अनुभव – श्रुती शेटे

आमच्यात असं मानतात की लग्न ठरल्यापासून ते लग्न होई पर्यंतचा काळ मुला-मुलीसाठी खूप धोक्याचा असतो. भूत-प्रेत-पिशाच बाधा होण्याचे प्रकार ह्या काळात हमखास घडतात. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. असे म्हणतात की या काळात शक्यतो बाहेर पडणे टाळायचे असते. म्हणूनच साखरपुडा आणि लग्न ह्यात कमी दिवसांचे अंतर ठेवले जाते जेणे करून संभाव्य धोका टाळला जाईल. पण जे विधिलिखित असते ते घडतेच! 2011 च्या ऑक्टोबर महिन्याअखेरीस आमचा साखरपुडा झाला व लागोलाग डिसेंबरच्या 18 तारखेला लग्न ठरले. 

आम्ही राहायला मुंबई सबरबन मध्ये आहोत. हा प्रसंग माझ्या पतीसोबत त्याच वर्षातल्या नोव्हेंबर महिन्यात घडला होता. ते एका फार्मा कंपनीत असल्यामुळे फिरतीचे काम त्यांच्या कामाचा 80 टक्के भाग आहे. त्यांच्या भागातल्या सेल्स टार्गेट ची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे ते वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर- तिन्ही लाईन्सची स्टेशन्स सतत फिरत असत. 2010 पासून जबाबदारी वाढल्याने आणि बस-रिक्षाच्या प्रवासात खूपच वेळ खर्च होत असल्याने ते पूर्ण मुंबई स्वतःच्या मोटारसायकलवर पालथी घालू लागले. वेळ बराच वाचू लागला. मात्र कधीकधी परिसरातल्या हॉस्पिटल्स व क्लिनिक्समधील मोठ्या डॉक्टरांची अपॉईंटमेंट रात्री 9-10 नंतरच मिळे. व काम संपवून मोटारसायकलने घरी याला यायला रात्रीचे 12-1 वाजत.

नोव्हेंबरच्या दुसरा आठवडा होता. आणि त्या आठवड्यात अशाच सलग मोठ्या हॉस्पिटल च्या डॉक्टरांच्या अपॉईंटमेट्स होत्या. ते डॉक्टर त्यांचे काम आटोपल्यावर मगच अपॉइंटमेंट द्यायचे त्यामुळे खूप उशीर व्हायचा. रोजच घरी यायला 12-1 वाजायचे. त्या रात्रीही १०-१०.३० पर्यंत काम संपवून त्यांनी घरी येण्यासाठी वेस्टर्न एक्सप्रेस हाय-वे धरला. रहदारी फारशी नसल्याने साधारण एका तासात कांदिवली गाठले. थंडीचे दिवस असल्याने ते नेहमी टोलनाका आला की थांबून जॅकेट घालत व नंतर पुढचा रस्ता धरत. कारण नंतर हळु हळू की गारठा वाढतो. 11:15 वाजता ला सासूबाईंनी त्यांना फोन केला आणि विचारले की ते कुठवर पोहोचले. ते म्हणाले. तसे ते म्हणाले “स्टेशन वर एक मित्र- सचिन भेटणार आहे 12 वाजता काही कामासाठी. त्याला भेटून 12ः30 पर्यंत घरी येईन.” बरं ठीक आहे म्हणत सासूबाईंनी फोन ठेवला. तसे हे पुन्हा सुसाट बाईक चालवत घरी यायला निघाले. 

साधारण 11:40 ला ते नेहमीच्या फाट्याजवळ आले तसे वळण घेऊन आतल्या रस्त्याला लागले.. वळल्यानंतर 2-3 मिनिटातच म्हणजे काही अंतर पार केल्यावर त्यांना रस्त्याच्या डावी कडे एक इसम लिफ्ट मागत असल्याचे दिसला.. पावणे बारा वाजत आले होते आणि या वेळेस याला एखादे वाहन मिळणे सहजा सहजी शक्य नव्हते. आपल्या पाठीवरच्या बॅगेत फारसे वजन नाही. बॅग पुढे ठेवली तर या बिचाऱ्याला लिफ्ट देता येईल” – असा विचार करतच त्यांनी त्या इसमाजवळ गाडी थांबवली. त्या इसमाने तिथल्या भागात राहणाऱ्या लोकांसार खा वेष परिधान केला होता. हातात एक हलकेसे गाठोडे होते. “कुठे जाणार दादा ? ” – माझ्या पतीने विचारले. तसे तो इसम म्हणाला “इथेच कोपऱ्यावर जायचंय” म्हणत तो घाईतच बाईक वर मागे बसला. 

