अनुभव क्रमांक – १ – निरंजन
आमची घरे जुन्या पद्धतीची आहेत. त्यामुळे इतर घरांच्या तुलनेत खूप लांब आणि मोठी घर. कालांतराने त्यांची विभागणी झाली तो भाग वेगळा. मला आणि माझ्या भावाला लहानपणापासून भुता खेताच्या गोष्टी ऐकण्याची खूप आवड होती. आम्हाला कोणी गोष्टी सांगितल्या की आम्ही त्याची मस्करी करायचो. त्या घटने पर्यंत आम्ही सगळ्याच गोष्टी ची चेष्टा केली.
त्या रात्री नेहमी प्रमाणे आम्ही आजी कडे नवीन गोष्टी साठी हट्ट करू लागलो. तिला अजिबात इच्छा नव्हती म्हणून ती म्हणाली की गोष्ट नाहीये पण एक सांगते. तुम्ही सगळ्याची नेहमी मस्करी करता ना.. आपल्या वाड्यातून एक बाई रोज वरच्या रस्त्याने येते आणि घरा मागून निघून जाते. आणि हे अगदी खरे आहे. आजी जरा जास्तच गंभीरतेने सांगत होती. त्यामुळे आमचे आम्हीच ठरवले की हे कितपत खरे आहे हे शोधून काढायचे. म्हणून दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही जेवण वैगरे आटोपल्यावर माडीवर जाऊन बसलो.
साधारण २-३ तास आम्ही कोणी दिसतंय का ते पाहत होतो. शेवटी एक वाजत आला तसे आम्ही दोघेही पेंगू लागलो म्हणून खालच्या खोलीत झोपायला निघून गेलो. झोपण्याआधी पाणी पिऊन झोपायची सवय होती म्हणून आम्ही दोघेही स्वयंपाक घरात पाणी प्यायला गेलो. मी पाणी पित होतो आणि माझा भाऊ शेजारी उभा होता. तितक्यात त्याला कसलीशी चाहूल जाणवली आणि त्याने खिडकीतून बाहेर डोकावले. पुढच्या क्षणी तो धाडकन खाली कोसळला. तो जरी जमिनीवर पडला असला तरी त्याचे डोळे सताड उघडे होते. मी त्याला पाहून जोरात ओरडलो. तसे घरातले सगळे उठून स्वयंपाक घरात धावत आले.
मला सगळे विचारू लागले पण मला तेव्हा नक्की काय झाले हेच माहीत नव्हते. माझ्या भावाने नंतर सांगितले की ती बाई दिसली मला, आणि तिने माझ्याकडे पाहिले आणि मी घाबरून जमिनीवर कोसळलो. भावाचे बोलणे ऐकून मला आजीच्या बोलण्यावर विश्वास बसला होता. पण त्या बद्दल आम्ही घरच्यांना कधीच सांगितले नाही त्यामुळे ती बाई नक्की कोण होती, ती आमच्या वाड्या शेजारून इतक्या रात्री कुठे जाते असे बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.
अनुभव क्रमांक – २ – राज कांबळे
माझा एक मित्र आहे सतीश नावाचा. तो लहान असताना नेहमी त्याच्या कुटुंबासोबत गावी जायचा. त्या वर्षी ही तो ट्रेन ने गावी जायला निघाला होता. योगायोगाने त्या ट्रेन चा मोटरमन म्हणजे ड्रायवर त्याच्या वडिलांचा वर्ग मित्र निघाला. मग काय. सतीश ११ वर्षांचा असेल तेव्हां. त्याने हट्ट करायला सुरुवात केली की मला ड्राइवर काकांसोबत बसायचे आहे आणि ट्रेन कशी चालते ते बघायचे आहे.
तसे ते त्याला इंजिन च्या डब्यात घेऊन गेले. जाता जाता त्याच्या आई ने त्याला एक बिस्कीट चा पुडा दिला म्हणजे प्रवासात भूक वैगरे लागली तर खाण्यासाठी. काही वेळात ट्रेन स्टेशनातून निघाली. रात्रीची वेळ होती. साधारण अर्ध्या तासाने सिग्नल नसल्याने ट्रेन एका निर्जन स्थळी थांबली. बहुतेक दोन स्टेशनच्या मध्ये. अंधार असल्यामुळे आजी बाजूचा परिसर काही नीट दिसत नव्हता.
