अनुभव – समाधान बंडा
अनुभव माझ्या मित्रांसोबत घडला होता. आमचा मोरया नावाचा एक ग्रुप आहे. आमच्या ग्रुप मध्ये मी, अमोल, मयूर ज्याला आम्ही एरर म्हणतो, सोहम म्हणजे सोम्या आणि यश म्हणजे सोंट्या असे ५ जण आहोत. दर वर्षी आमच्या ग्रुप च्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही कुठे ना कुठे फिरायला जातो. त्या वर्षी आम्ही खूप मजा करायची म्हणून एका फार्महाऊस वर जाण्याचे नक्की केले. ठरल्याप्रमाणे आम्ही एक फार्महाऊस बुक केलं जिथे स्विमिंग पूल ही होत. आम्ही २ दिवस तिथे राहणार होतो. दिवसभर मस्त एंजॉय करता यावे म्हणून पहाटे च सगळी तयारी करून निघालो. प्रवास सुरळीत चालू होता. गाडीत गाणी लाऊन आप आपल्या धुंदीत होतो, मजा मस्करी सुरू होती. जवळपास ६ वाजता आम्ही त्या फार्महाऊस वर पोहोचलो. अमोल आमच्यात सगळ्यात मोठा. तिथे जेवणाचे सगळे आम्हीच बघणार होतो. अमोल पाटील आमच्यात सगळ्यात मोठा म्हणून गेल्या गेल्या फ्रेश होऊन त्याने जेवण करायची तयारी सुरू केली. आणि त्याला मदत म्हणून कोणी भाजी कापून देत होत तर कोणी आणलेले नोज व्हेज साफ करत होत. जेवणाची तयारी झाल्या नंतर सगळे मित्र स्विमिंग पुल मध्ये पोहायला गेले. काही वेळानंतर जेवायला बाहेर आलो आणि मग पुन्हा पोहायला गेलो. दिवसभर खूप मजा मस्ती केली. अगदी मनसोक्त पोहलो. थेट संध्याकाळी च आम्ही बाहेर आलो. दमलो असल्यामुळे थोड्या वेळ अंग टाकले आणि झोप काढली.
रात्री ९ च्या सुमारास उठलो आणि फार्म हाऊस च्या बाहेर जाऊन बसलो. दिवसा तिथे आल्यावर काही वाटले नव्हते पण रात्री तो परिसर गूढ भासू लागला. आता मलाच तसे वाटत होते की इतरांना ही हे मला माहित नाही. दोन मित्रांनी जाऊन कोल्ड ड्रिंक्स आणले आणि आम्ही अश्याच गप्पा करत, जुन्या आठवणी काढत बसलो होतो. बऱ्याच वेळा नंतर आम्ही जेवण केले आणि १२.३० च्या सुमारास उरकून झोपायला गेलो. दिवसभर पोहून दमल्यामुळे मला लगेच झोप लागली. आजचा दिवस सार्थ ठरला असा विचार आला. सगळे अगदी गाढ झोपले होते. मला रात्री अचानक जाग आली. मी वेळ पाहिली तर ३ वाजले होते. वाटले की जाग आली आहे तर लघवी करून यावी. म्हणून मी उठलो आणि जवळच्या बाथरूम मध्ये जाऊ लागलो. तितक्यात बाहेरून कसली तरी हालचाल ऐकू आली. मी सहज खिडकी वरचा पडदा बाजूला केला आणि बाहेर पाहिले. तर सोंट्या, मयंक, एरर आणि सोम्या झोपेच्या धुंदीत स्विमिंग पूल कडे जात होते. मी जरा गोंधळलो पण पटकन भानावर येत फार्म हाउस मधून बाहेर आलो आणि हळु हळू त्यांच्या मागे जाऊ लागलो. ते चार ही जण स्विमिंग पूल जवळ एका रांगेत उभे राहिले. तितक्यात मला लक्षात आले की त्यांच्या हातात काही तरी आहे. मी नीट निरखून पाहिले आणि कळले की चौंघाच्या ही हातात एक चाकू आहे. मी जरा दचकलो. पण त्या नंतर मी जे दृश्य बघितले ते पाहून डोकच सुन्न झाले. त्यांनी एका पाठोपाठ एक आपल्या गळ्यावरून चाकू फिरवला आणि पुल मध्ये उड्या घेतल्या.
