अनुभव – संदेश वेळणेकर
त्या रात्री मी डेस्क वर पुस्तक वाचत बसलो होतो. थोड्या वेळाने आईची हाक ऐकू आली. गावाकडच्या मित्राचा फोन आला होता आनंदाची बातमी द्यायला. त्याचे लग्न ठरले होते. मी लवकरच येतो भेटायला सांगून फोन ठेवला आणि जायच्या तयारी ला लागलो.
दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी आईचा निरोप घेऊन गावी मित्राच्या लग्नासाठी निघालो. घरातून काही अंतर चाललो असेन आणि माझ्या समोरून एक काळी कुट्ट मांजर आडवी गेली. आता मला या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही म्हणून मी दुर्लक्ष करून झपाझप पावले टाकत पुढे निघालो. पण तितक्यात अचानक पाऊस सुरू झाला आणि नेमकी छत्री घरीच राहिली हे लक्षात आलं. मी धावतच एस टी स्थानका जवळ पोहीचलो पण तोपर्यन्त संपूर्ण भिजून गेलो होतो. त्यातच सतत मित्रांचे फोन येत होते कुठे पोहीचलास विचारायला त्यामुळे थोडी चीड चीड होत होती.
बस आली आणि मी चढून अगदी मागच्या मोठ्या सीट वर जाऊन बसलो. बाजूलाच 70-80 वर्षाच्या आजीबाई बसल्या होत्या. पेहराव साधारण माझ्या आजी सारखाच होता.. कपाळावर मोठं कुंकू, सडपातळ बांधा आणि हिरवी साडी. आवाज एकदम कणखर होता. तिने मला विचारले “पोरा कुठे चाललास?” मी म्हणालो “मित्राच्या लग्न साठी निघालो आहे वायंगणी ला”.. त्यानंतर आमच्यात बोलणे सुरु झाले आणि बोलता रात्र कधी झाली आणि डोळा कधी लागला कळलेच नाही.
रात्री साधारण 1.30 ला कंडक्टर चा आवाज कानावर पडला ‘चला वायंगणी आलं’ आणि मी खडबडून जागा झालो. मी बॅग घेऊन जायला निघालो तर त्या आजीने हाक दिली आणि म्हणाली ‘बाळा या वेळेला इथे उतरू नकोस’. मी थोडया गोंधळात पडलो. मी आजी कडे बघून स्मित हास्य केलं आणि जायला पुढे फिरलो तसे कंडक्टर ही म्हणाला “त्या बरोबर म्हणतायेत साहेब या वेळी इथे उतरणे बरे नाही” मी प्रश्नार्थक नजरेने कंडक्टर कडे पाहिले आणि बस मधून खाली उतरलो. कंडक्टर ने दरवाजा लावला आणि खिडकीतून डोके बाहेर काढत म्हणाला “साहेब जपून जा.. रस्त्यात कोणी भेटले तर थांबू नका”..
आता मात्र मी जरा स्थिरावलो आणि तो असे का बोलला असेल या विचारात पडलो. पण बस च्या आवाजाने मी पुन्हा भानावर आलो. मी रस्त्याच्या कडेने चालायला सुरुवात केली. मागे वळून पाहिले तर त्या काळ्या कुट्ट अंधारात बस दिसेनाशी झाली होती. मी चहूकडे नजर फिरवली. त्या निर्जन रस्त्यावर मी एकटाच चालत होतो. काही अंतर चालल्यावर मला गावाकडे जाताना लागणारी थोडी वस्ती दिसली. तिथून गाव तसे बऱ्यापैकी लांब होते.
चालत असताना मला कंडक्टर ने सांगितलेले वाक्य आठवले आणि पुढे नजर गेली. पुढच्या वळणावर एक वृद्ध माणूस आणि साधारण 22-23 वर्षाची सुंदर तरुणी उभी असलेली दिसली. तो म्हातारा जर विचित्रच दिसत होता. आश्चर्य म्हणजे त्याच्या हातात एक जुना कंदील होता आणि त्याने घोंगडी अंगावर घेतली होती. मी मनात केले की काय माणूस आहे, मोबाईल च्या जमान्यात कंदील घेऊन फिरतोय. माझे लक्ष त्या तरुणीकडे गेले आणि काही क्षणासाठी मी पूर्ण भारावून गेलो. चेहऱ्यावर गोड हास्य, सुंदर डोळे, नजर हटणार नाही असे सौंदर्य.
