लेखिका – रु.द.घा.

“अहो लक्षात आहे ना आज काय आहे ते?” शारदा म्हणाली. आज तिचा वाढदिवस. ती आज पंचवीस वर्षांची झाली होती. पंचवीस वर्षांची काहीतरी खास अशी भेटवस्तू अक्षयला तिच्यासाठी घ्यायची होती. त्यामुळे दिवसभर तो खूप फिरला, पण त्याला एकही वस्तू तिच्यासाठी योग्य वाटत नव्हती. शेवटी तो एका संग्रहालय वजा दुकानात येऊन स्थिरावला. इथे नक्कीच भेटवस्तू मिळेल असे वाटले. तो आत शिरला आणि वस्तू न्याहाळू लागला. आणि एका ठिकाणी त्याची नजर खिळली. अतिशय विलोभनीय अशी ती पेटी होती की कोणालाही पाहता क्षणी ती पसंत पडावी. तिच्यावर नाजुक असे रेखीव कोरीवकाम होते; त्या कोरीव कामामुळे तिच्याकडे लोक पटकन आकर्षक होत असत. जेमतेम दोन्ही तळहातावर मावेल इतकीच काय ती तिची लांबी होती. सर्व बाजूंनी भक्कम होती. ती पेटी इतकी सुंदर होती की संग्रहालयातील प्रदर्शनीय वस्तू मध्ये तिची जागा असावी. चौकशी केल्यानंतर समजले की ती पेटी खूप वर्षांपूर्वीची आहे. इतकी वर्ष झाली असूनही त्या पेटीची चमक काही कमी झाली नव्हती. हे पाहून अक्षयला आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. जास्त विचार न करता त्याने ती पेटी विकत घेतली. 

तो घरी आला आणि त्याने भेट म्हणून ती पेटी शारदाला दिली. तिला ही भेट खूप आवडली. खरंतर अध्यात्म (spirituality)वर विश्वास असणारे हे कुटुंब काही दिवसात अध्यात्म ऐवजी त्या छोट्याशा पेटीमध्ये रमून गेले होते. जो येईल तो त्या पेटीचे कौतुक करे. प्रत्येकाचं मन तिकडे आकर्षित होई, हे बघून शारदा मात्र चिंतीत होत असे. कोणीतरी ती पेटी आपल्या कडून हिरावून घेईल की काय अशी तिला धास्ती वाटू लागली आणि ती त्या पेटीत जास्तच गुरफटून जाऊ लागली. सतत त्या पेटी ला कवटाळून बसत असे. एवढेच नव्हे तर कालांतराने ती तिच्याशी गप्पागोष्टी ही करू लागली, हे पाहून अक्षयला मात्र हसू अनावर झाले. दिवसांमागून दिवस जात होते, इतर सगळ्या गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष झालं होतं आणि अक्षय-शारदाच्या लक्षातही आलं नव्हतं. त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. सर्वत्र उत्साही वातावरण. रात्री कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची जोरदार तयारी चालू होती, इतक्यात खोलीतून शारदाचा जोरदार किंचाळण्याचा आवाज आला. घरी आलेले पाहुणे, अक्षय सर्वजण आवाजाच्या दिशेने धावत गेले. 

