अनुभव – अतुल मर्दे

आमचा गड प्रेमी डहाणू हा ग्रुप असून प्रत्येक महिन्यात शनिवार रविवारी एखाद्या जवळच्या गड किल्ल्यावर ट्रेकिंग साठी जात असतो. त्या वेळी आम्ही निवडले होते ते म्हणजे महाराष्ट्राचे एवरेस्ट म्हणून ओळखले जाणारे कळसुबाई शिखर. इंटरनेट वर गडा संबंधी सगळी माहिती काढून आम्ही २१ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ६ वाजता डहाणू हून निघालो. साधारण ५ तासांचा प्रवास करत डहाणू – वाडा – कसारा घाटातून – इगतपुरी मार्गे आम्ही बारी या गावात येऊन पोहोचलो. तेथील एका मंदिराजवळ गाड्या पार्क केल्या. एव्हाना दुपार होत आली होती. 

गडाच्या पायथ्याशी कळसुबाई चे एक छोटेसे मंदिर आहे आणि एक मंदिर शिखरावर आहे. मंदिराजवळच आम्ही दुपारचे जेवण उरकले आणि तास भर आराम करून साधारण २.३० च्या सुमारास गड चढायला सुरुवात केली. सप्टेंबर महिना असल्यामुळे वातावरण चांगले च आल्हाद दायक वाटत होते. आम्ही रात्री गडावर मुक्काम करत असल्याने सर्वजण रमतगमत संध्याकाळी ५.३० ला शिखरावर येऊन पोहोचलो. 

तिथे मंदिरात दर्शन घेतले. परंतु मंदिरात पोहोचल्यावर मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळे आमची पंचाईत झाली. आमच्याकडे एक मोठी ताडपत्री होती जी आम्ही रात्री राहायचे असल्याने सोबत आणली होती. आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला जवळ जवळ उभे राहून ती ताडपत्री डोक्यावर धरली. क्षणभर असे वाटले की ती ताडपत्री नसून कळसुबाई देवीने आपल्या मायेची शाल आमच्यावर पांघरली आहे. देवीने आम्हाला तिच्या छत्र छायेखाली सामावून घेऊन त्या वादळी पावसापासून रक्षण केले आहे. जवळपास अर्धा तास आम्ही तसेच उभे होतो.

संध्याकाळ चे सहा वाजून गेले आणि पाऊस ही थांबला. सर्वत्र गडावर अंधार पडायला सुरुवात झाली होती. मुसळधार पाऊस पडून गेल्यामुळे बरेच धुके ही दाटले होते. अगदी ३-४ फुटांपर्यंत चेही नीट दिसत नव्हते. आमची चांगलीच तारांबळ उडाली. मोबाईल टॉर्च च्या प्रकाशात आम्ही राहण्यायोग्य जागा शोधत होतो. तसे पाहिल्यास गडावर झोपडी समान ४-५ दुकाने होती. परंतु ते दुकानदार आपल्या खाद्य पदार्थांची विक्री करून रात्री पायथ्याशी गावात परत जात असत. 

मंदिरापासून खाली काही अंतरावर आम्हाला असेच पडके दुकान दिसले. आता संध्याकाळ चे ७ वाजून गेले होते आणि मिट्ट अंधार पसरला होता म्हणून आम्ही तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. जेमतेम १० बाय १५ ची जागा असावी. आम्ही सगळे सामान आत ठेवले आणि काही वेळ आराम केला. एव्हाना ८ वाजत आले होते. जवळच पिण्यायोग्य पाण्याचा झरा होता. तिथले थंडगार पाणी पिऊन मन अगदी तृप्त झाले. 

आम्ही जेवण बनवायला सुरुवात केली. हवी तशी चूल पेटवण्यासाठी लाकडे आजूबाजूला असली तरी नुकताच पडून गेलेल्या पावसामुळे सर्व ओली झाली होती. रामदास भाऊ, विकास आणि रवी त्या परिस्थितीतही चूल पेटवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते. पण काही केल्या चूल पेटेना. पण आमच्यातल्या नीलेशभाऊ ने तर मी चूल पेटव नारच अशी भिष्मप्रतिज्ञाच घेतली. परंतु काही केल्या अग्नी देवता आमच्यावर प्रसन्न होईना.

शेवटी आम्ही कंटाळून बॅगेत असलेले बिस्कीट चे पुडे, वेफर्स ची पाकीट जे काही मिळेल ते खाऊ लागलो. काहींनी तर जेवणासाठी आणेलेले बटाटे, टॉमेटो खायला सुरुवात केली. पण काही वेळात जणू दैवी चमत्कार च झाला, बघता बघता चुलीतली लाकडे पेटू लागली. आम्हाला सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. पण क्षणभर ही विचार न करता चुलीवर भांडे ठेवले त्यात तांदूळ, डाळ, कांदे, टॉमेटो, मटार, मीठ मसाला वैगरे सगळे टाकले आणि खिचडी शिजत ठेवली. 

