अनुभव – ऋषिकेश भोकरे
२०१२ ची गोष्ट आहे. आम्ही तेव्हा एका नवीन ठिकाणी राहायला आलो होतो. मी तेव्हा १७ वर्षांचा असेन. मी ज्या बिल्डिंग मध्ये राहत होतो त्याच्या उजव्या बाजूला एक नदी आहे आणि त्या नदीला लागून एक स्मशान भूमी आहे. म्हणजे माझ्या बिल्डिंग पासून अगदी काहीश्या अंतरावर. नदीवरून पलीकडे जायला एक लहान पुल आहे. त्या पुलावरून पलीकडे गेले की नदीच्या दुसऱ्या बाजूला ही एक स्मशान भूमी आहे. आम्ही त्या बिल्डिंग मध्ये साधारण २ वर्ष राहिलो. त्या पुलावर विजेचे खांब नव्हते म्हणून रात्री तो संपूर्ण अंधारात असायचा. पुलाच्या एकदम टोकाला एक खांब होता आणि त्याचाच थोडा फार प्रकाश त्या रस्त्यावर पडायचा. त्या रात्री घरी जेवण तयार होते पण मला मात्र अचानक नॉन वेज चायनीज खायची इच्छा झाली. म्हणून मी ठरवले की जाऊन पार्सल आणायचे आणि घरी येऊन निवांत बसून खायचे.
मी घरी सांगून बाहेर जायला निघालो तसे माझे वडील मला ओरडले आणि म्हणाले “आता कुठे चाललास बाहेर.. घरी सगळे जेवण केलंय.. आता अचानक हे मध्येच चायनीज खायचे कुठून सुचले..” त्यांचे बोलणे न जुमानता मी घरातून बाहेर पडलो. खूप रात्र झाली नव्हती, ८ वाजून गेले होते. मुख्य रस्त्याने फिरून जाण्याऐवजी मी आतल्या स्मशान भूमीच्या रस्त्याने चालत गेलो आणि तिथून त्या पुलावरून मग पलीकडे जाणार होतो. गावाचा परिसर असल्यामुळे अंधार पडला की लगेच सगळे सामसूम व्हायला सुरुवात होते. त्यामुळे रस्त्यावर मोजकी लोक दिसत होती. त्या स्मशान भूमी जवळून चालत मी पुढे त्या पुलावर आलो आणि तितक्यात मला मागून माझ्या नावाने हाका ऐकू आल्या. आवाज तसा बराच लांबून येत होता. माझ्या वडिलांचा आवाज होता. मी त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं आणि तसाच पुढे निघालो. मागे वळून पाहिलं ही नव्हती कारण मला वाटले की वडील उगाच हाक मारत असतील. घरी आल्यावर बोलेन काय ते.. पण काही पावले पुढे जात नाही तितक्यात पुन्हा मागून वडिलांची हाक ऐकू आली.
पुलावर नेहमी प्रमाणे खूप अंधार होता. मी सरळ चालत राहिलो. काही वेळात मी हॉटेल मध्ये पोहोचलो, पार्सल घेतले आणि पुन्हा घरी यायला निघालो. येताना माझ्या हातात पिशवी होती आणि त्यात नॉन वेज होत. त्या पुलावर आलो तसे मला जाणवले की मझाय मागून कोणी तरी चालत येतय. पावलांचा आवाज स्पष्ट येत होता. आता मात्र मी जरा घाबरलो. मी पुलाच्या मधोमध आलो तसा तो आवाज आता माझ्या मागे अगदी जवळून येऊ लागला. माझ्या कानाजवळ मोठमोठ्याने श्वास घेण्याचा तो आवाज ऐकून हृदयचे ठोके वाढले. मी माझ्यात चालण्याचा वेग वाढवला. प्रचंड भीती वाटत होती म्हणून मी हनुमान चालीसा म्हणू लागलो. शेवटी मी त्या पुलावरून धावतच सुटलो. त्या पुलावरून जाताना काही च नव्हत वाटले पण येताना माझी चांगलीच तंतरली होती. पुढच्या काही मिनिटात मी घरी पोहोचलो. घरी आल्यावर मी वडिलांना विचारू लागलो की तुम्ही मला हाका का मारत होतात. तसे त्यांनी विचारले कधी हाका मारल्या..?
मी त्यांना म्हणालो की स्मशान भूमीच्या वाटेने मी पुलावर आलो तेव्हा तुम्ही मला बिल्डिंग खाली येऊन हाका मारल्या ना.. त्यावर ते म्हणाले की तू गेल्यापासून मी बिल्डिंग मधून बाहेर ही पडलो नाहीये. त्यांना बहुतेक कळले की माझ्या सोबत पुढे काय घडले असावे. त्यांचा बराच ओरडा खावा लागला. ते काळजी पोटी सांगत होते “त्या चायनीज पायी तुझ्या जीवावर बेतले असते हे. आणि गेलास तर फिरून जायचे होते ना, त्या आतल्या वाटेने का गेलास..” वडिलांचे बोलणे ऐकून मला माझी चूक कळली होती त्यामुळे आणलेले पार्सल मी फेकून दिले. मला वडिलांच्या आवाजात ज्या हाका ऐकू आल्या त्या हाका त्यांनी दिल्याचं नव्हत्या..