अनुभव क्रमांक – १ – शुभम कुपटे

मला हा अनुभव साधारण ११ वर्षांपूर्वी म्हणजे २०१० सा ली आला होता जेव्हा मी शाळेत शिकत होतो. माझी शाळा माझ्या गावापासून तशी लांब होती, रोज गावाहून येणे जाणे शक्य नव्हते म्हणून मी शाळे जवळच्या हॉस्टेल मध्येच राहायचो. तिथे माझे मित्र ही झाले होते. त्या महिन्यात माझ्या शाळेला सुट्टी लागली होती. त्यामुळे हॉस्टेल मधली बरीच मुलं आप आपल्या घरी निघून गेली होती. माझ्या सोबत जे मित्र रूम शेअर करत होते त्या सगळ्यांनी ठरवले होते की आपण २ इथेच दिवस थांबून नंतर गावी घरी जायचे. तेव्हा आम्हाला कुठे माहित होते की आमच्यासोबत त्या रात्री नक्की काय घडणार आहे. त्या दिवशी रात्री आम्ही लवकरच जेवण आटोपले. साधारण ८ ला जेवण वैगरे करून आम्ही फेरफटका मारायला म्हणून हॉस्टेल बाहेर पडलो. तसे आम्हाला जास्त वेळ बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण आता सुट्टी होती आणि आम्ही विचारून बाहेर पडलो होतो म्हणून काही काळजी नव्हती. 

सगळे मित्र आप आपल्या गावाला, घरी गेले होते. त्यामुळे मला ही माझ्या घरची ओढ लागली होती. माझे गाव तसे काही खूप लांब नव्हते. हॉस्टेल पासून १५-२० किलोमीटर वर असेल. पण रोज येणे जाणे मला तरी शक्य न सायचे त्यामुळे मी हॉस्टेल मध्ये राहायचो. मी मित्रांना म्हणालो की आपण उद्या घरी जाऊ मला घरची खूप आठवण येतेय. तसे ते ही ठीक आहे म्हणाले. आम्ही साधारण ११ वाजेपर्यंत बोलत बसलो होतो. नंतर आम्ही रूम वर येऊन झोपून गेलो. रात्री माझ्या एका मित्राला बाथरूम ला जायचे होते. तो आधीच जरा टरका असल्याने त्याने मला उठवले. आमच्या रूम पासून बाथरूम काही अंतरावर होत. मी त्याच्या सोबत जाऊन आलो. पण येताना अस वाटू लागले की आमच्या मागून कोणी तरी चालत येतंय. माझ्या मित्राने माझ्याकडे पाहिलं. त्याला ही तीच चाहूल जाणवत होती. तो फक्त एकच वाक्य म्हणाला “लवकर रूम मध्ये चल..”

आम्ही झपाझप पावले टाकत रूम मध्ये आलो. काही न बोलता मी माझ्या बेड जवळ गेलो, पण मला जाणवू लागले की माझ्या आजूबाजूला कोणी तरी आहे. ते माझ्या बेड भोवती फेऱ्या मारतय. मी घाबरून माझ्या मित्राला आवाज दिला पण तो काहीही बोलत नव्हता. बहुतेक माझ्या इतका तो ही घाबरला होता. आमच्या सोबत सुनील नावाचा अजुन एक मुलगा रूम शेअर करायचा. तो माझ्या डाव्या बाजूच्या बेड वर झोपला होता. तो इतका गाढ झोपायचा की आजूबाजूला किती गोंगाट केला तरी त्याची झोपमोड व्हायची नाही. पण त्या क्षणी जे घडले ते अनपेक्षित होते. तो गाढ झोपेतून अचानक बेड वर उठून बसला आणि वेगळ्याच आवाजात बोलू लागला. मी त्याला घाबरतच म्हणालो “सुनील.. असे काय बोलतोय.. झोपेत आहेस का..?”. तसे तो शांत झाला आणि म्हणाला “चल माझ्यासोबत.. आपण टेरेस वर जाऊन फिरून येऊ..” त्याचा विचित्र आवाज ऐकून मी जागीच बेशुद्ध पडलो. 

