अनुभव क्रमांक – १ – प्रणव साखरे

नेहमी प्रमाणे त्या दिवशी ही आम्ही तिघे मित्र एकत्र जमलो होतो. खूप गप्पा रंगल्या होत्या. बोलता बोलता विषय निघाला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी जवळच्या एका डोंगरावर फिरायला म्हणजे ट्रेकिंग ला जायचा प्लॅन केला. एकदम टॉप वर जायचे ठरवले. आम्ही घरी गेलो. रात्री मी लवकरच झोपलो कारण सकाळी लवकर उठायचे होते. ठरल्या प्रमाणे आम्ही पहाटे निघालो. ट्रेकिंग ला जाण्यासाठी जो भाग निवडला होता तो आमच्या घरापासून जवळच होता. आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आमच्या परिसरात ले २-३ कुत्रे ही आमच्या सोबत येऊ लागले. आम्ही त्यांना खूप हकलण्याचा प्रयत्न केला पण ते जात नव्हते. शेवटी आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तसे ते आमच्या सोबतच येऊ लागले.

आम्हाला काहीच कळत नव्हतं ते आमच्या सोबत का येत होते.. मी म्हटलं राहूदे तेवढाच विरंगुळा. सगळं ठरल्या प्रमाणे चालले होते. माझा मस्ती करत आम्ही निघालो होतो. आम्हाला एक डोंगर पार करून दुसर्‍या डोंगरावर जायचं होतं. काही वेळात आम्ही त्या डोंगरावर पोहोचलो. झाडी झुडपातून वाट काढत आम्ही जात होतो. साधी पायवाट होती. अंदाज घेऊन पाय वाट दिसेल तिकडे चालत राहिलो. दिशेचा साधारण अंदाज होताच पण तरीही आम्ही वाट चुकलो. पण पुढच्या काही वेळात आम्हाला रस्ता सापडला. या वेळेस मी म्हणालो की जरा लक्ष देऊन चला. वाटेतल्या खुणा वैगरे लक्षात ठेवा. काही अंतर चालत आल्यावर आम्हाला एक झरा लागला. पाणी नव्हते अजिबात. अगदी सुकून गेला होता. आम्ही पुन्हा रस्ता चुकणार असे वाटत होते पण सुदैवाने योग्य रस्त्याने गेलो पुढे गेलो.

तिथेच एका मोकळ्या जागेवर म्हणजे पठारावर आम्ही विश्रांती घेतली. काही तासांचा प्रवास झाला होता. जास्त थकायला झाले नव्हते पण तरीही विश्रांती घ्यावी गरजेची वाटली. काही वेळा नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. पण भीती होते तेच झाले. त्या निर्जन डोंगर दऱ्यात आम्ही पुन्हा वाट चुकलो. आम्हाला दिशाच कळेनाशी झाली होती. मी वाटेत दिसलेल्या लक्षात ठेवलेल्या खुणा शोधू लागलो. पण व्यर्थ. प्रत्येक वेळी वेगळे ठिकाण दिसू लागले. आम्ही वेड्या सारखे फिरून फिरून त्याच ठिकाणी येत होतो. त्या डोंगराला किती फेऱ्या मारल्या असाव्यात देव जाणे. बराच वेळ चालून झाले. आम्ही तिघेही धापा टाकू लागलो.. सगळ्यांची डोकी वेगळी वेगळी चालत होती. ‌एक जण म्हणत होता या दिशेने जाऊ तर दुसरा त्याच्या विरुद्ध दिशेने जाण्याच्या गोष्टी करत होता. एकच मार्ग होता. वरच्या दिशेने चालत राहायचे. आम्ही तेच केले. साधारण दीड दोन तासानंतर आम्ही अगदी टॉप ला येऊन पोहोचलो. 

