लेखक – ऋतिक करकरे

माझ्या गावातल्या घरी सत्य नारायणाची पूजा होती. म्हणून माझे आई वडील, काका काकू सगळे गावी गेले होते. मी मात्र पुजेच्या १ दिवस आधी जाणार होतो. गावी माझे आजी आजोबा राहायचे. जायच्या दिवशी सकाळीच आई चा फोन आला. 

हॅलो हा बोल आई..

आज येतोय ना तू..?

हो, ग येतोय मी..

रात्र होण्या आधी गावी यायचा प्रयत्न कर.. आज अमावस्या आहे..

हो ग, काळजी नको करुस..

बोलून फोन ठेवला आणि मनात केले की आज कामावर जायचे आहे आणि मग निघायचे आहे. त्यामुळे पोहोचे पर्यंत रात्र तर होणारच. काम आटोपून रात्री ८ ची एस टी पकडायचा निर्णय घेतला. घरी आलो, बॅग वैगरे भरली आणि काही वेळातच बस स्टॉप वर पोहोचलो. बस ही वेळेत आली त्यामुळे थांबावे लागले नाही. आल्या आल्या पटकन बसलो म्हणून विंडो सीट मिळाली. बॅग तशीच मांडीवर घेऊन बसलो. काही वेळात कंडक्टर ने इस टी ची बेल मारली आणि एस टी आपल्या मार्गाला लागली. मी डोळे मिटून शांत पडून राहिलो. आत येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे झोप कधी लागली कळलेच नाही. अर्ध्या रस्त्यात पोहोचलो तेव्हा आई चा पुन्हा फोन आला. 

“अरे ऋतिक कुठे आहेस.. किती वेळ झालाय बघितले स का..?” 

त्यावर मी तिला सगळे खरे सांगितले. 

” अग कामावरून पूर्ण दिवस करून मग रात्री ८ च्या एस टी ने निघालोय..”. 

माझे बोलणे ऐकून ती रागात ओरडलीच “तुला मी सांगितले होते लवकर निघ, रात्र करू नकोस. पण तू कोणाचे कधी ऐकतोस का..”

मी काही बोललो नाही. फोन ठेवल्यावर मला पुन्हा गाढ झोप लागली. 

कंडक्टर ने आवाज दिला तेव्हा मी झोपेतून जागा झालो. पाहतो तर माझा स्टॉप आला होता. मी एस टी तून खाली उतरलो आणि आई ला फोन लावण्यासाठी फोन काढला. पण गावाच्या परिसरात आल्यामुळे रेंज नव्हती. आता काय करायचे याचा विचार करू लागलो. पण तेवढ्यात एक रिक्षा येताना दिसली तसे मी हात करून थांबवली. माझा गावचे नाव सांगितले आणि जाणार का म्हणून विचारले. तो रिक्षावाला मान डोलावून तयार झाला तसे मी रिक्षात बसलो. बराच उशीर झाला होता. एव्हाना संपूर्ण गाव आणि आजूबाजूचा परिसर निद्रेच्या आहारी गेला होता. मी काही संवाद साधायला म्हणून त्या रिक्षा वाल्याला विचारले की तुम्ही इतक्या रात्री पर्यंत भाडे घेऊन जाता का.? त्यावर तो काहीच बोलला नाही. मी पुन्हा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण तो जणू माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता. काही वेळ प्रयत्न केला पण नंतर मीही गप्प बसलो. २०-२५ मिनिटांचा रस्ता होता. काही वेळा नंतर ची शांतता मला अस्वस्थ करू लागली म्हणून मी पुन्हा विचारले “कोणत्या गावचे आहात..?” या वेळी तो काही बोलला नाही पण माझ्या कडे वळून बघितले आणि एक स्मित हास्य केलं. तितक्यात रिक्षा धक्के खात अचानक बंद पडली. मी त्याला म्हणालो “काय झालं..?”

तर तो जरा चिडत च म्हणाला ” दिसत नाही का रिक्षा बंद पडली ते..?” मला वाटले की तो खाली उतरून बघेल काय बिघाड झालाय पण तो असे बोलून तसाच बसून होता. मी त्याला म्हणालो की मी बघतो काय झाले ते. त्यावर तो म्हणाला ” काही गरज नाही, गाडी चालू होणार नाही..” आता मात्र मला त्याचा राग आला. काहीही न करता तो कसं काय सांगू शकतो की गाडी चालू होणं नाही म्हणून. मी त्याच्या हातावर पैसे ठेवत रागातच रिक्षातून खाली उतरलो. काय करावं सुचत नव्हतं. मी तसाच चालत पुढे निघालो. त्याने मागून आवाज दिला ” जपून जा.. हा रस्ता चांगला नाही..” मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे चालू लागलो. मनात विचार आला की तो असं का बोलला असेल. विनाकारण मनात भीती उत्पन्न होऊ लागली. कारण मध्यरात्र उलटून गेली होती आणि चोहो बाजूंनी मिट्ट अंधार. बऱ्याच अंतरावर असलेल्या विजेच्या खांबावरून जेमतेम प्रकाश येत होता. म्हणून मी मोबाईल ची टॉर्च सुरू करून चालू लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच झाड होती. मी सहज मागे वळून पाहिले तर तो रिक्षावाला ही दिसत नव्हता. मला वाटले की पैसे घेऊन निघून गेला असेल. तसे ही त्याला पुढे यायचे नसेल म्हणून त्याने रिक्षा पुन्हा सुरू करायचा एकदा ही प्रयत्न केला नाही. मनातले विचार बाजूला सारून मी पुढे जाऊ लागलो पण माझ्या सोबत पुढे काय घडणार आहे याची मला पुसटशी कल्पना ही नव्हती. 

