्याच्या पायांकडे गेले. त्याच्या पायाला घुढग्या जवळ खरचटले होते. जणू त्याचा पाय कुठे तरी घासला असावा किंवा तो पडला असावा. त्यातून रक्त ही येत होते. ती जखम अगदी ताजी होती म्हणजे अवघ्या काही वेळापूर्वी झाली असावी. आम्ही त्याला विचारले “अरे, हे पायाला काय लागले.. कुठे पडलास का?” तेव्हा त्याने पाहिले आणि फक्त एकच वाक्य म्हणाला “मला माहित नाही..” आम्हाला थोडे विचित्रच वाटले. तसे आम्ही पुन्हा विचारले पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. शांत बसून राहिला होता आणि कसल्या तरी भलत्याच विचारात होता. मी त्याच्याकडे च पाहत होतो. अधून मधून चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. 

त्याचे असे विचित्र वागणे पाहून आम्हा सर्वांना शंका येऊ लागली की काही तरी अभद्र नक्कीच घडले आहे. माझ्या मनात हे विचार चालू असतानाच एक मित्र जवळ येत हळूच कानात पुटपुटला ” सतीश च हे वागणं साधं दिसत नाही, बहुतेक याला बाहेरचं काही झालं तर नसेल..” त्याच हे बोलणं प्रिया ने सुद्धा ऐकले कारण ती बाजुलाच बसली होती. तेव्हा तिला ही तसेच वाटू लागले. आम्ही ठरवले की सतीश ला आता जास्त काही न बोलता सरळ झोपून जाऊया. पण खोलीतला लाईट बंद करायची कोणाची हिम्मत होत नव्हती. त्याच्या अश्या गूढ वागण्याने सगळ्यांना च जरा भीती वाटत होती. अश्या वेळी जरी सगळे सोबत असले तरीही अनोळखी ठिकाणी रात्र काढणे साधे नव्हते. आमच्यातल्या एकाने हिम्मत करून उठून लाईट बंद केला आणि अंथरुणात येऊन झोपला. त्या खोलीला दोन मोठ्या खिडक्या होत्या पण मागच्या बाजूला कोणतीही वस्ती, घरे नसल्यामुळे बाहेर अंधार होता. त्यामुळे खिडकीतून बाहेर चा प्रकाश ही येत नव्हता. खोलीत अंधार पसरला होता. अगदी बाजूला कोण झोपले आहे हे सुद्धा दिसत नव्हते. अंदाजे २५-३० मिनिट झाले असतील, खोलीत कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येऊ लागला. आम्ही जमिनीवर आंथरूण करून झोपल्यामुळे त्या पावलांची कंपने मला स्पष्ट जाणवत होती. एव्हाना मला धूसर दिसू लागले होते. कारण आपण बऱ्याच वेळ अंधारात राहिल्यावर आपल्या दृष्टीला थोडे का होईना पण दिसायला सुरुवात होते. माझे ही तसेच काहीसे झाले होते. मी आजूबाजूला पाहत अंदाज घेतला पण आमच्यातले कोणीही उठले नव्हते. सगळे गाढ निद्रेच्या आहारी गेले होते. 

मला त्या आवाजाने राहवले नाही म्हणून मी माझ्या बाजूला झोपलेल्या मित्राला हळूच म्हणालो ” ऐक ना.. कोणी तरी चालण्याचा आवाज ऐकू येतोय का तुला..?” त्यावर तो म्हणाला ” अरे झोप आता.. काही बोलू नकोस.” मी ही जास्त विचार न करता झोपून गेलो. डोळे उघडले तेव्हा उजाडले होते. मी उठून पहिला प्रश्न विचारला “तुम्हाला रात्री कोणी आपल्या खोलीत चालत आहे असे वाटले का..?” त्यावर प्रिया म्हणाली “हो.. मला सुद्धा रात्री अस जाणवलं, पण वाटल की भास होतोय म्हणून मी दुर्लक्ष करून झोपून गेले..”. सतीश अजूनही गाढ झोपेत होता. त्याच्या उठण्याची वाट पाहू लागलो. तो उठल्या उठल्या आम्ही जरा अंदाज घेतला आणि त्याला कालचा किस्सा विचारायला सुरुवात केली पण त्याला काहीच आठवेना. माझे लक्ष त्याच्या पायावर गेले. त्याच्या पायावरची जखम मी दिसेनाशी झाली होती जस त्याला काही झालेच नव्हते. ते पाहून आम्ही सगळेच जण आश्चर्यचकित झालो. काल रात्री नक्की काय घडलं हेच समजत नव्हत. भास तर नक्कीच नव्हता कारण इतक्या लोकांना एकच वेळी एकच भास कसा होईल. मला कळून चुकले होते की हा काही साधा प्रकार नाही. आम्ही त्या दिवशी मित्राच्या घरी किंवा गावात या घटनेबद्दल कोणालाही सांगितले नाही. तो विषय आम्ही तिथेच सोडून दिला आणि त्या बद्दल नंतर कधी बोललो नाही. 

Leave a Reply