अनुभव – सुनील पाटील

मी कोल्हापूर येथे वास्तव्यास आहे. अनुभव आहे १९७६ सालचा. पूर्वी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावात राहायचो. त्या गावात माझे आजोबा श्री दत्तू पाटील हे सरपंच होते. त्या काळी आमच्याकडे बरीच वर्ष गावाची पाटीलकी देखील होती.. हा अनुभव मी माझ्या आजोबांकडून आणि आमच्या गावातील बऱ्याच लोकांकडून ऐकला आहे. जुलै महिना चालू होता आणि त्या वर्षी पावसाचा जोर खूप वाटत होता. सुरुवातीचा महिना जरी असला तरी सततच्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहरात जाण्याचा रस्ता देखील बंद झाला होता. अश्या वेळी शहरांचा लहान गावांशी संपर्क त्या काळी लगेच तुटायचा कारण दूरध्वनी सेवा ही उपलब्ध नव्हती. त्याच दिवसात गावातल्या गुरव नावाच्या एका गृहस्थांचे निधन झाले. गावात ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली. सगळे गावकरी एकत्र आमच्या घरी येऊन जमले. कारण मुसळधार पाऊस असल्याने पुढे काय आणि कसे करायचे हे ठरवायचे होते. काही वेळात एक बैठक घेऊन आजोबांनी सगळे समजावून सांगितले. त्यांच्या घरी सगळे विधी उरकून प्रेत गावाच्या वेशीवर असलेल्या स्मशानात घेऊन जायचे ठरले. माझे आजोबा आणि सगळे गावकरी गावातल्याच एका दुकानातून अंत्य विधी चे सामान घेऊन त्या गृहस्थांच्या घरी पोहोचले. ठरल्या प्रमाणे सगळे विधी उरकले व त्यांची तिरडी उचलली गेली. ती अंत यात्रा त्यांच्या घरापासून ते थेट गावाच्या वेशीवर असलेल्या स्मशाना पर्यंत जाणार होती. काही वेळातच ते सगळे स्मशान भूमीच्या जवळ येऊन पोहोचले. 

त्यातले काही जण पटापट पुढे गेले आणि आतली व्यवस्था पाहू लावले. पण प्रेत जाळायला तिथे पुरेशी लाकड नव्हती. जी होती ती सततच्या पावसामुळे पूर्ण भिजून ओली झाली होती त्यामुळे त्याचा वापर करणं शक्य नव्हत. आमचं गाव दोन डोंगरांच्या मध्यभागी वसले होते. वरील डोंगराळ भागात अगदी घनदाट जंगल होते. तिथेच एक छोटे कौलारू घर बांधून स्माशा ना साठी लागणारी मोठी लाकड तोडून ठेवली जात. दर महिन्याला जाऊन तिथून हवी तशी लाकड इथे स्मशान भूमीत आणून ठेवत. या वेळी मात्र त्यांचा अंदाज चुकला होता आणि बऱ्याच दिवसांपासून गावातले कोणीही त्या ठिकाणी लाकड आणायला गेलं नव्हत. आजोबांनी पटकन निर्णय घेतला आणि काही गावकऱ्यांना घेऊन जंगलाच्या दिशेने चालत निघाले. कारण सकाळ पर्यंत थांबणं शक्य नव्हतं. त्या प्रेता बरोबर तुरळक लोक स्मशान भूमीत च थांबली. पावसाचा जोर अधिकच वाढला होता जणू ढगफुटी झाली होती. लाकड ठेवलेले ते कौलारू घर एका टेकडीवर होते आणि तिथे जाण्या आधी वाटेत एक नदी लागायची. मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीही काठोकाठ भरून वाहत होती. वाहत्या पाण्याचा वेगही जाणवत होता. माझ्या आजोबां सोबत साधारण ७-८ लोक सोबतीला होती. नदी काठी बांधलेली एक नाव घेऊन ते दुसऱ्या काठावर जायला निघाले. गडद रात्र, मुसळधार पाऊस आणि त्यात सोसाट्या चा वारा. एरव्ही ती नदी पार करून जाणं सहज शक्य असल तरी आज ते खूपच दिव्य वाटत होत. ती नौका जेमतेम चालवत ते कसे बसे दुसऱ्या काठाला येऊन पोहोचले. पटापट उतरून जंगलाच्या दिशेने चालत निघाले. मोडक्या छत्र्या, हातात कंदील घेऊन कशी बशी वाट काढत टेकडी चढू लागले. 

