अनुभव क्रमांक – १ – स्वप्नील साळुंखे

गोष्ट जवळपास ३-४ वर्षां पूर्वीची आहे. तेव्हा मी ११ वी ला होतो. सैनिक शाळा होती. अगदी माळरानात एकाकी, डोंगराच्या कुशीत वसलेली. आजू बाजूला एक गाव काय साधी वस्ती ही नव्हती. तसे माझ्या शाळेचे क्षेत्र फारच पसरलेले होते. एकूण आठ हॉस्टेल चे युनिट होते. बघायला गेले तर ७ हॉस्टेल चे युनिट हे एकत्र आहेत परंतु आठवे हॉस्टेल मात्र मुख्य कॅम्पस पासून जवळपास ३ किलोमिटर लांब आहे. मुलांची वाढती संख्या बघून संस्थेने खूप नंतर हे हॉस्टेल बांधले. काही तांत्रिक अडचणीमुळे हे कॅम्पस पासून लांब बांधले होते. माझा तिथे खूप उशिरा प्रवेश झाल्यामुळे मला ते आठवे युनिट मिळाले. ज्या दिवशी राहायला गेलो तेव्हा सिनियर सांगू लागले की दुसरे युनिट मागून घे, इथे राहू नकोस. मी त्यांना कारण विचारले तसे ते म्हणाले की तू नवीन आहेस, इथे फक्त १६ मुलं राहतात. त्यावर मी म्हणालो की यात काही विशेष नाही, मी राहतो जाऊन. नंतर हळु हळू मुलं येतील ना.. माझ्या अश्या बोलण्याचा बहुतेक राग आला त्यांना. तो का आला हे मला तेव्हा कळले नाही. ते चिडून म्हणाले “नंतर पश्र्चाताप करून घेऊ नकोस..” आणि रागात निघून गेले. 

मला असं जाणवले की त्यांना मला काही तरी सांगायचे आहे पण ते सांगू शकत नाहीत. आणि म्हणून त्यांनी मला हॉस्टेल युनिट बदलून घ्यायला सांगितले. असेल काही कारण असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. उत्साहाने मी माझ्या रूम मध्ये गेलो. सगळे सामान बॅग मधून बाहेर काढून वस्तू नीट ठेवल्या. समान लावून झाल्यावर मी तेथील वॉर्डन ची भेट घेतली. त्यांनी मला हॉस्टेल चे सगळे नियम समजावून सांगितले. सगळे समजावून झाल्यावर मी त्यांचा निरोप घेऊन पुन्हा रूम वर जायला निघालो. तसे त्यांनी मला पुन्हा थांबवले आणि जरा दबक्या आवाजात म्हणाले “तू नवीन आहेस.. हॉस्टेल मध्ये कामाशिवाय जास्त फिरायचे नाही.. खासकरून रात्री रुमच्या बाहेर निघायचे नाही.. बाथरूम ला वैगरे जायचे असेल तर आधीच जाऊन यायचे..” मी त्यांना हो म्हणून रूम वर आलो. रात्री जेवण आटोपले. जस जशी रात्र होत गेली तसे सगळे वातावरण शांत होत गेलं. मला असल्या गोष्टींवर विश्वास नसल्याने मी त्या वॉर्डन चे म्हणणे डावलत एकटाच Hostel एक्सप्लोर करायला निघालो. किती रूम आहेत, कोणती रूम बंद आहे, बाहेर जायला कुठून मार्ग आहेत सगळे काही.. 