पण पुढच्याच क्षणी मी भानावर आलो. हे दोघे इतक्या रात्री इथे काय करत असावेत. मी त्यांच्या समोरून जायला निघालो तेवढ्यात ते दोघेही थोडे पुढे आले आणि मी किंचितसा दचकलो. त्या वृद्ध माणसाने अतिशय मृदू स्वरात विचारले “कुठे निघालात साहेब”. मी जरा दबक्या आवाजात म्हणालो “कुठे नाही इथेच मित्राकडे लग्नाला वायंगणी ला”.. तो वृध्द पुढे म्हणाला “चला मग सोबतच जाऊया आम्हाला ही तिथेच जायचे आहे”. ती तरुणी मला एक टक पाहत होती. अगदी निरखून..
मला आता विचित्र वाटू लागले होते. कारण ओळख वैगरे नसताना हे दोघे माझ्याबरोबर चालत होते. माझ्या मनात असंख्य प्रश्न येऊ लागले.. हे नक्की आहेत तरी कोण ? इतक्या रात्री इथे कसे ? आणि माझ्या बरोबरच मला जायचे त्याच ठिकाणी कसे येत आहेत ?. त्या दोघांची ती नजर असे भासवत होती की ते माझीच वाट पाहत इथे थांबले आहेत. मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला की तुम्ही कुठून आलात आणि कुठे निघालात पण त्यांनी मात्र इथल्या इथल्या गोष्टी सांगून टाळाटाळ केली.
साधारण 20 मिनिट चालल्यावर माझ्या मित्राचे घर दृष्टीस पडू लागले तसा मी त्यांना म्हणालो ‘चला, माझा प्रवास संपला, माझ्या मित्राचे घर आले.. निघतो मी या दिशेने’. तसे ते जड आवाजात म्हणाले “बरं.. पण आमचा प्रवास कधी संपणार कोण जाणे”.. त्यांनी स्मित हास्य केलं आणि त्या पायवाटेने जाऊ लागलो. मला सहज वाटले म्हणून मी मागे वळून पाहिले आणि काळजाचा ठोकाच चुकला.. मागे फक्त ओसाड रस्ता होता आणि ते दोघेही नाहीसे झाले होते..
मी चालण्याचा वेग वाढवला आणि कसे बसे मित्राचे घर गाठले. मित्राच्या घरी पोहीचल्यावर त्याला घडलेला प्रकार सांगितला पण साधारण 10 मिनिट तो गप्प च होता. त्याच्या चेहऱ्यावर चे हावभाव पाहून वाटत होते की नक्कीच काही तरी लपवायचा प्रयत्न करतोय हा. मी न राहवून म्हणालो “आता सांगशील का मला??” त्याने खोलीची कडी लावून घेतली आणि माझ्या जवळ बसत म्हणाला ‘हे बघ मी सांगतोय ते कितपत खरं आहे हे मला माहित नाही पण ते दोघे त्या रस्त्याला खूप जणांना दिसले आहेत’. अस म्हणतात की ते बाप-लेक याच भागात एक छोटंसं गेस्ट हाऊस पहायचे. सगळं सुरळीत चालू होतं. पण एके दिवशी एक शहरातला माणूस तिथे राहायला आला. ती मुलगी त्याच्या प्रेमात पडली. आणि काही महिन्यात बाळंतीण राहिली. शहरातील कामे आटपून मी लगेच येतो आणि लग्न करतो असे वचन दिले. पण तो काही पुन्हा या गावात परतला नाही. त्यांनी काही महिने त्या माणसाची वाट पाहिली पण नंतर लोक बोलायला लागली. त्यांच्या जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केली. असे म्हणतात की ते दोघे त्या माणसाच्या शोधात आजही त्या बस स्थानकाजवळ प्रवस्याना दिसतात, त्यांची विचारपूस करतात.
मी हे सगळे ऐकून मात्र सुन्न झालो. मला विश्वास बसत नव्हता. पण पुढच्या काही दिवसात मला कित्येक जण येवून भेटले ज्यांना अगदी असाच अनुभव आला होता.
माणूस नकळत पणे का होईना अशी काही कृत्ये करतो की ज्याची किंमत समोरच्याला आयुष्यभर च काय तर त्या नंतरही भोगावी लागते.