अनुभव – नंदिनी सालेकर

२०१९ ची गोष्ट आहे. मी एका चार मजली इमारती मध्ये राहत होते. आम्हा ४ जणांचे कुटुंब. मी, माझा छोटा भाऊ शुभम आणि माझे आई वडील. तेव्हा मी नववी इयत्तेत शिकत होते. नुकतीच वार्षिक परीक्षा संपली होती. त्यामुळे सुट्ट्या लागल्या होत्या. मी, माझा भाऊ आणि इमारती मधली सगळे मित्र मैत्रिणी आम्ही सगळे दिवसभर इमारती समोरच्या गार्डन मध्ये खेळायचो. त्या गार्डन मध्ये आणि आमच्या इमारती मध्ये एक रस्ता होता. त्या रस्त्यावर दिवस भर वाहतूक चालू असायची. पण रात्री तो रस्ता खूप सामसूम असायचा. त्यामुळे तिथून जाणे ही आम्ही टाळायचो. रात्री जेवण वैगरे आटोपून इमारती खालच्या परिसरात च खेळायचो. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये घरी खूप उकडायचे त्यामुळे रात्री बाहेर आल्यावर थोडा का असेना पण गारवा वाटायचा. आणि हेच मला खूप आवडायचे. त्या वेळी मोठी माणसे ही जेवण आटोपून रात्री शतपावली करायला यायची. म्हणून मग आम्ही खूप उशिरा पर्यंत बॅडमिंटन खेळायचो. नेहमी प्रमाणे त्या दिवशी मी आणि माझा लहान भाऊ शुभम आम्ही खेळायला खाली आलो. तशी आमच्या वयाची अजुन मुल होती पण कोणीही मोठी माणसे आली नव्हती. वातावरण ही भकास वाटत होत. नक्की सांगता येणार नाही पण काही तरी वेगळे. आम्ही नंबर पाडले आणि बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. माझा नंबर शेवटचा होता. रोज रात्री खेळत असल्यामुळे सगळ्यांचा बराच सराव झाला होता त्यामुळे मला माहित होते की माझा नंबर काही लवकर येणार नाही. पण बसून सुद्धा मी कंटाळले होते. 

मग काय करणार तर माझ्या एका मित्राची सायकल घेऊन राऊंड मारून यायचा विचार केला. त्याच्याकडे चावी मागितली कारण नवीन सायकल असल्यामुळे त्याने लॉक लाऊन ठेवले होते. पण त्याने साफ नकार दिला कारण सायकल नवीन होती. मी काही त्याला जास्त बोलायला गेले नाही. तशीच निराश होऊन तिथून चालत जाऊन इमारती बाहेर असलेल्या रस्त्यावरच्या फुटपाथवर जाऊन बसून राहिले. त्याला काय वाटले काय माहीत पण थोड्या वेळाने तोच माझ्याकडे आला आणि सॉरी बोलून सायकल ची चावी दिली. पण ती देताना त्याने मला बजावून सांगितले की रात्री चे कुत्रे मागे लागतात, फक्त दोन राऊंड मारून मला लगेच आणून द्यायची सायकल आणि सायकल ला काही झाले नाहीं पाहिजे. मी त्याला हो सांगून त्याच्या हातातून चावी घेतली आणि लोक उघडुन सायकल घेऊन निघाले. तिथल्याच बाजूच्या परिसरात राऊंड मारायला गेले. मी एकटीच होते. तसे मी खूप घाबरट आहे पण त्या दिवशी मला काहीच वाटत नव्हत. मी दोन नाही तरी ५ ते ६ राऊंड मारले. सायकल ठेवायला जेव्हा इमारती कडे जाऊ लागले तेव्हा तिथे कोणीही दिसत नव्हत. वाटले सगळे गेले घरी गेले. मी लांबून इमारती कडे पाहतच होते तेवढ्यात मला माझा भाऊ गॅलरी मध्ये उभा दिसला. मी त्याला खालून च विचारले. तुम्ही सगळे इतक्या लवकर का गेलात. तेव्हा तो जरा चिडत च म्हणाला “इतक्या लवकर काय.. साडे बारा होऊन गेले.. मम्मी पप्पा चिडले आहेत तुझ्या वर.. खाली काय करतेय लवकर ये वरती.. आणि येताना गार्डन मध्ये बेंच वर बॅडमिंटन चे रॅकेटस् ठेवलेत ते घेऊन ये.. आणि शिवम ची सायकल पण लॉक लाऊन ठेव.. शिवम पण खूप चिडलाय.. “