“आलं की सांगा दादा “- असं म्हणत ह्यांनी गाडीला किक मारली. यांना वाटले की इथेच काही किलोमीटर अंतरावर जायचे असेल त्यामुळे ५ मिनिटांनी यांनी विचारले आले की सांगा मला. पण १० मिनिट झाले तरीही त्या इसमाचे “इथेच कोपर् यावर आहे ” हे एकच वाक्य. शेवटी कंटाळून ह्यांनी गाडीचा वेग कमी करत त्या इसमास म्हटले “दादा , मी आता ह्या उजवीकडच्या रस्त्याला वळणार आहे, तुम्हाला इथेच उतरवतो.”

“थांबशील तर गाडीसकट गाडेन तुला” मागून त्या माणसाचा आवाज आला. अचानक आलेल्या त्या आवाजामुळे ते एकदम दचकले आणि त्यांनी साईड मिरर मधून पाहिले तर तो माणूस अगदी रागाने ह्यांच्या कडे बघत होता. डोळे जणू आग ओकत होते. ते घाबरले होते पण अश्या परिस्थितीत ही त्यांनी विचारले – “बरं मग तुम्हाला कुठे जायचं आहे हे तरी सांगा. तुम्हाला सोडून मग मी घरी जातो.”

भीती ने अंगावर शहारे येत होते पण चेहऱ्यावर ते दाखवायचे नव्हते. ते उत्तराची वाट पाहत होते आणि पुढच्या क्षणी उत्तर मिळाले. 

“समुद्रावर घे गाडी”. तसे त्यांनी जास्त विचार न करता समुद्राकडे जाण्याचा रस्ता धरला. कुठे याला लिफ्ट दिली असा विचार मनात येऊन गेला. वेग मुद्दाम कमी ठेवला होता म्हणजे मागच्याने काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर गाडीवरून उडी टाकता येईल ! एव्हाना १२ वाजून गेले होते. त्या समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यावर फक्त ही एकच मोटरसायकल होती. भरीस भर म्हणून त्या भागातले लाईट्स गेले होते म्हणून तिकडचे आणि रस्त्यावर चे स्ट्रीट लाईट स ही बंद होते. तिथल्या परिसरात मिट्ट काळोख पसरला होता. काही मिनिट झाली असावीत. हळु हळु समुद्राच्या लाटांचा आवाज त्या शांत पण भयाण वातावरणात कानावर पडू लागला. तो आवाज एरव्ही मनाला प्रसन्न करणारा वाटत असला तरी आज मात्र एक वेगळीच भीती निर्माण करत होता. 

तेवढ्यात ह्यांचे नशीब बलवत्तर म्हणून की काय – ह्यांचा जो मित्र स्टेशनला वाट बघत थांबलेला त्याने ह्यांना फोन केला – “सव्वा बारा झाले मित्रा आहेस कुठे ?” ह्यांनी घाबरतच अत्यंत हळू आवाजात जे घडत होते ते त्या मित्राला सांगितले. तसे तो मित्र म्हणाला “बरं घाबरु नकोस, आत्ता तू कुठे पोहोचला आहेस?”.. हे म्हणाले “आता मी अक्षरशः समुद्राच्या किनाऱ्यावर गाडी चालवतो आहे.” तो मित्र प्रसंगावधान राखून म्हणाला – “तिथे माझा एक मित्र राहतो. तो दहा मिनिटात त्याची मोटरसायकल घेऊन तू आत्ता आहेस तिथे येईल. तू एक काम कर, त्याच भागात तिथेच गोल गोल चकरा मारत रहा. आणि हो , गाडी चुकूनही थांबवू नकोस!”.. मित्राचे ते बोलणे जरा विचित्र वाटले असले तरीही त्यांना जरा धीर वाटला. कारण कोणीतरी आपल्या मदतीला येणार आहे ही कल्पना त्यांना घडत असलेल्या प्रसंगाला तोंड देण्याचे बळ देऊन गेली. 

