अनुभव – रोहित जाधव

हा प्रसंग माझ्या वडिलांसोबत ९० च्याच दशकात घडला होता. वडिलांबद्दल सांगायचे म्हंटले तर अतिशय भारदार व्यक्तिमत्त्व आणि त्यांना अत्तर वैगरे लावायची ची प्रचंड आवड होती. ते लावल्याशिवाय ते घराबाहेर पडतच नसत. ते अतिशय उत्तम रित्या बाईक चालवायचे. शहरात होणाऱ्या स्पर्धेत म्हणजे बाईक रेसिंग मध्ये ते नेहमी भाग घ्यायचे. तसे तर ते मुख्य शहरापासून बरेच लांब राहायचे. पण त्यांचे पुष्कळ मित्र शहरात असल्यामुळे ते बाईक वरून नेहमी ये जा करायचे. हा त्यांचा नेहमीचा दीन क्रम होता. मित्रांबरोबर लेट नाईट ड्राईव्ह करून झाल्यावर मग घरी यायला निघायचे. त्यामुळे नेहमी खूप उशिरा घरी यायचे. 

एके रात्री ते मित्रांना भेटून एकटे घरी यायला निघाले. त्या दिवशी ही नेहमी प्रमाणे त्यांनी अतिशय उग्र असे गुलाबाचे अत्तर लावले होते. त्याचा सुगंध सगळी कडे दरवळत होता. नेहमी प्रमाणे खूप उशीर झाला होता. मध्यरात्र उलटुन गेली असावी. रस्ता अगदी निर्जन झाला होता. त्या काळी इतक्या रात्री रस्ता पूर्ण सामसूम व्हायचा. रात्रीचा दीड वाजला होता. त्या निर्मनुष्य रस्त्यावरून त्यांच्या बाईक च्याच हेडलाई ट च प्रकाश अंधाराला चिरत पुढे सरकत होता. स्ट्रीट लाईट असून नसल्या सारखे होते. शहराचा भाग मागे पडला. ते आता एका दुसऱ्या रस्त्याला लागले. तितक्यात वाटेत एका बस स्टॉप वर त्यांना कोणी तरी बसल्याचे जाणवले. त्यांनी बाईक चा वेग कमी करत नीट निरखून पाहिले. तिथे एक बाई एकटीच बसली होती. दिसायला अगदी साधीच होती. 

त्यांचा भूता खेतांवर अजिबात विश्वास नव्हता त्यामुळे तसला विचार ही त्यांच्या मनात आला नाही. त्यांना वाटले की इतक्या रात्री ही बाई इथे आहे म्हणजे नक्कीच काही तरी गडबड आहे. ही एकटी नसेल हिच्या सोबत अजुन कोणी असेल आणि लपून बसले असेल. कोणाला तरी फसवायचा किंवा लुटायचा बेत असणार. त्या काळी आमच्या परिसरात अश्या घटनांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे आपण मदत करायला जायचो आणि आपल्यावर यायचे असा विचार करत त्यांनी बाईक चा वेग पुन्हा वाढवला आणि तिला ओलांडून ते पुढे निघून गेले. याआधी असे त्यांना कधीच कोणी दिसले नव्हते म्हणून त्यांना जरा विचित्र वाटले. साधारण १५-२० मिनिटांनी ते नेहमीच्या ब्रीज वर पोहोचले. 

त्यांना पुन्हा रस्त्यावर कडेला कोणी तरी उभे दिसले. जसं जसे ते जवळ येत गेले त्यांना जाणवले की ही तीच बाई आहे जी काही आपल्याला अलीकडच्या बस स्टॉप वर आधी दिसली होती. आता मात्र त्यांना विचित्र वाटू लागलं. डोक्यात विचारचक्र सुरू झालं. कारण गेल्या १५-२० मिनिटात त्यांच्या बाईक शिवाय रस्त्यावर एकही वाहन दिसले नव्हते. त्यामुळे तिचे इथे येणे अशक्य होते. त्यात त्यांच्या बाईक चा वेग ही खूप होता. ते तिच्या जवळून जाऊ लागले तसे त्यांनी अजुन एक विचित्र गोष्ट पाहिली. ती बाई आपल्या कडेच एक टक लाऊन पाहतेय. ते तिच्याकडे पाहत गाडी चालवत पुढे जात होते तितक्यात अचानक ती कोण किंचाळत त्यांच्या गाडीवर धावून आली. त्यांनी प्रसंगावधान राखत झटकन बाईक चा वेग वाढवला आणि तिची झेप चुकवून ते पुढे आले. झालेला प्रकार इतक्या क्षणात घडला होता की त्यांना काही विचार करायला वेळच मिळाला नाही. त्यांच्या हृदयाचे नकळत वाढले होते. त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. भीतीने गाळण उडाली होती. मागून फक्त भयानक रित्या हसण्याचा आवाज येत होता. 

