अनुभव क्रमांक – १ – तरेश
माझी दहावीची परीक्षा संपली होती आणि मी एकदाचा निःश्वास सोडला. आता मला ओढ लागली होती ती आमच्या गावी जायची. गाव म्हंटले की गावाकडचे मित्र, त्यांच्या बरोबर रात्र भर चालणाऱ्या गप्पा, मस्ती, आमचे शेत आणि गोठा. गेले दोन ते तीन वर्ष आम्हाला गावी जात आले नव्हते त्यामुळे या वर्षी कधी एकदा गावी जातो असे झाले होते. परीक्षा आटोपल्यावर पुढच्या आठवड्यात आम्ही गावी जायचे पक्के केले. माझे काका काकू, त्यांची मुलगी, माझ्या घरचे सगळे आम्ही एकत्र च गावी जायला निघालो. जवळपास ३ वर्षांनी आम्ही गावी जात होतो त्यामुळे काय नवीन पाहायला मिळेल याची उत्सुकता मला जास्त होती. संपूर्ण दिवसाच्या प्रवासानंतर आम्ही एकदाचे गावी पोहोचलो. सुरुवातीचे दिवस अगदी मजेत गेले. पण नंतर नवीन काय करायचे याचा विचार करू लागलो.
त्या दिवशी सगळ्यांनी ठरवले की आमच्या घरा पासून काही अंतरावर असलेल्या आमच्या गोठ्यावर जायचे. ठरल्या प्रमाणे मी, काका, माझा मित्र आणि आमच्या घरी असलेला कुत्रा असे आम्ही जाऊन संध्याकाळी परत येऊ असे घरी सांगितले. पण आजोबांनी मात्र नकार दिला. मी खूप हट्ट केला पण तरीही ते ऐकत नव्हते. कारण विचारल्यावर ते चिडून म्हणाले “नाही जायचे बोलतोय ना मग नाही जायचे..” इतके म्हणून ते निघून गेले. शेवटी आई ला सांगून आम्ही तिथे जायला निघालो च. गोठा तसा घरा पासून बराच लांब होता म्हणून काका ने बैलगाडी काढली. मी जवळपास ३ वर्षांनी बैलगाडीत बसत होतो त्यामुळे खूप छान वाटत होत. साधारण अर्ध्या पाऊण तासात आम्ही गोठ्यात आलो. जेवण वैगरे घेऊन च निघालो होतो. तिथे गेल्यावर मस्त जेवलो, गप्पा झाल्या. आमच्या शेतात फेर फटका मारे पर्यंत संध्याकाळ होत आली.
आजोबांना कळण्या आधी आपण घरी पोहचायला हवे असा विचार करून आम्ही निघायची तयारी केली. सूर्य मावळतीला जाऊन हळु हळू अंधार पडायला सुरुवात झाली होती. काका म्हणाला की घाई करा, आपल्याला निघायला हवे आता. आजोबांना कळले की आपण इथे आलो आहोत तर आपली काही खैर नाही. आमचा गोठा मुख्य रस्त्यावर पासून बराच आत होता आणि त्याला जोडणारा रस्ता ही अगदी खराब होता. शेतातून जाणारा कच्चा रस्ता. त्या रस्त्याला लाईट ही नव्हते. मी या आधी त्या भागात रात्र होई पर्यंत कधी थांबलो नव्हतो त्यामुळे मला वेगळच वाटत होते. परिसर अगदीच निर्मनुष्य वाटू लागला आणि त्यात ती भयाण शांतता. पण आम्ही तिथे एकत्र होतो त्यामुळे इतके काही वाटले नाही. मी आणि माझा मित्र गप्पा मारत होतो आणि काका बैलगाडी चालवत होता. त्या शांत वातावरणात बैलगाडी चा तो आवाज आज मात्र वेगळाच जाणवत होता. गोठ्यापासून थोडे अंतर लांब आलो असू, तितक्यात काकाने ओरडुन सांगितले “मागे बघू नका..” अचानक तो बैलगाडी पळवू लागला. मला वाटले की काका उगाच आपली खेचत असणार म्हणून मी त्याला म्हणालो “काका घाबरवू नकोस रे उगाच..”
