अनुभव – रोहित चौघुले

गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. माझ्या लहानपणीची. माझे गाव अगदी निसर्गरम्य होते म्हणजे आता ही तसे आहे. लहान असताना शाळे व्यतिरिक्त आम्ही घरी कधी नासाय चोच. गावभर उनाडक्या करत फिरायचो. माझे बरेच मित्र होते आणि त्यात जवळचे म्हणजे सोन्या, बंड्या आणि आकाश. त्यांच्या जोडीला माझा लहान भाऊ प्रभू ही नेहमी असायचा. त्या काळी आम्ही सगळे एकत्र निघायचो. कधी चिंचा काढायला अगदी उंच झाडावर चढा यचो तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आंबे चोरायला जायचो. ते लहानपणी चे दिवस अगदी छान होते पण ती गोष्ट मला अजूनही लक्षात आहे. माझ्या लहान भावासोबत घडलेली ती घटना. 

त्या दिवशी आम्ही नदीवरून पोहून घरी आलो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या त्यामुळे घरी बसून काय करणार म्हणून आम्ही गावापासून बऱ्याच लांब असलेल्या एका पडीक बंगल्याजवळच्या झाडावरील आंबे चोरायचा बेत आखला. विशेष म्हणजे तो बंगला अगदी मोडकळीस आला होता आणि त्या बद्दल गावात बऱ्याच अफवा होत्या म्हणून त्याला नाव ही भूत बंगला असे पडले होते. याच कारणामुळे तिथे कोणी जात नसे. त्यामुळे त्या झाडावर बरेच आंबे असायचे पण ते काढायला जायचे कोणी धाडस करत नसे. आम्ही दुपारची जेवण आटोपून साधारण ३ ला घरातून बाहेर पडलो. माझा भाऊ ही माझ्या सोबतच होता. साधारण अर्ध्या तासात आम्ही तिथे पोहोचलो. माझ्या सगळ्या मित्रांमध्ये वयाने मी मोठा होतो त्यामुळे सगळ्यांना बजावून सांगितले की बंगल्याच्या आत जायचे नाही. तसे ही आम्ही आज पर्यंत ऐकलेल्या सगळ्या गोष्टींमुळे कोणीही आत गेले नसते पण तरीही मी त्यांना ताकीद देऊन ठेवली. 

आम्ही तिथे पोहोचल्यावर मी सहज एक नजर त्या बंगल्यावर फिरवली. दुपारची वेळ असली तरीही तो त्या बंगल्याची अवस्था पाहून अंगावर शहारेच आले. मित्रांना म्हणालो की चला पटापट आंबे पाडा. तसे ते ही दगड वैगरे मारून आंबे पाडू लागले. पुढच्या १५-२० मिनिटात आम्ही बरेच आंबे जमवले. तसे आम्ही तिथून बाहेर जाऊ लागलो. तितक्यात माझा मित्र आकाश म्हणाला “थांबा रे.. प्रभू कुठे गेला..”. मी झटकन मागे वळून पाहिले. माझा लहान भाऊ प्रभू त्या आवारात कुठे ही दिसत नव्हता. मी पटकन धावत जाऊन आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पण तो कुठे दिसेना. आमच्यात वयात तो एकटाच लहान होता म्हणून मला त्याची काळजी वाटू लागली. मनात विचार आला “बंगल्यात तर गेला नसेल

.?”. काही झाले तरी त्याला लवकरात लवकर शोधायला हवे. आम्ही सगळ्यांनी शोधाशोध सुरू केली. बराच वेळ झाला पण तो कुठे सापडत नव्हता. 

मी पुन्हा बंगल्याच्या मागच्या बाजूला गेलो. तिथे एक पडकी विहीर होती. मी जसे त्या विहिरीजवळ जाऊ लागलो तसा मला रडण्याचा आवाज येऊ लागला. मी लगेच ओळखले की हा आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून प्रभू चा आहे. मी त्या दिशेने धावच घेतली. विहिरी जवळ बसून तो रडत होता. मी त्याला विचारले “काय रे.. काय झाले.. इथे असा का बसला आहेस.. आणि रडायला काय झालंय.. आम्ही कधी पासून तुला शोधतोय..? तो काहीच बोलला नाही. फक्त समोर त्या विहिरी कडे बघत रडत होता. मी माझ्या मित्रांना हाक दिली तसे ते ही आले. आम्ही त्याला घेऊन घरी आलो. मी त्याला खाटेवर झोपवले. तसे आजीने माझा चेहऱ्यावरचे हावभाव पाहत लगेच ओळखले की आमचे काही तरी बिनसले आहे. तिने विचारले तसे मी तिला सगळे सांगितले की आम्ही त्या भूत बंगल्या जवळ आंबे पडायला गेलो होतो तर प्रभू हरवला होता, आणि खूप वेळाने आम्हाला विहिरी जवळ सापडला, तिथेच रडत बसला होता. मी विचारले की काय झाले पण काहीच बोलला नाही. 