चालता चालता मला बाजूच्या एका उंच झाडावर कसलीशी सळसळ जाणवली आणि माझी पावलं जागीच थिजली. काय असेल तिथे..? मी घाबरतच तिथे एक नजर फिरवली आणि वाटले की झाडावर कोणी तरी बसलेय. भीती ने अंगावर शहारे आले. पण ते जे काही होत ते स्पष्ट दिसत नव्हत. आता खरंच तिथे काही होत की माझा फक्त भास होता हे समजलं नाही. मी पुढे चाल मांडली. तितक्यात मला एक विचित्र आवाज आला. मी थांबून मागे वळून पाहिले पण अंधार असल्यामुळे काही दिसलं नाही. मी जशी चालायला सुरुवात केली तसे माझ्या पावलांसोबत अजुन दोन पावलांचा आवाज येऊ लागला. जशी ती माझ्या पायाला एखाद्या दोरीने बांधली गेली आहेत म्हणजे मी ३ पावलं टाकली की तीही तीन पावलं टाकत होती. आता काय करावे सुचेना. मी माझ्या चालण्याचा वेग वाढवला. पण बहुतेक माझ्या नशिबात होत तेच घडत होत. पुढे जातच होतो तोच रस्त्याकडे ला पुन्हा कोणी तरी उभ असल्याचं जाणवले. या वेळेस तो भास नव्हता. मी त्याच्याकडे पाहिले आणि माझ्या पाया खालची जमीनच सरकली. काळीज भीतीने धड धडू लागले. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून तोच रिक्षावाला होता. फरक फक्त एवढाच होता की त्यांचं संपूर्ण शरीर रक्ताने माखले होते, अंगात काचा घुसल्या होत्या. एक डोळा फुटून तो लोंबकळत होता. त्याचे असे हे भयानक रूप पाहून मी प्रचंड घाबरलो. कोणताही विचार न करता अंगात होता नव्हता तेवढा जीव लाऊन मी धावू लागलो. 

धावता धावता मागे बघितले पण मागे कोणीही नव्हते. मी धावण्याचा वेग कमी केला. पण इतका दमलो होतो की तिथेच रस्त्याकडे ला एका दगडावर बसलो. धाप लागली होती. श्वास कमी पडत होता. तितक्यात बाजूला कोणीतरी बसल्याची चाहूल लागली आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. त्या दिशेला वळून पाहण्याची हिंमत नव्हती पण नकळत मान वळवली आणि उरला सुरला त्राण ही निघून गेला. एक २३-२४ वर्षांची तरुणी माझ्या बाजूला बसली होती आणि कसलेही हावभाव न देता माझ्या कडे एक टक बघत होती. खरं तर चालण्याची ही शक्ती उरली नव्हती पण हे जे काही घडतं होत त्या पासून दूर जायचं होत. मी धडपडत उठलो आणि पुन्हा धावू लागलो. बऱ्याच वेळा नंतर मी माझा गावाच्या वेशीवर आलो आणि मला काही घर दिसली. थोडा का होईना जीवात जीव आला. मागे वळून पाहिलं तर फक्त निर्मनुष्य रस्ता दिसत होता. वाटलं की नशीब चांगल म्हणून मी वाचलो. घरी पोहोचलो आणि घडलेला प्रसंग सांगितला. आई मला सांगू लागली “याच साठी मी तुला रात्री उशीर करू नकोस हे सांगत होते. काही दिवांपूर्वी ची घटना आहे. एका रिक्षाचालकांचा आणि रिक्षात बसलेल्या एका तरुण मुली चा विचित्र आपघात झाला. त्यात ते दोघेही मरण पावले. त्या दिवसापासून ते वाटसरु ना दिसतात. काही इजा पोहोचवत नाहीत पण त्यांचे आत्मे त्याच रस्त्यावर भटकत आहेत असे गावातली लोक सांगतात..” आई ने मला त्यांचे फोटो दाखवले आणि मला धक्काच बसला. त्यात तोच रिक्षावाला होता. ज्याने मला अर्ध्या रस्त्यावर आणून सोडले होते. पुढेचे २/३ दिवस मी तापाने फणफणत होतो.

Leave a Reply