लेखक – अंकित भास्कर

” हॅलो… हा बोला कोण बोलतंय…..?”

                    ‘ सिमाच्या ‘ मोबाइल वर अनोळखी नंबरने आलेल्या कॉलला रिसिव्ह करत म्हणाली.

” तुमच्या आईची तब्येत खूप गंभीर आहे तुम्हाला लगेच हॉस्पिटल मध्ये यावे लागेल. “

     ” हा…! कोण बोलताय आपण…..? आई कुठे आहे…….? काय झालंय तिला……? “

      समोरच्या व्यक्तीचे ते बोलण ऐकून ‘ ती ‘ आश्चर्याने विचारू लागली.

” हे बघा, तुमच्या आईकडे वेळ खूप कमी आहे आताच डॉक्टर सांगून गेलेत. मी पत्ता मेसेज करतोय तुम्ही लवकर या “

” पण…….. “

         बोलतच तिच्या हातात असलेल्या मोबाइलचा कॉल कट झाला. समोरच्या व्यक्तीचे ते बोलण ऐकून ती जवळच्या भिंतीचा आधार घेत खालीच बसली. तिच्या हातात असलेला मोबाईल खाली जमिनीवर आदळला. समोर एक अनोळखी व्यक्ती तिच्या आईची अवस्था दुरावल्याच सांगत होता. डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबत न्हवते. खरतर ती एका अनोळखी शहरात आपल्या १२ बाय ८ च्या खोलीत एकटीच राहायची.  घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने कॉलेज सोबत एक साधा जॉब करायची. एका अनोळखी शहरात अनोळखी ठिकाणी रूममध्ये एकटेच राहण हे तिच्यासाठी खूप नवीन होते. घरात फक्त ती व तिची आई हे दोघेच होते. कॉलेजचा पहिला महिना असल्या कारणाने ती आपल्या आईला सोबतीला आणू शकली न्हवती. तिची ही अवस्था ऐकून तिला राहवत न्हवत. आपल्या रुमच्या एका कोपऱ्यात तीच रडण सुरू झालं होत. काही क्षणात तिच्या मोबाइलच्या नोटिफिकेशन ट्यून ने तिच लक्ष वेधून घेतलं. तशी ती थोडी भानावर आली. पांढऱ्या रंगाच्या बल्बच्या प्रकाशात रूमच्या पांढऱ्या शुभ्र भिंती आणखीनच गडद वाटत होत. रूमच्या एकीकडे एक लाकडी कपाट, एक छोटासा बेड, बाजूला एक लाकडी टेबल. आणि त्यावर प्लॅस्टिकच्या भांड्यात असलेल्या फळांच्या बाजूला चकाकत असलेला प्यूर स्टेनलेस स्टीलचा चाकू.. जो बल्बच्या उजेडात चमकत होता.. पण तिला ह्या कोणत्याच गोष्टीच भान न्हवत. मोबाइलचा पासवर्ड टाकून नोटीफिकेशन बघितल तर एक मेसेज आलेला. मेसेज वाचून आपल्या मैत्रिणीला कॉल केला. तीन रींगच्या नंतर समोरून एक आवाज आला.

” हॅलो.. हा बोल ग.. ह्या वेळेला का बर कॉल केलास..? सगळे झोपले आहेत. वेळ बघितली आहेस काय..? रात्रीचे दीड वाजलेत. काय झालं सगळ ठीक आहे ना..? “

” अग माझ्या आईची तब्येत बरी नाही म्हणून मला कॉल आला होता. तू प्लीज माझ्या रूमवर येऊ शकतेस का..? मला काय करावं हे समजत नाहीये.. प्लीज ये न..”

” थोड नीट सांगशील का काय झालं ते…?”

” तू प्लीज ये न मला खूप भीती वाटायला लागली आहे..”

