लेखक – राहुल नाटकर

HR:- ” Congratulation राहुल, मग तुम्ही केव्हा जॉईन करू शकता”

मी:- तुम्ही सांगा सर, मी केव्हा ही जॉईन करायला तयार आहे, लवकर असेल तर अजूनच सोयीसकर.

HR :- आजचा Thursday…! Monday पासून चालेल तुम्हाला..?

मी:- हो, काही हरकत नाही.

HR:- ठीक आहे ,आपण आता पेपर वर्क करून घेऊया सोमवारी तुम्ही इथे आल्यावर मी तुमची रिपोरटिंग औथोरिटी सोबत भेट घालून देईन..

मी:- Ok, ठीक आहे सर..

तीन महिन्या अगोदर मी मुंबईला जॉब करायचो पण व्यक्तिगत कारणांमुळे मला मुंबई ची नौकरी सोडून परत माझ्या गावी, म्हणजे अमरावती ला यावे लागले.. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून नवीन जॉब मी शोधत होतो, शेवटी एका कंपनी मध्ये सेल्स executive जॉब ची ऑफर आली, इंटरव्ह्यू झाला आणि सिलेक्शन सुध्दा झाले, आता सेल्स म्हटले की फिरणे आलेच.

आज ऑफिस चा पहिला दिवस , तब्बल 2 महिन्या नंतर कामावर जाणार , त्यामुळे मनात एक वेगळीच धाकधूक होती. वेळेच्या आधीच मी ऑफिस मध्ये पोहचलो.

मी:- गुड मॉर्निंग सर

 गुड मॉर्निंग राहुल, आज तुझा पहिला दिवस त्यामुळे तुला जास्त त्रास तर देऊ शकणार नाही, माझे बॉस मस्करित म्हणाले आणि पुढच्या सूचना देऊ लागले.

बर.. राहुल, तुझं एक महिना ट्रेनिंग असणार , सोबतच तुझा एक महिना झाल्या नंतर वर्किंग एरिया कोणता असेल याचा रूट तुला निखिल सांगेल आणि सोबतच तुला तो ट्रेनिंग ही देईल त्यामुळे तुला आज पासून पुढचे 30 दिवस निखिल सोबत असावे लागणार आहे,कळलं..?

इतके म्हणून त्यांनी निखिल म्हणून हाक मारली..

तसे माझ्याच वयाचा एक मुलगा आत आला. 

“येस सर..?”

निखिल, हा राहुल आणि राहुल, हा निखिल.. त्यांनी आमची ओळख करून दिली.

निखिल, ” राहुल तुझ्या सोबत महिनाभर असणार आहे,त्याला पूर्ण ट्रेन करणे आणि त्याला पूर्ण रूट समजवून देने हे तुझं काम असणार आहे”

त्यावर निखिल ने ” हो सर” म्हंटले आणि त्यांनी पुढे मला विचारले. “राहुल, तुला कळले सगळे..? 

मी ही त्यांना येस सर म्हणत होकारार्थी मान डोलावली. 

निखिल आणि मी, आम्ही दोघांनी एकमेकाला फॉर्मली इन्ट्रोडूस केले…

तेव्हा पासून मी प्रत्येक वेळी निखिल सोबतच असायचो, इतका वेळ सोबत घालवल्याने काही दिवसातच आमच्या मध्ये खूप घनिष्ट अशी मैत्री निर्माण झाली.

तसा निखिल खूप हुशार आणि मेहेनती मुलगा, त्यानी मला कमी दिवसातच चांगले ट्रेन केले, सोबत प्रत्येक गावात जाण्याचा रूट सुद्धा लक्षात आणून देण्याचा खूप प्रयत्न करायचा, पण माझ्या डोक्यातला गूगल मॅप च करपट असल्यामुळे मला रस्ते लवकर लक्षात नव्हते राहत..

तरीही तो बिचारा मला समजावण्यासाठी खूप प्रयत्न करायचा..

