अनुभव – अक्षय कदम
प्रसंग लॉकडाऊन मधला आहे जो माझ्यासोबत आणि माझ्या मित्रा सोबत घडला होता. तेव्हा नुकताच लॉक डाऊन सुरू झाले होते त्यामुळे आम्ही दोघं ही घरून च काम करायचो. माझ्या मित्राचे नाव अनिकेत. तो ही माझ्याच बिल्डिंग मध्ये राहतो आणि आम्ही दोघं एकाच ठिकाणी जॉब ला आहोत. त्या दिवशी आमची शिफ्ट ८.३० ला संपली. ऑफिस चे काम करून झाल्यावर घरच्यांसोबत एकत्र जेवण करायचो. पण त्या दिवशी जरा उशीर च झाला. जवळपास १० वाजले. मी अनिकेतला फोन केला आणि आम्ही ठरवलं की थोडं पाय मोकळे करायला म्हणून बिल्डिंग च्या कंपाऊंड मध्ये फेऱ्या मारू. तेव्हढीच शतपावली पण होईल आणि दिवसभर घरीच असल्यामुळें थोडी मोकळी हवा पण मिळेल. त्या दिवशी माझ्या घरी चपात्या उरल्या होत्या. म्हणून आईने त्या कुत्र्यांना देण्यासाठी सांगितले. मी आणि अनिकेत, बिल्डिंग च्या खाली आलो आणि कुत्र्यांना शोधण्यासाठी गेटच्या बाहेर पडलो. आमच्या बिल्डिंग च्या समोर स्वामी समर्थांचा एक मठ आहे. तिथे नेहमी असे उरलेले जेवण कुत्र्यांना देण्यासाठी एक जागा केली आहे. त्या जागेवर नेहमी एक-दोन कुत्रे असतातच, पण त्या दिवशी तिथे एकही कुत्रा नव्हता.
आम्हा दोघांना हे बघून थोडे आश्चर्य वाटले. एरवी कुत्रे रात्रभर रस्त्यावर भुंकत असतात, पण आज रस्ता आणि ती जागा पूर्णपणे शांत होती. कुत्र्यांना शोधण्यासाठी म्हणून आम्ही थोडे पुढे जायचे ठरवले. दोन-तीन बिल्डिंग सोडून पुढे आल्यावर आम्ही दोघे ज्या सेक्टर मध्ये राहतो त्याच्या एकदम शेवटच्या रस्त्यावर आलो. या रस्त्यावर अजून कुठल्या बिल्डिंग नाहीत. आजू-बाजूचे प्लॉट अजून रिकामेच आहेत. तसंच हा रस्ता सर्वात शेवटी असल्याने, त्याचा वापर कोणीही करायचे नाही. गमतीने आम्ही त्याला भूत रस्ता असे नाव दिले होते. आम्ही ज्या सेक्टर मध्ये राहतो ते खाडीच्या जवळ असल्याने रात्रीचा गार वारा असतो कधीतरी. पण त्या दिवशीचा वारा हा जरा जास्तच गार वाटत होता. गप्पा मारत आम्ही त्या रस्त्यावर पोहोचलो होतो. त्या रस्त्यावरच्या मधल्या काही street light बंद होत्या. मी कुत्र्यांना शोधण्यासाठी आजू-बाजूला नजर टाकली. पण एकही कुत्रा नजरेस पडला नाही. ” कमाल आहे न ?” मी अनिकेतला बोललो ” इथे पण कुत्रे नाहीत “. “बहुतेक कुत्रे सुद्धा त्यांच्या घरीच असतील लॉक डाउनचे पालन करण्यासाठी !” अनिकेत मला हसूनच बोलला. आम्ही आता परत पाठी जायचे ठरवलं.
आम्ही मागे वळणार तेवढ्यातच अनिकेत मला बोलला ” ते बघ त्यांची ( कुत्र्यांची ) गॅंग आज तिथे बसली आहे “. ते सर्व कुत्रे आज त्या रस्त्याच्या शेवटच्या टोकाला बसले होते. आम्ही त्या दिशेने चालायला लागलो. त्यांच्या जवळ पोहोचलो तेव्हा थोडे विचित्रच वाटलं. कारण कुत्र्यांना जेव्हा कसली चाहूल लागते तेव्हा ते लगेच सावध होतात, पण त्या दिवशी आम्ही त्यांच्या अगदी पाठी होतो. कुत्र्यांनी कसलीच हालचाल केली नाही. तिथे ६ कुत्रे होते आणि सगळे एकाच दिशेला बघत होते. जणू काही त्यांच्या समोर कुणी तरी होते, जे त्यांना असे करण्यासाठी भाग पडत होते. आम्ही आता त्या कुत्र्यांच्या बाजूला आलो, आणि समोर पहिले. तिथे एक काळा कुत्रा होता. तो कदाचित ह्या भागातील नसावा. आम्हाला तो कुत्रा जरा विचित्रच वाटला. सामान्य कुत्र्या पेक्षा तो जरा मोठाच होता. त्याचे डोळे तांबडे-लाल असे होते. मी जसे चपात्या बाहेर काढायला लागलो, तसे तो आमच्या वर गुरगुरायला लागला. त्याच्या गुर्गुरण्यासोबत बाकीचे कुत्रे विचित्र आवाजात रडायला लागले. असे कुत्र्यांचे रडणे आम्ही पहिल्यांदाच ऐकले होते. मला आणि अनिकेतला काही समजेनाच कि असे का होतय. आता आम्हाला थोडी भीती वाटायला लागली होती.