” भीती आणि तुला …. कधीपासून…..? तू एका शुल्लक कारणावरून माझा सगळ्यांसमोर माझा इतका अपमान केलास.. आणि तुला वाटतंय का आपल्यातले सगळे वाद विसरून, तू तोडलेली मैत्री विसरून मी यावे.. तू जे माझ्या सोबत वागलीस, जे केलस या साठी मी तुला कधीच माफ करू शकणार नाही सीमा.. मला वाटले की तू माझी माफी मागायला फोन केला असशील.. “

त्यावर ती म्हणाली ” प्लीज तू लवकर ये, जास्त प्रश्न विचारू नकोस.. खरंच भीती वाटायला लागली आहे.. तुझ्याशिवाय माझे या शहरात कोणीच नाही”

” हम्म… ठीक आहे घरून निघतांना कॉल करते….”

इतकं बोलून कॉल कट झाला. तशी तिची नजर पूर्ण रुमभर फिरू लागली. एका अनामिक भीतीने तिच्या मनात घर केलेलं. भीती… भीती कसली तिच्या समजण्या पलीकडचे झालेले. तितक्यात अचानक रूमचा बल्ब चरचर करत खाडकन फुटला. तसे रूममध्ये काळोख पसरला. सगळ काही शांत झालं होत. त्या भयाण शांततेत तिची वाढत असलेली काळजाची धडधड मात्र तिला स्पष्ट ऐकू येत होती. भीतीने घशाला कोरड पडलेली. अशातच ती पाणी कुठे ठेवले आहे ते चाचपडत शोधू लागली.. तितक्यात तिच्या हाताला काडी पेटी लागली. तिने एक काडी पेटवली आणि काही सेकंदासाठी रूम मध्ये मंद प्रकाश पडला. तशी ती जागेवरच स्तब्ध झाली. समोरच दृश्य बघून काळीज जोरजोरात धडधडू लागलं. एक काळीकुट्ट मानवी आकृती तिच्या समोर येऊन उभी होती. हातात पेटत असलेल्या काडीच्या फिक्कट नारंगी उजेडात ती मानवी आकृती स्पष्ट दिसत होती. तिचे लाल तांबूस रंगाचे डोळे त्या उजेडात आणखीनच गडद वाटत होते तिला काही कळणार तितक्यात काडी जळत तिच्या बोटांपर्यंत आली. तसे तिला भाजल्यामुळे पटकन तिने काडी फेकून दिली. आणि पुन्हा एकदा रूम मध्ये गडद अंधार पसरला. पण या वेळेस ती एकटी नव्हती. तेवढ्यात बाहेरून कुणीतरी रूमची बेल वाजवली. तशी तिची भीती आणखीनच वाढली. चाचपडतच ती दारा पर्यंत गेली आणि हळूच दार उघडल. तिची मैत्रीण दिसली आणि तिला बघतच ती तिला कवटाळलीच. अश्रूंचा बांध फुटला. 

” काय झालंय..? इतकी काय घाबरली आहेस…? “

” अग आई……….”

ओक्साबोक्शी रडत आपली परीस्थिती सांगत होती. सीमाला घेऊन तिची मैत्रीण आत आली. ‘ तिच्या ‘ घशाला कोरड पडल्याकारणाने ती आपल्या मैत्रिणीचा हात सोडत मागे पाणी घेण्यासाठी वळली. पाण्याचे २ घोट घेतले आणि मागे बघितल. तर तिची मैत्रीण कुठेच दिसत नव्हती. तिला शोधत ती दरवाज्याच्या दिशेने निघाली.. तोच बाजूच्या मोबाईलची रिंग झाली. मोबाईलकडे लक्ष करत तिने कॉल रिसिव्ह केला. तस समोरून आवाज आला.