असेच एक-एक दिवस करत, माझे ट्रेनिंग संपण्याचा शेवटचा दिवस आला.

त्या दिवशी निखिल ऑफिस मध्ये लवकर आला होता. मी पोहोचल्यावर मला गमती मध्ये म्हणाला ” भाऊ, उद्या शेवटचा दिवस, मग परवा पासून तुला माझी काही कटकट नसणार..

मी ही मुद्दामून मस्करी च्याच स्वरात म्हणालो ” हो, यार खूप त्रास दिला तू महिनाभर ,आता परवा पासून सुटकेचा श्वास घेऊन मी… “

इतके आम्ही दोघेही जोरात हसलो.

नंतर निखिल मला म्हणाला ” बर.. मी काय म्हणतो, उद्या आपल्याला वरुड ला जायचे आहे, साधारणतः 100 km अंतर आहे,त्यामुळे आपल्याला जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर निघावे लागेल.”

तसे मी त्यालाच विचारले ” तू सांग, किती वाजता निघायचं..? मी त्या वेळेत तयार राहीन.

सकाळी 7:30 ला निघुया, पण सोबत तू तुझी पण बाईक घे, तिथे आपल्याला 4 गावात मार्केट करायचे आहेत, त्यातल एखाद गाव तू बघ, बाकी मी लवकर आटपून घेईन जेणे करून आपल्याला लवकर निघता येईल.

मी होकारार्थी मान हलवली..

ठरल्या प्रमाणे मी आमच्या नेहमीच्या जागेवर निखिलची वाट बघत होतो, थोड्या वेळातच निखिल तिथे पोहचला आणि आम्ही निघालो.

पाहिल्या 2 गावात आम्ही सोबतच गेलो.

पुढची गाव साधारण २ किमी वर होती. तसे निखिल म्हणाला ” इथून पुढे काही अंतरावर शिरगाव आहे, तिथे तू जा आणि मी उरलेलं गाव बघून घेतो.”

मी त्याला पुढे विचारले ” बर..”पण आपण भेटायचं कुठे.?”

‘आपण तिथून पुढच्या गावा जवळ भेटू’

अरे..पण मला तिथून पुढचा रस्ता नाही लक्षात.’

त्यावर निखिल मला समजावून सांगू लागला ” सोपं आहे रे.. सरळ 3-4 किलोमीटर नंतर एक फाटा येईल, तिथे तुला एक सरळ रस्ता जाताना दिसेल तर दुसरा डावीकडे जाणारा..तुला फक्त तिथे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता न घेता, जो डावीकडचा रस्ता आहे, तो पकडायचा आहे…

मी बर..ठीक आहे म्हणत आम्ही आपआपल्या मार्गी लागलो.

मी त्या त्या गावातले काम आटपून पुढच्या गावा ला निघालो, थोड्या अंतरावर जात नाही तर माझ्या गाडीतले पेट्रोल संपले आणि बाईक बंद पडली. आसपास नजर फिरवली पण एक ही पेट्रोल पंप नव्हते. शेवटी गाडी लोटत साधारण एक ते दीड किलोमीटर आणली. उन्हाळ्यात ला मे महिना आणि त्यात दुपारचे 1-2 वाजले असावेत. तेवढ्यात मला एक पेट्रोल पंप दिसले आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला. तसे पटकन पेट्रोल भरून मी पुढच्या दिशेला निघालो आणि निखिल ने सांगितलेल्या फाट्याला पोहोचलो. समोर बघतो तर काय एक रस्ता सरळ जात होता, दुसरा डावीकडे आणि या दोन्ही रस्त्यांच्या मधून सुध्दा एक तिसराच रस्ता जात होता.

बाईक ढकलण्या च्या आणि पेट्रोल पंप शोधण्याच्या नादात निखिलने कोणता रस्ता पकडायला सांगितला हे मी विसरलो.