पाहतात ते नवलच… त्या सुंदर पेटीवर रक्ताचा सडा पडला होता व शेजारी एक मांजर रक्ताळलेल्या अवस्थेत मरून पडली होती. ज्यांना हा प्रकार बघवला नाही ते पटकन खोली बाहेर पडले.. अक्षय आणि शारदाला मात्र नवल वाटत होते. कारण ती पेटी कपाटात होती व कपाटाचे दार बाहेरून बंद होते मग मांजर आत जाईलच कशी?? घरी आलेले पाहुणे आपापसात कुजबुजू लागले भुताटकी आहे… बाहेरचे केलंय कोणी तरी… हा सगळा प्रकार काही साधा नाही असे समजून जवळजवळ सर्वच लोक आपापल्या घरी निघून गेले. झालेल्या प्रकारामुळे अक्षय व शारदा दोघेही सुन्न झाले होते. या एका प्रकारानंतर मात्र हळूहळू परिस्थिती बिकट होत गेली. नोकरीनिमित्त अक्षय बाहेर असल्यामुळे शारदा दिवसभर एकटीच घरी असे. त्यांच्या घरी जास्त कोणाचे येणे जाणे ही नव्हते. तिला तिच्या बरोबर घरी कोणीतरी असल्याचे भास होऊ लागले. तिथे अक्षय ची अवस्था ही विचित्र होऊ लागली. कामामध्ये रोज नवनवीन अडचणी येऊ लागल्या. जो प्रोजेक्ट, जे काही काम तो करायला घ्यायचा त्यात त्याला अपयश येऊ लागलं. जस जसे दिवस पुढे सरकत होते तस तसे ही प्रकरणं इतकी वाढली की त्याच्यावर नोकरी जाण्याची वेळ आली. 

इतकेच नाही तर घरातही शारदा बरोबर त्याचे खटके उडू लागले. विनाकारण भांडण होऊ लागले. घरातले वातावरण पूर्णपणे बदलले. त्या दिवशी आवराआवर करताना शारदा च्याच एक गोष्ट लक्षात आली की तिचे नेहमीचे वापरायचे दागिने घरात दिसत नाहीयेत. तिला चांगले लक्षात होते की नेहमी प्रमाणे काल रात्री तिने त पेटीत दागिने ठेवले होते. त्या पेटीत तर ते नव्हतेच पण घरातही कुठे सापडत नव्हते. तिने अक्षय च्या कानावर ही गोष्ट घातली आणि विचारले की आपल्याकडे घरी कोणी येऊन गेलं का. पण गेल्या दोन दिवसात त्यांच्या कडे कोणीही आल नव्हतं. आता अजुन एक व्याप झाला होता. राहून राहून अक्षयला त्या पेटी बद्दल शंका येऊ लागली. गेल्या काही दिवसात जे काही घडतं य ते फक्त त्या पेटी मुळे च होतंय असे त्याला वाटू लागलं. शंकेचे निरसन करण्यासाठी त्या दोघांनी एक प्रयोग करायचा ठरवला. शारदा ने बाकीचे २ दागिने त्या पेटी त ठेऊन दिले आणि ती पेटी तिच्या उशाशी ठेवून दिली.. दुसऱ्या दिवशी पाहतात तर काय दागिने त्या पेटी मधून गायब होते. आता मात्र त्यांना खात्री पटली की हे सगळे खूप भयंकर आहे. पण ती पेटी नक्की कुठून आली आणि त्या मागचे सत्य शोधून काढण्याचा त्यांनी ठरवले. 

दुसऱ्याच दिवशी अक्षय त्या संग्रहालयात गेला जिथून त्याने ती पेटी विकत आणली होती. विकत देणाऱ्या व्यक्तीने त्यांना सांगितले की ती पेटी त्याला एका घराच्या लिलावात विकत मिळाली होती. पण त्याला त्या पेटीचा काहीही त्रास झाला नव्हता उलट अक्षयने ती पेटी विकत घेतल्यावर त्याला फायदा झाला होता. लीलाव केलेल्या घर मालकाचा पत्ता त्यांनी त्या व्यक्तीकडून मिळवला. पुढच्या दोन दिवसात त्यांनी ते घर शोधून काढले आणि ती पेटी घर मालकाला दाखवली. तो माणूस ती पेटी बघून घाबरला च. आणि चिडून म्हणू लागला “दूर ठेवा त्या पेटीला.. हिच्या मुळेच माझे हे हाल झाले आहेत. ही पेटी आणली आणि माझ्या आयुष्याची दुर्दशा झाली. खूप श्रीमंती होती माझ्या घरी.. स्वतःचा व्यवसाय, मोठे घर, बक्कळ पैसा.. पण ही पेटी घरी आणली आणि सगळे काही संपले, मला स्वतःचे घर विकावे लागले, व्यवसाय बंद पडला.. आज मी दुसरीकडे एक नोकरी करतोय..” त्या माणसाच्या अवस्थेबद्दल जरी त्यांना कळले असेल तरी ती पेटी नक्की कुठून आली हे त्याने सांगितले नव्हते. त्याला बऱ्याच विनवण्या केल्यानंतर त्याने सत्य काय ते सांगितले. तो म्हणाला की ही पेटी एका चोरा कडून भरपूर पैसे देऊन विकत घेतली होती. उत्तर मिळाले पण मग आता त्या चोराला कुठून शोधणार हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. 