माझे डोळे उघडले ते थेट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. मी उठल्यावर कोणाला काहीच सांगितले नाही. हॉस्टेल मध्ये साफ सफाई करण्याऱ्या एक वयस्कर बाई होत्या मी त्यांना जाऊन सगळा प्रकार सांगितला आणि या बद्दल त्यांना काही कल्पना आहे का असे विचारले. तसे त्या आजी ने मला सांगितले “तू खूप नशीबवान आहेस, बरे झाले तू टेरेस वर गेला नाहीस, तिथे एका बाई चा मृत्यू झाला होता.. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत आहे.. मला हा प्रकार माहीत होता पण मी कधी कोणासमोर काही बोलले नाही. ती अजूनही तिथेच आहे आणि काही जणांना दिसली सुद्धा आहे. जे कोणी रात्री त्या वेळेला टेरेस वर जातात..” तिचे ते बोलणे ऐकून मी निशब्द झालो होतो. त्याच दिवशी मी माझ्या घरी निघून आलो.

अनुभव क्रमांक – २ – निखिल भैलुमे

माझा चुलत भाऊ पिनु एका हॉस्टेल मध्ये रहायचा. त्याला मित्रांसोबत राहायला आवडत असे त्यामुळे कॉलेज साठी तो हॉस्टेल वर च रहायचा. त्याचे मित्र ही अगदी जिवाभावाचे होते. माझ्या भावाला रोज सकाळी उठून रनिंग ला जाण्याची खूप आवड होती. त्याच्या सोबत त्याचे मित्र ही जायचे. त्या दिवशी मात्र त्याच्या एका मित्राने त्यांची चेष्टा करायचे ठरवले. रात्री झोपल्यावर त्याने सगळ्यांच्या घड्याळाची आणि मोबाईल मधली वेळ बदलली. तो मुद्दाम रात्री ३ ला उठला आणि सगळ्या मित्रांनाही उठवले. त्यांना सांगितले की ५ वाजले, उठा आता आपण रनिंग करायला जाऊ. तसे ते सगळे हॉस्टेल बाहेर पडले. हॉस्टेल पासून थोड्याच अंतरावर एक उंच डोंगर होता. ते त्याच भागात धावायला जायचे. नेहमी प्रमाणे ते तिथपर्यंत धावत गेले आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी थांबून व्यायाम करू लागले. त्या भागात बराच अंधार होता पण काही अंतरावर असलेल्या स्ट्रीट लाईट चा प्रकाश तिथं पर्यंत येत होता. 

तितक्यात त्यांच्यातल्या एका मित्राला जाणवले की समोरच्या एका झाडामागे कोणी तरी उभे आहे. बाकीच्यांना वाटले की हा आपली मस्करी करतोय. तसेही तो मित्र नेहमीच असे फसवयचा. त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. तसे माझा भाऊ म्हणाला की थांब मी एक दगड भिरकावून बघतो त्या दिशेने, एखादे जनावर असेल तर निघून जाईल. असे म्हणून त्याने एक मोठा दगड उचलला आणि त्या दिशेला फेकला. तशी त्या झाडा मागच्या झाडीत कसलीशी सळसळ जाणवली. आम्ही सगळे मित्र त्या दिशेने एक टक पाहत होतो. तसे त्या झाडा मागून एक पांढरा शुभ्र, उंच आणि अतिशय धिप्पाड माणूस बाहेर आला. तो रागाने आमच्याकडे पाहत होता. तो नक्की माणूस च आहे की अजुन काही हे आम्हाला कळत नव्हत. आम्हाला काही सुचायच्या आत तो आमच्या दिशेने धावत सुटला. 

आम्ही प्रचंड घाबरलो. त्याला असे आमच्या दिशेने धावत येताना पाहून आम्ही सगळे हॉस्टेल च्याच दिशेने पळत सुटलो. तितक्यात रस्त्यात आम्हाला ऊस तोडण्याऱ्या कामगारांच्या गाड्या येताना दिसल्या तसे जिवात जीव आला. आम्ही हॉस्टेल वर पोहोचलो तेव्हा ४ वाजत आले होते. ज्या मित्राने आम्हाला फसवून रात्री ३ ला तिथे नेले होते त्याला आम्ही खूप झापले. सकाळी आम्ही फ्रेश होऊन पुन्हा त्या ठिकाणी गेलो. एव्हाना उजाडले होते. त्या भागात ही लोकांची ये जा सुरू होती. आम्ही त्या झाडाजवळ गेलो. त्या झाडाला खिळे मारले होते. आम्हाला जरा विचित्र च वाटले. आम्ही तिथल्या भागात गावकऱ्यांना विचारले तेव्हा जी माहिती आम्हाला मिळाली त्यावरून त्या प्रसंगाचा उलगडा झाला. त्या झाडाला खिळे मारून तिथे अतृप्त प्रेत आत्मे टांगले जातात. 