लक्षात होते फक्त हे,की ज्या रस्त्याने आलो त्या ने सरळ नाही जायचे. मी मधल्या रस्त्याचे बाजूचे वळण घेतले आणि निघालो. पुढे 2-3 किलोमीटर जात नाही, तशी माझी बाईक परत बंद पडली आणि मी डोक्याला हात लावत म्हणालो 

” आज, कसला दिवस आहे यार..आता तर पेट्रोल पण भरले, कधी नव्हे गाडी आज इतकी का त्रास देत आहे..!”

बाईक स्टार्ट करण्याकरिता किक मारत होतो,

5 मिनिटांनी बाईक स्टार्ट झाली आणि परत पुढचा प्रवास सुरु केला,परत 2-3 किलोमीटर पुढे बाईक बंद पडली आणि 5 मिनिटांनी सुरू झाली..

असाच सारखा प्रकार अजून 1- 2 वेळा माझ्या सोबत घडला.

चौथ्या वेळी बाईक बंद पडल्यावर माझे आजूबाजूला लक्ष गेले. आणि मला जाणवले की मी परत त्या एकाच ठिकाणी येतोय आणि त्याच जागेवर माझी गाडी बंद पडतेय…

कारण पाहिल्यावेळेस चे आठवल्यावर लक्षात आले की दोन्ही बाजूला शेत होते आणि डावीकडच्या शेता मध्ये, रस्त्याच्या जवळच एक बुजगावणे होते आणि त्या शेतात एक म्हातारा 2 बैलांना घेऊन शेत नांगरत होता..

मग मी स्वतःच्या मनाला संजवले, “इथे प्रत्येक शेतामध्ये असे बुजगावणे असतील आणि प्रत्येक शेतामध्ये कोणी तरी बैलांना घेऊन शेत नांगरणी करतच असेल.”

कदाचित, हा माझा भास असावा..

असे बोलून मी, बाईक परत स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला आणि ती सुरू झाली.

नेहमी प्रमाणे 2 ते 3 किलोमीटर वर बाईक परत बंद पडली , आता मात्र मला खूप मोठा धक्का बसला कारण बारकाईने बघितल्यावर कळले की त्या ठिकाणी तेच बुजगावणे होते आणि आजूबाजूचा परिसर सुध्दा पहिल्यासारखाच होता.

आता मला कळून चुकले की मी मागल्या 2 तासंपसून एकाच ठिकाणी फिरतोय,

मला भीतीपाई खूप घाम फुटला, घसा कोरडा पडला आणि आता काय करावे सुचेनासे झाले.

मी निखिल ला कॉल करण्याचा प्रयत्न केला,पण मोबाइलला नेटवर्क नव्हते आता काय करावे हा यक्ष प्रश्न माझ्या पुढे उभा होता, तशीच माझी नजर शेतात काम करणाऱ्या म्हाताऱ्यावर गेली,मनात धाकधूक होती की त्यांची मदत घ्यावी की नाही, कारण सोबत घडणारा प्रकार साधारण नव्हता.

तरीही हिंमत करून मी त्यांना आवाज दिला..

” ओ… आप्पाजी..

हा .. इकडे इकडे…

मला शहराकडे जायचे आहे,रस्ता कुठून आहे..?(घसा फाडून ओरडत विचारले)

त्यांनी हाताचा इशारा करत विचारलं..” काय झालं..? इकडे ये काही ऐकू नाही येत आहे..

मी लगेच बाईक स्टँडवर लावून त्यांच्या जवळ गेलो.

काय म्हणत बाबू..? ‘इतल्या उन्हाचा इथं काय करून रायला..?’

मी:- आप्पाजी.. पुष्कळ वेळ झाला मी शहराकडे जाण्याचा रस्ता शोधतोय पण मार्ग काही सापडत नाही आहे,मला पुढच्या गावाला जायचे आहे. हे बोलत असताना माझा स्वर हळूहळू कमी होत होता.

तितक्यातच मला गरगरल्या सारखे झाले, चक्कर येऊन पडणारच तर त्या म्हाताऱ्याने माझा हात पकडून मला खाली बसवले..

