हा अनुभव मला आणि माझ्या भावाला आला होता. ४ मार्च २०१९ महाशिवरात्र होती. मला सुट्टी होती म्हणून मी माझ्या माहेरी आई ला भेटायला जाणार होते. मी आणि माझा लहान मुलगा दर्शू आम्ही बऱ्याच दिवसांनी जायचा बेत आखला होता. सगळ लवकर आवरून आम्ही दोघं ही बदलापुर हून कल्याण ला यायला निघालो. माझा मुलगा मामा कडे जायचं म्हणून खूप खुश होता. येताना लोकल ट्रेन ने आलो. माझे वडील स्टेशन ला आम्हाला घ्यायला आले होते. दर्शु लहान असल्यामुळे ते नेहमी आम्हाला घ्यायला यायचे. घरी गेल्यावर आई शी मनसोक्त बोलणे झाले,  दिवस खूप छान गेला. संध्याकाळी पुन्हा घरी जायचे होते पण भावाची म्हणजे निखिल ची भेट झाली नव्हती. तो कामावर गेल्या असण्या कारणाने त्याची वाट पाहत बसले होते. तो ५.१५ ते ५.३० च्या दरम्यान घरी आला. त्याच्याशी थोडे बोलणे झाले, मजा मस्ती झाली.

बराच वेळ उलटून गेला पण तरीही आमच्या गप्पा सुरूच होत्या. भाऊ बहिणी च गोड नात आता काही वेगळे सांगायला नको. पण उशीर होतोय हे लक्षात आल्यावर माझे वडील म्हणाले की उगाच उशिरा निघू नकोस, तुला उद्या पुन्हा जॉब साठी सकाळी लवकर उठायचे आहे. मग सगळ्यांचा निरोप घेतला आणि घरी यायला निघाले. जाताना भाऊ आम्हाला सोडायला येणार होता. मामा सोबत फिरायला दर्शू ला खूप आवडायचे म्हणून तो खूप खुश होता. साडे सहा सात वाजयला आले होते म्हणून आमची घाई होत होती. कारण महाशिवरात्री असल्याने अंबरनाथ ला जत्रा भरते. आणि त्यातून जायचे म्हणजे दिव्य च. बहुतेक ठिकाणी रस्ता ही बंद असतो. आम्ही उल्हासनगर मधून जायला निघालो. भावाला वाटले की नेहमीच्या रोड ने जाता येईल पण नेमका तो देखील बंद केला होता. 

म्हणून भावाने शॉर्टकट घेतला आणि अंबरनाथ मधून निघू असे म्हणाला. मी ही जास्त काही बोलले नाही कारण लवकर घरी पोहोचायचे होते. तसे आम्ही शॉर्टकट ने जायला निघालो. रस्ता त्याला देखील माहीत नव्हता पण तो रस्ता नीट वाटत होता. गाडी नीट चालवत असल्यामुळे मला वाटले की त्याला माहीत असेल पण जेव्हा त्याने जाताना एक दोघांना विचारले तेव्हा मला कळले की त्याच्या साठी ही तो रस्ता नवीन च आहे. काही वेळा नंतर एक अरुंद रस्ता लागला, लहान गल्ली असते तशी. आजू बाजूला वस्ती होती काही घर वैगरे होती. मला वाटले की आता हा रस्ता संपल्यावर निघू बाहेर पण कसलं काय. तो अरुंद रस्ता काही संपायचे नावच घेत नव्हता. कल्याण हून बदलापूर ला यायला फारसा वेळ लागत नाही, अवघे ३०-४० मिनिट लागतात. पण आता साडे सात आठ वाजत आले होते तरीही आम्ही तिथेच होतो.

काही वेळाने माझ्या लक्षात आले की थोड्याच मिनिटा पूर्वी आम्ही अश्याच एका भागातून गेलो होतो जिथे आंबेकर चौक अशी पाटी लावली होती आणि समोरच्या एका बिल्डिंग ला लायटिंग लावली होती. दुसऱ्यांना फक्त एक गोष्ट वेगळी होती. आधी हाच रस्ता सरळ होता पण आता मात्र तो उताराचा झाला होता. जिथे आधी घरे होती तिथे आता निळ्या रंगाचे पत्रे होते आणि लोक अजिबात च दिसत नव्हती. माझा भाऊ पण आता गोंधळात पडला होता पण कदाचित मी घाबरेन म्हणून काही बोलत नव्हता. निमूटपणे तशीच गाडी चालवत राहिला. आम्हाला परतीचा रस्ताच दिसत नव्हता. मला ही आता भीती वाटू लागली होती आणि त्याला सांगायचे म्हंटले तर तो अजुन टेन्शन मध्ये येईल म्हणून मी सुद्धा त्याला काहीच बोलले नाही. अर्ध्या पाऊण तासानंतर त्याने न राहवून यू टर्न घेतला. अवघ्या काही वेळा पूर्वी असलेला उताराचा रस्ता आता मात्र अगदी सरळ झाला होता. आम्ही दोघं ही आता घाबरलो होतो. ह्या सगळ्यात आजू बाजूचा परिसर अगदीच सामसूम झाला होता. 