इथपर्यंत तर आलो खरे पण आता जाणार कसे. तसे ही आम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचे होते म्हणजे ज्या डोंगराच्या टॉप ला जायचे होते तो सोडून आम्ही भलती कडेच आलो होतो. कोणाच्याही फोन ला रेंज नव्हती. आम्ही काही वेळ तिथेच थांबून विचार केला. वरच्या भागात आल्यामुळे दिशेचा अंदाज आता नीट बांधता येत होता. आम्ही चारही बाजूला पाहिले. आम्हाला तिथून काही अंतरावर असलेली खाडी दिसली. त्याच्याच हिशोबाने आम्ही पूर्वेच्या दिशेने चालू लागलो. अखेर पंधरा मिनिटाने आम्हाला हवा असलेला टॉप दिसला तसे आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला . काही क्षण विश्रांती घेतली, आणि घरच्या वाटेला निघालो. 

येताना वाट माहिती होती म्हणून जास्त वेळ लागला नाही. आम्ही कसे बसे खाली उतरलो आणि घरी पोहोचलो. आमची अवस्था अगदी वाईट झाली होती. माझ्या आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि कुत्र्यांच ही सांगितलं. त्यावर ती म्हणाली की कदाचित तो तुम्हाला दिलेला संकेत होता की तुम्ही तिघे एकटे जाऊ नका. तरीसुद्धा तुम्ही वरती गेलात. आणि मला असे वाटते की तुम्हाला चकवा लागला असावा. मुक्या प्राण्यांना सुद्धा कळते की की आपल्या सोबत काहीतरी विपरीत घडणार आहे.

अनुभव क्रमांक – २

मी माझ्या गावाला गेले होते त्या वेळेस ची गोष्ट आहे. माझ्या मामाचे गाव म्हणजे अगदी छोटेसे खेडे आहे. त्या रात्री आम्ही सगळी भावंडं चुलत मामाच्या खोलीत टिव्ही पाहता बसलो होतो. बरीच रात्र झाली होती. मला खूपच झोप आली होती म्हणून टिव्ही पाहता पाहता नकळ त झोप लागली. ज्या वेळी जाग आली तेव्हा रात्रीचे २ वाजून गेले होते. माझ्या सोबतचे सगळे अगदी गाढ झोपून गेले होते. मी पुन्हा झोपणार तितक्यात मला खोली बाहेरून कोणी तरी खोकत असल्याचा आवाज आला. मला वाटले की मामा बाहेर झोपला आहे आणि बहुतेक तो खोकत असावा. 

बाहेरून कसलासा मंद प्रकाश खोलीत येत होता आणि त्यामुळे मला झोपही लागत नव्हती. तसे ही लाईट वैगरे चालू असला की त्या प्रकाशामुळे मला अजिबात झोप लागत नाही. काही वेळ उलटला असेल. मामा चा खोकला वाढतच चालला होता. तितक्यात दरवाज्याची कडी वाजली. मला वाटले की मामा ला पाणी हवे असेल म्हणून तो दार उघडायला सांगत असेल. मी उठले आणि पाण्याचा पेला घेऊन दार उघडायला गेले तितक्यात मामाच्या मुलाने मला हाक देऊन अडवले. तितक्यात दाराची कडी वाजणेही अचानक थांबले. मी त्याला म्हणाले की बरे झाले तू उठलास, मामा ला खूप खोकला येतोय बघ. तू त्याला जरा पाणी देऊन ये ना. कधी पासून तो कडी वाजवतो य. 

तसे तो म्हणाला ” अग काय बोलतेस तू.. बाबा आत मधल्या खोलीत झोपले आहेत.” मी त्याला प्रश्न केला “अरे मग बाहेर कोण खोकते य कधी पासून”. त्याने दरवाजा उघडुन पाहिले पण बाहेर कोणीही नव्हते. मला वाटल की मला भास झाला असेल. म्हणून मी हा विषय सोडून दिला. काही दिवसांनी आजी शी बोलताना हाच विषय पुन्हा निघाला. तेव्हा मला या गोष्टीचा उलगडा झाला. आजी म्हणाली की आपल्या इथल्या एका शिंप्याची बायको टिबी च्याच आजारामुळे अकस्मात रित्या गेली होती. तेव्हा पासून रात्री अपरात्री ती गावात फिरताना दिसते. मी ही एकदा तिला पाहिले होते. या पुढे खात्री केल्याशिवाय दरवाजा उघडायला जाऊ नकोस. काही दिवसानंतर मी घरी आले आणि आई ला ही या प्रकाराबद्दल सांगितले. तसे तिने ही तेच सांगितले जे आजी ने सांगितले होते. बहुतेक त्या बाई ला अजूनही मुक्ती मिळाली नसावी. 