अनुभव क्रमांक – ३ – राज गिरी  

अनुभव मला १२ वी ला असताना आला होता. तेव्हा मी लातूर च्याच एका बॉइज् हॉस्टेल मध्ये पार्ट टाईम जॉब करायचो. त्या hostel ची रचना काही निराळीच होती. त्यात ते हॉस्टेल अगदी कमी वस्ती असलेल्या भागात होते. म्हणजे मुख्य गावापासून बऱ्याच अंतरावर. हॉस्टेल ची इमारत ३ मजली होती आणि त्याच जवळ एक शाळा होती. खर सांगायचे तर अंधार पडल्यावर ती इमारत एखाद्या भय पटातल्या झपाटलेल्या इमारती सारखी भासे. आता मला च तसे वाटायचे की खरंच तसे होते हे मला माहीत नाही पण हा प्रसंग मला खूप काही सांगून गेला. हा अनुभव जेव्हा मला आला तेव्हा दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. त्यामुळे हॉस्टेल मधले बरेच विद्यार्थी आप आपल्या घरी गेले होते. त्यामुळे हॉस्टेल तसे बरेच रिकामी होते. आम्हाला ही घरी जाण्याची परवानगी दिली होती पण माझे आई बाबा काही कारणास्तव बाहेर गावी गेल्यामुळे मला हॉस्टेल मध्येच थांबावे लागले. 

हॉस्टेल मालकाचे घर खाली तळ मजल्यावर होते. त्यांच्या कडेच रात्रीचे जेवण आटोपून मी दुसऱ्या मजल्यावर झोपायला गेलो. माझा बेड खिडकी शेजारी होता. साधारण रात्री १ च्या सुमारास मला अचानक जाग आली. काही विशेष कारण नव्हते म्हणजे मला ही तसे काही जाणवले नाही की मला अचानक जाग का आली. पण जाग आल्यामुळे माझे लक्ष खिडकीतून त्या शाळेच्या इमारतीकडे गेले. मी हॉस्टेल च्याच दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे मला शाळेचे छत स्पष्ट दिसत होत. त्यावर मला कोणी तरी उभ असल्याचे जाणवले. मला वाटले की आपल्याला भास होतोय म्हणून मी दुर्लक्ष करत झोपून गेलो. पण तितक्यात अचानक कुत्रे भुंकू लागले. खुप विचित्र आवाजात जणू ते भुंकत नाहीयेत तर रडत आहेत. माझी पुन्हा झोपमोड झाली. मी खिकडी तून बाहेर पाहिले आणि माझे लक्ष पुन्हा त्या शाळेच्या छतावर गेले. 

तिथे खरंच कोणी तरी उभ होत. आता मात्र मला घाम फुटू लागला. इतक्या रात्री असे छतावर तेही अगदी टोकाला कोण उभे आहे. मी नीट निरखून पाहण्याचा प्रयत्न केला पण नीटसे काही दिसत नव्हते. पण एवढे मात्र जाणवले की ते जे कोणी आहे ते मान खाली घालून उभे आहे. मी खरंच घाबरलो होतो. तितक्यात त्याने मान वर करून माझ्याकडे पाहिले आणि माझ्या डोळ्यांदेखत त्या छतावरून खाली उडी घेतली. तो अनपेक्षित भयानक प्रसंग पाहून मी भीती ने थरथरू लागलो. कारण तो उडी मारताना तर दिसला पण खाली जमिनीवर कोणीही नव्हते. माझे हातपाय कापू लागले होते. मी खिडकी बंद करून रूम मधले लाईट चालू केले. डोक्यावर पांघरूण घेतले आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो. पण काही केल्या ते भयाण दृश्य डोळ्यांसमोरून जात नव्हते. एकटा असल्यामुळे कोणाला काही सांगू ही शकत नव्हतो. 

मी माझ्या छोट्या मोबाईल वर देवाची आरती लाऊन झोपलो. सकाळी जाग आली तेव्हा मी तापाने फणफणत होतो. सकाळी उठायला उशीर झाला होता. नाश्ता करण्यासाठी हॉस्टेल मालक मला बोलावण्यासाठी आले तेव्हा मी त्यांना रात्री घडलेला सगळा प्रकार सविस्तर सांगितला. तेव्हा त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. काही वर्षांपूर्वी त्या शाळेचे बांधकाम सुरू असताना एका कामगाराचा वरून पडून मृत्यु झाला होता. तेव्हापासून मला ही कधी कधी तो दिसतो. इतके दिवस मला वाटतं होते की तो माझा फक्त भास होता पण तसे नव्हते कारण तो काल तुला ही दिसला. त्यांचे असे बोलणे ऐकल्या नंतर मात्र मला तिथे क्षणभर ही थांबायची इच्छा नव्हती. मी त्याच दिवशी आई बाबांना बोलवून घेतले आणि त्यांच्या सोबत घरी गेलो. 

