अनुभव – शबाना पठाण

घटना माझ्या आजोबा सोबत बऱ्याच वर्षांपूर्वी घडली होती. माझे गाव कोल्हापूर ला आहे. तो खूप जुना काळ होता आणि त्या काळी वीज नसायची. माझे आजोबा कामाला जात होते. कोल्हापूर च्या एका साखर कारखान्यात कामाला जायचे. तिथे वेग वेगळ्या शिफ्ट होत्या त्यामुळे कधी दिवसा जावे लागायचे तर कधी रात्री. कारखान्यात कामाला जाताना आणि येताना त्यांच्या सोबतीला मित्र असायचे म्हणजे तिथेच काम करताना बऱ्याच जणांशी ओळख झाली होती. हा प्रसंग जेव्हा घडला तेव्हा त्यांची नाईट शिफ्ट होती. तेव्हा आमच्या ठिकाणी एक जागा बाधित मानली जायची. आणि त्यामुळे रात्री अपरात्री त्या भागात कोणी फिरकायचे नाही. जर कोणी त्या भागात तून गेलेच तर त्यांना भयानक अनुभव यायचे. शक्यतो तिथून जाणे सगळेच टाळायचे पण काही नाईलाज झाला आणि त्या भागातून जावे लागले तर एक गोष्ट ठरलेली असायची.

जर काही दिसले तर त्यावर काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही. आपण पाहिलेच नाही अश्या आविर्भावात तिथून निघून जायचे. आणि हाच एक मार्ग होता त्या भयानक गोष्टी पासून वाचण्याचा. त्या काळी आमच्या भागात या बद्दल बरीच भीती पसरली होती. आजोबांच्या कामाला जाण्या येण्याच्या वाटेत नेमकी ती जागा होती आणि तिथून जाण्या शिवाय त्यांना दुसरा पर्याय नव्हता. एक गोष्ट चांगली होती की ते एकटे नव्हते. त्यांच्या सोबत त्यांचे कारखान्यातील मित्र ही असायचे. त्यांच्या मित्रांमध्ये एक जण दारू पिणारा होता. नाईट शिफ्ट संपली की घरी येताना तो दारू पित असे. त्या रात्री ही तसेच झाले. काम आटोपून शिफ्ट संपवून ते सगळे घरी यायला निघाले. 

त्या एका मित्राने दारू प्यायली होती त्यामुळे त्याला घेऊन ते घरी येत होते. ते त्या बाधित जागे जवळ जाऊ लागले तसे त्या दारुड्या मित्राला म्हणाले की काहीही न बोलता गप चूप चल आमच्या सोबत, त्याने मान डोलावली पण तो खूप नशेत होता. ते चालत त्या भागात आले तसे त्यांना एक म्हातारा माणूस उभा दिसला. सगळ्यांना शंका आली तसे फक्त एकमेकांना इशारा केला की काहीच न बोलता इथून पुढे चला. पण त्या दारू प्यायलेल्या मित्राने धुंदीत त्या म्हाताऱ्याला मुद्दामून एक लांबचा पत्ता विचारला. सगळे मित्र त्याच्याकडे घाबरून पाहू लागले.

तसे तो म्हातारा आ वासून एक वेगळाच आवाज करू लागला आणि त्याने पत्ता दाखवण्यासाठी हात लांब केला. त्याचा हात अतिशय लांब व जाड होता. तो भयानक प्रकार पाहून त्यांना कळून चुकले की हे काही तरी वेगळेच प्रकरण आहे. हे सगळे कळल्यावर मात्र ते धावत सुटले. या सगळ्या धावपळीत तो दारू प्यायलेला मित्र मागेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या मित्राची चौकशी केली तेव्हा कळले की तो खूप आजारी पडलाय. कदाचित घडलेल्या प्रकारामुळे त्याने धसका घेतला असावा. पण दुर्दैवाने अवघ्या दोन दिवसात तो मरण पावला.

Leave a Reply