अनुभव – पूजा पांडे राऊत

१ मे २०१६ ला माझ लग्न झालं. आदल्या दिवशी हळद होती. भरपूर नातेवाईक, पाहुणे आले होते. त्यामुळे घर अगदी भरले होते. हळद लाऊन झाल्यावर मी माझ्या मैत्रिणींसोबत घराच्या टेरेस वर गेले. आमच्या गप्पा, मजा मस्करी सुरू होती आणि त्यात रात्रीचे २ कधी वाजले कळलेच नाही. माझी आई वर आली आणि मला चांगलीच ओरडली. हळदीचे अंग आहे, इतक्या वेळा सांगून ही ऐकत नाहीस, आत्ताच्या आत्ता खाली झोपायला चल. आईचा ओरडा ऐकुन मला जरा रागच आला. सगळ्या मित्र मैत्रीणीना सोडून खाली जायची इच्छा नव्हती पण नाईलाजाने जावे लागले. 

दुसऱ्या दिवशी लग्न सोहळा पार पडला. माझे राव दुसऱ्या गावचे असल्याने आम्ही पहाटेच निघालो. दुसऱ्या दिवशी तिथे लगेच रिसेप्शन होते. आणि रिसेप्शन आटोपल्यावर आम्हाला पुन्हा लगेच निघून माझ्या घरी यायचे होते. काय तर म्हणे तशी रित असते. त्यात ४ नंतर अमावस्या लागणार होती म्हणून लवकर निघायचं होत. दुसऱ्या दिवशी रिसेप्शन आटोपले तसे माझ्या घरचे निरोप घेऊन घरी निघाले. आम्हाला त्यांच्या सोबत जाता आले नाही कारण माझ्या दिराची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे आम्हाला निघायला संध्याकाळ झाली. 

झोप झाली नव्हती म्हणून आम्ही ठरवले की आम्ही जाणार होतो त्या मार्गाने जाताना मध्ये एक जागृत देवस्थान लागते, तिथे दर्शन घेऊ आणि त्याच भागात एखादी रूम बघून एक रात्र काढू. म्हणजे झोप तरी नीट होईल आणि मग दुसऱ्या दिवशी पहाटे पुढच्या प्रवासाला लागू. आमच्या सोबत माझा लहान भाऊ आणि लहान बहीण सुद्धा होते. संध्याकाळी निघाल्यामुळे काही तासात आम्ही त्या देवस्थानाच्या परिसरात पोहोचलो. मंदिरात जाता नाही आले कारण खूप उशीर झाला होता पण आम्ही आजूबाजूच्या परिसरात फिरलो. तो पर्यंत माझ्या रावांनी एक आलिशान हॉटेल बुक केलं. 

त्या वेळी त्या हॉटेल मध्ये आम्हीच होतो. २ रूम बुक केल्या होत्या. आमच्या रूम पासून एक रूम सोडून दुसऱ्या रूम माझे भाऊ बहीण होते. झोपण्याआधी मी फ्रेश व्हायला म्हणून बाथरूम मध्ये गेले. पण मला अतिशय विचित्र वाटू लागले. सांगता येणार नाही नक्की कसे पण खूप अस्वस्थ वाटू लागले. मला जाणवले की हे बाथरूम बाहेर येऊन माझी मस्करी करत आहेत म्हणून मी मी जरा चिडून च म्हंटले शांत बस जरा मस्करीचा मुड नाहीये, आधीच खूप थकलीये. तरीही त्यांची मस्करी चालूच होती. म्हणून मी रागात दरवाजा उघडून बाहेर आले आणि बघतेय तर काय ते कधीच गाढ झोपून गेले होते. मला वाटले झोपायचे नाटक करत आहेत म्हणून मी त्यांना उठवले तर त्यांचे डोळे झोपेमुळे लाल झाले होते. मी त्यांना सॉरी म्हणत पुन्हा झोपायला सांगितले. 

मी बाजूला झोपले आणि मोबाईल वाजला. बहिणीचा फोन आला होता. ती मला म्हणाली “ताई तू एक गोष्ट नोटीस केली का, हे इतके मोठे हॉटेल आहे आणि आपण च फक्त या हॉटेल मध्ये आहोत”. तितक्यात आमच्या दोघांच्या तोंडून निघाले “हॉटेल कमी आणि भूत बंगलाच जास्त वाटतोय हा”. मी काही वेळा पूर्वी घडलेला विचित्र प्रकार सांगितला. माझे राव जागे होऊन आमचे बोलणे ऐकत म्हणाले “असे काही नाहीये, तुमचे डोके नका लावू झोप आता”. मी ही बहिणीला म्हणाले की “जास्त विचार करू नकोस, उद्या पहाटे लवकर निघायचे आहे आपल्याला.. झोप आता”. मी फोन ठेऊन दिला आणि डोळे मिटले. काही क्षणातच मला झोप लागली. 