वारा पाऊस असल्याने ते सगळे पूर्णपणे भिजून गेले होते. काही वेळेच्या पाय पीटी नंतर ते त्या लाकड ठेवलेल्या कौलारू घरापर्यंत येऊन पोहोचले. प्रत्येकाने दहा बारा लाकडाचे मध्यम व लहान आकाराचे ओंडके बांधून घेतले. माझे आजोबा त्यांना मदत करत होते. एक एक करत सगळी लोक ती लाकड डोक्यावर घेऊन परतीच्या मार्गाला लागले. माझे आजोबा शेवटी एकटेच राहिले होते. त्यांनी नेण्यासाठी लाकड बांधून बाहेर काढून ठेवली. त्या घराचे दार लावून घेतले आणि दारापुढे एक मोठा दगड ठेवला. दोरीने बांधलेली लाकड आपल्या डोक्यावर घेतली आणि टेकडी वरून खाली उतरू लागले. पावसाचा जोर काही कमी होण्याचे चिन्ह दाखवत नव्हता. जस जशी रात्र पुढे सरकत होती तस तसे पावसाचा जोर अधिकच वाढत चालला होता. त्यात ती लाकडी पावसाच्या पाण्यामुळे हळू हळू ओली होत होती. पाणी आत झिरपत जात होत. पण या सगळ्यात एक विचित्र गोष्ट त्यांना जाणवली. बरीच लाकड जरी असली तरी त्या लाकडांचे जराही वजन त्यांना जाणवत नव्हते. ते जरा आश्चर्य चकित झाले पण या सगळ्या कडे लक्ष देण्यापेक्षा लवकरात लवकर स्मशान भूमी मध्ये पोहोचणे जास्त महत्वाचे होते. म्हणून त्यांनी लक्ष न देता झपाझप पावलं टाकत वाटेवरून उतरायला सुरुवात केली. पण सततच्या धावपळीमुळे ते खूप दमून गेले होते. काही मिनिट विश्रांती घ्यायला म्हणून ते एका झाडा शेजारी थांबले आणि लाकडे खाली ठेवली. पण ती खाली ठेवताना अलगदपणे एखाद्या कागदासारखी खाली पडली. त्यांना काही च कळत नव्हतं की हा काय प्रकार आहे. त्यांच्या सोबत असणारी लोक एव्हाना बरीच पुढे निघून गेली होती जी दृष्टीस ही पडत नव्हती. 

आल्या मार्गाने आजोबा मागे वळून पाहणार तसा त्यांना एक जोरदार धक्का बसला. उतरणीची वाट असल्याने तोल जाऊन ते खाली कोसळले. हातातला कंदील ली खाली पडला. त्यांनी मागच्या दिशेला पाहिले. एक मानव सदृश्य आकृती तिथे उभी होती. अती सामान्य उंची..  साधारण ८ ते ९ फूट असेल. त्या गडद अंधारात त्या आकृतीचे डोळे चमकत होते. काय आहे ते समजत नव्हते पण ते आपल्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे हे त्यांना कळून चुकले. आपला एकट्याचा टिकाव लागणार नाही हे ओळखताच ती लाकड तिथेच टाकून ते धावत सुटले. पण त्यांना वाटेचा अंदाज आला नाही म्हणून ते वेगळ्याच दिशेला पळत गेले. काही अंतर धावून झाल्यावर त्यांना एक छोटे घर दिसले. मदत मिळेल या आशेने ते त्या घराकडे धावत गेले. पण ती आकृती त्यांच्या मागावर होती. धावत असताना पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला तसे ते पुन्हा खाली पडले. ती आकृती आता आजोबांच्या मागे येऊन उभी राहिली. एखाद्या हिंस्त्र श्वापदा प्रमाणे भासत होती. त्यांनी उठून पुन्हा धावायचा प्रयत्न केला तसे त्यांचा पाय पकडून जोरात पाठीमागे खेचले. आजोबा व ते जे काही होत त्यांच्यात जणू कुस्तीच रंगली. बराच वेळ झटापट सुरू राहिली. तो आवाज ऐकून त्या घरात राहणाऱ्या एका बाईला या सगळ्याचा अंदाज आला.. ती मागच्या दाराने धावत नदीच्या काठी आली आणि इतरांना मदती साठी बोलावू लागली. त्यांच्या सोबत आलेले लोक आणि त्या भागात राहणाऱ्या इतर जणांना हाताला लागेल ते हत्यार घेऊन त्या दिशेला धाव घेतली. कोणाकडे काठया होत्या तर कोणाकडे जुन्या काळातल्या बंदुका. इथे आजोबांची त्या भयाण गोष्टी पासून सुटका करण्याची झटापट सुरूच होती. त्या अकृतीने एक भला मोठा दगड उचलला. 

जेव्हा ते गावकरी तिथे धावत आले तेव्हा त्यांना आजोबा तर दिसले पण तो दगड हवेत तरंगताना दिसला. कारण त्यांना ती आकृती दिसत ही नव्हती पण ती होती एवढे मात्र नक्की. त्यातल्या बंडू पाटील नामक इसमाने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीची गोळी झाडली. तसे ते जे काही होत त्याला गावकऱ्यांची चाहूल लागली. तो दगड तसाच टाकून ते अंधारात दिसेनासं झालं. ते सगळे आजोबांकडे धावत गेले. तिथून काही लोक स्मशानभूमीत गेले आणि काही जण आजोबांना घेऊन कुलदैवत ज्योतिबाच्या मंदिरात गेले. त्यांना देवांचा कौल मिळाला की काही दिवसात सर्व काही ठीक होईल पण गावात दर वर्षी जत्रा भरवावी लागेल. कालांतराने सगळे काही सुरळीत झाले. आणि आजही गावात दर वर्षी जत्रा भरवली जाते. 

Leave a Reply