अनुभव – राकेश झांबरे
माझ्या मामा ला पुनर्वसन म्हणून एक जागा मिळाली होती. पण ती जागा दोघांत वाटून मिळाली होती. त्यामुळे दुसरा व्यक्ती कोण आहे हे आम्हाला शोधून काढायचे होते. त्यामुळे आम्ही कार्यालयात जाऊन सगळी माहिती काढून आणली. पत्ता होता तो कधीही न ऐकलेल्या गावाचा. त्यामुळे एक दिवस वेळ काढून त्या गावात जाऊन त्या व्यक्तीला शोधायला जायचे होते.. तेव्हा मी शहरापासून साधारण ६ किलोमीटर वर असलेल्या एका खेडेगावात राहत होतो. माझ्या मामाच्या मुलाचा फोन आला आणि तो म्हणाला की येत्या शनिवारी मला वेळ मिळेल तेव्हा आपण त्या गावात जाऊन येऊ तसे मी होकार कळवला. शनिवारी जरा लवकरच उठलो पण तरीही सगळी काम आवरून मला निघायला खूप उशीर झाला. माझ्या मामा चे घर माझ्या घरापासून तसे बरेच लांब होते. तिथे जाऊन मामाच्या मुलाला सोबत घेऊन मग पुढे जायचे होते.
त्याच्या घरी पोहोचायला मला जवळपास ३ वाजले. आम्ही दोघंही जेवण वैगरे आटोपून साधारण ४ ला निघालो. रस्ता अतिशय खराब असल्यामुळे अपेक्षेपेक्षा बऱ्याच वेळाने आम्ही त्या गावात येऊन पोहोचलो. तिथे चौकशी केल्यावर कळले की तो व्यक्ती गावाच्या अगदी शेवटच्या टोकाला राहतो. एव्हाना ७ वाजत आले होते. पण आम्ही ठरवले की आता आलोय तर त्याला भेटुन च जाऊ. काही मिनिटांचा रस्ता होता. पण तिथे गेल्यावर कळले की त्या नावाचा कोणताच व्यक्ती तिथल्या परिसरात राहत नाही. तसे हताश होऊन निघताना आम्हाला एका माणसाने सांगितले की तुम्ही इतक्या दूर आलाच आहात तर इथूनच काही अंतरावर एक दुसरे गाव आहे तिथे विचारपूस करून मग जा.
त्या गावाच्या टोकाला लागून एक मोठे धरण होते त्यामुळे सरळ रस्ता नव्हता. बाजूचे गाव जवळ जरी असले तरी आलो त्या मार्गाने परत जाऊन एक वळण घेऊन तितकेच अंतर पार करावे लागणार होते. तसे मी मामा च्या मुलाला म्हणालो की जाऊदे रे आता, आधीच खूप उशीर झालाय आपण पुन्हा येऊ कधी तरी. पण त्याने त्या माणसालाच विचारले की काका इथून सरळ एखादा रस्ता आहे का बाजूच्या गावात जायला. तसे तो माणूस म्हणाला “हो आहे एक कच्चा रस्ता.. पण त्या रस्त्याने शक्यतो कोणी जात नाही.. तुम्ही ही नका जाऊ. मुख्य रस्त्याने जा. थोडा वेळ लागेल पण तोच रस्ता बरा पडेल तुम्हाला..”
तसे आम्ही त्या मुख्य रस्त्याने जायला निघालो. आम्हाला त्या बाजूच्या गावात पोहोचायला जवळपास अर्धा तास लागला. तिथे गेल्यावर आम्ही ३-४ ठिकाणी विचारपूस केली. तसे कळले की तो माणूस ३० वर्षांपूर्वी गावातले घर सोडून कुटुंबासमवेत शहरात राहायला गेलाय.. झालं. मी मामाच्या मुलाला म्हणालो “फेरी फुकट गेली यार आपली. वेळ वाया तर गेलाच पण आता पोहोचायला बराच उशीर होणार आपल्याला”. तसे तो म्हणाला “आता त्या मेन रोड ने नको आपण त्या कच्च्या रस्त्याने जाऊया लवकर पोहोचू”. आमचे बोलणे जवळच उभा असलेला एक माणूस ऐकत होता. तसे तो म्हणाला “तुम्ही नवीन दिसताय या गावात.. त्या कच्च्या रस्त्याने जाऊ नका, तो रस्ता ठीक नाहिये”.
आम्ही हो हो म्हणत गावातून बाहेर पडलो आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्या कच्च्या रस्त्याने जायला लागलो. खेडेगाव असल्यामुळे वस्ती कमी आणि त्यात कच्चा रस्ता त्यामुळे रस्त्याकडे ला असणारे लाईट ही नाही. अंधार ही गडद होत चालला होता. रस्ता ही इतका विचित्र होता की एका बाजूला धरणाचे पाणी आणि दुसऱ्या बाजूला अगदी घनदाट झाडी. आम्ही निघण्या आधी गुगल मॅप वर बघून निघालो होतो पण इतक्या रात्री कसला मॅप आणि कसले काय. बराच वेळ झाला तरी त्या रस्त्यावर आमच्या गाडी शिवाय दुसरे एकही वाहन दिसत नव्हते. त्यात आम्हाला बरीच भूक लागली होती. एखादे गाव दिसले तर थांबून थोडे खाऊन घेऊ असा विचार केला पण एकही गाव दिसेना.