साधारण रात्री १.३० च्या सुमारास मला कसल्याश्या आवाजाने जाग आली. बाल्कनी च्या दरवाज्याच्या बाहेरून आवाज येत होता. कोणी तर आत येण्यासाठी विचारात आहे असं वाटल. मी घाबरतच उठले आणि दरवाज्याकडे एकटक पाहू लागले. यांना उठवायची इच्छा होत होती पण विचार केला की त्यांची उगाच झोपमोड होईल म्हणून मी त्यांना उठवले नाही. शेवटी मन घट्ट करून मी पुढे जाऊ लागले आणि बाल्कनी च्या बाहेरून दरवाज्यावर जोरात धाप पडली. मी घाबरून मागे धावले आणि त्यांना उठवू लागले. ते लगेच उठले आणि मला विचारू लागले की नक्की काय झाले तितक्यात पुन्हा दारावर जोरात २-३ धापा पडल्या. आता मात्र आम्ही दोघेही घाबरलो. 

मी त्यांना म्हणाले की हे कोणी तरी चोर वैगरे असतील. मनात नको ते विचार येऊ लागले. नवीन जोडपं बघून लुटायला वैगरे आले असतील का?. आणि यात हॉटेल चे लोक पण सहभागी असतील तर ?. पण मला बाजूच्या रूम मध्ये असलेल्या माझ्या भावा बहिणीची खूप काळजी वाटू लागली. यांनी जाऊन त्यांचा दरवाजा वाजवला तर त्यांना वाटेल को आम्ही आहोत, ते दरवाजा उघडतील आणि.. नको असे काही व्हायला नको. मी पटकन मोबाईल काढला आणि त्यांना फोन करू लागले. पण अश्या वेळी कधी फोन लागेल तर नशीब. त्या दोघांचा ही फोन आऊट ऑफ कव्हरेज एरिया. हॉटेल रिसेप्शन चा नंबर ही आठवत नव्हता. पोलिसांना फोन लावला तर सांगणार काय, मला तर हॉटेल च नावच आठवत नव्हतं.. भीती काय असते हे मला त्या रात्री जाणवले?. काहीच सुचत नव्हत. 

काही क्षण उलटले असतील आणि अचानक बाथरूम चा दरवाजा ही वाजू लागला. आता मात्र आमच्यातला धीर संपत चालला होता. कारण मला कळून चुकले होते की हा प्रकार जितका दिसतोय तितका साधा नाहीये. हे चोर वैगरे नाही हा काही भलताच प्रकार आहे. अनोळखी जागा, त्यात भर रात्री चारही बाजूंनी दारावर पडणाऱ्या धापा कोणाच्याही मनात भीती निर्माण करण्यासाठी पुरेश्या होत्या. रावांनी हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. मला तर वाटू लागले की की हा आमचा शेवटचा दिवस बहुतेक. मी देवाचा धावा करू लागले. 

माझे भावा बहिणीला फोन लावणे सुरुच होते. त्यांना याबाबत सावध करायचे होते. आणि तितक्यात बहिणीचा फोन लागला. तिने फोन उचलला तसे मी तिला घाबरतच सांगू लागले की कोणीही दरवाजा वाजवला तरी अजिबात उघडू नकोस. तितक्यात आमच्या रूम च्या दरवाज्यावर पुन्हा धापा ऐकू आल्या आणि आवाज आला “दार उघडं ताई मी आहे”. मी धावत जाऊन दरवाजा उघडला तर बाहेर माझा भाऊ आणि बहीण उभे होते. मी त्यांना खूप ओरडले की तुम्हाला काय गरज होती तुमच्या रूम च्या बाहेर यायची. काही झाले असते तुम्हाला तर. इतके म्हणून मी त्यांना मिठी मारली आणि मला रडू कोसळले. 

मी घडत असलेला प्रकार सांगू लागले आणि म्हणाले की हॉटेल रिसेप्शन ला ही फोन लागत नाहीये. तितक्यात माझा भाऊ धावत खाली रिसेप्शन जवळ गेला आणि तिथल्या दोघांना बोलवून आणले. त्याने इतके धाडस आणि समंजसपणा दाखवून मला आश्चर्यचकित केले होते. ते जसे आमच्या रूम जवळ आले तसे आजूबाजूने येणारे सगळे आवाज एकाएकी अचानक थांबले. त्यातला एक जण काही विचारणार तेवढ्यात मी त्यांच्यावर चिडतच म्हणाले “काय होतंय हे सगळे, काय प्रकार आहे हा?.. आम्हाला आमचे सगळे पैसे परत करा. आम्हाला नाही थांबायचे इथे”. त्यांनी विचारले “अहो मॅडम काय झाले ते तरी सांगा”. तसे मी त्यांना सगळे सांगितले पण त्यावर ते म्हणाले “मॅडम सोसाट्या चा वारा सुटलाय म्हणून तुम्हाला तसे वाटतं असेल. 

