अनुभव – शुभम सोनार
ही घटना माझ्या आजोबान बरोबर घडली होती. बऱ्याच वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे हा. माझे आजोबा स्वामी समर्थचे खूप मोठे भक्त होते. सदा त्यांच्या मुखी “जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ”, असा जप सुरू राहत असे. ह्या जपामुळे त्यांच्या आजू बाजू चे वातावरण सदैव सकारात्मकतेने भरलेले असायचे. आजही हा अनुभव सांगताना त्याचा अंगावर शहारे येतात. तो दिवस होता 17 मार्च चा, दुपारचे 12 वाजून 10 मिनटं झाले होते. अचानक घराचं दार वाजलं. दार उघडून पहिला तर जवळच्या किराणा दुकानावरचा एक मुलगा होता. तो म्हणाला की तुमच्या भावाचा फोन आला आहे लवकर चला. आजोबा घाई गडबडीत निघाले. दुकानावर पोचल्यावर त्यानी चालू फोन उचलून कामाला लावला. समोरून आवाज आला “दादा, सुनंदा ला बर नाही.. तू लवकर येऊन जा..” सुनंदा ही माझ्या आजोबांच्या भावाची बायको. त्यांचा तो भाऊ २ गाव सोडून राहायचा. ते वेळ न दवडता लगेच भावाकडे जायला निघाले आणि ३ च्या सुमारास पोहोचले. तिथली सगळी कामे आटोपली, जेवण उरकले आणि ते परतायला निघाले. बरीच रात्र झाली होती. त्यांच्या भावाने सांगितले की आता रात्रीच्या वेळेला का निघालास, उद्या पहाटे जा हवे तर.. पण आजोबांनी काहीतरी महत्त्वाचं कामाचं कारण दिलं आणि ते रात्री साडे दहाच्या सुमारास आपल्या घरी यायला निघाले.
त्यांनी गावाची वेस सोडली आणि एका पायवाटेने पुढे चालत जाऊ लागले. मुखात स्वामी नामाचा जप सुरू होताच. गावाच्या वेशी बाहेर सदाचे शेत होते आणि शेती पासून जवळपास ४ किलोमिटर अंतरावर त्यांचं घर. एव्हाना निघून काही तास उलटले होते. रात्रीचा एक किंवा दीड वाजून गेला असेल. त्या शेतातून जाताना त्यांना कोल्हेकुई ऐकू आली. अंगावर काटा येईल असा आवाज होता तो. माळरान खूप मोठं होत. गर्द झुडुपातून रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. त्यांनी अर्धे माळरान ही पार केले नसेल तितक्यात एका बाईच्या आवाजातली किंचाळी जोरात कानावर पडली. इतकी कर्णकर्कश किंचाळी त्या संपूर्ण माळरानात घुमली आणि त्यांना क्षणासाठी असे वाटले की आत्मा शरीर सोडून बाहेर येईल. जसे त्या किंचाळी चा आवाज आला आणि थांबला. तसे त्या आवाजासोबत सगळं काही शांत झालं. दूर होणारी कोल्हेकुई, रातकिड्यांची किरकिर.. सगळे काही. त्या माळरानावर एक भयाण स्मशान शांतता पसरली. आजोबा घाबरून जागच्या जागीच स्तब्ध झाले. त्यांच्या तोंडातून एक शब्द ही बाहेर पडत नव्हता. तितक्यात त्यांचे लक्ष समोर गेले आणि होता नव्हता तो त्राण ही संपला. समोरच्या अंधारातून एक स्त्री सारखी भासणारी आकृती त्यांच्याकडे पळत येताना दिसली. तिचा पाळायचा वेग अतिसामान्य होता, मोकळे केस, हिरवी साडी जी जागोजागी फाटली होती, हातात चुडा भरला होता. डोक्यावर कुंकू आणि सभोवताली एक वेगळेच प्रकाशाचे वलय. लांबून तरी ती सव्वाशीण वाटत होती.
ती अतिशय वेगात त्यांच्या दिशेने आली आणि काही कळायच्या आत अंगातून आर पार निघून गेली. हा सगळा प्रकार अवघ्या काही क्षणात घडला की त्यांना समजायला ही वेळ मिळाला नाही. आजोबांनी झापझप पावले टाकायला सुरुवात केली आणि त्या भागातून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागले. पण कधी रडायचा तर कधी ओरडायचा आवाज यायचा. ते माळरान जणू संपतच नव्हते. तितक्यात ती त्यांच्या समोर येऊन उभी ठाकली. आजोबा गवयावा करू लागले, रडू लागले आणि सांगू लागले “सोड मला.. ” त्या बाई ने नकारार्थी मान हलवली. आजोबा डोळे मिटून स्वामींचे नाव घेऊ लागले. जसे त्यांनी डोळे उघडले त्यांना दूरवर एका आदुंबराच्या झाडाखाली एक दिवा दिसला. तो दिवा पाहताच त्यांनी पुन्हा जोरात स्वामीच्या नावाचा जप सुरू केला. तसे ती बाई जोर जोरात ओरडू लागली. तसे आजोबांनी तारक मंत्र सुरू केला. त्या माळरानावर जोरात वारा सुटला, त्या औदुंबराच्या पारावर एक तेजोमय आकृती प्रकट होऊ लागली, परिसरात एक कणखर, जड, पण कानाला आणि मनाला शांती देणारा एक आवाज उत्तरला “उगाची भितोसी भय हे पळु दे, वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे। जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा.. अशक्य ही शक्य करतील स्वामी..”
त्या झाड खाली एक स्पष्ट आकृती दिसत होती, स्वामींची। साक्षात परब्रम्ह जगतपिता आले होते, संपूर्ण औदुंबर आणि शिवार प्रकाशमय झालं होतं. एक आदेश आला “सोड त्याला नाहीतर गाठ माझ्याशी आहॆ..” आवाजात हुकूम होता पण त्यांच्या कानात कोणीतरी अमृत टाकल्या सारखा असा तो आवाज.. जो निशंक आणि निर्भय करत होता.. आजोबांनी त्या जगतपिता समोर हात जोडले आणि बोलले “स्वामी वाचवा, स्वामी वाचवा.. प्रकाश इतका प्रखर होत वाढत गेला की त्या बाईच्या आ सहन झाले नाही आणि ती त्यात विरून गेली. एक दिलासादायक आवाज परिसरात घुमू लागला, “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”. आता झाड खाली कोणीही नव्हतं फक्त दिवा शांतपणे तेवत होता. आजोबा त्या झाडाजवळ गेले आणि त्यांनी हात जोडले. स्वामींचे आभार मानले व पारावर जाऊन बसले. अचानक त्याना कानाजवळ एक आवाज आला, बाळा थकला असशील ना.. ये डोकं ठेव मांडीवर आणि काही वेळ आराम कर.. अचानक त्यांचं डोकं कोणीतरी हळुवार पारावर ठेवलं आणि त्यानं झोप लागली. त्याना स्वप्नात दिसल की ते साक्षात जगतपिताच्या मांडीवर डोकं ठवून झोपले आहेत आणि स्वामींचा हात त्यांच्या डोक्यावरून फिरत आहे. जाग आली तर सकाळ झाली होती, ते त्याच पारावर झोपले होते.. बाजूला पहिलं तर स्वामींचा एक सुंदर फोटो ठेवला होता. बाबानी तो फोटो हातात घेतला, फोटो ला नास्कर केला. आणि गावाकडं चांगल्या आठवणी घेवून आणि घडलेला वाईट प्रसंग मागे सोडून पुढचा प्रवास सुरू केला.