अनुभव – संकेत शिंदे

गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मी साधारण आठवीत असेन. वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर संपला आणि त्याच दिवशी आम्ही सगळे बस ने गावी जायला निघालो. मी, माझा लहान भाऊ आणि माझे आई बाबा. सकाळी ७ ला पोहोचलो आणि गावातल्या माझ्या भावंडाना भेटलो. त्यातल्या माझ्या मोठ्या काकांच्या मुलाने म्हणजे किशोर दादा ने सांगितले की आज रात्री आपण सगळे आपल्या घरा मागच्या पडक्या शाळेत जाऊ आणि मस्ती करू. ती शाळा बऱ्याच वर्षांपासून बंद होती आणि अगदीच मोडकळीस आली होती. तिथे कोणीही फिरकायचे नाही. रात्री तिथे जाऊन मस्ती करायची म्हंटल्यावर मला अजून जोश आला. काही तरी थ्रिल करायला मिळणार होते ते ही बऱ्याच दिवसांनी. आणि सोबत भावंडं असली की मग काही बोलायलाच नको. मी अश्या गोष्टींसाठी नेहमी तयार असायचो. रात्री जेवण झाल्यावर बाहेर खेळायला जातो असे सांगून घरा बाहेर पडायचे ठरले. आम्ही या बद्दल बोलत असताना माझी आजी आली आणि तिने आमचे बोलणे ऐकले. ती आम्हाला बजावत म्हणाली की बाहेर खेळायला जाणार आहात ते ठीक आहे पण त्या पडक्या शाळेत चुकून पण जाऊ नका. पण साहजिकच आम्ही तिचे ऐकणाऱ्यातले नव्हतो. तिचे सांगणे डावलून आम्ही तिथे जायचे ठरवले. पण आम्ही किती मोठी चूक करायला जात आहोत याची आम्हाला कल्पना ही नव्हती. 

जेवण आटोपले. ठरल्या प्रमाणे आम्ही घरा बाहेर पडलो. काही वेळ घराच्या आवारात खेळत राहिलो. दोन अडीच तास झाले असावेत. घरचे झोपले आहेत याचा अंदाज घेतला आणि मग हळूच घराच्या मागच्या दिशेला आलो. तेव्हा दीड वाजून गेला होता. संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेले होते. त्यामुळे परिसरात एक जीवघेणी शांतता पसरली होती. आवाज होता तो फक्त वाऱ्यामुळे सळसळणाऱ्या झाडाच्या फांद्यांचा. ती पडकी शाळा आमच्या घरापासून अगदी १० मिनिटांच्या अंतरावर होती. सगळ्यांनी ठरवले की आपण आजची रात्र इथेच काढायची अंक घरच्यांनी विचारले तर सांगायचे आम्ही सकाळी च उठून मॉर्निंग वॉक करायला आलो होतो. आम्ही त्या शाळेजवळ येऊन पोहोचलो. अगदीच मोडकळीस आल्यामुळे रात्रीच्या गडद अंधारात ती अजूनच भयाण वाटत होती. पडक्या भिंती, जमिनीवर जमा झालेला पाला पाचोळा पाहून इथे कोणीही फिरकत नसावे याची जाणीव झाली. आम्ही तुटलेल्या एका खिडकीतून आत उडी मारली. तिथून चालत अगदी आत आलो. एव्हाना मस्तीच्या आवेशात असलेले आम्ही अचानक शांत झालो होतो. चालत असताना आजूबाजूला पाहत होतो. अंधार असला तरीही तुटलेल्या छतातून आणि वर्गांच्या खिडकीतून बाहेर चा उजेड आत येत होता. ज्यामुळे आम्हाला आतली वाट, भिंती, तुटलेले दरवाजे दिसत होते. चालत असताना अचानक एक विचित्र आवाज आला जसे कोणी बेंच किंवा खुर्ची सरकवली असावी. 

आम्ही सगळे एकाच जागी स्तब्ध आलो. पण आमच्यातला एक जण म्हणाला की गावातली पोर असतील, आपल्या मागे येऊन घाबरवायचा प्रयत्न करत असतील.. जिथून आवाज आला होता त्या दिशेला आम्ही जाऊन पाहिले पण तिथे कोणीही नव्हते. एक हाक देऊन ही पहिली की कोणी आहे का पण काहीच प्रतिसाद आला नाही. कोणी लपून बसले आहे का ते सुद्धा पाहिले पण आम्हा भावंडांशिवाय तिथे दुसरे कोणीच दिसले नाही. आम्ही तिथून बाहेर पडणार तितक्यात एका वर्गाचे दार अतिशय जोरात खाडकन आवाज करत बंद झाले. आम्ही जागीच खिळलो. माझ्या मनात भीती चे एक लहर उमटून गेली. त्या धक्क्यातून सावरत नाही तोच माझ्या बाजूची खिडकी ही जोरात आपटून बंद झाली. जसे कोणी आतून खेचून बंद केली आहे. तितक्यात कुठून तरी आवाज ऐकू आला ” ही माझी जागा आहे.. ” तो आवाज जणू घुमत होता त्या शाळेत पण नक्की कोणत्या दिशेने येतोय हे मात्र उमगत नव्हत. या सगळ्या मध्ये आम्ही एका वर्गात येऊन अडकलो आहोत हे ही आम्हाला कळले नाही. आणि जो दरवाजा आणि खिडकी बंद झाली होती त्याच वर्गात आम्ही अडकून पडलो होतो. आम्ही तो दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण तो जणू बाहेरून कोणी तरी घट्ट पकडुन ठेवलाय असे भासू लागले. आम्ही प्रचंड घाबरलो होतो. शेवटी मी आणि दादा ने जोरात दरवाजा खेचला तसा तो कसा बसा उघडला. आम्ही जिवाच्या आकांताने बाहेर धावत सुटलो. 

तिथून थेट घरी आलो. या सगळ्या प्रकारात सकाळचे ४ कधी वाजले आम्हाला कळलेच नाही. घरी गेल्यावर आम्ही सगळे काही सांगितले आणि आम्हाला बरेच ओरडा मिळाला. आजीने आम्हाला जवळ घेतले आणि सांगू लागली ” मी तुम्हाला बजावून सांगितले होते की त्या पडक्या शाळेत जाऊ नका पण तुम्ही पोर मोठ्यांचे कधीच ऐकत नाहीत.. तुम्ही लहान आहात.. तुम्हाला सगळ्या गोष्टी अजुन कळणार नाहीत पण तरीही सांगते.. शाळा होण्या आधी ची गोष्ट आहे.. जमिनीच्या वादामुळे तिथल्या जमीन मालकाला तिथेच मारून पुरले होते.. नंतर काही वर्षांनी तिथे शाळा बांधण्यात आली. पण सगळ्यांना तिथे विचित्र अनुभव यायचे म्हणून मुलांनी शाळेत येणेच बंद केले. कालांतराने शाळा बंद पडली ती कायम ची.. गावातली लोक रात्रीच्या वेळी त्या भागात फिरकत ही नाहीत. तिथे कोणी गेले की सहजा परत येत नाही. पण तुम्ही खूप चांगले नशीब घेऊन जन्माला आला आहात म्हणून तिथून सुखरूप बाहेर येऊ शकलात.. एक गोष्ट लक्षात ठेवा की मोठी लोक तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट सांगतात त्या मागे सगळ्यात जास्त असते ती तुमची काळजी.. “

आजीचे बोलणे ऐकून आम्हाला आमची चूक कळली होती.. या घटनेला बरीच वर्ष उलटली. पण आज ही कधी तो अनुभव आठवला तर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत..

Leave a Reply