अनुभव – गौरव घरत

अनुभव मी जेव्हा माझ्या मित्रांसोबत फार्म हाऊस वर फिरायला गेलो होतो तेव्हाचा आहे. आमच्याकडे हिवाळा आला की फार्म हाऊस वर जाणे म्हणजे नेहमीचे होते. त्यामुळे आम्हीच ठरवलेल्या नियमाप्रमाणे मी आणि माझे काही मित्र एका फार्महाऊस वर राहायला गेलो. बुकिंग वैगरे आधीच केले होते त्यामुळे बाकीच्या गोष्टींबद्दल काही काळजी नव्हती. आम्ही दोन दिवसासाठी ते फार्म हाऊस बुक केले होते. त्या दिवशी दुपारची जेवण उरकून आम्ही जायला निघालो. पोहोचे पर्यंत संध्याकाळचे ६ वाजत आले होते. तिथे पोहोचल्यावर आम्ही सामान वैगरे आत नेऊन ठेवले. खूप फ्रेश वाटत होते. फार्महाऊस तसे प्रशस्त होते आणि समोरच एक मोठे स्विमिंग पुल ही होते. संध्याकाळची वेळ असल्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट एक वेगळाच आनंद देत होता. आम्ही तिथल्याच भागात फेरफटका मारू लागलो. वातावरणात मस्त थंडावा जाणवत होता. 

सूर्य नुकताच मावळला असल्यामुळे आकाशात सूर्य प्रकाशाच्या गुलाबी छटा पसरल्या होत्या. डोंगर दऱ्यांचा परिसर असल्यामुळे अंधार तसा लवकरच जाणवू लागला. फार्महाऊस जवळच्या परिसरात वर्दळ अगदीच तुरळक वाटली. त्याला लागूनच एक छोटा रस्ता होता. त्यावरून काही लोक घराच्या दिशेला परतत असावी असे वाटून गेले. हळु हळु अंधार गडद होत चालला होता तसे वातावरणात ही थंडावा अधिकच जाणवू लागला. हिवाळ्याचे दिवस होते आणि तो परिसर जरा उंचावर च होता. काही वेळात तिथे अगदीच स्मशान शांतता पसरली. आवाज होता तो फक्त आम्हा मित्रांच्या बोलण्याचा. तितक्यात आम्ही आणलेल्या साऊंड वर मी गाणी लावली तसे सगळ्यांना हुरूप आला. सगळे जोमात आल्यावर मग काय पार्टी ला सुरुवात झाली. सगळे मस्त एन्जॉय करत होते. तेवढ्यात अचानक फार्महाऊस ची लाईट गेली आणि सगळी कडे मिट्ट अंधार पसरला. टॉर्च लावायचा विचार केला तर आम्हा सगळ्यांचे मोबाईल ही आत रूम मध्ये ठेवले होते. 

आता मोबाईल आणण्यासाठी आत जाणार कोण हा एक मोठा प्रश्न होता कारण ते फार्महाऊस आम्हा सगळ्यांना नवीनच होते. पण पुढच्या ५ मिनिटात लाईट आली आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. पुन्हा आमची मजा मस्ती सुरू झाली. तितक्यात माझ्या लक्षात आले की आमच्यातला एक मित्र तिथे नाहीये. मी इतरांना विचारले पण तो नक्की कुठे गेलाय हे कोणालाही कळले नाही. त्याची शोधाशोध सुरू झाली. तितक्यात एका मित्राचे लक्ष स्विमिंग पुल कडे गेले आणि ह्रदयाचा ठोकाच चुकला. तो स्विमिंग पुलच्या पलिकडच्या कठड्यावर बसला होता आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्याचे तोंड आमच्या विरुद्ध दिशेला होते. त्या बाजूला मिट्ट अंधार होता त्यामुळे तो तिथे का पाहतोय असा नुसता विचार येताच काळजात चर्र झाले. आम्ही त्याला हाक मारली पण तो काही प्रतिसाद च देत नव्हता. त्याला आमचा आवाज तर नक्कीच जात होता पण तरीही तो आमच्या हाकेला उत्तर देत नव्हता. त्याच्याजवळ जाण्याची कोणाचीही हिम्मतच नव्हती.

तसे मी म्हणालो “आपण सगळे जाऊ आणि घेऊन येऊ त्याला”. आम्ही त्याच्या जवळ गेलो आणि विचारले “काय रे.. काय झाले.. इथे काय करतोस..”. तसे तो आमच्याकडे न पाहताच म्हणाला “मला काहीही करून लिंबुसरबत हवेय”. आम्ही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलो. पण जास्त काही न बोलता जाऊन लिंबू सरबत करून आणले आणि त्याला प्यायला दिले. तो एका क्षणात ते प्यायला आणि काहीही न बोलता आत निघून गेला. त्याचे असे वागणे पाहून कोणाचीही पार्टी करायची ईच्छा नव्हती. आम्ही त्याच्या सोबत च बसलो होतो. काही वेळा नंतर तो उठला आणि बाथरुम मध्ये लघवी साठी गेला. आता गेल्या गेल्या तो जोरात ओरडला आणि घाबरतच बाहेर आला. अगदी वेडी सारखा करू लागला. आम्ही त्याला शांत करायचा प्रयत्न करत होतो पण तो काही ऐकत नव्हता. बऱ्याच वेळानंतर तो शांत झाला आणि झोपला. 