काही वेळाने तो आवाज यायचा बंद झाला. ते आता त्या ठिकाणापासून बरेच लांब आले होते. त्यांना जरा हायस वाटल कारण ती त्यांचा पाठलाग करत नव्हती. एव्हाना २.३० वाजत आले होते. पण हा प्रकार नक्की काय आहे या बद्दल त्यांना कुतूहल वाटू लागले. याच उत्सुकतेपोटी ते घरी येण्या ऐवजी आपल्या एका मित्रा कडे गेले आणि त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. आता मात्र त्या दोघांची उत्सुकता शिगेला पोहचली. त्यांना जाणून घ्यायचे होते की ती बाई नक्की कोण आहे. तिथे जाऊन याचा शोध लावायचा हे त्यांनी पक्के केले. त्यांनी मित्राला सोबत घेतले आणि पुन्हा त्या ठिकाणी जायला निघाले जिथे त्यांनी तिला पाहिले होते. तासाभरात ते त्या ठिकाणी पोहोचले. पण तिथे कोणीही नव्हते. त्यांनी काही किलोमिटर च्या परिसरात तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठे ही दिसली नाही. शेवटी कंटाळून ते आपल्या घरी आले. 

२ दिवस उलटले. माझे वडील पुन्हा त्याच रस्त्यावरून घरी परतत होते. त्या दिवशी पार्टी वैगरे करून आल्यामुळे त्यांनी थोडे ड्रिंक्स ही घेतले होते. बाईक चालवत घरी जायचे होते म्हणून त्यांनी प्रमाणात ड्रिंक केले होते. त्या रस्त्यावरून जात असताना त्यांना ती बाई पुन्हा रस्त्या कडेला उभी दिसली. या वेळेस मात्र ती त्यांना हाताने इशारा करून बोलवत होती. ते तिच्या अगदी जवळून पास झाले पण बाईक थांबवायचे धाडस त्यांना झाले नाही. ते थेट त्यांच्या मित्राकडे गेले. आणि त्याला पुन्हा तिथे घेऊन जाऊ लागले. पण त्यांचा मित्र त्यांना समजावून सांगू लागला की तू ड्रिंक्स केले आहे, तू आता घरी जा. पण धुंदीत असल्यामुळे ते काही ऐकत नव्हते. शेवटी त्यांनी बाईक तिथेच मित्राच्या घरी पार्क केली आणि तिथलीच एका ओळखीच्या व्यक्तीची रिक्षा घेतली. मित्र रिक्षा चालवत होता तर माझे वडील पॅसेंजर सीट वर बसले होते. 

ती बाई जिथे दिसली होती त्या ठिकाणी ते पुन्हा पोहोचले. यावेळेस ही त्यांना कोणीच दिसले नाही. मित्र वैतागला होता. पण वडील त्याला म्हणाले की आपण थोड्या वेळ इथेच थांबू आणि मग बघू. आज या सगळ्या चा सोक्ष मोक्ष लाऊन मगच घरी जायचे. मित्र ही तयार झाला तसे ते काही वेळ तिथेच थांबले. एव्हाना रात्रीचे २.४० झाले होते. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता. प्रत्येक मिनिटाला थंडी चा जोर वाढत चालला होता. ते दोघे ही सिगारेट ओढत बसले होते. काही वेळाने मित्र ही मागच्या पेसेंजर सीट वर येऊन बसला. त्यांची नजर बाहेर त्या बाई ला शोधत होती. बराच वेळ उलटला होता. त्यांनी रिक्षा चालूच ठेवली होती. त्यामुळे त्या शांत वातावरणात रिक्षाच्या चालू इंजिन चा आवाज काय तो फक्त येत होता. 

तितक्यात अचानक रीक्षाच्या एका बाजूने ती बाई आली आणि जोरात ओरडली “तुम्ही मला शोधताय?” काही कळायच्या आत तिने त्यांच्या मानेवर हाताची पकड घट्ट केली. त्यांनी तिच्या चेहऱ्या कडे पाहिले तर तिचा चेहरा संपूर्ण जळून गेला होता, डोळ्यातून रक्त वाहत होते, केस अर्धवट जळाले होते. ते पाहून त्यांनी संपूर्ण ताकदीनिशी तिचा हात झटकला. ते प्रचंड घाबरले. त्यांचा मित्र तर रिक्षा च्याच एका कोपऱ्यात बसून हा भयानक प्रकार पाहत च राहिले. ते झटकन ड्रायवर सीट वर बसले आणि गियर टाकून रिक्षा वेगात घेतली. त्यांचा मित्र मागे पाहत होता. पण अंधार असल्यामुळे काहीच दिसत नव्हते. त्यांनी अतिशय वेगात रिक्षा पळवत घरी आणली. दुसऱ्या दिवशी दोघेही आजारी पडले होते. दोघांच्याही घरी विचारपूस झाली. त्यांनी सगळा प्रकार घरी सांगितला. माझ्या आजी ने कसली पूजा वैगरे घातली. त्यांनी त्या रात्री घातलेले कपडे जाळून टाकले. आजीने त्यांना एक गोष्ट सांगितली जी त्यांच्या कायम लक्षात राहिली. कधीही असे उग्र वासाचे अत्तर वैगरे लाऊन रात्री बाहेर पडू नकोस, कारण त्यामुळे अश्या अज्ञात शक्ती आपल्याकडे आकर्षित होतात आणि आपली पाठ सोडत नाहीत..

Leave a Reply