अनुभव – शुभम सहारे

प्रसंग माझ्या दीपक नावाच्या एका मित्रा सोबत घडला होता. आम्ही दोघं तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण ८ किलोमिटर आत असलेल्या एका गावात राहायचो. जवळपास ५-६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गणपती विसर्जनाच्या एक दिवस अगोदरची. गाव असल्याने रात्री ९ वाजताच सगळा शुकशुकाट व्हायचा. दीपक च्या मामा कडे गणपती बसवला असल्यामुळे तो रोज तिथे जायचं. त्याच आणि त्याच्या मामा च घर जवळच असल्यामुळे यायला जायला काही अडचण व्हायची नाही. त्याच्या मामा चे घर ज्या भागात होते त्याला तोली म्हणून ओळखले जायचे. त्या दिवशी तो आपल्या मामाच्या घरून आपल्या घरी यायला निघाला. तसा बराच उशीर झाला होता. रात्रीचे ११ वाजून गेले असतील. वाटेत चौक लागायचे. आणि चौकात ३ दुकानं होती. त्या रात्री तिथून चालत येत असताना अचानक रस्त्याकडेच्या विजेच्या खंबावरची लाईट गेली. दुसरा खांब दूर असल्यामुळे हलकासा प्रकाश तिथं पर्यंत येत होता. त्याच्याच उजेडात तो पुढे जात राहिला. तितक्यात त्या दुकानाच्या वरहांड्यात त्याला दोन मुली बसलेल्या दिसल्या. अंधार असल्यामुळे चेहरा नीट दिसत नव्हता. त्याला वाटले की उत्सवाच्या निमित्ताने गावात पाहुण्या आल्या असतील. त्यामुळे त्याने जास्त काही लक्ष दिलं नाही. तो जसा त्यांच्या समोरून जाऊ लागला तसे त्या दोघीही उभ्या राहिल्या. 

पण दीपक मात्र आपल्याच धुंदीत चालत होता. त्या त्याच्या सोबत रस्त्याच्या दुसऱ्या कडेने चालू लागला. त्यांना जसे जाणवले की त्या आपल्या सोबतच चालत आहेत त्याला वाटले की या मुली गावातल्याच असाव्यात. म्हणून तो संवाद साधण्यासाठी त्यांच्या दिशेने चालू लागला. काही अंतर जवळ आल्यावर त्याने प्रश्न विचारला ” इतक्या रात्रीचे इथे काय करताय..?” पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. तितक्यात त्याचे लक्ष त्यांच्या कंबरेच्या खालच्या भागाकडे कडे आणि त्याला जाणवले की शरीराचा फक्त अर्धाच भाग दिसतोय, त्यांना बहुतेक पायच नाहीत. अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. तो काय पाहतोय याचा विचार करतच होता तितक्यात मागून एक कुत्रा आला आणि त्यांच्या दिशेने पाहून भुंकू लागला. त्याने त्या कुत्र्याला परतून लावण्यासाठी एक दगड उचलून त्याच्या दिशेने भिरकावला. आणि पुन्हा मागे वळून पाहिले. तर त्या मुली त्याला कुठेच दिसल्या नाहीत. काही वेळासाठी तो विचारात पडला पण नंतर दुर्लक्ष करून पुढे चालू लागला. काही पावले पुढे चालत गेला आणि त्याला मुलींच्या कुजबुजण्याचा आवाज आला तसे त्याची पावले जागीच थिजली. तो त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागला. तसे एक वाक्य कानावर पडले ” तो जातोय ” आणि त्यांचं सर्वांग भीतीने शहारले. त्याने चालण्याचा वेग वाढवला तसे मागून कोणीतरी येत असल्याचे भासू लागले. त्याने तिरक्या नजरेने मागे पाहिले आणि त्याला जाणवले की त्या दोन मुली ज्यांच्या शरीराचा खालचा भागच नाहीये त्या जणू हवेत तरंगत च त्याच्या दिशेने वेगाने येत आहेत. 

तो जिवाच्या आकांताने धावत सुटला आणि घरी पोहचे पर्यंत थांबलाच नाही. घरी गेल्यावर आईला सगळा प्रसंग सांगितला. तिने पटकन देवाकडचा एक धागा त्याच्या हातात बांधला. अनुभवलेल्या विचित्र आणि भयानक प्रसंगामुळे पुढचे काही दिवस तो घरातून रात्री बाहेर ही पडला नाही. पण त्याला आज पर्यंत समजू शकले नाही की त्या मुली कोण होत्या आणि त्याच्याच मागे का लागल्या होत्या. त्यामुळे हे गूढ आजही तसेच आहे.

Leave a Reply