मी त्याला हे बोललो खरे पण मला अचानक वातावरणात गारवा वाटू लागला. मे महिन्यात ले दिवस होते आणि त्यात हा असा गारवा. मला आश्चर्य च वाटले. काका ला नक्कीच काही तरी विचित्र जाणवले हे मला कळून चुकले. आमच्या सोबत आलेला आमचा कुत्रा ही घाबरून माझ्या जवळ येऊन बसला. हे सगळे पाहून आता आम्हाला ही भीती वाटू लागली होती. मी काका ला काही विचारणार तितक्यात तो पुन्हा म्हणाला “काहीही झाले तरी चुकूनही मागे बघू नका..” मला त्याच्या आवाजातली भीती अगदी स्पष्ट जाणवू लागली. तो बैलगाडी अतिशय जोरात पळवू लागला. काका ला इतके घाबरलेले पाहून आम्ही सुद्धा पुरते घाबरून गेलो होतो. तितक्यात मला मागून कोणी तरी हाक दिल्यासारखे वाटले. मी मागे वळून पाहणार तितक्यात माझ्या मित्राने माझा हात धरला आणि मला सावध करत हळूच म्हणाला “ती मला सुद्धा हाक मार ते य, मागे वळून पाहू नकोस..” तो खोटं बोलत नव्हता कारण मला जी हाक ऐकू आली ती एका स्त्री च्या आवाजातली होती.
आम्ही तिघे ही प्रचंड घाबरलो होतो. काका फक्त एकच बोलत होता, मागे बघू नका. तो आवाज आता हळु हळू जवळ येऊ लागला. मला काय करावे काही सुचत नव्हते. कधी एकदा मुख्य रस्त्याला लागतो असे झाले होते. तितक्यात एक भयानक गोष्ट मला जाणवू लागली.. आमच्या बैलगाडीत आमच्या तिघा शिवाय अजुन कोणी तरी बसले आहे. नुसत्या कल्पनेने माझ्या अंगावर सरसरून काटा येऊन गेला. आज काही आपण जिवंत घरी जाणार नाही असा विचार मनात येऊ लागला. मी आणि माझा मित्र आम्ही दोघेही एकमेकांचा हात घट्ट पकडुन बसलो होतो. मनात देवाचा धावा करत होतो. कोणी तरी मागून मला सतत हाका मारून बोलवत होत. मी काका कडे पाहत विचारले “काका.. हा काय प्रकार आहे”. त्याने माझ्याकडे पहिले पण तो एकही शब्द बोलला नाही. त्याचे न बोलणे मला सर्व काही सांगून गेले. माझा मित्र त्याला बैलगाडी अजुन जोरात पळवायला सांगत होता. काही अंतर कापल्या नंतर आम्हाला मुख्य रस्ता दृष्टीस पडू लागला. तसे तो आवाज ही हळु हळू धूसर होऊ लागला.
असे वाटू लागले की ते जे काही होते ते आता मागे पडले आहे. शेवटी आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. आम्ही जे काही अनुभवले होते त्या नंतर अजुन ही मागे वळून पाहण्याची हिम्मत होत नव्हती. घरी पोहचेपर्यंत आम्ही कोणीच कोणाशी काही बोललो नाही. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा काका म्हणाला की आपल्या सोबत जे घडले ते घरी चुकूनही कोणाला सांगू नका. तसेही आम्ही त्या भयानक प्रसंगामुळे पुरते हादरून गेलो होतो. आज पर्यंत मला कळू शकले नाही की आमच्या मागे कोण लागले होते. आमच्या नावाने हाका नक्की कोण देत होते. मी या बद्दल कधीच कोणाला सांगितले नाही. काका समोर ही हा विषय पुन्हा कधीच काढला नाही. पण एक गोष्ट मला समजली की “आजोबा तिथे जायला नकार का देत होते..”
अनुभव क्रमांक – २ – किरण पांडुरंग
हा अनुभव मला साधारणतः मी १९ वर्षाचा असताना आला होता. ते पावसाळ्याचे दिवस होते आणि गणेशोत्सव काही दिवसांवर आला होता . दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या गावाला ला गणपती बसणार होता . दरवर्षी आम्ही संपूर्ण परिवारासह गावाकडं जायला निघतो पण या वर्षी आईची तब्येत बरी नसल्यामुळे मी एकटाच गावाला जायला निघालो. तसा माझा भूत, पिश्याच्च या गोष्टींवर विश्वास नाही पण पहिल्यांदा एकट्याने रात्रीचा प्रवास करत असल्याने थोडेसे दडपण आले होते. रात्री १० च्या गाडीने मी गावाचा प्रवास सुरू केला.. गाडी जश जशी डोंगरमाथ्याच्या दिशेने धावत होती तसा तस पावसाचा जोर वाढत चालला होता. बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसाला खिकडीतून पाहत होतो. सुमारे पहाटे ३ च्या सुमारास मी गावाजवळच्या एका एसटी स्टँड वर उतरलो. माझा मोठा भाऊ संकेत मला स्टँड वर घ्यायला येणार होता. पावसाचा जोर काही कमी झाला नव्हता. त्यामुळे मी तिथेच एस टी स्टँड च्याच शेड खाली बाकावर बसून त्याची वाट पाहू लागलो. पहाटेचे ३ होऊन गेले होते. अंधार आणि त्यात मुसळधार पाऊस. पावसाचा जोर काही कमी होण्याची चिन्हं दिसत नव्हती. रस्त्यावर स्ट्रीट लाईट असून नसल्या सारखे होते. कोणीही नजरेस पडत नव्हते. तसे ही पहाटे ३ ला कोण दिसणार म्हणा.