रात्रीचे १२ वाजत आले होते. मी त्या hostel च्याच बहुतेक एका टोकाला आलो असेन. तिथं एक बाथरूम होत. मी आत गेलो, साहजिक च इतक्या रात्री बाथरूम मध्ये कोणी असेल असं वाटलं नाही. मी सहज एक फेरी मारून पुन्हा बाहेर येणार तितक्यात त्या बाथरूम मधल्या एका बंद दरवाज्यातून अचानक पाण्याचे थेंब पडण्याचा आवाज येऊ लागला. मी जरा थांबलो. आधी सगळे काही शांत होते पण मग आता हा अचानक आवाज. मला वाटले की नळ वैगरे खराब झाला असेल, मी दुर्लक्ष करत तिथून बाहेर पडणार तितक्यात नळ अचानक जोरात सुरू झाला. बहुतेक आत कोणी तरी आहे असे वाटले पण पाणी पडण्याच्या आवाजा व्यतिरिक्त अजुन कसलाही आवाज येत नव्हता. मी काही वेळ थांबून वाट पाहिली पण कोणीही बाहेर आले नाही. मी विचार केला की जाऊन नळ बंद करावा, उगाच पाणी वाया जातेय. मी तो दरवाजा उघडला आणि नळ बंद करून मागे वळलो, काही पावले चालत पुढे गेलो आणि पुन्हा तो नळ अगदी जोरात सुरू झाला. आता मात्र मी घाबरलो. 

पण पुढच्या क्षणी वाटले की आपली कोणी तरी मस्करी करतंय. बहुतेक हॉस्टेल चे विद्यार्थी मला घाबरवत असतील आणि इथेच कुठे तरी लपून बसले असतील. मी ते संपूर्ण बाथरूम पाहिले, प्रत्येक दरवाजा उघडुन पहिला पण माझ्या शिवाय तिथे दुसरे कोणीही नव्हते. पण मग हा नळ चालू झालाच कसा.. मला कळेनासे झाले. कोणी असते तर ओल्या पायांचे ठसे नक्कीच दिसले असते. मी हिम्मत करून पुन्हा नळ बंद गेला आणि दबक्या पावलांनी तिथून बाहेर पडू लागलो. तितक्यात समोरून सर्रकन एक आकृती गेल्यासारखे जाणवले आणि काळीज भीती ने धड धडू लागले. मला नक्की भास झाला की आत्ता माझ्या समोरून खरंच एक आकृती.. आता मात्र मला तिथे क्षणभर ही थांबायची इच्छा नव्हती. मी चालण्याचा वेग वाढवला. तसा मागून एक भरडा किळसवाणा आवाज कानावर पडला “जास्त घाई करू नकोस..”. तो भयानक आवाज ऐकून मी रूम च्याच दिशेने धावतच सुटलो. धापा टाकत रूम जवळ आलो आणि आत शिरताना पुन्हा एकदा त्या दिशेला नजर टाकली. 

काही वेळापूर्वी झालेला तो भास नव्हता. त्या अंधाऱ्या कोपऱ्यात एक आकृती उभी होती. तिचे फक्त चमकणारे दोन डोळे दिसत होते, शरीराचा भाग अंधारात नीटसा दिसलाच नाही. ते दृश्य पाहून मात्र अर्धांगवायूचा झटका आल्यासारखे वाटले आणि मी दारातच कोसळलो.. सकाळी कोणी तरी तोंडावर पाणी शिंपडले तेव्हा डोळे उघडले. पाहिले तर मी माझ्या रूम मधल्या बेड वर होतो. रात्री चा प्रसंग आठवला आणि मी ताडकन उठून बसलो. डोकं जड झाल होत. समोर पाहिले तर काही मुलं माझ्या रूम मध्ये होती. मी त्यांना काही सांगणार तितक्यात त्यातले दोन जण म्हणाले. काही सांगायची गरज नाही.. बाथरूम चा लाईट चालू होता म्हणजे तू काल रात्री तिथे गेला होतास आणि रूमच्या दारात पडला होतास. काय झाले असेल ते माहितीये आम्हाला. मी त्यांच्याकडे आश्चर्याने आणि तितक्यात भीतीने पाहत होतो. तसे त्यातला एक सांगू लागला.. ” काही वर्षांपूर्वी परीक्षेत नापास झाल्यामुळे एका मुलाने बाथरूम मध्ये स्वतःला पेटवून घेतले होते. त्याचा च रात्री भास होतो, काही जणांना तो दिसतो. म्हणून या युनिट मध्ये कोणी राहायला येण्याचे धाडस करत नाही..”

अनुभव क्रमांक – २ – विशाल मांढरे

मी राहायला मुंबई ला आहे आणि पेशाने डॉक्टर आहे. अनुभव मी साताऱ्याला असतानाचा आहे. साधारण २०१८ मधला. माझ्या मित्र सोबत कॉलेजची सुट्टी संपवून आम्ही सगळे हॉस्टेल ला परतलो होतो. माझ्या एका मित्राला यायला बराच उशीर झाला. आम्ही त्याला फोन करून विचारले तेव्हा तो म्हणाला माझ्या तालुक्या वरून यायला एकही एस टी मिळत नाहीये, अजुन थांबून बघतो थोड्या वेळ. तो बराच वेळ थांबला पण एस टी काय त्याला मिळाली नाही. शेवटी एका ट्रक वाल्याकडे लिफ्ट मागितली आणि आमच्या हॉस्टेल पासून अलीकडच्या फाट्यावर उतरला. कारण तिथून तो ट्रक दुसऱ्या दिशेला जाणार होता. एव्हाना ११ वाजत आले होते. आणि हॉस्टेल पर्यंत जायला एखादे वाहन मिळेल याची जरा ही खात्री नव्हती. म्हणून मग तो चालत च निघाला. फाट्या जवळून थोडे पुढे चालत आले की काही अंतरावर एक पुल लागतो. तो पुल खालून ओलांडून करून यावे लागते. बरीच रात्री झाल्यामुळे आधीच रस्ता सामसूम झाला होता. 

त्याला लवकरात लवकर हॉस्टेल वर पोहोचायचे होते. तो पुलाखालून जाऊ लागला तसे त्याला मागून कोणी तरी चालत येत असल्याचा भास झाला. त्याने एकदा तिरक्या नजरेने पाहून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण मागे कोणीही दिसले नाही. तो पुन्हा समोर पाहून चालू लागला. पुन्हा त्याला तोच भास झाला. असे एकदा नाही तर ३-४ वेळा झाले. या वेळी मात्र त्याने मागे वळून पहायची हिम्मत केली नाही. पुल ओलांडून तो बाहेर आला आणि ती चाहूल त्याला अधिकच जाणवू लागली. जस कोणी तरी त्याच्याकडे धावत येतंय. त्याने मागे वळून पाहिले आणि त्याला धडकीच भरली. एक बाई त्याच्या दिशेने धावत येत होती. पण जसे त्याने मागे वळून पाहिले तसे ती जागीच थांबली. त्याने घाबरतच विचारले “कोण पाहिजे तुम्हाला..” बऱ्याच वेळ समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. पण तू बाई हळु हळु त्याच्या दिशेने येऊ लागली आणि त्यालाच विचारू लागली “तुम्हाला कोण हवंय..” ती इतका घाबरला की पाठ करून सरळ हॉस्टेल च्याच दिशेने धावत सुटला. 

तो हॉस्टेल वर धापा टाकतच आला आणि येऊन अक्षरशः घाबरून ओरडू लागला. आमच्या रूम चा दरवाजा वाजवू लागला. आम्ही सुद्धा धावत जाऊन दरवाजा उघडला कारण तो खूप जोरात दरवाजा वाजवत होता. तो पूर्ण घामाघूम झाला होता आणि धावत आल्यामुळे त्याचा श्वास लागत होता. आम्ही त्याला आत घेतले, पाणी प्यायला दिले आणि शांत केले. आम्ही घडलेला सगळा प्रकार ऐकून निशब्द झालो होतो. त्या रात्री आम्ही कोणीच झोपलो नाही. नंतर काही दिवसांनी आम्ही ते हॉस्टेल ही बदलले. 

अनुभव क्रमांक – ३ – प्रशांत पाटील

अनुभव माझ्या चुलत भावाच्या मित्रासोबत घडला होता. तो त्याच्या मित्रांबरोबर हॉस्टेल मध्ये रहायचा. त्याच्या हॉस्टेल भोवती उसाचे शेत होते. आणि तिथून त्याचे कॉलेज तसे बरेच लांब होते. गावाकडचा भाग असल्यामुळे रात्री अपरात्री जास्त वर्दळ नसायची. हिवाळ्याचे दिवस चालू झाले होते. ते सगळे हॉस्टेल वर होते. पण त्यांचा एक मित्र रात्री लावणी पाहण्यासाठी गेला होता. त्याला यायला बराच उशीर झाला. हे सगळे त्याची हॉस्टेल वर वाट पाहत होते. रात्री सगळा कार्यक्रम आटोपल्यावर तो यायला निघाला. मध्यरात्र उलटली होती. तो एकटाच गेला होता त्यामुळे येताना ही त्याला वाटेवर कोणाचीही सोबत नव्हती. तो हॉस्टेल च्याच गेट जवळ आला. तो गेट आणि हॉस्टेल ची इमारत यात बरेच अंतर होते. म्हणजे जवळपास ४-५ मिनिट चालत जावे लागे. गेटवर वॉचमन काका पहारा देत होते. त्याच्याशी थोड बोलून तो आला आणि इमारतीच्या दिशेने चालू लागला. काही अंतर चालत गेल्यावर त्याच्या लक्षात आला की त्याच्या मागून कोणीतरी चालत येतंय. त्याला वाटले वॉचमन काका असतील. 

म्हणून त्याने मागे वळून पाहिले आणि भीती ने थरथर कापू लागला. मागे एक बाई उभी होती. केस चेहऱ्यावर होते पण तरीही तिच्या कपाळावर चे भले मोठे कुंकू स्पष्ट जाणवत होत. तिच्या मागे पाहिले तर वॉचमन काका ही आपल्या जागेवर नव्हते. त्या निर्जन भागात ते फक्त दोघेच होते. ती बाई फक्त एका जागी स्थिर उभी राहून त्याला एक टक पाहत होती. इथे याची दातखीळ च बसली. काय करावे काही सुचेना. ओरडा वेसे वाटले, तिथून पळून जावेसे वाटले पण काहीच करता येत नव्हते. ती बाई काय करेल त्याचा नेम नव्हता पण बराच वेळ ती तशीच उभी होती. त्याने गळ्यात तुळशीची माळ घातली होती हे तिने हेरले. ती त्याच्या जवळ आली आणि हळूच म्हणाली “माळ काढ..”. ती वारंवार फक्त एकच वाक्य म्हणत होती. माळ काढ.. तो जागचा हलू शकत नसला तरी ही त्याने संपूर्ण शक्ती एकवटून जोरात वॉचमन काकांच्या नावाने आरोळी ठोकली. आणि तो तिथेच बेशुध्द पडला. त्याचा आवाज ऐकून बाजूलाच गेलेले काका धावत त्या दिशेने आले. तर त्यांना तो बेशुध्द पडलेला दिसला. पण त्या व्यतिरिक्त तिथे दुसरे कोणीही नव्हते. 

त्यांनी कसे बसे उचलून त्याला रूम वर आणले. आम्ही विचारू लागलो तसे ते म्हणाले की याने जोरात हाक दिली मला आणि मी पाहायला आलो तर हा वाटेत बेशुध्द पडला होता. त्याला थेट सकाळी जाग आली. त्याने घडलेला सगळं प्रसंग आम्हाला सांगितला. त्यावर ते वॉचमन काका म्हणाले की आज पर्यंत इथे राहणाऱ्या मुलांना असे बरेच अनुभव आले आहेत. हे हॉस्टेल जिथे बांधले आहे तिथे खूप वर्षांपूर्वी स्मशान भूमी होती. कदाचित त्यामुळेच की काय पण असे प्रसंग नेहमी घडतात. झालेल्या प्रसंगामुळे माझ्या चुलतभावाचा तो मित्र आणि सगळे खूप घाबरले होते. त्या प्रसंगानंतर हॉस्टेलमधील कोणीच रात्री उशिरा बाहेर पडले नाही..

Leave a Reply