शेवटी ते दोघे प्राचीन वस्तू ची जाण असणाऱ्या एका तज्ञा कडे गेले. त्या व्यक्तीने पेटी चे सूक्ष्म निरीक्षण केले असता पेटीतील आतील बाजूस अगदी लहान अक्षरात एका संग्रहालयाचे नाव लिहिलेलं आढळून आले. लागलीच त्यांनी इंटरनेट वरून ते संग्रहालय कुठे आहे याची माहिती मिळवली. आणि वेळ ना दवडता ते तिथे येऊन पोहोचले. संग्रहालयाच्या प्रमुखाने ती पेटी ओळखली व काही महिन्यांपूर्वी ती चोरीला गेली असल्याचे सांगितले. त्यांनी संग्रहालयात त्या पेटी ची जागा दाखवली. अक्षय आणि शारदा दोघेही त्या जागे जवळ गेले. तिथे त्या पेटी बद्दल माहिती लिहिली होती. जवळपास पन्नास वर्ष जुनी, एका राजवाड्यातील ती पेटी होती. आणि त्या राजवाड्याचे नाव आणि पत्ता ही त्यावर लिहिला होता. अक्षय ने त्या प्रमुखाला विनंती केली आणि पेटी त्याच ठिकाणी ठेवण्याची अनुमती मागितली. पण त्याने साफ नकार दिला. त्याचे कारण त्यांनाही कळले नाही. तितक्यात शारदा च्याच डोक्यात विचार आला आणि ती म्हणाली “आपण ही पेटी त्याच राजवाड्यात नेऊन का नाही ठेवत..?” अक्षय चिडून म्हणाला की झाला तेवढा उपद्व्याप खूप झाला. आता ही पेटी फेकून देऊ कुठे तरी म्हणजे आपल्याला सुटका मिळेल. 

पण शारदा ने हट्ट च धरला. म्हणून मग अक्षय नाईलाजाने हे करण्यास तयार झाला. तो राजवाडा एका दुसऱ्या शहरात होता. त्यांनी तिथे जायची तयारी सुरू केली. तीन चार दिवसात गाडी वैगरे बुक करून ते तिथे जायला निघाले. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. ड्रायव्हर ला मेन रोड वर थांबायला सांगून ते त्या राजवाड्याच्या दिशेने चालत निघाले. त्यांना वाटले तसे काही नव्हते. राजवाडा कसला ती वास्तू पडीक झाली होती. नुकताच अंधार पडायला सुरुवात झाली असल्यामुळे ती वास्तू अजूनच भयाण वाटू लागली. परिसर ही निर्जन होता. तिथे या वेळी कोणी फिरकत असेल असे ही वाटत नव्हते. मागच्या बाजूला गर्द झाडी होती. सर्वत्र पालापाचोळा पसरला होता. बाहेरूनच राजवाडा इतका भयंकर होता की तिकडे कोणीही मनुष्य न दिसणे हे साहजिकच होते. तिथे गेल्यावर काहीतरी विपरीत घडणार असल्याची चाहूल उगीचच मनात येत होती. शारदा आणि अक्षय बाहेरून त्या राजवाड्याचे निरीक्षण करत असतानाच त्यांच्या पुढे एक मनुष्य येउन उभा राहीला आणि शारदा जोरात किंचाळली. तो मनुष्य अगदी विचित्र दिसत होता. फाटके मळलेले धोतर आणि सदरा परिधान केला होता. तसेच खांद्यावर काळे असे जाडजूड घोंगडे होते. साधारण साठी पासष्टी चा व्यक्ती होता तो. 