इतके बोलून तो घरात निघून गेला. त्या इमारतीच्या परिसरात मी एकटीच होते. आता मात्र माझ्या मनात भीतीने घर करायला सुरुवात केली होती. मगाशी शांत आणि थंड वाटणारे वातावरण आता खूप भयाण वाटत होत. मी हिम्मत करून गार्डन मधून बॅडमिंटन घेऊन बाहेर आले आणि तिथून येत असताना वाटेत ला रिकामा झोपाळा हळूच हेलकावे घेऊ लागला. मी दचकून थांबले आणि मागे पाहिले पण कोणी दिसले नाही. मनात नको नको ते विचार येऊ लागले. मी स्वतःला समजावू लागले की वाऱ्यामुळे हलला असेल. पण मला हे ही माहित होते की त्या भागात अजिबात वारा वाहत नाहीये. तिथे दोन झोपाळे होते आणि विचित्र गोष्ट म्हणजे त्यातला एकच हळुवार पणे हेलकावे घेऊ लागला. हळु हळु त्याचा वेग वाढू लागला जसे कोणी त्यावर बसून झोके घेतेय पण कोणी च दिसत नव्हत. मी तिथून घाबरून पळत सुटले. भीतीने अंगातला त्राण च संपला होता. मी रस्ता ओलांडून इमारतीच्या दिशेने धावत सुटले पण मला लक्षात आले की मी सायकल लॉक च केली नाहीये. मनात विचार आला शिवम माझ्यावर आधीच चीड लाय. सायकल ला लॉक नाही लावले आणि चोरीला वैगरे गेली तर..? म्हणून मी सायकल पण लॉक करून पटकन चावी माझ्या खिशात टाकली. धावतच इमारती मध्ये घुसले. नेमके विंग मधले लाईट सुरू नव्हते त्यामुळे मिट्ट काळोख होता. मी मागे वळून गार्डन च्या दिशेने पहिले तर तो झोपाळा अजूनही हेलकावे घेत होता. मी अजून च घाबरले. तिसऱ्या मजल्यावर राहत असल्यामुळे मी वर धावतच सुटले. 

आधीच धावत आल्यामुळे मी दमून गेले होते. कशी बशी पहिल्या मजल्यावर आले तर मध्येच पायऱ्यांवर कोणी तरी बसलेले दिसले आणि ते दृश्य पाहून काळजात एकदम धस्स झालं. मी शहारले आणि काही क्षणासाठी होते तिथेच थांबले. तिथे एक बाई बसली होती. त्या अंधारात मला तिचा चेहरा नीट दिसला नाही. पण केस मोकळे सोडून तिथेच जिन्यावर बसली होती. मी स्वतःला सावरलं आणि ठरवल की काही झालं तरी घरी जायचे. मी सगळी हिम्मत एकवटून जड पावलांनी तिच्या बाजूने जाऊ लागले. हात पाय भीतीने कापू लागले पण माझ्याकडे तिथून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. जसे मी तिच्या बाजूने वर जाऊ लागले मला खूप घाण वास येऊ लागला. जसा एखादा प्राणी मरून गेल्यावर त्याचे मांस सडल्यावर येणारा अतिशय उग्र वास. त्यात ती विचित्र आवाजात गुरगुरत होती. तो आवाज ऐकून माझ्या शरीरातला त्राण जातोय की काय असे वाटू लागले. मी या आधी अश्या प्रसंगातून कधीही गेले नव्हते. त्यामुळे मला वाटू लागले की कोणत्याही क्षणी भोवळ येऊन खाली पडेन. पण तरीही स्वतःला भानावर ठेवत मी दबक्या पावलांनी तिच्या बाजूने जाऊ लागले. तितक्यात तिने माझा एक पाय घट्ट पकडला. विजेचा एक तीव्र झटका लागावा असे वाटले. मी हात पाय झटकून ती पकड सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. ओरडायचा प्रयत्न करू लागले. पण माझा तोंडातून आवाजच फुटत नव्हता. तिने मानेला एक हिसडा देऊन माझ्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर आलेल्या मोकळ्या केसातून तिचा एक डोळा दिसला. संपूर्ण काळपट. माझ्यावर रोखलेली जीवघेणी नजर..

माझ्या हातात असलेल्या बॅडमिंटन च्या रॅकेट ने तिच्या डोक्यावर प्रहार करायला सुरुवात केली. माझी तिच्या तावडीतुन सुटण्यासाठी धडपड सुरूच होती. मला वाटतं नव्हत पण मी तिच्या तावडीतुन सुटले आणि धावत तिसऱ्या मजल्यावर आले. माझे दार जोरात बडवू लागले, मम्मी पपांच्या नावाने हाका मारू लागले, मोठ्याने रडूच लागले. त्या आवाजाने बाजूच्या फ्लॅट मधले शेजारी जागे झाले आणि आप आपल्या घरातून बाहेर येऊन पाहू लागले. माझ्या घराचा दरवाजा उघडला तसे मी घरात शिरले आणि मला चक्कर येऊन मी बेशुद्ध पडले. शुद्धीवर आले ते सकाळी १० च्या सुमारास. म्हणजे रात्र भर मी बेशुद्ध च होते. शेजारचे आणि इमारती मधले लोकं माझ्या घरीच माझ्या भोवती बसले होते. जसे मी भानावर आले तसे त्यांनी मला वेग वेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी घडलेला सगळा प्रसंग त्यांना सविस्तर सांगितला. काल रात्री कोणीही मोठी माणसे शतपावली करायला आली नव्हती.. माझे मित्र १२ वाजण्या आधी घरी निघून गेले होते. आई ने सांगितलेले वाक्य आठवले ” रात्री खेळायला जात आहात ते ठीक आहे पण १२ च्या आत घरी या कारण १२ पासून अमावस्या सुरू होणार आहे..”.. माझ्या सोबत काय घडले का घडले या प्रश्नांची उत्तरं मला आज पर्यंत उलगडली नाहीयेत. त्या प्रसंगानंतर मी त्या बद्दल बोलणे आवर्जून टाळते. 

Leave a Reply