काही वेळातच खिचडी तयार झाली आणि आम्ही त्यावर ताव मारत सगळी संपवली. फक्त नीलेशभाऊ ने पूर्ण ताट न संपवता थोडी खिचडी तशीच टाकली होती. आम्ही बरेच सुस्तावलो होतो त्यामुळे गप्पा गोष्टी करतच झोपायच्या तयारीला ला लागलो. एव्हाना १० वाजायला आले होते. सगळीकडे मिट्ट अंधार पसरला होता. वाहणाऱ्या वाऱ्या व्यतिरिक्त झुड पांची सळसळ तेवढी ऐकू येत होती. त्याच आवाजात झोपडी बाहेर कसलीशी चाहूल जाणवली. अतिशय जीर्ण झालेल्या कपड्यातील एक जख्खड म्हातारी झोपडीच्या दराशेजारी येऊन उभी राहिली आणि म्हणाली “बाळांनो मला खूप भूक लागली आहे, मला काही खायला देता का? कारण मला इथून काही तरी शिजल्याचा वास यात आहे”. 

इतक्या रात्री या अश्या उंच शिखरावर ही म्हातारी बाई कशी आली याचा विचार मनात डोकावून गेला आणि काळजात धस्स झालं. दिसतं तस नसत अस म्हणतात. कोण असेल ही ? भूत, पिशाच्च, एखादा अतृप्त आत्मा की साक्षात कळसुबाई देवी आपली परीक्षा बघायला तर आली नसेल ना? 

तितक्यात रामदास भाऊ म्हणाले “अरे आपण गडावर जेवण शिजल्यावर थोडेसे अन्न बाजूला काढून ठेवतो, म्हणजे तिथले जीव, जंतू, प्राणी आणि अदृश्य शक्ती यांच्यासाठी. यावेळी नेमके आपण ते काढायला विसरलो. आणि कदाचित म्हणून च ही म्हातारी इथे आली असावी.” रामदास भाऊंचे बोलणे ऐकताच सगळ्यांची टरकली. ती बाई काही जायचे नाव काढत नव्हती. आणि आमची कोणाची झोपडी बाहेर जायची हिम्मत होत नव्हती. काहींनी तर घाबरून डोक्यावर पांघरूण घेऊन राम नामाचा जप च सुरू केला होता. 

तितक्यात आमच्यातला सर्वात धाडसी रवी उठला आणि निलेशभाऊ च्या ताटातली उरलेली खिचडी एका दुसऱ्या ताटात घेऊन दाराजवळ गेला. तिच्याकडे न पाहताच त्याने ताट पुढे केले. तसे तिने पटकन ताट हिसकावून घेतले आणि दारा शेजारी बसून खाऊ लागली. रवी पुन्हा आमच्यात येऊन झोपला तसे मी म्हणालो “रवी तिचे पाय पाहिलेस का? उलटे होते की सरळ?”. माझे बोलणे मस्करित घ्यायचे सोडून तो उठला आणि सरळ झोपडी बाहेर त्या म्हातारीला बघायला गेला. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण माझे न ऐकता तो सरळ चालत झोपडी बाहेर गेला. आम्ही दाराकडे टक लाऊन त्याच्या परत येण्याची वाट पाहत होतो पण ५ मिनिट झाले तरी तो परतला नव्हता.

आता मात्र आम्ही भयंकर घाबरलो. मी म्हणालो “रविला जाऊन खूप वेळ झाला, आपण त्याला शोधायला जायला हवे”. तितक्यात रवी आत आला आणि आम्ही काही विचारण्याच्या आत सरळ झोपून गेला. मी त्याला विचारले काय रे काय झाले, कुठे होतास इतका वेळ. त्यावर तो म्हणाला की “ती म्हातारी, ती गायब झाली, ताट रिकामे आहे. ताट देऊन मिनिट पण झाला नव्हता, इतक्यात तिने ताट संपवले. गेले ५ मिनिट फिरून मी तिला आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे शोधले पण ती काही शेवट पर्यंत दिसली नाही, मी पुन्हा बाहेर जाणार नाही, झोपुया आपण”. 

लाकडे ओली असताना ही अचानक चूल पेटणे, त्या म्हातारीचे जेवण मागायला येणे याला काही तरी अर्थ नक्कीच असावा. याच विचारात आम्ही ती गूढ रात्र कशी बशी काढली. सकाळी पुन्हा आम्ही कळसुबाई देवीचे दर्शन घेतले. कदाचित कळसुबाई च आमची परीक्षा घ्यायला येऊन गेली असे प्रकर्षाने जाणवले. आम्ही देवीकडे मनो भावाने प्रार्थना केली आणि काही चूक झाली असेल तर माफ कर अशी विनवणी केली.

पहाटेच्या त्या प्रसन्न वातावरणात संपूर्ण गडावरील निसर्गरम्य परिसर पाहून सगळ्या गोष्टींचा विसर पडला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. 

Leave a Reply