सचिनने फोन केल्याबरोबर त्या गावात समुद्राजवळ राहाणारा तो मित्र अजून 4-5 जणांना सोबत घेऊन ह्यांच्या दिशेने यायला निघाला. त्याच भागात राहणारा असल्याने समुद्रकिनारा व आसपासचा परिसर त्याच्या चांगल्याच परिचयाचा होता! माझे पतीही सचिनने सांगितल्या प्रमाणे तिथेच गोल गोल चकरा मारत होते. मागचा इसम अजूनही मोठ्यामोठ्याने “थांबशील तर जिवंत गाडेन ” हेच बरळत होता. त्याचा आवाज त्या मिट्ट काळोखात त्या भयाण वातावरणात घुमत होता. आपल्याला कधी मदत मिळतेय याची ते प्रकर्षाने वाट पाहत होते. पुढच्या १५ मिनिटात ते 4-5 जण गाड्या घेऊन त्यांनी सांगितलेल्या लोकेशन वर आले. त्यांना गाडी दिसताच त्यांनी त्यांच्या गाड्यांचा वेग कमी केला. 

त्या मित्राने सचिनला ला पटकन फोन केला.. “भावा, तुझा मित्र इथे मोटार सायकल वर फिरताना दिसतोय खरा पण त्याच्या पाठीमागे तर कुणीच बसलेलं दिसत नाही आहे !” ते एक वाक्य ऐकुन सचिनच्या हृदयाचा ठोका चुकला.. तो फोनवर जवळजवळ किंचाळलाच.. ” अरे गाठा त्याला लवकर.. मस्करी करणाऱ्या तला नाहीये तो.. हे जे पण आहे ते खूप विचित्र आहे “. सचिन चे बोलणे ऐकून तो काय ते समजून गेला.. ३-४ मोटारसायकल्स आपल्या दिशेने सुसाट येताना पाहून यांच्या जिवात जीव आला ! जसे त्या बाईक स अगदी जवळ आल्या तसे त्यांनी परत साईड मिरर मधून मागच्या इसमाकडे पाहिले.. “आज वाचलास. परत घावशीलच कधीतरी” असं म्हणतच एक विदारक हास्य करत तो डोळ्यांदेखत दिसेनासा झाला.

तो गायब होताच ह्यांनी गाडी थांबवली. अंगात कसलाही त्राण राहिला नव्हता.. त्यांनी यांना गाडी वरून उतरवलं. पाणी वगैरे दिलं आणि म्हणाला “नशीब थोर तुझं भावा म्हणून वाचलास. पाणबुड्या होता तो जो कोणी तुझ्या मागे बसलेला तो ! पाण्यात बुडून मेलेला. त्यांचे आत्मे खेचून आणतात एकट्या दुकट्याला इथं आणि जिवे मारतात पाण्यात बुडवून!”.. हे मात्र त्याचे बोलणे अवाक होऊन ऐकत होते. तेवढ्यात परत सासूबाईंनी ह्यांना फोन केला “एक वाजला रे. अजून किती गप्पा मारशील मित्राबरोबर!”.. परिस्थिती चे गांभीर्य ओळखत यांनी संवाद न वाढवता फक्त “आलोच” असं म्हणत फोन ठेवला. ह्यांनी गाडीला किक मारली. तो एक मित्र बाकीच्याना म्हणाला – “2 गाड्या ह्याच्या पुढे राहूद्या आणि 2 मागे. मी सोबत राहतो माझी गाडी घेऊन” अशा प्रकारे अतिशय सावधपणे त्यांनी ह्यांना घरापर्यंत सोडले.

त्या घटनेनंतर 4-5 दिवस ह्यांना ताप होता. घरी हा घडलेला प्रकार सांगितल्या मुळे घरचेही सर्व चिंतेत होते. सासूबाईंचे मोठे भाऊ ज्योतिषी असून ते देवदेवस्की पण करत असल्यामुळे यांना बघायला त्यांना घरी बोलावले होते. त्यांनी दिलेला अंगारा ह्यांनी लग्नाच्या दिवसापर्यंत रोज न चुकता लावला. नंतर असे काही घडले नाही. आज पर्यंत भुताखेतांचा विषय आल्यावर चेष्टामस्करी करणाऱ्या माझ्या पतीचा भुतांवर विश्वास मात्र बसला. म्हणतात ना “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” !

Leave a Reply