सावळा, रखरखीत चेहरा यामुळे तो जरा भीतीदायक च भासत होता. त्याने त्याची नजर शारदाच्या हातात असलेल्या पेटीवर रोखली होती. काही कळायच्या आत त्याने शारदाच्या हातातून ती पेटी हिसकावून घेत विचारले, “कुठे सापडली ही पेटी?” एकूणच त्याचा अविर्भाव बघता त्याला नक्कीच या बद्दल काहीतरी माहित असावे अशी खात्री शारदा व अक्षयला झाली. अक्षयने त्याच्या बाबतीत घडलेला सर्व प्रकार त्या व्यक्तीला ऐकवला. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, “तुम्ही कोण आहात, कुठून आलात मला माहित नाही.. पण असेच घडणाऱ या पेटी ला हात लावला की.. अरे पोरांनो मी पंधरा वर्षाचा असताना माझ्या आज्यानं मांत्रिकाच्या मदतीने या पेटीला कुलूप लावून त्या संग्रहालयात बंद करून टाकले होते. कोणी हिम्मत केली ही ला बाहेर काढण्याची? आता भोगा आपल्या कर्माची फळ.” असे म्हणून तो डोक्याला हात लावत खाली बसला. शारदाने न राहून त्यांना या पेटीच्या रहस्य याबाबत विचारले. पण तो काही सांगायला तयार नव्हता. खूप विनंती केल्यानंतर तो व्यक्ती रहस्य सांगण्यास तयार झाला आणि हे ही म्हणाला की यावर कितपत विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर आहे पण मला जे माहीत आहे ते तुम्हाला सांगतो.

खूप वर्षांपूर्वी या वाड्यात या शहराचे राजा आणि राणी राहत असत. तसेच अनेक सेवकही होते. त्यापैकिच एक सेविका होती. तिची खासियत म्हणजे ती दिसायला खूप सुंदर होती आणि राणी ची ती खास सेवक ही होती. पण तीच्याबद्दलची एक वाईट गोष्ट म्हणजे तिला सोने, दागदागिने यांचा खूप हव्यास होता. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती दागिन्यांची चोरी करायची. राणीची ती खास असल्यामुळे इतर सेवक तिला वचकून असत.

राणीच्या जन्मदिनानिमित्त अनेकांनी राणीला वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या. राजाने खास राणीसाठी हिऱ्याची अंगठी करून घेतली. ती खुपच सुन्दर होती. राणीला ही ती खूप आवडली आणि त्या सेविकेची नजर तिच्यावर पडली. त्याच रात्री तिने ती अंगठी चोरली. दुसऱ्या दिवशी अंगठी हरवल्यामुळे राजवाड्यात गोंधळ उडाला. सर्व राजवाड्याची तसेच राजवाड्यातल्या अनेक लोकांची कसून चौकशी करण्यात आली. ती सेविका निर्धास्त होती कारण राणीची खास असल्याने तिची तपासणी कोणी करणार नाही याबद्दल तिला खात्री होती. पण राणी च्या आदेशानुसार तिच्या खोलीची ही तपासणी घेण्यात आली. आणि तिथे राणीची अंगठी आणि बरेच इतरही दागिने सापडले. 

