अनुभव – श्रेयस गायकवाड

घटना जवळपास २ वर्षांपूर्वीची म्हणजे ७ डिसेंबर २०१८ ची आहे. आमचा ८ जणांचा ट्रेकिंग आणि कॅम्पिंग चा ग्रुप आहे. त्यात ४ मुलं आणि ४ मुली आहेत. आम्ही बरेच ट्रेकिंग आणि नाईट कॅम्पिंग केले आहे. पण त्या रात्री सारखा जीवघेणा अनुभव आम्हाला कधीही आला नव्हता. नेहमी प्रमाणे विकेंड ला आम्ही कॅम्पिंग चा प्लॅन केला होता. शुक्रवार असल्याने कामावरून निघायला बराच उशीर झाला. आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा साधारण ११ वाजून गेले होते. गावापासून बाहेरचा परिसर होता आणि त्या परिसरात एक मोठा तलाव होता. तलावापासून काही अंतरावर आम्ही कार पार्क केली होती. आम्ही ट्रेकिंग किंवा कॅम्पिंग करताना कधीही मांसाहार किंवा मद्यपान करत नाही. पण या वेळी कोणत्याही किल्ल्यावर जायचा बेत नसल्यामुळे आम्ही फक्त एन्जॉय आणि पार्टी करायचा प्लॅन केला होता. 

आम्हाला पोहचायला बराच उशीर झाला होता. आम्ही येताना रस्त्यातून चिकन स्टार्टर्स, बिर्याणी, व्हिस्की वैगरे आणली होती. त्यात भर म्हणून आम्ही कच्चे चिकन सुद्धा घेतले. तिथे जाऊन बॉनफायर करायचा आणि

स्वतः चिकन भाजायचे असा आमचा बेत ठरला होता. गावा बाहेरचा परिसर असल्यामुळे सगळी कडे अगदी मिट्ट अंधार पसरला होता. दूर दूर पर्यंत एकही घर किंवा वस्ती नव्हती. आम्हाला कोणालाच त्या जागेचा परिचय नव्हता. पण आमच्या पैकी माझा मित्र सुमित कॅम्पिंग मध्ये अनुभवी होता. आम्ही कार पार्क करून त्या तलावाजवळ आलो. तितक्यात २ कुत्रे आमच्या जवळ आले. मला कुत्रे आवडत असल्यामुळे मी त्यांना बिस्कीट दिले. पण आमच्या सोबत असलेल्या मुलींना आवडले नाही म्हणून आम्ही त्यांना पळवू लागलो. पण तरीही ते जात नव्हते. मला थोडे वेगळेच वाटले. पण नंतर एका मित्राने त्यांना दगड उगारून हाकलून लावले.

तलावा पासून काही अंतरावर एक टेकडीवजा डोंगर होता. तसे आम्ही वर जाऊन तिथेच कॅम्प लावण्याचा प्लॅन केला. काही मिनिटात आम्ही वर पोहोचलो. पण तितक्यात लक्षात आले की आमच्याकडे पाणी फक्त पिण्या पुरता आहे. आम्ही आणलेले कच्चे चिकन धुण्यासाठी पाणी लागणार होते. तसे एक मित्र म्हणाला की आपण जाऊन त्या तलावातून थोडे पाणी घेऊन येऊ. तसे दुसरा मित्र म्हणाला की उगाच फेऱ्या मारत बसण्यापेक्षा, चिकनच तलावावर घेऊन जाऊ आणि तिथून धुवून आणू.. ते बरे पडेल. आमच्या सगळ्यांचे यावर एकमत आले. आम्ही २ ग्रुप केले. माझे २ मित्र आणि २ मैत्रिणी वरच्या बाजूला थांबून कॅम्प बांधणार. मी, सुमित, आणि २ मैत्रिणी खाली तलावावर जाऊन चिकन धुवून आणणार असे ठरले. आम्ही चौघांनी पिशवी घेतली आणि पुन्हा खाली जाऊ लागलो. 

येताना आम्ही ज्या वाटेने आलो होतो त्या ऐवजी आम्ही दुसऱ्या एका वाटेने खाली उतरू लागलो. आमच्या हातात लहान टॉर्च होत्या. त्यानेच वाट काढत आम्ही त्या पायवा टेवरून खाली जात होतो. एका बाजूला गर्द झाडी आणि दुसऱ्या बाजूला उतारावर तलाव दिसत होता. परिसरात कमालीची शांतता होती. थंडीचे दिवस असल्यामुळे वतावरणात थंडावा जाणवत होताच. तितक्यात माझी नजर बाजूच्या गर्द झाडीत गेली आणि तिथेच खिळली. पुसट श्या प्रकाशा त कोणी तरी उभ असल्याचा भास झाला आणि अंगावर शहारे आले. काय होते कळले नाही पण उंची अतिसामान्य होती. मी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण माझी नजरच त्यावरून हटत नव्हती. अस वाटू लागल की ते जे काही आहे त्याने मला नजरेने बांधून ठेवलंय आणि त्याच्या कडे बोलावते य. तितक्यात मला सुमित ने खांद्यावर हात ठेवत हलवत भानावर आणले. 

काही वेळासाठी मी विचारच करत राहिलो की मला जे जाणवले तो फक्त भास होता की खरच तिथे काही तरी होते. आम्ही चालत असतानाच मी ती गोष्ट तिघांनाही सांगितली. आमच्या बरोबरच्या मुली खूप घाबरल्या पण सुमित माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. असे काही नाहीये, तुला फक्त भास झाला बाकी काही नाही असेच म्हणत आज तो ऐकायच्या तयारीत नव्हता. त्याने ठरवलेच होते की हाती घेतलेले काम करूनच मग परत कॅम्प कडे जायचे. आता आमच्यात त्यालाच काय तो कॅम्पिंग चा सगळा अनुभव होता म्हणून त्याचे बोलणे आम्ही ऐकले. काही मिनिटात आम्ही पुन्हा तलावाजवळ पोहोचलो. सुमित ने पिशवीतून चिकन काढले अनित ते धुवायला म्हणून तलावात काही पाऊल चालत थोडे आत गेला. तितक्यात त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. 

मला चांगले माहीत होते की त्याला उत्तम रित्या पोहोता येते पण मला जाणवले की त्याला पाण्यातून बाहेर निघता च येत नाहीये. आम्ही तिघेही घाबरलो. टॉर्च च्याच प्रकाशात नीट काही दिसत नव्हते. मी प्रसंगावधान राखत पाण्यात गेलो आणि त्याचा हात धरून त्याला खेचले तसे तो बाहेर निघाला. एका मैत्रिणीने त्याच्या हातातले चिकन घेऊन पिशवीत ठेवले. आता कोणीही काही बोलत नव्हते. आम्ही त्या भागातून लवकरात लवकर बाहेर पडायचा प्रयत्न करू लागलो. झपाझप पावले टाकत आम्ही त्या पाण्यापासून दूर जाऊ लागलो. तितक्यात ज्या मैत्रिणीच्या हातात पिशवी होती ती अतिशय जोरात ठेच लागून पडली. तिच्या पायातून रक्त येