अनुभव – महेश फडके

अनुभव साधारण २५-२६ वर्षांपूर्वी माझ्या आई वडिलांना आला होता. पण त्या अनुभवाचे साक्षीदार माझ्या घरचे सगळे जण होते. तेव्हा त्यांचे नुकताच लग्न झाले होते. एके दिवशी ते बाहेर फिरायला गेले होते. त्या काळी गावात कोणाकडे दुचाकी नव्हती. त्यामुळे ते सायकल घेऊन गेले होते. कारण रात्री पुन्हा गावी यायला वाहन मिळायचे नाही. संपूर्ण दिवस फिरून झाल्यावर त्यांनी सिनेमा पाहायला जायचे ठरवले. तिकीट काढून ते रात्री ९ च्या शो ला सिनेमा पाहायला बसलो. ते सिनेमागृह आमच्या गावापासून ३ ते ४ किलोमिटर अंतरावर होते. रिक्षा असायच्या पण ९ च्या शेवटच्या शो नंतर निघाल्यावर इतक्या रात्री रिक्षा मिळणे अशक्य होते. आजीने त्यांना बजावून सांगितले होते की लवकर या पण आई वडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. सिनेमा साडे अकरा च्या दरम्यान संपला आणि ते बाहेर पडले. सिनेमागृह मुख्य जिल्ह्याच्या जवळ होते आणि तिथून गाव बरेच लांब. जाताना वाटेत एक किल्ला लागायचा. त्या किल्ल्याच्या बाहेरच्या भागात त्या काळी खूप लोक उतारा टाकत असत. त्यामुळे तो रस्ता रात्री येण्याजाण्याच्या लायकीचा नव्हता असे त्यांना आधी पासून च मोठ्या लोकांनी सांगितले होते.. पण वडिलांना तो रोड नेहमीचाच असल्यामुळे रात्री घरी येताना काही वाटले नाही. ते पावसाचे दिवस होते. जसे ते त्या रस्त्याला लागले तसे अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आई म्हणाली की आपण कुठे तरी आडोशाला थांबुया नाहीतर या पावसात काही मिनिटात पूर्ण भिजून जाऊ.

तिचे ऐकून वडिलांनी त्या रस्त्यावरच्या एका झाडाजवळ सायकल थांबवली. ते दोघेही त्या झाडाच्या मोठ्या बुंध्या खाली येऊन थांबले. आभाळ दाटून आले होते असे वाटत होते. त्यामुळे हा पाऊस किती वेळ असाच राहील याचा काही नेम नव्हता. अतिशय थंडगार वारा सुटला होता आणि त्यात जोरात पाऊस. अर्धवट भिजेले ले ते दोघेही त्या झाडाखाली कुडकुडत उभे होते. त्यांनी बराच वेळ पाऊस जाण्याची वाट पाहिली. पाऊस कधी थांबतो याकडे माझ्या वडिलांचे लक्ष होते. त्या रस्त्यावर अतिशय गडद अंधार होता, रस्त्याकडेला स्ट्रीट लाईट होता पण तो खूपच लांब होता ज्याचा प्रकाश त्यांच्या पर्यंत पोहोचत ही नव्हता. तितक्यात आईला अचानक मागून कसलीतरी हालचाल जाणवली. तिने घाबरून मागे पाहिलं आणि एखाद्या खोल विहिरीत डोकावून बघितल्यासारखे तिला वाटले. असे का जाणवले हे तिला ही कळले नाही पण ती खूप घाबरली आणि लगेच बाबांना म्हणाली “आपण इथून निघू या.. मला आता इथे नाही थांबायचं..” वडिल तिला समजावत सांगू लागले “अगं खूप पाऊस चालू आहे आपण थोडा पाऊस थांबला की निघूया..” पण आईने वडिलांचे काही ऐकले नाही. त्यामुळे तसेच तिथून पावसात भिजत सायकलवर घरी निघून आले. मध्यरात्र उलटून गेली होती. त्यांना पोहोचायला अपेक्षेपेक्षा बराच उशीर झाला होता. 