तितक्यात ट्रॅक वर एक म्हातारी बाई दिसली. तसे तो काकांना म्हणाला ती बघा एक बाई समोरच उभी आहे. ते लक्ष न देताच म्हणाले असेल कोणी तरी भिकारी. ट्रेन चालू झाल्यावर निघून जाईल समोरून. ते लघु शंकेला म्हणून गेले. सतीश तिथेच बसून बिस्कीट चा पुडा उघडून बिस्कीट खाऊ लागला. तितक्यात ती म्हातारी खिडकी जवळ आली आणि सतीश कडे हात पुढे करून खायला मागू लागली. त्याने बिस्कीट द्यायला म्हणून हात पुढे केला तसे काकांनी येऊन खिडकी लावली. सिग्नल झाल्यामुळे त्यांनी ट्रेन चालू केली.
ते गावाला पोहोचले. काही वर्षा नंतर ते पुन्हा असेच भेटले. तेव्हा सतीश मोठा झाला होता. असेच बोलता बोलता त्याने विषय काढला की तुम्हाला आठवतेय का मी लहान असताना तुम्ही मला एकदा तुमच्या सोबत बसवले होते. तसे ते म्हणाले हो आठवतेय ना. त्यावर सतीश ने विचारले , त्या रात्री ती म्हातारी बाई खिडकी जवळ आली होती, तिला मी बिस्कीट देत होतो पण तुम्ही पटकन खिडकी लाऊन घेतली. तसे म्हणाले “अरे काय बोलतोस, इंजिन ची खिडकी किती उंचावर असते तुला माहित आहे ना मग कोणी बाई इतक्या वर कशी येऊ शकते, आणि मला कोणी दिसले नाही तितक्यात सिग्नल झाला म्हणून तर मी खिडकी लाऊन घेतली”..
अनुभव क्रमांक – ३ – नेहा हतनकर
माझ्या काकांना अदृष्य शक्तींची जाणीव होते. इतकेच नाही तर त्यांना त्या शक्ती झपाट तात सुद्धा. म्हणून ते अनोळखी ठिकाणी जाणे आवर्जून टाळतात.
ही घटना साधारण २ महिन्यापूर्वीच ची आहे. काही कामानिमित्त पहाटे बाईक ने ते गावी जायला निघाले. तेव्हा नीटसे उजाडले ही नव्हते. काही वेळात ते घाटाच्या रस्त्याला लागले. तसे त्यांना एक माणूस रस्त्याकडे ला उभा दिसला. तो हात करून त्यांच्याकडे लिफ्ट मागत होता. त्याने पांढऱ्या रंगाचा सदरा आणि धोती घातली होती. हातात एक छोटी पिशवी ही होती. काका घाईत असल्यामुळे त्या माणसाकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेले. दिवसभरात गावातले काम आटोपून ते रात्री साधारण ९ च्याच सुमारास पुन्हा परतीच्या वाटेला लागले. वाटेत पुन्हा घाटाचा रस्ता लागला तसे तोच माणूस त्यांना पुन्हा रस्त्याकडे ला हात करत उभा दिसला. रात्रीची वेळ असल्याने एकटे जाण्यापेक्षा कोणी सोबत असलेले बरे असा विचार करत या वेळेस त्यांनी गाडी थांबवली. काकांनी त्या माणसाला विचारले की कुठे जायचे आहे तसे तो म्हणाला की थोडे पुढे सोडा मला. तसे काकांनी त्याला बसायला सांगितले.
त्यांच्या गप्पा सुरू झाल्या तसे तो माणूस त्यांना विचारू लागला आणि बोलता बोलता अरे तुरे करत एकेरी उल्लेख करू लागला. काकांना जरा वेगळेच वाटले. तो सांगू लागला “सकाळी पण तुझ्या बाईक ला हात केला पण तू थांबला नाहीस, पण आता मात्र भेटलास”. काकांनी त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिले नाही. तितक्यात तो माणूस म्हणाला “बड इथेच थांबव” काकांनी गाडी थांबवली तसे तो माणूस उतरला. ते म्हणाले की “चला निघतो आता”. तसे तो माणूस म्हणाला “इतक्यात सुटका नाही, १२ वाजेपर्यंत घरी पोहोच शील तू पण त्या आधी मी पोहोचे न तिथे”. काकांनी हसत त्याच्याकडे पाहिले आणि हा काहीही बरळतोय असा विचार करून तिथून गाडी काढली.
