अनुभव – रितिका देशमुख
ही घटना आमच्या पणजोबांसोबत घडली होती. साधारण १९५० चा काळ असावा. आमचे पणजोबा गोविंदराव अगदी धीट होते. मजबुत शरीरयष्टी आणि अतिशय रांगडे व्यक्तिमत्व त्यामुळे सगळे गाव त्यांना ओळखत असे. त्यांच्या मित्राचे एक भजनी मंडळ होते. जवळपास कुठे भजनाचा कार्यक्रम असला की ते आवडीने त्यात भाग घेत असत.
अश्याच एका दिवशी त्यांना बाजूच्या गावातून त्यांना भजनासाठी आमंत्रण आले होते. गाव जवळपास ५-६ किलोमीटर अंतरावर होते. पण मधला परिसर जंगल पट्टीचा होता. त्यात जाण्यासाठी दोनच पर्याय होते – पायी चालत जाणे किंवा जास्तीत जास्त बैलगाडी वैगरे घेऊन जाणे. पण सोबत बरेच लोक असल्याने त्यांनी पायी जायचा निर्णय घेतला. जंगलाचा भाग असल्यामुळे तिथे जंगली जनावरांची भीती तर होतीच पण खरे कारण काही वेगळच होते. जंगलाच्या मधोमध एका मोठ्या झाडाखाली एका खविसाचे वास्तव्य होते. याबद्दल संपूर्ण गावाला माहीत होते. रात्री अपरात्री त्या भागातून एकटा गेलेला माणूस पुन्हा कधी परतायचाच नाही. त्यामुळे रात्रीच काय तर दिवसाही कोणी त्या परिसरातून एकटे जायला टाळायचे.
भजन संध्याकाळी ७ वाजता होते. त्यामुळे आम्हाला यायला उशीर होईल, बहुतेक पहाटेच येऊ असे सांगून ते घरातून बाहेर पडले. रमत गमत ते साधारण ६ च्या सुमारास त्या ठिकाणी येऊन पोहोचले. तिथे चहा वैगरे घेऊन ठरलेल्या वेळेप्रमाणे ७ वाजता भजनाला सुरुवात झाली. ५-६ तास भजनाचा कार्यक्रम चालू होता. अगदी छान आणि मनासारखा कार्यक्रम झाल्यामुळे सगळे खूप खुश होते. ११ च्या सुमाराला सगळे आटोपते घेतल्यावर त्यांनी जेवण उरकले आणि साधारण १२ ला ते आपल्या गावात जायला निघाले. सगळे जण सोबत च निघाल्याने तसे काही काळजी करण्याचे कारण नव्हते. पण मंडळ मोठे असल्याने लोक भरपूर पण वाट शोधण्यासाठी घेतलेले कंदील मात्र २ च होते. गप्पा गोष्टी करत त्यांनी गावाची वेस ओलांडली आणि ते त्या घनदाट जंगलाच्या वाटेला लागले.
हळू हळू गावाचा परिसर मागे पडू लागला तसे अंधार गडद होऊ लागला होता. त्या मिट्ट अंधारात वाट काढत ते गावाच्या दिशेने चालत होते. अचानक मध्येच एका बाजूने झाडात सळसळ ऐकू आली की काळजात धडकी भरल्यासारखे व्हायचे. झपाझप पावले टाकत त्यांनी तो रस्ता कसा बसा पार केला आणि साधारण ३ च्याच सुमाराला ते गावात येऊन पोहोचले. सगळ्यांचा निरोप घेऊन ते आपल्या घरात आले. २-४ घोट पाणी प्यायले तितक्यात दारावर थाप पडली. इतक्या रात्री पुन्हा कोण आले हे पाहायला क्षणाचाही विलंब न करता त्यांनी दार उघडले. त्यांच्या सोबत असलेल्या एका मित्राची म्हणजे गुणाची आई आणि बायको दारात उभी होती. त्याची आई अतिशय घाबरलेल्या अवस्थेत सांगू लागली “अरे राजा, गुणा तुमच्यासोबत च निघाला होता ना.. पण तो अजून घरी परतला नाहीये”. तसे त्यांनी गुणाच्या आई ला धीर देत म्हंटले “तुम्ही काळजी करू नका आम्ही बघतो जाऊन”.
ते लगेच बाहेर पडले आणि त्यांनी पटापट मित्रांना गोळा केले. जास्त उशीर न करता ते पुन्हा त्या वाटेला लागले. या वेळेस हातात कंदील आणि काठ्या घेऊन ते गुणाला सगळी कडे शोधू लागले. मनात नको ते विचार येत होते पण ते सगळे बाजूला सारून गुणाला शोधणे महत्त्वाचे होते. त्याला शोधता शोधता पहाट होत आली. गावातल्या लोकांनी जीवाचे रान केले, सगळा परिसर पिंजून काढला पण गुणा काही सापडला नाही. शेवटी हताश होऊन ते पुन्हा गावात परतले. पण इथले वातावरण खूपच गंभीर झाले होते. गुणाच्या घरी रडारड सुरू झाली होती. सगळे त्याच्या घरच्यांना धीर देत होते. तितक्यात दोन गावकरी धावत त्यांच्या घराजवळ आले. ते दोघेही धावत आल्यामुळे अगदी धापा टाकतच सांगू लागले ” जंगलाच्या मध्यभागी एका मोठ्या झाडाखाली गुणा निपचित पडलाय.. शुद्धीवर येत नाहीये”. तसे आम्ही सगळ्यांनी त्या दिशेने धाव घेतली.
