अनुभव – ऋषी घार्गे
अनुभव माझा मोठा भाऊ शुभम सोबत घडला होता. साधारण ४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शुभम त्याच्या अक्षय नावाच्या मित्र सोबत गावी यात्रे साठी गेला होता. या आधी ही तो बऱ्याच वेळेला अक्षय च्या गावी गेला होता त्यामुळे तो परिसर, तिथली माणसे त्याला काही नवीन नव्हती. शुभम अक्षयच्या घरीच होता, जेवण वैगरे आटोपून ते यात्रेमध्ये फिरायला गेले. बाईक असल्यामुळे जाण्या येण्याची काही चिंता नव्हती. ते खूप फिरले, मजा केली आणि जवळपास १२.३० च्या सुमारास घरी यायला निघाले.
उन्हाळ्याचे दिवस होते पण वातावरण प्रसन्न वाटत होत. पौर्णिमा असल्यामुळे चंद्राचा नितळ प्रकाश सगळीकडे पसरला होता. त्यामुळे बाईक हेड लाईट च्या प्रकाशा शिवाय ही आजूबाजूचा परिसर नजरेस पडत होता. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार शेतं, त्यातून वाहणारा वारा. दोघं ही बाईक वरून निवांत गप्पा मारत घरी येत होते. तितक्यात माझा भाऊ म्हणाला की गाडी जरा बाजूला घे मला लघवी आली आहे. तसे अक्षय ने बाईक रस्त्याकडे ला घेतली. ते जिथे थांबले होते तिथे रस्त्याच्या आजू बाजूला वस्ती दिसत नव्हती.
कदाचित आतल्या भागात काही घर असतील तर माहीत नाही. रस्त्यापासून थोडे आतल्या बाजूला तो लघवी करायला गेला. तितक्यात त्याला दिसले की तो जिथे उभा आहे तिथून काही पावलांवर एक पडकी विहीर आहे. सहज म्हणून तो त्या विहिरी जवळ चालत गेला आणि आत डोकावून पाहू लागला. चंद्राचा प्रकाश असल्यामुळे आतलं नीट दिसत होत. विहिरीला पाणी नव्हत उलट सगळा गाळ आणि कचरा साचला होता आत. तो पुन्हा रस्त्याकडे जायला मागे वळला तसे त्याला एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला.
तो आवाज ऐकून तो एकदम दचकला. कारण त्या भागात अजिबात वस्तू नव्हती. एक घर ही दिसत नव्हत. त्यात अश्या अवेळी एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज. तरीही हिम्मत करून त्याने कानोसा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला जाणवले की तो आवाज त्याच विहिरीच्या आतून येतोय. खर तो बराच घाबरला होता पण तरीही त्याने त्या विहिरीत पुन्हा एकदा डोकावून पाहिले. तिथले दृश्य पाहून त्याच्या पाया खालची जमीनच सरकली.
त्या विहिरीत साधारण ६-७ वर्षांची मुलगी एका दगडावर बसून रडत होती. ते भयाण दृश्य तो धड धडत्या काळजाने पाहत होता. लांब सडक केस, कपाळी हळद कुंकू.. काही अभद्र घडायच्या आत तो उलट पावली मागे जाऊ लागला आणि तितक्यात त्या मुलीला चाहूल लागली. तिने झटकन वर पाहिले. आणि तिची भेदक नजर शुभम वर खिळली. हळु हळु तिचा आकार मोठा होऊ लागला. मोहिनी घातल्यासारखा शुभम तिथेच उभा राहून सताड उघड्या डोळ्यांनी ते किळसवाणे दृश्य पाहत होता. तितक्यात त्याला अक्षय ची हाक ऐकू आली तसे तो भानावर आला आणि आरोळी ठोकत बाहेर रस्त्यावर आला.
घडलेला प्रसंग सांगितल्यावर अक्षय ची पण चांगलीच तंतरली. क्षणाचाही विलंब न करता ते त्या भागातून बाहेर पडले. आई भवानी ची कृपा म्हणून ते थोडक्यात या भयानक प्रसंगातून बाहेर पडले.