तितक्यात माझी बहीण म्हणाली की आमच्या रूम मध्ये असे काही वाटत नाहीये तुम्ही आमच्या रूम मध्ये झोपायला चला. तसे ही ३-४ तास झोप मिळेल. माझी अजिबात इच्छा नव्हती पण नाईलाज होता म्हणून मी निमुटपणे त्यांच्या रुममध्ये जाऊन झोपले. जाताना आम्ही रिसेप्शन चा दुसरा नंबर पुन्हा घेतला. आम्ही झोपल्यावर काही मिनिट झाली असतील आणि पुन्हा तसाच प्रकार घडायला सुरुवात झाली. रूम चा दरवाजा वाजू लागला. मी लगेच रिसेप्शन ला फोन करून त्या माणसाला वर बोलावून घेतले आणि चिडून पुन्हा जाब विचारू लागले “काय प्रकार चालू आहे इथे.. इथे नक्की काही तरी आहे आणि तुम्ही ते आमच्यापासून लपवत आहात.. तुम्ही आल्यावर लगेच सगळे शांत कसे होते.. मला कारण जाणून घ्यायचे आहे.. तुमच्याकडे काही उत्तर नसेल तर तुम्ही इथे आमच्या सोबत च झोपा”. 

तो विनंती करू लागला की मॅडम असे मला इथे झोपता येणार नाही. मला हॉटेल मालकाची परवानगी घ्यावी लागले. मी म्हंटले “आत्ताच्या आत्ता त्यांना फोन करा आणि त्यांची परवानगी घेऊन जोपर्यंत इथले सगळे शांत होत नाही तोपर्यंत इथेच थां बा.”. त्यांनी हॉटेल मालकाला फोन केला. सगळा घडलेला प्रकार सांगितल्यावर त्याला पटले की आम्ही खूप घाबरलो आहोत म्हणून त्याने परवानगी दिली. आम्ही दरवाजा लावला आणि तो माणूस खाली अंथरूण करून झोपला. १५ मिनिट झाली आणि पुन्हा दार हादरून लागले. या वेळेस मात्र दार बाहेरून अतिशय ताकदीने ढकलले जात होते. जसे कोणी तरी अतोनात प्रयत्न करून ते तोडून आत येण्याचा प्रयत्न करतेय. आता मात्र त्या माणसाने ही हा सगळा प्रकार पाहिला आणि तो ही बुचकळ्यात पडला.

ती रात्र आम्ही जागून च काढली. पहाटे उजाडल्यावर आम्ही थेट खाली गेलो. तिथे हॉटेल चे मालक आले होते. त्यांनी आम्हाला चहा नाश्ता वैगरे दिला आणि म्हणाले “तुम्ही घाबरले आहात.. मला सगळे सांगितले माझ्या माणसाने.. आम्ही लग्न झालेल्या खूप नवीन जोडप्यांना पॅकेज देतो पण असे कधीच झाले नाही.. बेटा जाताना इथे जवळ च एक देवस्थान आहे तिथे दर्शन करून मगच जा.. तिथे माझा मित्र आहे, त्याला सांगून मी तुम्हाला VIP दर्शन करून देतो.”. मला आधीच राग अनावर होत होता पण त्यांच्याकडे बघून असे वाटले की त्यांची यात काही चूक नाही. आम्ही जास्त संवाद न साधता तिथून बाहेर पडलो. सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या देवळात वळलो आणि १० मिनिटात दर्शन घेऊन बाहेर पडलो.

बाहेर येऊन गाडीत बसलो तर माझ्या बहिणीचे गाडीच्या काचेवर लक्ष गेले. मधोमध भेग पडून काच अगदी तुटायला आली होती. तितक्यात हे म्हणाले की इथली लहान मूल खेळत असताना बॉल वैगरे लागला असेल. जाऊदे होणार च होता खर्च तो टाळता कसा येईल. माझ्या मनात शंका येऊन गेली की आमच्या सोबतच हा योगायोग का घडतोय. रावांनी जास्त विचार न करता तिथून गाडी काढली. तिथून पुढे एक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आणि ऑईल चेक करायला म्हणून गाडी वळवली. माझा भाऊ आणि माझे राव खाली उतरले आणि पाहतात तर काय मागचे दोन्ही टायर पंक्चर झाले होते. आता माझी शंका विरून खात्री झाली होती की आमच्या मागे कोणीतरी आहे. यातून सहजा सहजी सुटका होईल असे वाटत नाही. 

