ही घटना २०१७ साली मी व माझ्या एका मित्रा सोबत घडली होती. माझी गर्ल फ्रेंड येवल्याला बी एस सी नर्सिंग चा कोर्स करत होती. त्यांच्या कॉलेज ला सुट्ट्या लागणार होत्या. तिने मला फोन करून सांगितले की संध्याकाळी मी घरी यायला निघणार आहे. जव्हार पर्यंत यायला वाहन आहे पण तिथून पुढे यायला रात्री वाहन मिळणार नाही त्यामुळे तू मला घ्यायला ये. तिच्या सोबत तिच्या अजुन ३ मैत्रिणी होत्या पण त्यांच्या घरचे त्यांना घ्यायला येणार होते. त्यातल्या एकीच्या घराच्यांनी वेळेवर सांगितले की आम्हाला यायला जमणार नाही पण तो पर्यंत त्या चौघिही हॉस्टेल वरून घरी यायला निघाल्या. हॉस्टेल मधून परवानगी वैगरे घेऊन निघायला उशीर झाला होता त्यामुळे येवल्याहून नाशिक ला पोहोचे पर्यंत ८ वाजले. मला पालघर हून नाशिक पर्यंत वेळेत पोहोचणे शक्य नव्हत म्हणून मी त्यांना त्रंब्यक पर्यंत यायला सांगितलं.
तिच्या एका मैत्रिणी चा बॉयफ्रेंड आशिष ही घ्यायला येणार होता त्यामुळे तिने माझा नंबर त्याला दिला होता. आम्ही दोघांनी बोलण केलं आणि दोन बाईक घेऊन निघालो, आमची भेट विक्रम गड ला झाली. तिथून आम्ही सोबत च निघालो. निघतानाच मी पेट्रोल फूल करून घेतलं होत जेणेकरून येताना काही त्रास नको. आधीच उशीर झाला होता. खूप रात्र झाली होती पण जव्हार च्या घाटाच्या रस्त्यांमुळे आम्ही बाईक हवी तशी जोरात चालवू शकत नव्हतो. त्रंब्यक ला पोहोचे पर्यंत १२ वाजले. आम्हाला यायला बराच उशीर झाला होता म्हणून त्या सगळ्या एका लॉज वर थांबल्या होत्या. त्यातल्या दोघींना घ्यायला अजुन ही कोणी आले नव्हते. आम्ही त्यांना सांगितलं की ट्रिपल सीट जाऊ शकतो पण ट्रॅफिक हवालदार अडवेल म्हणून त्या तयार झाल्या नाहीत. त्या तिथेच लॉज वर थांबल्या.
शेवटी आम्ही चौघ च निघालो. येताना अगदी सावकाश येत होतो. आशिष बाईक घेऊन पुढे होता आणि आम्ही मागे. आता पुन्हा घाटाचा रस्ता लागणार होता. मी वेळ पाहिली तर १.३० वाजत आला होता. या आधी ही मी त्या रस्त्यावरून बऱ्याच वेळा गेलो होतो पण इतक्या रात्री तिथून प्रवास करण्याची माझी पहिलीच वेळ होती. वळणा वळणाचा रस्ता एवढ्या रात्री अजूनच भयाण वाटत होता. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. त्यात त्या रस्त्याला लाईट असून नसल्या सारखे. बरीच रात्र झाल्या मुळे आमच्या दोन बाईक शिवाय एकही वाहन नजरेस पडत नव्हते. फक्त अधून मधून एखादी फोर व्हीलर समोरून पास व्हायची. खर तर मनात वेगळीच भीती होती कारण आमच्या सोबत मुली होत्या. या भागात पूर्वी खूप चोरी मारीच्या घटना व्हायच्या. रात्री अपरात्री रस्त्यात अडवून सगळे लुटून न्यायचे आणि हे मी खूप जणांकडून ऐकले होते. तरीही घाटातून खूप हळूहळू जात होतो. इतक्यात आशिष ची गर्ल फ्रेंड जोरात ओरडली.