” हॅलो.. मी रितिका बोलतेय… तब्बल दोन तास झालेत कॉल करतेय कुठे होतीस….? “

समोरून येणाऱ्या आवाजाने ती पुरती हादरून गेली. तिची भेदरलेली नजर मिनिटापूर्वी आलेल्या आपल्या मैत्रिणीला शोधू लागली. ती कुठेच दिसत न्हवती पण समोर तिची तीच मैत्रीण रितिका रागातच बोलत होती. आपल्या मैत्रिणीच आवाज ऐकताच ती जागेवरच स्तब्ध झाली. काहीच न बोलता तिच्या हातातील मोबाईल खाली जमिनीवर पडला. तसे रुमच्या उघड्या खिडकीतून थंड वाऱ्याच्या झोक्याने तिला स्पर्श केला. त्या वाऱ्याच्या झोक्यासरशी रुममध्ये पेटत असलेल्या मेणबत्तीचा फिक्कट नारंगी उजेड कमी कमी होत बंद झाला आणि पुन्हा एकदा रूममध्ये काळोख पसरला. काय घडतय हे तिच्या समजण्या पलीकडचे झालेले. काय करावं काय नाही समजत नव्हते. तस थंड वाऱ्याच्या झोक्याने खिडकीचे दार जोरजोरात खिडकीवर आदळू लागल. तिला काही कळणार तितक्यात एक वटवाघुळ आपल्या पंखांची फडफड करत, चित्कार करत समोरून निघून गेलं. जसा तो आवाज थांबला तितक्यात जोरात दारावर थापा पडू लागल्या. पुन्हा एक भीतीची लहर अंगाला स्पर्श करून गेली. अंग घामाने भिजले होते.. ती दबक्या पावलांनी दरवाज्याकडे निघाली. दोन पावलं समोर निघालीच होती की सारकाही एकदम शांत झालं.. सारं काही… जोरात खिडकीवर आदळणार खिडकीच दार, दरवाज्यावर पडणारी जोराची थाप……सार काही……आवाज होता तो फक्त वाढत जाणाऱ्या तिच्या काळजाच्या ठोक्याचा.. डोक्यात विचारांचा काहूर माजलं होत. तिची नजर आता काळोखाने माखलेल्या अंधाऱ्या खोलीत चौफेर फिरू लागली. पुन्हा एकदा मेणबत्ती च्या शोधात चाचपडू लागली. शेवटी मेणबत्तीचा शोध लागलाच. मेणबत्ती हातात घेऊन मेणबत्तीच्या बाजूला असलेली आगपेटी ची एक काडी घाईघाईतच पेटवू लागली. मेणबत्ती ने पुन्हा एकदा रूम प्रकाशमय केली. मेणबत्ती हातात घेऊन बाजूच्या टेबलावर ठेवली. तशी पुन्हा एकदा दरवाज्यावर थाप पडली. आता तिच्या अंगातील उरल सुरल आवसानही गळून पडलं. आश्चर्याने मागे बघत ती उठली आणि ती जागेवरच बेशुद्ध पडली.

दुसऱ्या दिवशी सकाळी..

” हे बघा, तुम्हाला त्यांच्या सोबत काय घडले हे मला सांगायलाच हवे नाहीतर आम्हाला त्यांची मानसिक स्थिती जाणून घ्यावी लागेल.”

फाईलमध्ये असलेल्या एकएक कागदांना चाळत एक डॉक्टर आपल्या समोर बसलेल्या एका तरुणीला आपल्या रुग्णाच्या विषयी पुर्ण माहिती विचारून घेत होते.

” डॉक्टर.. तिच्या विषयी मला पुरेपूर्ण माहिती तर नाही.. पण काही महिन्यांपूर्वी अगोदर तिची आई एका अपघातात देवाघरी गेली. त्या प्रसंगानंतर ती पुरती हादरून गेली होती. घरची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असल्या कारणाने नातेवाईकांनी सुध्दा तिला विचारणं सोडून दिल. मी एकच तिची मैत्रीण, मला लहान बहिणी मानायची. शाळेत सर्वात हुशार आणि गुणी मुलगी म्हणून शहराच्या कॉलेजमध्ये तिथल्या शिक्षकांनी तिचा प्रवेश करून दिला. पण ती आई गेल्याच्या धक्क्यातून अजुन सावरू शकली नव्हती. तिच्या आईच्या आठवणी काही केल्या तिच्या डोक्यातून जात नव्हत्या. तिचे राहते घर सोडून ती शहरात एक छोटासा जॉब करू लागली आणि इथेच एक रूम भाड्यावर घेऊन राहू लागली. आईच्या आठवणीतून बाहेर पडण्याचा कदाचित हाच एक मार्ग तिने शोधला होता. गेले 2 महिने सगळ काही सुरळीत चाललं होत.. पण काल रात्री दीडच्या सुमारास तिचा मला कॉल आल आणि……..”

