लेखिका – रुदघा

रात्र अमावस्यसेची,चहुदिशांना काळोखाने व्यापून टाकले होते.मी आणि माझा मित्र कामानिमित्त सकाळीच गावाबाहेर पडलो होतो . आमच्या येथे मानले जाते कि अमावस्येला महत्त्वाचे काहीएक काम असेल तर करावे ; ते काम पूर्ण होते व लाभही होतो . सगळं जग अमावस्येचा दिवस वाईट मानत असले तरी आमच्या गावची प्रथा निराळीच!!असो … याच प्रथेनुसार माझे अत्यंत महत्त्वाचे असे जमिनीचे काम करण्यासाठी म्हणून मी व माझा मित्र बाहेर पडलो होतो . काम तर पूर्ण झालेच पण तेथून निघायला बराचसाच उशीर झाला .

मी ,माझा मित्र रघु आणि आमची सायकल असे आम्ही गावाकडे परतीच्या प्रवासाला लागलो.रात्र होती अमावास्येची पण आम्ही होतो तरुण निडर ना कशाची चिंता ना भीती ..

रात्रीचे साधारण सव्वाअकारा वाजले होते . आमचे दोघांचेही घर गावाच्या वेशीपासून बऱ्याच लांब पल्ल्यावर होते . अशातच अगदी गावाच्या वेशीवर सायकलची चेन खराब झाली , ती परत जोडली जाईना.इथपर्यंत आम्ही डबलसीट प्रवास केला होता.पण आता चालत जाणे भागच होते . घड्याळात साडेअकरा होऊन गेले होते.मला उगीचच कसेतरी वाटू लागले , पण मी राघूला काहीही बोलून दाखवले नाही.आम्ही माळावरच्या कच्च्या रस्त्याने जायचे ठरवले . कारण तो रस्ता जरी खराब असला तरी घरी लवकरात लवकर पोहोचण्याच्या दृष्टीने योग्य होता .

मी आणि रघु गप्पा मारत चाललो होतो. रघु अखंड बडबडत होता कोण जाणे माझं लक्ष त्याच्या बोलण्याकडे नव्हतेच मुळी…

आणि आम्ही त्या माळावरच्या रस्त्याला लागलो.माळावर झाडांची प्रचंड दाटी होती , त्यातच तो काळाकुट्ट अंधार , रातकिड्यांची चाललेली प्रचंड आणि कर्णकर्कश्श किरकिर , घुबडांचे घुत्काराने – कोल्हाकुत्र्यांचे रडणे अगदी स्पष्टपणे ऐकू येत होते , सोबतीला तो माळावरचा रानटी वारा झाडांमद्ये – गवतामद्ये शिरून रात्र अजूनच भयानक भासवत होता.इतका वारा असूनही थंडी भासत नव्हती , हवेत एक वेगळाच प्रकारची उब जाणवत होती , आणि या सगळ्याकडे उगीचच माझे लक्ष जात होते .

हे माझ्या बाबतीत पहिल्यांदाच घडत होतं .

थोडे पुढे गेल्यावर गावची स्मशानभूमी लागणार होती , स्मशानभूमी समोरूनच हा कच्चा रस्ता जात होता . साधारण सात एक फूट पल्ला असेल.

स्मशानाशेजारी आल्यावर रघुचे बडबडने अचानक थांबले.

मी त्याच्या कडे हळूच एक कटाक्ष टाकला , आमची नजरानजर झाली . बस्स आम्ही मुकाट्याने पुढे चालू लागलो . माळावरचे चित्रविचित्र आवाज , आमच्या पावलांचा आवाज आणि खडकामध्ये चालवल्या मुळे होणारा सायकलचा आवाज एवढेच काहीएक ऐकू येत होते . थोडेसे पुढे आल्यावर स्मशानभूमीत प्रेत जळत असल्याचे दिसले . जवळपास कुणीच नव्हते , बहुतेक सर्व विधी झाले असावेत . रघु म्हणाला ” ह्या: कुणालातरी देवाज्ञा झाली बघ ” मी त्याच्याकडे पाहिले ,आमची नजरानजर झाली , मी आवंढा गिळला काहीच न बोलता समोर पाहून चालू लागलो . एवढ्यात …..माझ्या आणि रघु भोवती हळूहळू एक पांढरे वलय निर्माण होऊ लागले आम्ही दोघांनिही जाणले की काहीतरी विपरीत घडत आहे , आम्ही झपाझप पावले टाकीत चालू लागलो . जसजसे आम्ही पुढे चाललो तसतसे ते वलय अधिकाधीक गडद गडद होऊ लागले . स्मशानाभूमीचा रस्ता संपेपर्यंत ते वलय गडद होते नंतर हळूहळू ते फिकट होऊन लुप्त झाले . मला दरदरून घाम फुटला होता, माझी वाचाच बंद झाली होती , मनात नाहीनाही ते विचार येत होते , माझी पावले एखाद्या यंत्रमाणवाप्रमाणे वेगाने पुढे चालली होती , सर्वांग थरथरत होते . मी अतिशय हिम्मत करून रघुकडे पाहिले त्याचीही तीच अवस्था झाली होती.

बापरे…

काय होते ते..??

आम्ही तोंडातून एकही ‘ब्र’ न काढता होईल तितक्या वेगाने पुढे चालू लागलो . मनात-डोक्यात फक्त देवाच्या नावाचा जप सुरू होता .थोडया वेळाने आम्ही वस्तीच्या शेजारील तिखटण्याला (जिथे तीन रस्ते येऊन मिळतात अशी जागा) लागलो . पुढे गेलो तर अस्पष्ट आकृती आम्हाला दिसली , कुणीतरी झाडाच्या फांदीला गळफास घेतला होता. प्रेताच्या ओझ्यामुळे झाडाची फांदी अक्षरशः वाकली गेली होती आणि प्रेत गुडघ्यातून पाय वाकून जमिनीला लागावे असे लटकत होते . आम्ही थोडे पुढे जाऊन निरखून पाहण्याचा प्रयत्न केला आणि आमची बोबडीच वळली. शरीरातून सगळा त्राणच निघून गेल्यामुळे माझ्या हातून सायकल निसटली .

ते लटकलेलं प्रेत पूर्ण पांढरशुभ्र होतं , प्रेताच्या ओझ्यामुळे ते लोंबकळत होत खरं पण त्याला खालून पायाच नव्हते,ते पाय जमिनीत आरपार गेल्यासारखे जाणवत होते आम्हाला कळून चुकले ते खरोखरचे प्रेत नसून एक भयानक आत्मा आहे.

बापरे। माझी आणि रघु ची शेवटची नजरानजर झाली आणि आम्ही दोघेही जिवाच्या आकांताने पळत सुटलो ते थांबलो घरी गेल्यावरच….

तब्बल महिनाभर आम्ही दोघे अंथरुणावर पडून होतो . पण ही गोष्ट आमच्या दोघातच राहिली आयूष्यभर………

नाही नाही कदाचित तिघांत …….

Leave a Reply