घरी आल्या आल्या आजीने दोघांचाही समाचार घेतला. त्यात नवीन लग्न झालेल असल्यामुळे आईलाही बोलणे खावे लागले. आई वडिलांनी सगळे निमूटपणे ऐकून घेतले. भिजल्यामुळे दोघांनीही कपडे बदलले, अंग पुसले आणि झोपायची तयारी करू लागले. तितक्यात आई अचानक वेड्यासारखी वागू लागली. वडिलांना जोर जोरात ओरडू लागली, मध्येच मोठ्याने कुत्सितपणे हसू लागली. तिचा आवाज ऐकून काका, काकू माझे आजोबा धावत खोलीत आले. तसे त्यांना ही ती बोलू लागली, शिव्या देऊ लागली. वडील एक दोन वेळा आई ला ओरडले, तिला शांत व्हायला सांगितले पण तीच विचित्र वागणं थांबत नव्हत. माझ्या आजी च्या अंगात देवीचे वारे असल्यामुळे तिला या गोष्टीची कल्पना यायला वेळ लागला नाही की आईवर एका वाईट शक्तीचा प्रभाव पडला आहे. ती लगेच देवघरा कडे धाव घेतली. देवासमोर बसून डोळे मिटून काही तरी पुटपुटू लागली. अवघ्या काही मिनिटांसाठी तिथे बसली असताना इथे मात्र आईचे ओरडणे, विचित्र हसले वाढतच चालले होते. सर्व जण आजी ची वाट बघत होते की आजी काहीतरी उपाय करेल. अचानक आजी देवासमोरुन उठली, हातात तिने अंगारा घेतला आणि धावतच येऊन आईच्या कपाळाला लावला. आई थोड्यावेळासाठी शांत झाली तसे सगळ्यांच्या जीवात जीव आला. सगळ्यांना वाटले की आता हीच विचित्र वागणं थांबेल आणि आई नीट होईल पण तसे झाले नाही. 

आई अजुन ओरडायला लागली, ते ही अतिशय विचित्र आवाजात. पुन्हा घाणेरड्या शिव्या देऊ लागली, हसायला लागली. आजी परत एकदा आत गेली. तिने अंगारा आपल्या हाताला, चेहऱ्याला लावला. हातात घेऊन मीठ घट्ट बंद केली आणि काही तरी मंत्र पुटपुटू लागली. सगळ्यांना वाटले की आजी आईला पुन्हा अंगारा लावणार की काय. पण ती आई कडे जाणार तितक्यात आईच आजीच्या अंगावर धावून गेली जसे काही ती आजीला मारणारच आहे. तेवढ्यात आजीने तोच अंगारा लावलेल्या हाताने आईच्या कानाखाली वाजवली. आई जोरात बिछान्यावर पडली. घरातले सगळेच हा भयाण प्रकार आ वासून पाहत राहिले. पुढचा बराच वेळ आई तशीच बिछान्यावर बेशुद्धावस्थेत पडून होती. आजीने घरच्यांना ताकीद दिली की जो पर्यंत मी सांगत नाही तो पर्यंत कोणीही तिच्या जवळ जायचे नाही. आजी पुन्हा जाऊन देवघरा समोर बसली आणि देवाचे नामस्मरण करू लागली. बऱ्याच वेळानंतर आईला शुद्ध आली आणि ती उठून बसली. उठल्या उठल्या तिला रडू कोसळले. वडिलांनी तिला जवळ घेतले आणि धीर देऊ लागले. इतक्यात आजी समोरून आली आणि विचारले “काय झालं.. का रडतेस..?” त्यावर आई म्हणाली की मला काही कळत नाहीये, पण मला खूप अस्वस्थ वाटतंय, बर वाटत नाहीये. आई ला खूप ताप आला होता. तिच्या कपाळावर अंग्याऱ्याचा एक टीळा लाऊन झोपायला सांगितले. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला जाग आली तेव्हा बरे वाटत होते. त्यानंतर परत आईला असा त्रास कधीही झाला नाही. 

Leave a Reply