अनुभव – योगेश कुदर्माळे
आमचं गाव कर्नाटक मधल्या गुलबर्गा जिल्ह्यात होते. गावी आमचे शेत ही होते जे गावातल्या घरा पासून जवळपास ४ किलोमिटर वर होते. प्रसंग बराच जुना आहे, साधारण १९८६ चा. माझ्या वडिलांनी मला सांगितला होता. त्या काळी माझ्या काकांनी शेतावर मजूर ठेवले होते कारण माझे बाबा आणि काका दोघे ही सरकारी नोकरी करायचे. त्यामुळे त्यांना शेतात काम करण्यासाठी वेळ मिळायचा नाही. म्हणून एका करारावर त्यांनी ते शेत त्यांच्या मित्राला सांभाळायला दिले होते. दर सहा महिन्यांनी जो काही नफा किंवा तोटा व्हायचा तो ते ६०-४० प्रमाणात वाटून घ्यायचे. त्या काळी दालन वळणासाठी KRTC च्या सरकारी बसेस जास्त नव्हत्या. रात्री १०.३० ची शेवटची बस असायची जिथून ती पुढे बिजापूर मार्गे जायची. त्या वेळी तिथे बरीच छोटी छोटी खेडी होती. आमच्या शेता जवळ एक छोटी वस्ती होती. साधारण १०-१२ झोपड्या होत्या आणि सगळा मजूर वर्ग त्याच ठिकाणी राहायचा. जवळ पासच्या शेतात काम करायला जायचा. त्या खेडेगावात आतल्या भागात पक्के रस्ते नसल्याने बसेस वैगरे अजिबात नसायच्या. म्हणून मग तिथली काही तरुण मुलं टांगा चालवायची. बाबांना महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी सुट्टी असायची. त्यामुळे ते दोन दिवस शेत पाहणी करायला शेतावर असायचे. रोज रात्री शेवटच्या बस ने शेतावर जायचे. ते पावसाचे दिवस होते. त्या रात्री बाबा नेहमी प्रमाणे शेवटच्या बस ने शेतावर जायला निघाले. १०-१५ मिनिटात ते पोहोचले आणि बसमधून उतरताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शेवटची बस असल्याने खूप गर्दी होती.
त्यामुळे उतरल्यावर सगळी लोक मिळेल त्या टांग्या ने आप आपल्या घरी जाऊ लागले. बाबांना त्यांचा एक जुना मित्र भेटल्याने एका झाडा शेजारी आडोसा घेऊन ते काही वेळ त्याच्याशी बोलत बसले. तो तिथल्याच एका जवळच्या खेड्यात राहायचा. बोलणं आटोपून झाल्यावर ती त्याच्या मार्गाने निघून गेला. बाबांना नंतर लक्षात आले की आता शेतावर जायला एकही टांगा नाहीये. त्यांना वाटले की आपण काही वेळ थांबून बघू कदाचित एखादा टांगेवला प्रवाश्यांना सोडून येईल परत. साधारण ११ वाजून गेले होते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्ता निसरडा झाला होता. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेतं होती पण रस्त्याला दिवे नव्हते. तितक्यात बाबांना टांग्याचा आवाज येऊ लागला तसे त्यांनी त्या दिशेला पाहिले. टांग्यात एक लावला कंदील होता आणि त्याचाच काय तो प्रकाश जेमतेम अंधाराला चिरत होता. कारण त्या परिसरात इतका अंधार होता की त्या कंदिलाचा प्रकाश सोडला तर २ फुटांच्या पुढचे ही काही दिसत नव्हत. तो जस जसा जवळ येऊ लागला त्यांना कळले की तो एक ओळखीचा टांगे वाला आहे. ते पटकन टांग्या ते बसले आणि शेतावर जायला निघाले. पावसाचा जोर खूपच वाढत चालला होता. तो व्यक्ती ओळखीचा असल्याने गप्पा मारत ते काही मिनिटात शेतावर पोहोचले. उतरून त्यांनी त्याला पैसे दिले आणि म्हणाले की खूप पाऊस आहे, त्यात अंधार असल्यामुळे जायला त्रास होईल त्यामुळे आजची रात्र इथेच थांब आणि उद्या सकाळी जा. पण त्याला घरी जायची घाई लागली होती म्हणून तो काही ऐकत नव्हता.