आम्ही बाहेर हॉल मध्ये येऊन बसलो. पण इतक्यात आमची या विचित्र प्रकारापासून सुटका होईल असे वाटत नव्हते. अचानक बाहेर कुत्र्यांच्या भुकण्याचा आवाज येऊ लागला. सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केले पण नंतर असे वाटू लागले की तो आवाज आत फार्महाऊस मधून येतोय. आम्हाला वाटले की ते कुत्रे एखादा दरवाजा किंवा खिडकीतून आत शिरले की काय.. मी उठलो आणि मागच्या एका दरवाजाच्या जवळ गेलो. पण तिथे कोणीही दिसले नाही. मला वाटले दरवाज्या बाहेर असतील म्हणून त्यांना हुसकून लावायला म्हणून मी दार उघडले तर बाहेर एकही कुत्रा नव्हता. आता मात्र मी खरंच घाबरलो. काय घडतंय कळत नव्हतं. एकही कुत्रा दिसला नाही पण भुंकण्याचा आवाज मात्र येत होता. याच विचारात मी आत आलो. आवाज सतत सुरूच होता. 

मी न राहवून खिडकी उघडली आणि बाहेर पाहू लागलो. त्या भागात जरा अंधार होता त्यामुळे काही दिसले नाही. मी खिडकी बंद केली आणि आत सोफ्यावर येऊन बसलो. माझा एक मित्र तिथेच गाढ झोपला होता. टिव्ही नुसताच सुरू होता म्हणून मी तो बंद केला तितक्यात माझे लक्ष त्या खिडकीजवळ गेले. बाहेर कोणी तरी उभ असल्या सारखे जाणवले आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. मी माझ्या मित्रांकडे पाहिले, कोणी जाग असेल तर उठवाव अस वाटल पण सगळे अगदी गाढ झोपेत होते. मी पुन्हा दबकत खिडकीत पाहिलं पण या वेळी तिघे कोणीही दिसले नाही. मला नक्कीच नको नको ते भास होत आहेत असा विचार करून मी तिथेच झोपलो. सकाळी कसल्याश्या आवाजाने जाग आली. रात्री घडलेल्या प्रसंगामुळे सगळ्या चा मूड गेला होता. सगळे फ्रेश झालो आणि नाष्टा करू लागलो. 

सहज म्हणून मी माझ्या त्या मित्राला विचारलं की काल काय झालं होत तुला.. असे वेड्यासारखे का वागत होतास. त्याने जे सांगितले ते आम्ही ऐकतच राहिलो. तो म्हणाला की “मला काल लाईट गेल्या नंतर चे काही आठवत नाहीये पण तुम्ही मला रूम मध्ये घेऊन आलात त्या नंतर चे आठवतेय. मी बाथरूम मध्ये गेलो आणि किंचाळ लो कारण खिडकीच्या बाहेर कोणी तरी उभ होत आणि मला असं वाटलं की ते मलाच पाहून हसते य.” त्याचे बोलणे संपते न संपते तसे तिथला केअर टेकर साफ सफाई करायला आला. त्याने बहुतेक आमचे बोलणे ऐकले असावे. तो म्हणाला “लेकरांनो खुप चांगले नशिब होते तुमचे की तुम्ही त्याला काही प्रतिसाद दिला नाही.” सर्व मित्र एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलो की हा माणूस असे काय बोलतोय.

आम्ही त्याला काही विचारणार ईतक्यात तोच पुढे सांगू लागला “आजपासुन ठीक २ वर्षांपूर्वी याच फार्म हाऊस वर तुमच्यासारखाच एक मित्रांचा ग्रुप आला होता. त्यांच्यात काही कारणामुळे वादावादी झाली आणि तो वाद अगदी विकोपाला गेला. त्यातच एकाचा जीव गेला, त्याला तसेच इथल्या स्विमिंग पुल मध्ये टाकून ते निघून गेले. तेव्हापासूनच तो खूप जणांना दिसतो.” हे असे सगळे ऐकून आम्हाला तिघे क्षणभर ही थांबायची इच्छा नव्हती. पुढच्या काही मिनिटात आम्ही सगळे सामान घेतले आणि घरी जायला निघालो. तेव्हा पासुन आज पर्यंत आम्ही कुठल्याही फार्म हाऊस वर फिरायला गेलो नाही.

Leave a Reply