मी धावत त्यांच्या दिशेने गेलो पण खूप उशीर झालेला. पुलमध्ये रक्ताचा सडा पसरला होता. मला काही कळणार तितक्यात मला मागून कोणीतरी जोरात धक्का दिला तसे मी त्या पाण्यात पडलो. सगळं अंग रक्ताने माखले. मी लगेच पुल मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागलो पण तितक्यात माझा पाय कोणी गाडी जोरात खेचला तसे मी आत पाण्यात जाऊ लागलो. माझ्या नाका तोंडात ते पाणी, ते रक्त जाऊ लागले. आत कोण होत ते दिसत नव्हत. जमेल तितक्या जोरात हात, पाय हलवू लागलो. तितक्यात मला ओमी धावत येताना दिसला. तो बहुतेक माझ्या मदतीसाठी धावत येत होता. त्याने मला हात दिला आणि पाण्यातून बाहेर यायला मदत करू लागला. मी सुद्धा माझा पाय जोरात झटकला तसे ज्याने कोणी माझा पाय पकडला होता त्याच्या तावडीतून माझी सुटका झाली. मी कसाबसा पुलाच्या बाहेर आलो. नाकातोंडात बरेच पाणी गेले होते. त्याने मला उचलून आत नेले. आत गेल्यावर मी त्याला सगळं प्रकरण सांगितले. पण तो माझ्याकडे आ वासून पाहतच राहिला. मी त्याला विचारले “काय झाले असे का बघतोय..?”. त्यावर तो म्हणाला ” अरे काय बोलतोय तू.. शुद्धीत आहेस का.. ते चार ही जण दुसऱ्या खोलीत झोपलेत.. आणि मी तुला बुडताना पाहिले म्हणून धावत आलो वाचवायला.” त्याचे बोलणे ऐकून मी सुन्न च झालो. त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही म्हणून मी आत पाहायला गेलो तर ते चौघेही तिथेच झोपले होते.
डोक्यात झिणझिण्या येऊ लागल्या होत्या. काय होतंय काही कळत नव्हतं. जे घडले, जे दिसले ते खर होत की मला इतके विचित्र भास होत आहेत की ते अगदी प्रत्यक्षात घडल्यासारखे वाटतेय. मी धावत खिडकी जवळ गेली आणि पुन्हा स्विमिंग पुलकडे पाहिले. समोरचे दृश्य पाहून माझा पायाखालची जमीनच सरकली. तिथे कोणी तरी उभ होत. एक काळपट आकृती जी मला खुणावत होती. मला बोलवत होती पुन्हा.. मी निरखून पाहायचा प्रयत्न केला पण त्या भागात उजेड कमी असल्यामुळे मला स्पष्ट दिसत नव्हते. मी लगेच च कल्पेश ला म्हणालो “आपण आत्ताच्या आत्ता इथून निघतोय, तू बाकीच्यांना उठव..” तो मला बरेच प्रश्न विचारू लागला की अचानक काय झालं, आता रात्रीच कसे निघणार, इतरांना काय सांगू..” पण मी त्याला जास्त काही न बोलता फक्त एकच वाक्य बोललो “सगळं सांगतो नंतर..” त्याने माझ्या डोळ्यांत पाहिले आणि त्याला जे काही समजायचे होते ते तो समजून गेला. माझ्या डोळ्यातली भीती, काळजी त्याने अचूक ओळखली. आम्ही जर इथून निघालो नाही तर आमचे काही खरे नाही हे मला कळले होते. त्याने लगेच गाडी काढली, तोपर्यंत सगळ्यांनी उठून सामान अवरले. पुढच्या ५ मिनिटांत आम्ही त्या फार्म हाऊस मधून बाहेर पडलो. गाडीत बसलो आणि गाडी गेटच्या बाहेर आली. माझी मागे पाहण्याची अजिबात हिम्मत होत नव्हती. पण हळूच रियार व्यू मिरर मध्ये ओझरती नजर टाकली. तर तिचं काळसर आकृती गेट च्या आत उभी राहून आम्हाला पाहत होती.
मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि देवाचे नाव घेऊ लागलो. त्या फार्म हाऊस पासून आम्ही बरेच लांब आलो तसे सगळे मला विचारू लागले की काय झाले, आपण इतक्या तडकाफडकी का निघून आलो. तुझ्या एका सांगण्यावरून सगळे ती जागा सोडून आलोय. मी सगळा प्रकार त्यांना सांगितला. त्या भागातून बाहेर पडताना आम्ही गाडी थांबवून एक दोघांकडे चौकशी करून पाहिली पण त्यांच्याकडून जे कळाले की ते अजूनच भयाण होते. ते म्हणाले की या गावातच काय पण आजूबाजूच्या गावात तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे एकही फार्म हाऊस नाही. आम्ही सगळेच विचारात पडलो की जर इथे एकही फार्म हाऊस नाही तर आम्ही जिथे गेलो होतो, रात्री झोपलो होतो ते काय होतं.??