म्हातारा:- बाबू..लय थकलेला दिसून रायला तू..! काई खात का..?

मी मान हलवत,नकार दिला..

म्हातारा:- बर..” माया झोपडीत जरास्क ताक हाय, थे देऊ का..?”

मला खूप अशक्तपणा जाणवत होता, त्यामुळे मी त्यांना म्हटले..

‘ ठीक आहे.. थोडं द्या’

तसेच ते त्यांच्या झोपडी कडे निघाले, आणि ग्लास भरून माझ्यासाठी ताक घेऊन आले, मी ते ताक पिणारच की तेवढ्यात मागून एक आवाज आला..

राहुल…राहुल…

त्या आवाजाने मी दचकून मागे बघितले,आणि माझ्या हातातले सारे ताक खाली सांडले.

वळून बघतो तर काय, रस्त्यावर निखिल त्याची बाईक घेऊन उभा होता,मी लगेच धावत त्याच्या कडे गेलो.

निखिल:- अरे… मूर्खा तिथे काय करत करतोय? केव्हाचा कॉल करतोय तुला.. कॉल का लागत नाहीये?

मी झालेला सर्व प्रकार त्याला थोडक्यात सांगितला..

त्यावर तो फक्त एकच वाक्य म्हणाला “बर.. लवकर चल इथून..”

2 मिनिट मी त्या आजोबांना सांगून येतो.

जे काही सांगायचे आहे इथूनच सांग आणि चल लवकर.

आप्पाजी ..’ येतो मी, माफ करा माझ्यामुळे तुमचे ताक वाया गेले’

असे बोलून आम्ही दोघे तिथून निघालो, निखिल जवळपास पुष्कळ वेळ झाला माझ्याशी काहीच बोलला नाही.

आता संध्याकाळ झाली होती, हळूहळू अंधार गडद होत चालला होता.

तितक्यात निखिल म्हणाला ” राहुल, समोर चहा ची टपरी आहे तिथे थांबशील, चहा घेऊ.”

आम्ही दोघांनी गाडी पार्क केली.

भाऊ , दोन चहा द्याल.. इतके म्हणत त्याने लगेच माझ्याकडे बघून विचारले ” बर आता सविस्तर सांग तुझ्यासोबत आज काय घडलं आणि तू तिथे काय करत होतास..?”

अरे तू जस सांगितलं मी त्या फाट्याजवळ जवळ पोहोचलो. तिथे मला 3 रस्ते दिसले, एक सरळ जाणारा, दुसरा डावी कडचा आणि तिसरा म्हणजे त्या दोघांच्या मधला, मी विसरलो होतो की कोणत्या रस्त्यानी जायचे ते.

त्यामुळे मी मधला रस्ता पकडला.. आणि नंतर मी त्याला सगळा प्रकार क्रमा क्रमाने सांगितला.

त्या नंतर निखिल ने जे सांगितले ते कल्पना शक्तीच्या पलीकडचे होते. तो म्हणाला “राहुल, तू ज्या शेताच्या मधोमध बसला होता तिथे तुझ्या जवळ कोणीच नव्हते, तिथे तू फक्त एकटाच होतास.. तू ज्या म्हाताऱ्याचे वर्णन करतोय असा व्यक्ती, अशी झोपडी आणि बैलांची जोडी तुझ्या दूर दूर पर्यंत काहीच नव्हते.. 

तू एकटाच तिथे मला बडबड करताना दिसलास….

मी अचंबित होऊन विचारले ” हे कसं शक्य आहे..?”

तसे तो म्हणाला ” आई ची शपथ. मला तिथेच जाणवले की हा काही वेगळा प्रकार आहे, त्यामुळे मी तुला तिथुन लवकर चलण्यास म्हटले.. आणि अजून महत्वाचे म्हणजे मी 2 वर्षा पासून इकडे येतोय, त्या फाट्यावर तिसरा कोणताच रस्ता नाही.

हे ऐकून मला अजूनच धक्का बसला..