बाहेर येऊन गाडीत बसलो तर माझ्या बहिणीचे गाडीच्या काचेवर लक्ष गेले. मधोमध भेग पडून काच अगदी तुटायला आली होती. तितक्यात हे म्हणाले की इथली लहान मूल खेळत असताना बॉल वैगरे लागला असेल. जाऊदे होणार च होता खर्च तो टाळता कसा येईल. माझ्या मनात शंका येऊन गेली की आमच्या सोबतच हा योगायोग का घडतोय. रावांनी जास्त विचार न करता तिथून गाडी काढली. तिथून पुढे एक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आणि ऑईल चेक करायला म्हणून गाडी वळवली. माझा भाऊ आणि माझे राव खाली उतरले आणि पाहतात तर काय मागचे दोन्ही टायर पंक्चर झाले होते. आता माझी शंका विरून खात्री झाली होती की आमच्या मागे कोणीतरी आहे. यातून सहजा सहजी सुटका होईल असे वाटत नाही. 

सकाळचे ८.३०-९ झाले होते आणि संध्याकाळी ४ वाजता अमावस्या लागणार होती. काय करायचे काही कळत नव्हते. इतक्या सकाळी कोण गॅरेज वाला ही मिळणार नव्हता. तितक्यात यांना आठवले की यांचा एक मित्र याच भागात राहतो. त्यांनी लागलीच त्याला फोन करून कळवले. त्याने सांगितल्या प्रमाणे आम्ही गाडी हळू हळू चालवत गावात त्याच्या घरी गेलो. मित्राला सगळा प्रकार सांगितला. त्याने तर सरळ हॉटेल च्याच मालकाला फोन लावून शिवीगाळ करायला सुरुवात केली. मला मात्र त्यांचीच दया आली. म्हणजे तो माणूस खरं वाटला. म्हणून मी त्यांना फोन केला तसे ते मला सांगू लागले “बेटा पूजा.. हे जे काही घडले ते तू तुझ्या सोबत च आणले होते आणि आता ही तुझ्या सोबत च आहे. तुम्ही सांगितले त्या प्रमाणे तुझी हळद नुकताच झाली.. त्या नंतर तू कुठे गेली होतीस का ?..” तसे मी म्हणाले की हो आधी टेरेस वर होते आणि मग निघाल्यावर पेट्रोल पंप जवळ एकदा उतरले होते. 

तसे ते पुढे म्हणाले “तुला एक सांगतो की जमत असेल तर तू आणि तुझी बहिण तुम्ही दोघी ट्रेन ने जा. वाहनाने प्रवास करू नका.. ते जे काही आहे ते तुझ्या सोबत आहे आणि ते तुम्हाला इतक्या सहज सहजी जाऊ देणार नाही”. पण हे सगळे माझ्या रावांना अजिबात पटले नाही म्हणून त्यांनी साफ नकार दिला. ते म्हणाले की काहीही होऊ दे पण आपण सोबतच जायचे. तितक्यात माझ्या रावांच्या मित्राने त्याच्या आई ला फोन केला. आणि त्याने मला बोलायला सांगितले. बहुतेक तिची आई हे सगळे जाणून होती. ती मला म्हणाली “घाबरु नकोस आणि मी काय सांगते ते नीट ऐक.” तितक्यात मी त्यांना म्हणाले “काकू मला फक्त आवाज आला पण काही दिसले नाही हो.. पण नक्की काय आहे हे.. कोण आहे माझ्या सोबत.. कोण त्रास देतय मला”. ती मला शांत करतच म्हणाली “बर झाल तुला काही दिसलं नाही.. ते जे आहे ना ते वाट बघतय अमावस्या सुरू होण्याची. त्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरी जावेच लागेल नाही तर..”

नाही तर काय काकू.. मी त्यांना विचारले. त्यावर त्या म्हणाल्या “काही नाही.. तुम्हाला मी एका कापडात काही तरी बांधून देतेय. गावातल्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि मगच पुढच्या मार्गाला लागा. आणि एकदा गाडी चालू झाली की काहीही झाले तरी रस्त्यात कुठे ही उतरायचे नाही.. थेट घरी जायचे”. आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे दर्शन घेऊन थेट घरी गेलो. प्रवासात हनुमान चालीसा ऐकत च होतो. ४-५ तासात आम्ही सुखरुप घरी येऊन पोहोचलो. असं म्हणतात की नव्या जोडप्याने लग्न झाल्यानंतर अस बाहेर पडायचे नसते. हे सगळे मी ऐकुन होते पण त्याचे खरे कारण मला या अनुभवामुळे कळले. आजही तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. 

Leave a Reply