अनुभव – आकाश शिंदे

अनुभव माझ्या आजोबांची एक आठवण म्हणून पाठवतोय. माझे आजोबा म्हणजे माझ्या आईंचे वडील. माझ्या आई ला चार बहिणी आणि एक भाऊ. माझा मामा मी लहान असतानाच देवा घरी गेला. त्या काळी माझे आजोबा मेंढरे ओळत असत, मेंढरे चरण्यासाठी व शेतात खत बसणी ते लांब लांबच्या गावात जात असतं. पण ऐके दिवशी आजोबा शेजारच्या गावात गेले होते. जवळपास ३० किमी अंतर असेल. इतक्या लांब ते या आधी कधी आले नव्हते. सोबत मित्र ही होता. दिवसभर मेंढरे चरून आल्यावर रात्री एका ओळखीच्या शेतकऱ्याच्या शेतात सोडली. दुसऱ्या दिवशी महत्त्वाचे काम होते म्हणून कामासाठी त्यांना घरी परतावे लागणार होते. म्हणून ते जेवण आटोपून घरी जाण्यासाठी पायीच निघाले. त्याकाळी जास्त वाहने नसायची. बरीच रात्र झाली होती. गावाची वेस मागे पडली आणि ते निर्मनुष्य रस्त्याला लागले. रात्रीचे १२.३० वाजले असतील. ते चालत जात असताना अचानक त्यांना ढोल ताशांचा, गाण्याचा आवाज येऊ लागला. ते चौफर पाहू लागले तसे दूर कुठून तरी एक पालखी येत असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. काही माणसे पालखी हातात घेउन नाचत ओरडत येत होती. जशी ती पालखी आजोबांच्या जवळ येऊ लागली. तस त्यांना जाणवले की ती माणसे खूपच विचित्र नाचत हसत व ओरडत होती. तितक्यात त्यांना लक्षात आले की ही माणसे नाहीत. ही भुतांची पालखी आहे. त्यांनी ऐकलेला एक विचित्र उपाय करायचा ठरवला. 

आपल्या जागेवरून न हलता त्यांनी पायातली एक चप्पल काढली आणि आपल्या डोक्यावर उलटी ठेवली. तशी ती पालखी मागे मागे जाऊ लागली. आजोबा त्या पालखीच्या दिशेने चालू लागले आणि काय आश्चर्य.. ती पालखी जिथून आली होती तशीच उलट मागच्या दिशेला जाऊ लागली. ते दृश्य खूपच भयावह होत. काही वेळात तो आवाज कमी कमी होत गेला आणि ती पालखी कुठे तरी अंधारात नाहीशी झाली. आजोबांनी चप्पल घातली आणि ते पटापट घराच्या दिशेने निघाले. आजोबा निडर होते म्हणून या प्रसंगातून सहज बाहेर पडले. काही दिवसानंतर विचारपूस केल्या नंतर त्यांना कळले की ती जागा चांगली नाही, तिथे रात्री अपरात्री जागी भुतांची पालखी दिसते. 

Leave a Reply