ते पुढे असल्यामुळे काय झाले हे पाहायला मी पटकन बाईक चा वेग वाढवला आणि त्यांच्या जवळ जायला निघालो. तसे माझ्या काळजात धस्स झालं. मला एक मानवी आकृती उभी दिसली. घाबरण्याच कारण म्हणजे त्या आकृतीची असामान्य उंची. तब्बल ७-८ फूट. विस्कटलेले केस, अंगावर मळकट कपडे आणि विस्फारलेला जबडा. मला तर कळायला वेळ लागला की आम्ही नक्की काय पाहतोय. मी लगेच माझ्या गर्ल फ्रेंड ला म्हणालो की समोर पाहू नकोस. कारण तिने जर तो भयाण प्रकार पाहिला असता तर ती सुद्धा घाबरली असती. पण कदाचित ते तिला दिसलं नसावं म्हणून ती काहीच बोलली नाही. थोड्याच वेळात आम्ही घाटाचा रस्ता संपवून जव्हार ला पोहोचलो. पण हे सगळ इतक्यावरच थांबणार नव्हत. पुढे जे घडलं ते अनाकलनिय होत.
घाट सोडल्यावर रस्ता चांगला होता म्हणून आशिष थोडा पुढे निघून गेला. मी मात्र गाडी खूप हळु चालवत होतो. तितक्यात माझी बाईक बंद पडली. मला वाटलं की एक दोन प्रयत्नात सुरू होईल पण बराच प्रयत्न केल्या नंतर पेट्रोल चेक केलं. तर सगळ संपलं होत. मी जाताना टाकी फुल करून निघालो होतो मग अचानक पेट्रोल कस काय संपू शकत. मी टाकी कुठून लोक वैगरे आहे का ते ही तपासून पाहिले पण तसे काहीच नव्हते. मी लगेच आशिष ला फोन केला आणि सांगितले की पेट्रोल संपले आहे तू पुन्हा मागे ये. पण एव्हाना ते काही किलोमिटर अंतर पुढे निघून गेले होते. बहुतेक मलाच उशीर झाला त्याला फोन करायला. आता त्या दोघांना परत येणे शक्य नव्हते म्हणून मग त्याने त्याच्या एका मित्राला जायला सांगितले. आता आम्हाला बराच वेळ वाट पाहावी लागणार होती. बाईक जिथे बंद पडली होती तो परिसर तसा वस्तीचा होता.
मी काही अंतर बाईक ढकलत पुढे आणली. एक दीड तास उलटून गेला असेल. चार सव्वा चार वाजले असावेत. एक चहाच्या टपरी वाला येताना दिसला. आम्ही थांबलो होतो तिथे जवळच टपरी होती त्याची. आम्ही तिघे जाऊन थोडा वेळ थांबलो होतो. तितक्यात अचानक मला काय झालं माहीत नाही मी माझ्या गर्ल फ्रेंड च्या कानाखाली मारली आणि जोरात तिचा गळा आवळला. ती रडायला लागली आणि गुदमरू लागली. तितक्यात त्या टपरी वाल्याने येऊन तिला माझ्या पासून दूर केले. मी त्या प्रकरणे भांबावून गेलो. एका क्षणात काय घडले माहीत नाही पण मी माझ्या स्वतः वरचा ताबा पूर्णपणे गमावला होता. ती घाबरून खूप रडत होती, कसं तरी तिला समजावलं आणि गप्प केलं. तरीही ती आता मला घाबरून उभी होती. तितक्यात आशिष चा मित्र पेट्रोल घेऊन आला, त्याने मला नाव वैगरे विचारले. आशिष ने माझ्याकडे कोणती गाडी आहे हे सांगितले असावे म्हणून तो लगेच आम्हाला शोधू शकला.
तो टपरी वाला माणूस म्हणाला की नशीब तुम्ही इथे आलात नाही तर तुमचं काय झालं असतं काय माहित. हा रस्ता खराब आहे, आम्ही सुद्धा इथे आधी राहायला घाबरत होतो पण नुकताच राहायला लागलो आहोत. आम्हाला घरी पोहोचायला ५.३० झाले. घरी आल्यावर थेट झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी उठल्यावर कळले की कालची रात्र अमावास्ये ची होती.