अनुभव क्रमांक – ३ – धीरज गांगुर्डे

ही गोष्ट साधारणतः १९७५ या सालातील आहे. माझे वडील लहान असतानाची. माझे आजोबा तेव्हा सरकारी नोकरी करायचे आणि उच्च पदावर कार्यरत होते. त्यांची बऱ्याचदा बदली व्हायची. त्या वर्षी त्यांची बदली कोकणात झाली होती. त्यांना राहायला एक घर दिले होते. तसे आजोबा संपूर्ण कुटुंबासोबत तिथे राहायला गेले. अगदी पहिल्या दिवस पासून त्यांना त्या घरात खूपच अस्वस्थ वाटायचे. नक्की सांगता येणार नाही कसे पण खूप वेगळे आणि विचित्र वाटायचे. पण त्यांचा नाईलाज होता म्हणून तिथे राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. या बद्दल सुरुवातीला त्यांनी कोणालाही सांगितले नाही. 

माझ्या वडिलांना १ भाऊ आणि १ बहिण. त्यात वडील सगळ्यात लहान. त्यांना ही त्या घरात राहायला आल्यापासून खूप त्रास व्हायचा. काही कधी खूप भूक लागा यची. तशी लहान मूल वाढत्या अंगाची असल्यामुळे भूक लागणे साहजिक असले तरी त्यांना प्रचंड प्रमाणात भूक लागाय ची. आजी त्यांना कडेवर घेऊन घराबाहेर फेऱ्या मारायची आणि शांत करायची. त्या दिवशी ही आजी घरा बाहेर अश्याच फेऱ्या मारत होती. रात्र ही बरीच झाली होती. फिरता फिरता घराच्या खिडकी वर असलेल्या भागावर तिला एका बाईची आकृती दिसली आणि भीतीने ती जीवाच्या आकांताने ओरडली. आजोबा लगेच धावत तिच्याजवळ आले आणि तिला विचारू लागले की काय झाले.. इतके जोरात का ओरडली स. 

तसे तिने खिडकी कडे बोट दाखवत म्हंटले ” खिडकी वर कोणी तरी उभे आहे..” माझे आजोबा लगेच तिथे गेले आणि नीट निरखून पाहिले पण त्यांना तिथे कोणीही दिसले नाही. तेव्हा आजीला भास झाला की तिथे खरंच कोणी होते हे मात्र अनुत्तरित राहील. काही महिने उलटले. पुन्हा त्यांना असे च विचित्र अनुभव येऊ लागले. खिकडीवर कोणी तरी उभ असल्याचं वाटायचं. कोणी तर घराच्या कोपऱ्यात उभ राहून आपल्याला एक टक पाहतंय असा भास व्हायचा. त्या रात्री आजोबांना पाठीला अचानक झोंबायला लागले. त्यांनी पाहिले तर त्यांच्या पाठीवर नखाने ओर बाडल्याच्या खुणा दिसल्या. आता मात्र या सगळ्या गोष्टी भयानक वळण घेऊ लागल्या होत्या. जिवावर बेतण्या आधी आजोबांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली. 

तेव्हा त्यांना बऱ्याच गोष्टी कळल्या. ते ज्या घरात इतके महिने राहत होते त्या घरात एका बाईला जाळून जिवानिशी मारून टाकले होते. तेव्हा पासून त्या घरात तिचे भास होतात. त्यांच्या शेजारचा एक व्यक्ती त्यांना समजावून सांगू लागला “तुम्ही सुशिक्षित लोकं अश्या भूता-खतांच्या गोष्टींवर विश्वास कशाला ठेवणार.. म्हणून मी तुम्हाला काही सांगितले नाही.. ” त्यानंतर माझ्या आजी आजोबांनी ते घर सोडले आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. 

Leave a Reply