त्यांना घरी पोहोचायला बरोबर १२ वाजले. त्यांनी बाईक अंगणात लावली आणि समोर नजर गेली. तो माणूस त्यांच्या दारात उभा होता. ते आश्चर्याने पाहत त्याच्या जवळ चालत गेले. ते त्याला काही बोलणार तितक्यात तो म्हणाला “काय, म्हणालो होतो ना, बघ बरोबर १२ वाजलेत आणि तुझ्या आधी मी पोहोचलो य”. काकांना बरेच प्रश्न पडले होते की हा माणूस नक्की कोण आहे, याला माझ्या घराचा पत्ता कोणी दिला.?. त्या दिवशी नेमके ते घरी एकटे होते. तो माणूस पुढे म्हणाला “चल, घरी कोणी नाहीये आपण प्यायला बसू?”. काकांनी नकळत होकार दिला त्यांची इच्छा नसताना ही. त्या रात्री काकांनी कच्ची दारू प्यायली. त्यांना अजिबात सवय नव्हती तरीही ते भरपूर दारू प्यायल्यावर सुद्धा पूर्ण शुद्धीत होते. पहाटे त्यांना गाढ झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी माझी माऊशी म्हणजे त्यांची बायको घरी आली. तिच्या आवाजाने त्यांची झोपमोड झाली. तसे उठल्या उठल्या ते भाकरी करून दे म्हणून तिच्या मागे लागले. तिला थोडे आश्चर्य वाटले की सकाळी उठल्यावर चहा मागणारे हे आज भाकरी का मागत आहेत.? तरीही तिने त्यांना ७-८ भाकऱ्या करून दिल्या. आणि काही मिनिटात त्यांनी त्या संपवल्या. आता मात्र तिला शंका येऊ लागली की काल रात्री काही तरी घडलेय. आणि ज्यांनी आता भाकऱ्या खाल्या तो माणूस कोणी वेगळाच आहे. तिने विचारायला सुरुवात केली तसे काका तिच्याशी विनाकारण भांडू लागले. त्यांच्यातला वाद अगदी विकोपाला गेला आणि शेवटी ते तिला म्हणाले “घरातून बाहेर निघ, मी खूप वैतागलो य, मला जीव द्यायचाय”..
तोपर्यंत त्यांची मुलगी आणि आजी घरी आले. त्यांनी ही खूप समजवायचा प्रयत्न केला पण ते काही ऐकायला तयार नव्हते. एका क्षणाला ते एकदम भानावर आले आणि शांत झाले. त्यांनी समोर पाहिले तर दारात तोच माणूस उभा होता. त्यांना सांगू लागला “या सगळ्यांना बाहेर जायला सांग आपण दोघे ही या पंख्याला लटकून घेऊ, काय उपयोग अश्या जगण्याला, मरण च योग्य आहे तुला. या सगळ्यांना बाहेर जायला सांग आत्ता म्हणजे मला आत येता येईल आणि तुला या सगळ्यातून कायमचे सोडवता येईल”. पण घरातून कोणीच बाहेर पडले नाही. एव्हाना माउशी ला कळून चुकले होते की यांना पुन्हा कोणी तरी झपाटले य. कारण ते दारात फक्त एक टक पाहत होते. तिने त्यांचा हात पकडला आणि जोरात झटकला तसे ते एकदम भानावर आले. ती त्यांना थेट देवळात घेऊन गेली आणि नंतर त्यांना तो माणूस दिसायचा बंद झाला.
अनुभव क्रमांक – ४ – प्रशांत
हा अनुभव माझ्या लहानपणीचा आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गावी गेलो होतो. उकडत असल्या कारणाने आम्ही सगळे अंगणात च झोपायचो. त्या दिवशी दिवसभर खेळून झाल्यावर रात्री जेवण उरकले आणि आम्ही रात्री झोपायला अंगणात आलो. माझा नुकताच डोळा लागला होता आणि तितक्यात मला एक कर्णकर्कश किंचाळी ऐकू आली. सगळे ताडकन उठून बसले. काही वेळा साठी कोणाला काही कळलेच नाही. आमच्यापैकी काही जण आजी बाजूला चौकशी करून आले पण काही कळले नाही की तो आवाज कुठून आला. म्हणून आम्ही जास्त लक्ष न देता झोपून गेलो.
दुसऱ्या दिवशी आमच्या ओळखीचे एक व्यक्ती अचानक आजारी पडले. आम्ही त्यांना पाहायला गेलो तेव्हा ते बोलण्याच्या मनस्थितीत ही नव्हते. ४-५ दिवसांनी जेव्हा त्यांची तब्येत सुधारली तेव्हा त्यांनी सांगितले की ते शेजारच्या नातेवाईकांकडे रात्री झोपण्यासाठी गेले होते. रात्री त्यांना कसल्याश्या आवाजाने त्यांची झोपमोड झाली तसे ते उठले आणि समोर पाहतात तर त्यांच्याच घरातली एक बाई समोर उभी होती. जी काही वर्षांपूर्वी मेली होती.
ती किंचाळी त्या बाईची होती आणि ती ऐकुन मी जागीच बेशुध्द झालो. नंतर कळले की तिला तिच्या घरी आलेले आवडायचे नाही. कित्येकदा तिच्या घरच्यांना ती दिसली आहे. त्यांच्या घरासमोरून जाणाऱ्या लोकांना रात्री अपरात्री रस्त्यात उभी दिसायची.