एक तास उलटुन गेला. आम्हाला वाटले की आम्ही कोणत्या भलत्याच रस्त्याला लागलो. साधारण दीड तासानंतर आम्हाला एक पाटी दिसली. त्यावर एका गावाचे नाव आणि २२ किमी असे लिहिले होते. तसा आमच्या जीवात जीव आला. त्या नंतर जरा आरामात च गाडी चालवू लागलो. साधारण अर्ध्या तासानंतर पुन्हा एक पाटी दिसली आणि जरा दचकलोच. ती तीच पाटी होती जी मी अर्ध्या तासापूर्वी पहिली होती. त्याच गावाचे नाव आणि २२किमी. आता ११ वाजत आले होते. बहुतेक तशीच पाटी असावी असा विचार करून मी गाडी चालवत राहिलो. पण काही वेळा नंतर पुन्हा तीच पाटी दिसली. आता मात्र आमच्या मनात भीतीने घर करायला सुरुवात केली होती.
गाडीतले पेट्रोल ही संपायला आले होते. काहीच सुचत नव्हते की काय घडतय. पेट्रोल संपले तर या निर्जन रस्त्यावर काय करायचे या विचाराने आम्ही अजुन घाबरलो. घरी फोन करून कळवू म्हणून मोबाईल काढला तर नेटवर्क ही नाही. असे वाटत होते की सगळे मार्गच बंद झालेत आणि आम्ही एका घेऱ्या त अडकलो आहोत. काही वेळा नंतर आम्हाला एक माणूस आणि मुलगी चालत जात असताना दिसले. त्यांच्या हातात कंदील किंवा दिवा वैगरे काहीच नव्हता. त्या किर्र काळोखात त्यांना वाट कशी दिसत होती देव जाणे. तसे मी त्यांच्या जवळ जाऊन बाईक थांबवून विचारले “काका इथून गाव किती लांब आहे हो?”. तसे तो म्हणाला “बरेच लांब आहे की अजुन.. साधारण २०-२२ किमी असेल”. त्याचे बोलणे ऐकून माझे हातपाय च गळून गेले. गेले ४-५ तास आम्ही सतत गाडी चालवत होतो पण फक्त त्याच एका विशिष्ट ठिकाणी. हे सगळे समजण्या पलीकडचे घडत होते.
आम्ही एकमेकांकडे पाहत ठीक आहे म्हंटले तितक्यात तो माणूस म्हणाला इथून पुढे २ किलोमीटर वर एक गाव लागेल. तिथे एकदा विचारू शकता. आम्ही देवाचे नाव घेऊन पुन्हा गाडी चालू केली आणि १० मिनिटात त्या माणसाने सांगितल्या प्रमाणे एक गाव दृष्टीस पडले. पण तिथले लोक निद्रेच्या आहारी गेले होते. तिथे एक दुकानदार दिसला आणि तो नेमका दुकान बंद करून जायला निघाला होता. त्याला विनंती करून एक पाण्याची बाटली घेतली आणि तिथून निघालो. काही मिनिट झाले असतील आणि रस्त्यात आम्हाला माणूस आणि मुलगी पुन्हा दिसले. त्यांना पाहून आम्ही विचारातच पडलो की इतक्या लवकर हे २-३ किलोमीटर चालत कसे आले. मी बाईक थांबवून त्यांना विचारले “अहो काका तुम्ही चालत येत होता ना मग इतक्यात इथपर्यंत कसे पोहोचला त, लिफ्ट वैगरे मागितली का कोणाकडे ?” तसे तो म्हणाला “नाही इथून एक शॉर्टकट आहे त्याने आलो आम्ही”.
तसे मी त्यांना विचारले “आम्ही बरोबर रस्त्याने जातोय ना ?” त्याने काही न बोलता होकारार्थी मान हलवली. मी गाडी चालू केली आणि पुढे निघालो. साईड मिरर मध्ये पाहिले तर मागे कोणीही नव्हते. माझे काळीज भीतीने धड धडू लागले होते. भेटला तो नक्की माणूस होता की अजुन कोणी. कारण एका क्षणात तो दिसेनासा झाला होता. मनात नको ते विचार येत होते. मी साधारण ९० च्याच वेगाने गाडी चालवत होतो. अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येत नव्हती. पण त्या क्षणी आम्हाला त्या भागातून बाहेर पडणे ही तितकेच महत्त्वाचे वाटत होते. साधारण १२.१५ ला आम्ही त्या मुख्य रस्त्याला येऊन पोहोचलो आणि समोर गाव नजरेस पडले. आणि नेमके तेव्हा च पेट्रोल ही संपले. तशी आम्ही गाडी ढकलत पेट्रोल पंपावर घेऊन गेलो आणि त्याला विनवणी करून पेट्रोल घेतले.साधारण पहाटे ३ नंतर आम्ही घरी पोहोचलो.
तो माणूस नक्की कोण होता आणि खर तर तो माणूस च होता का हा प्रश्न मला अजूनही सतवतोय. याआधी चकवा लागणे म्हणजे काय हे फक्त ऐकुन होतो पण त्या रात्री चकवा नक्की काय असतो हे अनुभवले. आमचे नशीब चांगले म्हणून आम्ही या सगळ्यातून सुखरूप पणे बाहेर पडू शकलो.