पुढे काही बोलणार तोच बाहेरून कुणी आत येण्यासाठी परवानगी मागितली.. “डॉक्टर ही फाईल” तस डॉक्टर साहेबांनी फक्त खुणावल आणि एक तरुण डॉक्टरांच्या समोर टेबलावर एक फाईल मांडून निघून गेला.

” ओह सॉरी, प्लिज आपण सुरू ठेवा..”

” डॉक्टर काल रात्री मला दीडच्या सुमारास कॉल आला आणि तिने मला रूमवर बोलावलं. बोलतांनी ती खूप अस्वस्थ वाटत होती. तब्बल 2 तास मी तिला कॉल करत राहिले पण तिचा कॉल लागत न्हवता. शेवटी तिचा कॉल लागला पण ती समोरून काही बोलण्याचा आत कॉल कट झाला. न राहून मला तिची काळजी वाटत होती. काळ वेळ न पाहता शेवटी काय झालंय हे बघायला मी तिच्या रूमवर गेले. रुमची बेल वाजवली पण काम करत न्हवती. शेवटी दरवाज्यावर थापा मारायला सुरुवात केली. ती काही प्रतिसाद देत न्हवती आणि नाईलाजाने मला शेजाऱ्यांच्या मदतीने तिच्या दरवाज्याची कडी मोडावी लागली. आत बघितल तर ‘ ती ‘ बेशुद्ध पडली होती. हाताजवळ एक धारदार चाकू जमिनीवर पडला होता. त्या नंतर मला काही समजण्याच्या आत मी रुग्णवाहिके ला कॉल केला आणि तिला इथे घेऊन आले. “

सगळे शांतपणे ऐकल्यावर त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले..

” हम्म… हे बघा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.. आणि तुमच्या सांगण्या प्रमाणे त्यांना कोणताच मेंटल स्ट्रेस दिसत नाही आहे..”

डॉक्टरांच्या रुग्णाची अवस्था दूरावल्याचे कारण ऐकून ती थोडी रडतच बोलू लागली.

” डॉक्टर प्लिज तिला लवकर बर करा ती माझी एकुलती एक मैत्रीण आहे.”

तस बाहेरून एक कर्मचारी डॉक्टरांच्या केबिनकडे धावत आले.

” साहेब बेड नंबर 46 च्या रुग्णाची अवस्था खूप बिघडली आहे. “

तसे डॉक्टर आणि ते कर्मचारी धावत केबिनच्या बाहेर पडले. तशी ती सुध्दा बाहेर पडली. दरवाज्यावर असणाऱ्या फिक्कट पांढऱ्या रंगाच्या काचेतून आत लक्ष गेलं आणि काही क्षणात डॉक्टर खोलीच्या बाहेर आले.

” I Am Sorry, आम्ही आमचा खूप प्रयत्न केला पण सीमाला वाचवू शकलो नाही. पण एक गोष्ट निदर्शनास आली आहे. त्यांनी बहुतेक मेंटल स्ट्रेस साठी असणारी औषध घेतली होती. तस त्यांच्या ब्लड टेस्ट मधून कळलय. अशी औषध एक सर्व सामान्य व्यक्तीला हेलुसिनेशन व्हायला भाग पाडतात. कधी कोणी असल्याचा भास होतो, तर कधी कोणी बोलण्याचा. पण प्रत्यक्षात तस असतच अस नाही. हे तेव्हा होते जेव्हा त्या औषधीची सुरुवात झाली असते आणि हळूहळू तो ताण इतका वाढत जातो की तो आवाक्याबाहेर जातो. ही पण तशीच केस आहे. पण तुमच्या सांगण्यानुसार सीमा ही औषध कोणाच्या सांगण्यावरून घेत होती…?.”

रितिका कडे बोलण्यासाठी काहीच नव्हत. ती फक्त रडत होती. डॉक्टर तिला धीर देत पुढे निघाले. रितिका रडतच सिमाच्या बेडजवळ गेली आणि तिच्या जवळ जात म्हणाली ” सॉरी पण मी तुला वाचवू शकले नाही.”

आणि एक गूढ हास्य करत तिथून बाहेर लागली. पण सीमाच निष्प्राण झालेलं शरीर भयभीत नजरेने तिच्याकडे पाहत राहील..

Leave a Reply