तितक्यात कुठून तरी एक ३०-३५ वर्षांचा व्यक्ती तिथे आला. त्याला त्याच गावात जायचे होते जिथे त्या टांगे वाल्याचे घर होते. त्यामुळे विचारल्या विचारल्या त्याने लगेच होकार दिला. ते तिथून निघणार तितक्यात त्याच्या मागून एक जोडपं आल. नुकताच लग्न झालं असावं असं वाटतं होत. नेमके त्यांना ही तिथेच जायचे होते. तो टांगे वाला माझ्या बाबांना म्हणाला की आता मला चांगली सोबत मिळाली आहे तुम्ही माझी मुळीच काळजी करू नका.. पण बाबांना खूप विचित्र वाटलं. कारण या वेळी तिथे एकही बस येत नाही.. जिथून ते आले होते तिथे दूर दूर वर वस्ती नाही.. त्यामुळे ते नक्की कुठून आले हे त्यांना समजत नव्हते. त्यात त्यांची नजर. ज्या पद्धतीने ते पाहत होते ते अगदीच विचित्र होत. ना त्यांच्याकडे समान होते ना हातात छत्री. त्यांचे चेहरे ही वेगळे वाटत होते पण कदाचित पावसात भिजल्यामुळे तसे वाटत असावे असे समजून त्यांनी जास्त लक्ष दिले नाही. ते आपल्या वाटेने शेतावर निघून गेले. २ दिवसांनी त्यांना बातमी कळली की तो टांगे वाला मुलगा खूप आजारी आहे, त्याने अंथरूण धरलय. त्या दिवशी गावात काम असल्याने ते त्याच्या घरी त्याला पाहायला गेले. तेव्हा त्याच्याकडून त्या रात्री घडलेली भयानक घटना कळली. तो त्या ३ प्रवाशांना घेऊन निघाला खरा पण साधारण १ किलोमिटर पुढे गेल्यावर त्या पस्तिशितल्या व्यक्तीने अचानक टांगा थांबवायला सांगितला. ज्या भागात त्याने थांबवायला सांगितला ती जागा अगदीच भयाण होती. बाहेर मिट्ट अंधार होता. त्याने विचारले सुद्धा ” इथे कुठे उतरताय.? इथे दूर दूर पर्यंत वस्ती नाही..?” त्यावर तो माणूस म्हणाला ” माझी हद्द इथे संपते..” त्या टांगे वाल्या मुलाला त्या वाक्याचा अर्थच कळला नाही. पैसे घेण्यासाठी त्याने हात पुढे केला तेव्हा त्याचे लक्ष नकळत खाली गेले आणि त्याच्या अंगावर सर्रकन एक काटा येऊन गेला.
जे पाहिलं त्यावर विश्वास च बसत नव्हता. पावसामुळे वातावरण अगदी थंड होत पण त्यातही त्याला दरदरून घाम फुटला. त्याचे हात पाय कापू लागले. तो व्यक्ती हळु हळु नजरेआड होत अंधारात निघूनही गेला. तश्याच अवस्थेत टांगा हाकत पुढे निघाला. आपण काय पाहिले हे तो समजण्याचा प्रयत्न करत होता. कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते. पण तो निव्वळ २ किलोमिटर चा रस्ता जणू संपतच नव्हता. त्याने न राहवून त्या जोडप्याला विचारले ” तुम्ही त्या माणसाला बघितले का..? तो काय बोलला ते कळले का..? ” त्यावर ते दोघे ही काही बोलले नाहीत फक्त नकारार्थी मान हलवली. तसे तो पुढे म्हणाला ” अहो तो माणूस म्हणाला की माझी हद्द इथे संपली.. मी पैसे घ्यायला गेलो आणि माझी नजर त्याच्या पायां जवळ गेली.. ” हे बोलता बोलता त्याने मागे वळून पाहिले आणि विजेचा तीव्र झटका लागल्या सारखा तो शहारला. कारण त्या टांग्यात मागे कोणीही नव्हतं..