आजीने त्याच्या कपाळावर हात लावला. तो तापाने अक्षरशः भाजत होता. त्याला औषध देऊन झोपवले. मी त्या नंतर घराबाहेर पडलो नाही. रात्री आम्ही जेवायला बसलो. मी त्याला बोलवायला गेलो पण तो अजूनही गाढ झोपला होता. मी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तापामुळे त्याला ग्लानी आली होती. त्या रात्री तो अन्नाचा एकही कण न खाताच झोपला. रात्री साधारण १.३० ला प्रभू च्याच रडण्याच्या आवाजाने झोपमोड झाली. आम्ही सगळे उठून त्याच्या जवळ गेलो. माझ्या वडिलांनी त्याला झोपेतून उठवून बेडवर च बसवले. त्याचे डोळे पाहून आम्हाला धक्काच बसला. अतिशय लाल भडक झाले होते. मला वाटले की झोपून उठलाय म्हणून तसे वाटत असावे पण मी नीट पाहिल्यावर कळले की हे काही साधे वाटत नाही. आजीच्या लक्षात आले की त्याला लागिर झालय. इतक्या रात्री आम्ही त्याला कुठे नेऊ ही शकत नव्हतो. ती रात्र तशीच सगळ्यांनी त्याच्या जवळ बसून काढली. 

दुसऱ्या दिवशी सकाळी आजीने स्वतः जाऊन एका बाहेरचे बघणाऱ्या बाई ला बोलवून आणले. ती घरी आली आणि जास्त वेळ न दवडता तयारी सुरू केली. ती घराच्या मधोमध ध्यानस्थ मुद्रेत बसली आणि कसले तरी मंत्र पुटपु टू लागली. थोड्या वेळा नंतर तिने आम्हाला सांगितले की प्रभू ला घेऊन या आणि माझा समोर एका पाटावर बसवा. तसे आम्ही त्याला खोलीतून बाहेर घेऊन आलो आणि तिच्या समोर बसवले. तिने पुन्हा मित्र म्हणायला सुरुवात केली. तसे तो अतिशय वेदनेने रडू लागला. आम्हाला त्याची अवस्था बघवत नव्हती. काही वेळात ती बाई मंत्र म्हणायचे अचानक थांबली आणि म्हणाली ” घात झालाय.. याला कोणी झपाटले आहे ते कळत नाहीये.. पण हे जे कोणी आहे ते तुमच्या पोराला नेणार म्हणजे नेणार..”. तिचे ते वाक्य ऐकून मलाच रडू कोसळलं. उगाच त्या बांगल्या जवळ गेलो. त्यात याला का नेले. आज ही अस्वस्था माझ्यामुळे झाली आहे. विचारचक्र चालू असतानाच आजीच्या बोलण्याने भानावर आलो. आजी तिला उपाय विचारात होती. 

तसे ती बाई म्हणाली की मला थोडा वेळ द्या मी सांगते नक्की काय झालंय ते. ती पुन्हा ध्यान लावून बसली आणि मंत्र पुटपुट लागली. जवळपास अर्ध्या तासानंतर तिने डोळे उघडले आणि म्हणाली ” एक उपाय आहे आणि तो तुम्हाला लवकरात लवकर करावा लागेल. नाही तर याला कोणीही वाचवू शकणार नाही.. हा त्या बंगल्या जवळच्या विहिरी जवळ गेला होता. त्या विहिरीत एका बाळंतीण बाईने उडी मारून आत्महत्या केली होती. तिला तुमचे बाळ हवंय.. तुमचा प्रभू हवाय.. एक उपाय आहे पण तो तुमच्या ने होईल की नाही माहीत नाही..” तसे आजी म्हणालो की पोराला वाचवण्यासाठी आम्ही सांगली ते करू.. तसे ती बाई सांगू लागली आणि मी सुन्न होऊन ऐकतच राहिलो. 