तिथे जाऊन पाहिले आणि सगळ्यांना धक्काच बसला. गुणाला जबर मार बसला होता. जखमांनी संपूर्ण अंग भरले होते. लगेच गावकऱ्यांनी त्याला उचलून घरी आणले. वैद्याला बोलावण्यात आले. तपासल्यावर कळले की गुणाच्या शरीरात ली जवळपास सगळी हाड मोडली आहेत. त्याच्यावर उपचार करून औषध वैगरे देऊन वैद्य निघून गेले. पण गुणाची ही अवस्था नक्की कशी झाली, कोणी केली या बद्दल कोणाला कळले नव्हते. गावकऱ्यांनी चर्चा करून विलंब न करता मांत्रिकाला बोलावले. गुणा अजूनही बेशुध्द अवस्थेत होता. मांत्रिक आल्यावर ते गुणा कडे फक्त एक टक पाहत राहिले. तसे आई ने त्यांना विचारले “काय झालं असावं माझ्या पोरासोबत, आपल्याला काही कळलं का?”. तसे मांत्रिकाने सगळ्यांना एक प्रश्न विचारला “काल गावाकडे परतताना गुणा मागे एकटा राहिला होता का?”. तसे पणजोबा म्हणाले “काळोख आणि जंगली प्राण्याची भीती असल्याने आम्ही जमेल तितक्या लवकर घरी आलो.. आणि आम्हाला घरी आल्यावर हा प्रकार कळला”.
तसे मांत्रिक म्हणाले “खूप वाईट घडले काल, गुणा खविसाच्या तावडीत सापडला होता”. त्यांचे बोलणे संपताच गुणा अचानक शुद्धीवर आला. तो अतिशय रागात होता आणि फक्त एकच वाक्य बोलत होता “मला कुस्ती खेळायची आहे”. गुणाच असं रूप पाहून सगळेच घाबरले होते. बघता बघता त्याचा राग वाढतच जात होता. तेवढ्यात मांत्रिकाने पिशवीतून अंगारा काढून त्याच्या कपाळावर लावला तसे तो हळू हळू शांत होऊ लागला. काही वेळा नंतर तो शुद्धीवर आला आणि त्याच्या सोबत घडलेला भयंकर प्रकार सांगू लागला. काल रात्री आपण अर्ध्या रस्त्यात आल्यावर माझ्या पायात अचानक वात आला म्हणून मी रस्त्याकडेला असलेल्या एका दगडावर थोड्या वेळ बसलो. तो पर्यंत तुम्ही सगळे बरेच पुढे निघून गेला होता. तितक्यात मला मागून कसलीशी हालचाल जाणवली. मी दचकून उभा राहिलो तसे एक अमानवीय आवाज कानावर पडला “कुस्ती खेळ माझ्याशी”.
मागे न पाहता मी वेगाने तुमच्या दिशेने धावत सुटलो. पण काही पावले टाकल्यावर वाऱ्याच्या वेगाने माझ्या समोर एक ८-९ उंच आकृती येऊन उभी ठाकली. त्याचे रूप पाहून माझे हातपाय च गळून गेले होते. मला कळून चुकले होते की ज्या खविसा बद्दल आपण इतके दिवस फक्त ऐकुन होतो त्याच्याच तावडीत आज आपण सापडलो होतो. काही कळायच्या आत त्याने माझा पाय खेचून मला जमिनीवर आपटले. तो किती तरी वेळ मला उचलून जमनिवर आदळत होता. माझ्या डोक्याला २-३ वेळा जोरात मार बसल्यावर माझी शुध्द हरपली त्यामुळे नंतर मला काय घडले ते माहीत नाही.
गुणाची अवस्था दिवसेंदिवस खालावत च गेली. जसे जणू त्याला वेड च लागले होते. कोणी ही त्याला भेटायला आले की तो एकच वाक्य बोलायचा “मला तुझ्यासोबत कुस्ती खेळायची आहे”. खूप उपचार वैगरे करून झाले पण त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. खर तर त्याला खविसाने झपाटले होते. पुढच्या १०-१५ दिवसात मृत्यूशी झुंज देत त्याने आपले प्राण सोडले. म्हणून कदाचित म्हणत असावेत “खविसाशी कुस्ती म्हणजे मृत्यू ला आमंत्रण”…