अनुभव – कल्याणी भोसले

माझे संपूर्ण बालपण गावी गेले. तो काळच वेगळा होता म्हणा. गावाकडच्या गोष्टी काही निराळ्याच असतात. आज ही कधी त्या गोष्टी आठवल्या की खूप वेगळे वाटते. गावी काम नसल्याने माझे वडील कामासाठी फिरतीवर असायचे. आजू बाजूच्या गावात तरी कधी तालुक्याच्या ठिकाणी त्यांना काम मिळायचे म्हणून प्रवास भरपूर व्हायचा. वेळ ही ठरलेली नसायची. कधी लवकर घरी यायचे तर कधी मध्य रात्र उलटून गेल्यावर. कारण कामाच्या ठिकाणहून उशीर झाला की गावात यायला वाहन मिळायचे नाही. असेच एकदा त्यांना बऱ्याच लांबच्या गावात काम मिळाले होते जे काही दिवस तरी चालणार होते. रोज जाऊन येऊन काम करायचे. प्रवास साधा नसायचा.

एस टी बस असली तरी ती अगदी गावात आत जायची नाही त्यामुळे बस मधून उतरून काही अंतर चालत जावे लागायचे आणि मग रिक्षा स्टँड वर थांबायला लागायचं. मग रिक्षा भरे पर्यंत बसून राहायला लागायच. एकदा त्यांना पोहोचायला रात्रीचे १२ वाजले. एस टी लाच उशीर झाला होता. बस स्टँड वर उतरून ते काही अंतर चालत गेले आणि रिक्षा ची वाट पाहू लागले. खूप उशीर झाल्यामुळे रिक्षा मिळेल की नाही याची खात्री नव्हती. मध्य रात्र उलटून गेल्यामुळे संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेले होते. अगदी थंडगार वातावरण आणि स्पशन शांतता. ते तिथेच एका बाकावर बसून राहिले आणि वाट पाहू लागले. बाजूला एक मोठे झाड होते त्याकडे च पाहत होते तितक्यात त्यांना कसलासा आवाज आला. जसं कोणी तरी रडतंय. 

ते आवाजाचा कानोसा घेऊ लागले आणि बकावरून उठून दबक्या पावलांनी त्या आवाजाच्या दिशेने चालत गेले. त्या झाडामागे कोणी तरी होत जे रडत होत. ते हिम्मत करून पुढे गेले. खिशातून पेन्सिल सेल ची छोटी बॅटरी काढली आणि त्या भागात फिरवली. तर तिथे एक बाई बसलेली दिसली. ते दृश्य पाहून काळजात एकदम धस्स झालं. कारण अश्या निर्जन निर्मनुष्य ठिकाणी ती बाई एकटी काय करतेय. ती घाबरलेली वाटत होती, कोणाची मदत मिळेल का अश्या भावनेने पाहत आहे असे त्यांना वाटले. बहुतेक ती आपल्याकडे मदत मागेल असे वाटत असताना तिने अतिशय घोगऱ्या आणि किळसवाण्या आवाजात विचारले “ तुमच्याकडे तंबाखू आहे का.. “ ते एकदम शहारले आणि त्यांना कळून चुकले की ही साधी सुधी बाई नाही एखादी हडळ आहे.

तितक्यात त्यांना आठवले ही कामावर असताना काही लोकांचे बोलणे कानावर पडले होते. रिक्षा स्टँड जवळच्या झाडा जवळ हडळ दिसते. ते आठवताच अंगावर सरसरून काटा आला. ते काहीच न बोलता हळु हळू मागे जाऊ लागले जेणेकरून तिच्या पासून दूर जाता येईल आणि तिथून पळ काढता येईल. एव्हाना त्यांनी बॅटरी चा उजेड खाली जमिनीकडे केला. जस जसे ते मागे जाऊ लागले एक वेगळाच आवाज येऊ लागला आणि त्यांना जाणवू लागले की ती तिच्या खऱ्या रूपात येतेय. अंधारात तिची आकृती हळु हळु एक भयाण राक्षसी रूप धारण करत होती. ते माघारी फिरले आणि जिवाच्या आकांताने गावाच्या दिशेने धावत सुटले. एकदाही मागे वळून पाहिले नाही. कसे बसे घरी आले तेव्हा कुठे त्यांचा जीव भांड्यात पडला. दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला घडलेला भयानक प्रकार सांगितला आणि आम्ही अगदी सुन्न च झालो. 

Leave a Reply