काही जागा दिवसा जरी साध्या वाटत असल्या तरीही रात्रीच्या गडद अंधारात त्या अगदी भयाण रूप धारण करतात. कारण त्या जागेचा इतिहास म्हणजेच त्या जागेत पूर्वी काय घडलंय हे कोणालाही माहीत नसतं. अश्या जागेत दडून बसलेलं गूढ नेहमीच आपलं अस्तित्व दाखवत आणि मग अनुभवायला मिळतो तो भयाण प्रसंग.. असाच हा एक अविस्मरणीय अनुभव..
अनुभव – शिवांश दर्शना निनाद सावंत
माझ्या मामाने नुकतेच सफाळे रोड येथील एका मोठ्या गृहसंकुलात फ्लॅट घेतला आहे. आजूबाजूला सुंदर झाडे, शांत वातावरण यामुळे तिथे खूपच छान वाटते. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आम्ही दोन दिवस मामाकडे रहायला गेलो होतो. रात्री जेवण आटोपल्यावर आम्ही संकुलातच शतपावली करत होतो. सोबत गप्पा सुरु होत्या. थंडीमुळे वातावरणात छान गारवा पसरला होता. वातावरण एकदम शांत होतं. त्या संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच एक भलंमोठं वडाचं झाड आहे. दिवसा प्रशस्त, धीरगंभीर वाटणारे ते झाड, रात्री मात्र एकदमच वेगळे भासत होते. माझ्या मनात काय आले कोणास ठाऊक, त्या झाडाकडे पाहतच मी मामाला प्रश्न केला, की हे झाड रात्रीचं किती वेगळं वाटतय ना. इथे काही अनुभव आलेत का इथल्या लोकांना?? अचानक मी विचारलेल्या या प्रश्नाने मामाला आश्चर्य वाटलं. किंचीत हसत आणि माझ्या प्रश्नावर मान डोलवत तो म्हणाला, हो….आले आहेत.
काय आहेत ?? सांग ना मला….मी उत्सुकतेने म्हणालो.
या झाडाजवळ नाही, पण त्या टाकीजवळ काहींना अनुभव आले आहेत. नऊ इमारतींच्या त्या गृहसंकुलातील एका इमारतीच्या गच्चीवरील टाकीकडे बोट दाखवत मामा म्हणाला. आम्ही त्या इमारतीच्या अगदी समोर उभे होतो. मान वर करुन मी इमारतीच्या गच्चीवरील त्या टाकीकडे एक नजर टाकली. क्षणभर मनात धस्स झालं.
मामा पुढे सांगू लागला, या संकुलाचं बांधकाम सुरु असताना इथे बरेच मजूर रहायचे. संध्याकाळी सातचा सुमार होता. अंधार पडला होता.
त्यातला एक मजूर संध्याकाळी काम संपल्यावर आंघोळ करण्यासाठी त्या टाकीजवळ गेला. त्या टाकीतून पाईप बाहेर काढून तिथे आंघोळीसाठी पाण्याची सोय केलेली होती. त्यावेळी तिथे तो एकटाच होता.
तो आंघोळ करत असताना अचानक त्याला पाठीवरुन कोणीतरी हात फिरवत असल्यासारखे भासले. भास असेल किंवा पाठीवरुन पाण्याचे ओघळ वाहत असतील असे समजून त्याने दुर्लक्ष केले पण पुन्हा काही क्षणातच त्याला पुन्हा तसाच भास झाला. त्याने आंघोळ करता करताच पाठीवर काय आहे हे चाचपण्यासाठी एक हात मागे नेला आणि त्याचवेळी त्याचा तो मागे नेलेला हात कोणीतरी घट्ट पकडला. त्याने मान वळवून मागे पहायचा प्रयत्न केला पण मागे मिट्ट काळोखाशिवाय काहीही न्हवतं. तो तसाच उठला, पूर्ण ताकदीनिशी स्वत:चा हात सोडवला आणि ओरडत खाली धावत सुटला. तो मजूर प्रचंड घाबरला होता.
दुसर्या दिवशी सर्व मजूरांनी हा प्रकार त्यांच्या सुपरवायजरला सांगितला. त्याने उलट मजूरांनाच दमदाटी केली. तुम्ही दारु प्यायला असाल, नसत्या अफवा पसरवू नका वगैरे म्हणाला. पण ते मजूर काही केल्या ऐकेनात. शेवटी सर्वांनी काम सोडून जायची धमकी दिल्यावर तो शहानिशा करायला तयार झाला.
एका रात्री तो सुपरवायजर आणि सर्व मजूर त्या टाकीच्या समोर असलेल्या इमारतीच्या गच्चीवर गेले आणि काय घडतय ते पाहू लागले. सगळा परिसर शांत झाला होता. हळु हळु एक विचित्र आवाज कानावर पडू लागला आणि बघता बघता त्या टाकीजवळ पडत असलेल्या अंधुक प्रकाशात एक मानव सदृश्य आकृती आकार घेऊ लागली. हळूहळू ती आकृती त्या गच्चीच्या कठड्यावर चढली आणि काही पावले चालून त्यांच्या डोळ्यांदेखत अचानक नाहीशी झाली.
ते सर्वजण हा प्रकार स्तब्ध होऊन पाहत होते. दुसऱ्या दिवशीपासून सर्व मजूरांना त्या टाकीजवळ जाण्यास मनाई करण्यात आली. त्यांच्या आंघोळीच्या पाण्याची सोय दुसरीकडे करण्यात आली. आणि या प्रकाराबद्दल कुठेही वाच्यता न करण्याबद्दल त्यांना बजावण्यात आले.
त्यानंतर त्या संकुलात राहायला आलेल्या काही राहिवाशांनादेखील त्या टाकीजवळ काही वेळा ती आकृती दिसली आहे तर काहींना चित्र विचित्र आवाज येतात. चौकशी केल्यावर असे समजले की ते संकुल ज्या जमिनीवर उभे होते त्या जमिनीच्या मालकांनी त्यांच्याच घरातील एका तरुण मुलीची याच ठिकाणी हत्या केली होती. तेव्हापासून ती सतत इथे आपले अस्तित्व दाखवत असते. अगदी आजही त्या मालकांच्या घरातील कोणीही व्यक्ती त्या संकुलात दिवसाढवळ्या जरी आली तरी तिथे त्या व्यक्तीला अचानक काही ना काही दुखापत होते. जणू काही ती त्यांना सांगत असते की मी अजून ही इथेच आहे…