हा काल नेमका त्या विहिरीजवळ गेला ज्या दिवशी तिने तिथे जीव दिला होता. येत्या अमावस्येच्या रात्री तुम्हाला हा उपाय करावा लागेल. एक काळी बाहुली घेऊन त्यावर प्रभू च रक्त लावयच. आणि ती बाहुली तुमच्या कुटुंबातल्या एका व्यक्ती ने त्या विहिरीजवळ नेऊन ठेवायची. जो कोणी हा उपाय करेल त्या व्यक्तीचा ती दिशाभूल करण्याचा प्रयत्न करेल, हाका मा रेल. पण चुकूनही तिच्या हाकेला ओ द्यायची नाही. कदाचित त्या व्यक्ती ला असे काही दृश्य दिसेल ज्याने त्याचे मन विचलित होईल. आमच्या घरी चर्चा सुरू झाली की नक्की कोणी जायचे. माझे वडील तयार झाले पण मी त्यांना म्हणालो की त्याच्या या अवस्थेला सर्वस्वी मी जबाबदार आहे, मी त्याला तिथे घेऊन गेलो नसतो तर हे झाले नसते. पण कोणीही माझे ऐकायला तयार नव्हते. पण मी समजल्यावर ते शेवटी तयार झाले.

अमावस्येचा ची ती रात्र आली. आम्ही सगळी तयारी आधीच करून ठेवली होती. जाताना एकदा माझ्या लहान भावाला पाहिले. त्याला पाहून माझे डोळे ही पाणावले. घरातून निघताना ती बाहुली तीन वेळा त्याच्या अंगावरून उतरवून घेतली आणि देवाचे नाव घेऊन मी बाहेर पडलो. मनात असंख्य विचार येत होते. जस जसे त्या बंगल्या जवळ येऊ लागलो तसे भीती वाढू लागली. पण मी मन घट्ट केलं. माझ्या लहान भावासाठी इतके तर मी नक्कीच करू शकतो. त्या आवारात मी प्रवेश केला आणि तितक्यात प्रभू चा आवाज कानावर पडला “दादा.. वाचव रे मला.. जीव गुदमरतो य माझा.. वाचव मला..” तो आवाज ऐकून काळजात अगदी चर्र.. झालं. मी पुढे चालत राहिलो. त्या विहिरी जवळ आलो आणि समोरचे दृश्य पाहून काळीज भीतीने धड धडू लागले. तो विहिरीच्या कठड्यावर उभा राहून सतत आत डोकावून पाहत होता. मी डोळे विस्फारून समोरचे दृश्य पहात होतो. बघता बघता त्याने आत उडी घेतली आणि मी त्या दिशेने धाव घेणार तितक्यात भानावर आलो. 

त्या बाई ने सांगितलेले सगळे आठवले. हा प्रभू नाही हे सगळे भास आहेत. मला भूलवण्यासाठी माझ्या समोर ही दृश्य उभी केली जात आहेत. मी दबक्या पावलांनी त्या विहिरी जवळ गेलो. संपूर्ण हिम्मत एकवटून खाली वाकलो आणि ती बाहुली त्या विहिरीला टेकून ठेवली. मी मागे वळणार तितक्यात त्या विहिरीतून एक भयानक आवाज ऐकू आला. सांगितलेला उपाय मी केला होता. आणि ती आवाज ऐकल्यानंतर मला तिथे क्षणभर ही थांबायचे नव्हते. मी सरळ घराच्या दिशेने धावत सुटलो. काही अंतर धावत आल्यावर जाणवू लागले की माझ्या मागून कोणी तरी धावत येतंय. पण मी ठरवले होते की काहीही झाले तरी मागे वळून पाहायचे नाही. मी जिवाच्या आकांताने धावत च राहिलो आणि एकदाचा घरी येऊन पोहोचलो. घरी सगळे माझी वाट पाहत होते. मी धावत थेट माझ्या भावाच्या खोलीत गेलो. त्याला मिठीत घेऊन रडू लागलो. तसे त्याचे वाक्य कानावर पडले “काय झाले दादा..?” त्याचे ते एक वाक्य ऐकुन जिवात जीव आला. तब्बल दोन दिवसानंतर तो नीट बोलला होता. पुढच्या काही दिवसात त्याच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली. 

तो पूर्ण बरा झाल्यानंतर मी देवाचे अगदी मनापासून आभार मानले. त्या नंतर मात्र आम्ही कोणीही त्या बंगल्या जवळ फिरकलो सुद्धा नाही. 

Leave a Reply