कोणाला विचारायचे म्हंटले तर ते ही शक्य होणार नव्हते. माझा भाऊ त्या सरळ रस्त्याने गाडी चालवत राहिला. पण आम्ही त्या भागातून बाहेर च पडू शकत नव्हतो. माहीत नाही किती वेळा त्याच एका ठिकाणी येऊन गेलो. प्रत्येक वेळी फक्त एखादी गोष्ट वेगळी जाणवायची. तिसऱ्यांदा आलो तेव्हा रस्ता काँक्रिट चा झाला होता आणि रस्त्यात बरेच खड्डे होते. तीच चौकाची पाटी, समोर तीच लायटिंग ची इमारत. फरक फक्त इतकाच की संपूर्ण परिसरात कोणीही नाही. जणू एखाद्या काळ चक्रात अडकून पडल्या सारखे आम्ही एकाच ठिकाणी अडकलो होतो. साडे आठ होऊन गेले होते. निखिल ने जास्त काही सांगितले नाही पण तो म्हणाला की आता जे होईल ते इथून च गाडी नेतो. पण आम्हाला पुढे काय पहावे लागणार होते हे स्वप्नात ही पाहिले नसेल. जस जसे पुढे जाऊ लागलो तसे वस्ती चा परिसर मागे पडू लागला.

रस्ता रिकामा, निर्मनुष्य होऊ लागला. अंधार अधिकच गडद जाणवू लागला. कारण रस्त्याला ना स्ट्रीट लाईट ही नव्हते. काही वेळा नंतर दिसले की एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे. बहुतेक पडीक असावी ज्याचे बांधकाम बऱ्याच वर्षा पूर्वी थांबले असावे आणि ती तशीच अर्धवट बांधली गेली असावी. गडद अंधारात हेड लाईट चा प्रकाश पडल्यामुळे दिसणारी ती बिल्डिंग अगदीच भयावह वाटत होती. त्या बिल्डिंग कडे पाहूनच भीती वाटत होती. आमच्या सोबत काय घडत होत काहीच उमगत नव्हत. मी न राहवून निखिल ला म्हणाले की कोणी दिसतंय का बघ आणि पुढचा रस्ता नीट विचारून घे. आम्ही दोघं ही कोणी दिसतंय का ते पाहू लागलो. बराच वेळ उलटून गेला होता. तितक्यात आम्हाला कोणी तरी चालत जाताना दिसलं. त्या बिल्डिंग च्या बाजूने येत होत. विशेष म्हणजे ती व्यक्ती अगदी गोरी पान होती, एक वेगळेच तेज जाणवत होत चेहऱ्यावर. अगदी शांत पणे गाडी घेऊन आम्ही त्या व्यक्ती कडे गेलो. 

जवळ जाताच त्याला विचारले तसे तो म्हणाला ” रस्ता चुकलात का तुम्ही..?” मी त्याला काही सांगणार तितक्यात निखिल म्हणाला ” इथून बाहेर कसं निघायचे.?” त्याने अगदी शांत पणे सांगितले ” इथून सरळ जाऊन पाहिले डावे वळण घ्या.” आम्ही त्याचे आभार मानून त्याने सांगितल्या प्रमाणे पुढे निघालो. मट्रेन पास झाली आणि आम्ही फाटक ओलांडून पुढे आलो.नोमन देवाचे आभार मानले कारण तो व्यक्ती जणू खूप गरज असताना एखाद्या देवा सारखा समोर आला होता. परत जाताना तो रस्ता साधा होता, ना खड्डे होते ना काही. अजूनही काळीज धड धडत होत कारण रस्ता मिळेलच याची खात्री नव्हती. पण त्याने सांगितल्या प्रमाणे सरळ जाऊन पहिले डावे वळण घेतले तसे आम्हाला रेल्वे फाटक दिसले.

ट्रेन पास होणार होती म्हणून फाटक बंद होते. काही अंतरावर पुढे आम्हाला कंपनी च्या लाईट दिसत होत्या. तसे थोडा धीर आला. आम्ही बराच वेळ एकमेकांशी नीट बोललो नव्हतो. म्हणून मीच विषय काढला ” बराच वेळ रस्ता सापडत नव्हता पण आलो बाहेर एकदाचे “. तसे निखिल म्हणाला ” तुला माहितीये का आपल्या सोबत काय होत होते ? मला वाटले की तू घाबरशील म्हणून मी काही बोललो नाही तुला. मी खूप घाबरलो होतो पण तुला आणि दर्षू ला यातून सुखरूप बाहेर काढायचे होते म्हणून मी हिम्मत हरु दिली नाही. त्यात तू व्यक्ती भेटली म्हणून आपण इथ पर्यंत आलो.” निखिल च्या चेहऱ्यावर अजूनही भीती दिसत होती म्हणून मग मी विषय बदलला. तितक्यात समोरून ट्रेन पास झाली. फाटक उघडले आणि आम्ही घराच्या दिशेने निघालो. पावणे नऊ ते नऊ च्या दरम्यान घरी पोहोचलो. अर्ध्या तासात घरी पोहोचवणारा रस्ता आज अडीच तास आम्हाला फिरवत राहिला. आम्ही खूप विचित्र आणि भयानक गोष्टी अनुभवल्या. आज हे सगळे आठवले की भीती दाटून येते आणि वाटते की ती व्यक्ती जर भेटली नसती तर त्या ” चकव्यातून ” आम्ही कधीच बाहेर पडू शकलो नसतो.

Leave a Reply