आमचे हे बोलणे चहावाला ऐकतच होता, तितक्यात तो म्हणाला..

“भाऊ तुम्हाले चकव्यान घेरल होत, तुमच नशीब की त्यातून तुम्ही निघाले, नाही तर आज तुमच्या जीवाले चांगलाच धोका असता.

हे सगळं ऐकून मी सुन्न झालो होतो, झालेल्या प्रकारावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण पुढे जे घडणार होत ते या पेक्षा ही भयंकर होत.

मी कसबसे तरी घरी पोहोचलो जेवण करून झोपण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या रात्री मला झोप सुद्धा लागली नाही..

दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस मध्ये पोहोचलो आणि निखिल माझ्या जवळ येत म्हणाला “राहुल, मित्रा सॉरी आणि थैंक्स यार….”

बर.. हे दोन्ही कशा करिता..? समजू शकेल का मला..?

अरे.. परवा रात्री अचानक वडिलांची तब्येत खराब झाली, त्यांना रात्री दवाखान्यात भर्ती करावे लागले. त्या गडबडीत मी तुला कळवू पण नाही शकलो की, मी उद्या येऊ शकणार नाही आणि तुला एकट्यालाच वरूडला जावे लागेल, हे पण सांगता आले नाही,

या करिता सॉरी..

आणि थैंक्स याकरिता की तू एकटा जाऊन माझं काम चांगल्या पद्धतीने करून पण घेतले..

रिअली थैंक्स भावा..

निखिलचे हे बोलणे ऐकून मला काल पेक्षा आज अधिक मोठा धक्का बसला, मी निखिलचे बोलणे पडताळून बघितले तर कळले की खरच त्याच्या वडिलांची तब्येत खराब झाली असल्यामुळे तो काल दिवस भर त्यांच्या सोबतच हॉस्पिटलमध्येच होता.

निखिल काल सुट्टीवर असताना, मग माझ्या सोबत वरूडला कोण आलं होतं..? त्या शेतामध्ये मला जे म्हातारे व्यक्ती भेटले ते कोण होते..? या सर्व प्रश्नांमुळे मी वैतागून गेलो होतो.

साधारण 15 दिवस उलटले. त्या दिवशी ऑफिस मध्ये बोस्त ने आत बोलावले आणि म्हणाले “राहुल, तुला आज वरूडला जायचे आहे..”

बॉस नी जसे वरुड चे नाव घेतले, तसेच माझ्या अंगावर काटे आले आणि झालेला सर्व प्रसंग माझ्या समोर उभा झाला..

मी घाबरतच म्हणालो ” हो सर..”

आज परत 15 दिवसानंतर मी वरुड करीता निघालो. मनात असंख्य प्रश्न होते.

मी त्याच फाट्या समोर येऊन थांबलो आणि बघतो तर काय तिथे दोनच रस्ते होते एक सरळ जाणारा आणि दुसरा डावी कडे जाणारा तेवढ्यात मागून जोरात हॉर्न वाजला.

पिकक्ककक्क पिकवकवक…

तशीच एक बाईक माझ्या बाजूला येऊन थांबली…

बघतो तर काय माझ्या ऑफिस मधला कलीग, प्रवीण होता.

अरे… राहुल तुझा आज वरूडला चक्कर होता का..?

मी त्याला “हो.. म्हणालो”.

प्रवीण:- बर… मला सरळ जायचं आहे भेटू संध्याकाळी ऑफिस ला….

त्यानी बाईक ला किक मारली…

आणि जाताना माझ्या बॅक सीट कडे बघून..

“अरे… निखिल याच training झालं, आता तर त्याला सोड की… तुझा आज कोणातच रूट नव्हता का..?

असे म्हणून तो निघून गेला…..

हे ऐकून माझे हात-पाय गळून पडले आणि शरीरात असलेला प्राण निघून गेल्या सारखे झाले.

कारण…

आज

मी एकटाच वरुड साठी निघालो होतो….

Leave a Reply