साधारण १५-२० मिनिट झाले असतील. मला एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. आणि पुढच्या काही क्षणात माझ्या समोरून एक लहान मुलगा रडत रडत धावत गेला. काही सेकंद होत नाहीत तितक्यात एक बाई त्या मुलाला हाक मारत माझ्या समोरून गेली. मला वाटले की पहाटेची बस पकडायला म्हणून आले असतील. त्या मुलाला घेऊन ती बाई येईलच इथे. पण ५-६ मिनिट झाली तरी कोणीही आले नाही. पण त्या ऐवजी २ धड धाकट माणसं आली आणि मला विचारू लागली “भाऊ.. तुम्ही एका लहान मुलाला आणि त्याच्या आई ला इथून जाताना पाहिले का..? ” तसे मी हो म्हणत त्यांना डाव्या बाजूला इशारा केला. ते दोघेही त्या दिशेने धावत गेले. मनात विचार आला की लहान मुलांना असे एकटे सोडायचेच कशाला. इतका पाऊस पडतोय. तो पोरगा भिजून जाईल एव्हाना. जाऊ दे ना आपल्याला काय करायचे आहे. मी दुर्लक्ष केले. पण माझ्या मनातले विचार थांबायचे नाव घेत नव्हते.
मी माझ्या भावाची वाट पाहत होतो. मला घ्यायला यायला विसरला की काय असे वाटून गेले. पुढचे ८-१० मिनिट झाले असतील आणि पुन्हा एक लहान मुलगा समोरून रडत रडत धावत गेला. मी जरा दचकलो. त्याच्या मागून पुन्हा ती बाई त्याची आई बहुतेक, ती त्याला हाक मारत माझ्या समोरून गेली. ५ मिनिट झाल्यावर पुन्हा तीच दोन माणसं येऊन मला विचारू लागली “भाऊ तुम्ही एका लहान मुलाला आणि त्याच्या आईला इथून जाताना पाहिले का..?” तोच प्रश्न. मी त्यांना उत्तर दिले तसे दोघेही तसेच त्या दिशेने धावत गेले. मी जरा गोंधळलो. ही घटना अगदी जशीच्या च्याच तशी काही वेळा पूर्वी घडली. हाच घटना क्रम होता. मी विचार करतच होतो आणि ८-१० मिनिटानंतर पुन्हा अगदी तसेच घडले. मला खरंच कळत नव्हत हे काय चाललय. तब्बल ५ ते ६ वेळा हाच प्रकार सतत घडत होता. घटना क्रम अगदी तसाच. आधी मुलगा रडत जायचा मग मागून त्याची आई आणि नंतर तीच २ माणसे मला विचारायला यायची. मी या फेऱ्यात अडकलो आहे आणि यातून सुटका होईल की नाही याची खात्री नव्हती. भावाला फोन केला तर तो ही फोन उचलत नव्हता. एव्हाना हा काही साधा सुधा प्रकार नाही हे मला कळून चुकले. गजाननाची कृपा काही विपरीत घडायच्या आत माझा भाउ स्टँडवर पोहचला. मी जेव्हा त्याला फोन करत होतो तेव्हा तो घरून निघाला होता आणि बाईक चालवत होता म्हणून माझा फोन त्याने उचलला नव्हता.
घरी पोहचताच मी आजीला कडकडून मीठी मारली आणि घडलेला सगळा प्रसंग सांगितला. तेव्हा तिने जे सांगितले ते ऐकून मला धडकीच भरली. ४ वर्षांपूर्वी त्या ठिकाणी बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने एका कुटूंबाचा चिरडून अपघाती मृत्यू झाला होता. अगदी अजूनही गावातल्या लोकांना स्टँड जवळ रात्री अपरात्री त्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. कधी कधी तर संपूर्ण कुटूंब दिसतं. जे तुला ही दिसले. गजाननाची कृपा तू या प्रसंगातून सुखरुप सुटलास. आज या घटने ला जवळपास १० वर्ष पूर्ण झाली पण अजूनही मी शक्यतो रात्रीचा प्रवास करणे टाळतो..
छान कथा आहेत.