ती सापडल्यावर गयावया करु लागली, माफी मागू लागली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. राणीचा तिने विश्वासघात केला त्यामुळे रागात राणीने तिचा हात हातात घेऊन तिच्या बोटात अंगठी घातली व शिपायास तिचा हात मनगटापासून तलवारीने वेगळा करण्यास सांगितले. दरबारात ले सगळे लोक ती शिक्षा उघड्या डोळ्यांनी पाहत होते. शिपायाने राणीचा हुकूम पाळत तलवार फिरवली आणि तिचा हात एका झटक्यात मनगटापासून वेगळा केला. ती वेदनेने व्हीवळू लागली, ओरडू लागली. राणी ला तिचा इतका राग आला होता की तिच्या मदितीलही कोणाला येऊ दिले नाही. त्यातच तिचा मृत्यू झाला. पण ती इतक्यावरच थांबली नाही. तो हात एका झाकणात ठेऊन एक पेटी तयार करा असा आदेश राणीने दिला. त्याप्रमाणे तिचा हात पेटी मध्ये ठेवण्यात आला आणि ती पेटी राणी वापरू लागली. काही दिवस उलटले. एका कोजागिरी पौर्णिमेला राणीचा संशयास्पद मृत्यू झाला. कोणी केला? का केला? कशासाठी केला? हे काहीच कळले नाही. हळूहळू या वाड्यातील शांतता, संपत्ती, माणसे सर्व काही लोप पावले आणि हा वाडा निर्मनुष्य झाला.. माझ्या पिढीतील व्यक्ती या वाड्याची देखभाल करतात तोच वारसा माझ्याकडे आला आहे. हा वाडा कधीही विकला गेला नाही. असं म्हणतात की या पेटीमध्ये त्या सेविकेचा जीव अडकला आहे .म्हणूनच….

असे म्हणत त्यांनी ती पेटी खाली ठेवली आणि आत जाऊन एक कुऱ्हाड घेऊन आले. बघता बघता त्यांनी त्या पेटी चे दोन तुकडे केले. अक्षय आणि शारदा चा जीव भांड्यात पडला. त्यांना वाटले की सगळे काही संपले पण तसे नव्हते. शारदा तो राजवाडा आतून बघायचा हट्ट करू लागली. ते म्हणाले की मी तुम्हाला दरवाजा उघडून देतो पण जास्त आत जाऊ नका, कोणत्याही वस्तू ला हात लावू नका तोपर्यंत मी या पेटीची विल्हेवाट लावतो, जाळून च टाकतो. ते दोघेही आत गेले. शारदा थेट आत चालत गेली आणि तिला एका महिलेचे चित्र रेखाटलेले दिसले. ती ते चित्र अगदी टक लाऊन पाहू लागली. ते दोघे अजुन आत चालत गेले आणि त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. भिंतीवरील दिवे पेटलेले होते, समोर दागिन्यांचा ढीग होता. त्यांना काही कळेनासे झाले. तितक्यात अक्षय च्याच लक्षात आले की शारदा कुठे ही दिसत नाहीये. तो तिला शोधू लागला पण ती कुठे ही दिसत नव्हती. तेवढ्यात त्याची नजर एका भिंतीवर लावलेल्या चित्रावर गेली. ती अगदी हुबेहूब शारदा सारखी दिसत होती. तो धावत बाहेर आला आणि त्या व्यक्तीला विचारू लागला की हा सगळा काय प्रकार आहे. 

तसे त्यांनी घाबरतच विचारले “तुम्ही अगदी आत त्या खोलीत तर गेला नव्हता ना..?”. असे म्हणत त्यांनी आत धाव घेतली आणि त्यांच्या मागोमाग अक्षय ही धावला. ते थेट त्या खोलीत गेले आणि शारदा त्यांना मृतावस्थेत सापडली. नियतीने तिला त्या सेविकीच्या खोलीपर्यंत आणून पोहचवले होते आणि तिची आत्मा शारदाला कायमची घेऊन गेली होती.  

Leave a Reply