अनुभव – श्रावणी सामंत

२०२० मध्ये लॉक डाऊन असल्यामुळे सगळे जण घरी होते. बोर्डाची परीक्षा असल्यामुळे मी रात्री अभ्यासाला बसायचे. कारण दिवसा सगळे घरी असल्यामुळे हवा तसा अभ्यास होत नव्हता. ऑक्टोंबर महिना सुरू होता. परीक्षा होणार की नाही, लॉक डाऊन कधी संपणार याची तेव्हा काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे नियमित अभ्यास सुरू असायचा. अगदी पहाटे ३ ते ४ वाजे पर्यंत अभ्यास करायचे आणि मग झोपायला जायचे. तेव्हा आई ने फोन दिला नव्हता. त्यामुळे सगळा अभ्यास फक्त पुस्तक वाचून करायचे. हा अनुभव येण्या आधी मला भास व्हायला सुरुवात झाली होती. रोज रात्री अभ्यासाला बसले आणि अधून मधून खिडकीतून भेर लक्ष गेले की मला एक काळपट आकृती दिसायची. साधारण ७-८ फूट उंचीची. मी सुरुवातीला आई ला काही सांगितले नाही कारण मला नक्की माहित नव्हत की खरंच तिथे कोणी आहे की हा सगळा माझा भास आहे. पण जस जसे दिवस पुढे सरकू लागले तसे हे खूप जास्त व्हायला लागले. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे प्रत्येक दिवशी ती आकृती माझ्या जवळ येत असल्याचे भासू लागले. म्हणजे ती आकृती उभीच असायची पण प्रत्येक रात्री तीच्यातले आणि माझ्यातले अंतर कमी व्हायचे. रात्रीचा अभ्यास करणे बंद करू शकत नव्हते कारण तेव्हाच नीट अभ्यास व्हायचा. ती रात्र मला अजूनही आठवतेय. 

मी नेहमी प्रमाणे रात्री अभ्यासाला बसले. बऱ्याच वेळा नंतर नकळतपणे बाहेर लक्ष गेलं.. पण कोणीही दिसले नाही. लॉक डाऊन असल्यामुळे सगळ सामसूम होत. पण ती आकृती ही मला दिसली नाही. बरं झालं ती दिसायची बंद झाली, आता शांत झोप लागेल असा विचार करून मी बेड वर जाऊन पडले. मला गरम होत होते म्हणून मी पांघरूण घेतले नव्हते. बराच वेळ झाला तरी मला झोप लागत नव्हती. म्हणून मग डोक्यात विचार सुरू होते. तितक्यात मला जाणवले की समोरच्या कपड्यांच्या बास्केट वर कोणीतरी बसलय. मी घाबरून डोळे बंद केले आणि काही वेळ तशीच पडून राहिले. पण उत्सुकतेपोटी मी हळूच पापण्या वर करून पुन्हा एकदा त्या दिशेला पाहिले. तिथे खरंच काही तरी होत. दोन्ही पाय दुमडून, मांड्या छातीशी घेऊन बसलं होत. लाल भडक डोळे जे माझ्यावर च रोखले होते. अचानक खोलीत एक थंडावा पसरला जो मला असह्य वाटू लागला. पांघरूण घेण्यासाठी म्हणून मी हात उचलला तेव्हा जाणवले की हात हलवता ही येत नाहीये. आई ला हाक मारण्यासाठी तोंड उघडायचा प्रयत्न केला पण तेही जमत नव्हतं. घशातून आवाजच निघत नव्हता. मी प्रचंड घाबरले होते. जास्त विचार न करता मी घट्ट डोळे मिटून घेतले. आणि पुढच्या क्षणी माझ्या पायाला एक थंडगार स्पर्श जाणवला. डोळे उघडुन पहायची हिम्मत होत नव्हती. संपूर्ण अंग झाल्या सारखं वाटू लागलं. काय करू काय नाही काहीच कळत नव्हतं. काही वेळानंतर मी डोळे उघडले तर ती आकृती माझ्यावर बसली होती. ते भयानक दृश्य पाहून मला भोवळ आली आणि माझी शुध्द हरपली. 

सकाळी डोळे उघडले तेव्हा जाणवले की अंग खूप जड झालंय. घड्याळ्यात लक्ष गेलं तर दुपारचे १२ वाजले होते. बेड वरून उठायला गेले तेव्हा जाणवले की अंग खूप दुखतय आणि ताप आले. आई ला सांगायचं कसं हा प्रश्न होता. काही दिवसांनी ताप उतरला पण मी पुन्हा रात्री अभ्यास करायचा प्रयत्न ही केला नाही. आई ला ही या प्रसंगाबद्दल काहीच नाहीत नाही. 

Leave a Reply