अनुभव क्रमांक – ४ – मयुरी मांजरेकर

हा अनुभव २०१६ सालचा आहे. माझी १२ वी पूर्ण झाली आणि मला पुढील शिक्षणासाठी घरापासून दूर जावे लागले. ज्या कॉलेजमध्ये माझे ऍडमिशन झाले होते तिथे राहण्यासाठी हॉस्टेलची सोय होती. त्यामुळे मग मी होस्टेलवरच राहण्याचा निर्णय घेतला. कॉलेज सुरू होऊन काही महिने झाले होते, त्यांनतर आमची परीक्षा होती. ज्या विषयाची परीक्षा होती त्याचा अभ्यास फारसा काही झाला नव्हता. दुपारचे जेवण मेस मध्ये करून मी आणि माझी मैत्रीण जीचे नाव गुलाब होते आम्ही दोघीही रूमवर आलो. अभ्यास झाला नव्हता म्हणून आम्ही कॉपी करायचे ठरवले. या आधी मी कधीही कॉपी केली नव्हती. माझी मैत्रीण मला म्हणाली की तुला जे महत्त्वाचे वाटते ते अगदी लहान अक्षरांमध्ये लिहून काढ. ती इतके बोलून बाजूच्या रूम मध्ये निघून गेली.

पटकन कोणी रूम मध्ये आले आणि मला कॉपी करताना पाहिले तर माझे काही खरे नाही. म्हणून मी जाताना तिला बाहेरून कडी लाऊन जायला सांगितले. तसे ती बाहेरून रूम ला कडी लावून निघुन गेली. मी खोलीत एकटीच होते. कोणीतरी आपल्याला खिडकीतून बघेल या भीती ने मी खिडकी सुद्धा बंद करून घेतली. पुन्हा जाऊन बेड वर बसले आणि जमेल तितक्या लहान अक्षरात लिहायला सुरुवात केली. निव्वळ अर्धा मिनिट झाला असेल आणि तितक्यात माझ्या कानाजवळ कोणी तरी पुटपुटले “कॉपी करतेस..” मी इतकी दचकले की सरळ उठून बेड पासून लांब गेले. मला भास झाला नव्हता कारण इतक्या जवळून बोलताना शब्दांसोबत तोंडातून निघणारी गरम वाफ मला स्पष्ट जाणवली. रूम मधला लाईट सुरू होता, मी त्यात एकटीच रूम मध्ये होते. मला खूप भीती वाटत होती. काळीज भीती ने धड धडत होत. मी जास्त विचार न करता दरवाज्याजवळ धावले आणि दरवाजा उघडायचा प्रयत्न करू लागले. 

पण मला आठवले की मीच मैत्रिणीला बाहेरून कडी लावून जायला सांगितले होते. मी अतिशय जोरात दरवाजा वाजवू लागले, हाका मारू लागले पण कोणालाच माझा आवाज ऐकू येत नव्हता बहुतेक. तितक्यात मला सुचले आणि मी खिडकी उघडली. बाहेर कोणी दिसतंय का ते पाहू लागले जेणेकरून मी हाक मारून कोणाला तरी बोलवेन आणि दरवाजा उघडायला सांगेन. पण माझे नशीब वाईट. त्या वेळेला बाहेरही कोणी दिसत नव्हते. तितक्यात मला मागून कडी उघडल्याचा आवाज आला आणि माझी मैत्रीण आत आली. तिला पाहून मला खूप वर वाटलं. मी तिला घडलेले सगळे सांगितले तसे ती म्हणाली की तुला भास झाला असेल. पण मला चांगल माहीत होत की माझा भास नव्हता. माझ्या सोबत त्या खोलीत नक्की कोणी तरी होत फक्त ते मला दिसत नव्हत. 

लिहायला घेतलेले पेपर मी कचऱ्यात फेकले. त्या नंतर मला दिवसाही तिथे राहायला भीती वाटायची. काही दिवसांनी मी व माझ्या मैत्रिणीने ते हॉस्टेल सोडले व आम्ही घरून च कॉलेज केले. आयुष्यात पहिल्यांदा कॉपी करायचा प्रयत्न केला होता जो अगदी शेवटपर्यंत लक्षात राहील.

Leave a Reply