मी चपात्या तश्याच खाली टाकल्या आणि आम्ही दोघ पाठी वळायला लागलो. तेवढयातच तो मोठा कुत्रा, एकदम भसाड्या आणि किळसवाण्या आवाजात ओरडायला लागला. त्याचे ते ओरडणे ऐकून, आमच्या काळजात धडकीच भरली. तो कुत्रा आता आमच्याकडेच धावत येऊ लागला. त्याला बघून आम्ही जीव मुठीत धरून उलट धावू लागलो. आम्ही जसे धावायला लागलो, तसे बाकीचे कुत्रे अजूनच जोरात रडायला लागले. अचानक त्या रस्त्यावरचे सगळे स्ट्रीट लाईटस् बंद झाले. आम्ही दोघे आता पुरते घाबरलो आणि जिवाच्या आकांताने पळू लागलो. तो मोठा कुत्राही आमच्या पाठी होता, त्याच किळसवाण्या आवाजात ओरडत. पण हळु हळू त्याचे ओरडणे एक भयानक रूप घेऊ लागले. आता मी आणि अनिकेत त्या रस्त्याला जोडणाऱ्या दुसऱ्या रस्त्यावर आलो. त्या रस्त्यावरच्या लाईटस् सुदैवाने चालू होत्या. पळता-पळता आम्ही दोघांनी मागे वळून पहिले आणि काळजात अगदी चर्रर्र झालं.. तर त्या कुत्र्याने स्वतःच रूप बदललं होतं. आता ती एक ६-७ फूट उंच काळी आकृती होती. तिचे डोळे सुद्धा त्या काळ्या कुत्र्या सारखेच तांबडे आणि लाल होते. ती आकृती जमिनी पासून एक फूट उंच हवेत तरंगतच आमच्या पाठी वेगाने येत होती.
ते दृष्य पाहून तर आमचा राहिलेला जीव सुद्धा गळून पडला. आता आम्ही होता तेवढा सगळा जीव एकवटला आणि पळू लागलो. आम्ही आमच्या बिल्डिंग च्या जवळ पोहोचलो. आणि माझे लक्ष्य अचानक त्या स्वामी समर्थांच्या मठाकडे गेले. त्या मठाचे पुजारी तिथेच राहत असत. ते गेट लॉक करण्यासाठी बाहेर आले होते. त्यांना पाहून मी अगदी बेंबीच्या देठा पासून अरोडलो “काका थांबा !” त्यांनीही आमच्याकडे बघितले आणि पटकन कसलाही विचार न करता मठाच्या गेटचे लॉक काढले, गेट उघडले आणि जोरातच ओरडून बोलले “पाठी बघू नका, इकडे आत या”. आम्ही दोघेही, होता नव्हता तेवढा सगळा जीव एकवटला आणि मठाच्या दिशेने धावू लागलो. ज्या क्षणी आम्ही दोघेही त्या मठात पाऊल टाकले, तसे पाठून त्या अमानवी आकृतीचा किळसवाणा आवाज आला ” आज वाचलात “. त्या उन्हाळ्याच्या दिवसातही आम्हाला थंडीने जखडून टाकले होते. तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. त्या काकांनी आम्हाला पाण्याच्या बाटल्या दिल्या. त्या १ लिटर च्या बाटल्या आम्ही २०-३० सेकंदातच पूर्ण रिकाम्या केल्या. ते काका आम्हाला धीर देत बोलले ” घाबरू नका, ती दुष्ट आत्मा गेली”. “तुम्ही इथे सुरक्षित आहेत” .
मी आणि अनिकेतने एकमेकांकडे बघितले. अनिकेतने त्यांना विचारले “ती आकृती तुम्हाला पण दिसली ?” त्यावर ते बोलले ” हो ती आकृती मला पण दिसली”. आणि त्यानी आम्हाला विचारले एवढ्या रात्री तुम्ही कुठून येत आहात. त्यावर मी त्यांना सगळी गोष्ट सांगितली. ते आम्हाला सांगायला लागले की तो शेवटचा रास्ता वापरात नसल्यामुळे आजू-बाजूची लोक त्या रस्त्यावर घरावरून नकारात्मक शक्ती जाव्यात म्हणून नारळ फिरवून तो नारळ त्या रस्त्यावर येऊन टाकतात. त्यामळे त्या रस्त्यावर अशा वाईट शक्तींचा आवास आहे. त्यातलीच कदाचित एक दुष्ट शक्ती आज तुमची वाट बघत होती. त्या दुष्ट शक्तीं भविष्य बघू शकतात. आणि म्हणूनच ती आज तिथे कुत्र्याच्या रूपात आली. पण तुमचं दैव बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात. हे ऐकूनच आमच्या दोघांच्या अंगावर काटाच आला. त्यांनी आमच्या दोघांच्या कपाळावर स्वामींचा अंगारा लावला. ते काका बोलले कि आता ती आकृती परत येणार नाही. तुम्ही आता तडक घरी जावा. आता आमच्या दोघांच्या जीवात जीव आला. आम्ही दोघे धावतच आमच्या बिल्डिंगच्या आत आलो. आत watchmen रेडिओ वर गाणी ऐकत होता. ते बघून थोडा हायसं वाटलं. आम्ही दोघेही आपापल्या घरी गेलो. मी घरी जाऊन घरच्यांना हा झालेला प्रकार सांगितलं. आणि घरच्यांना ही सांगितले की तो रस्ता कधीही वापरू नका. आजही तो प्रसंग आठवून अंगावर काटा येतो.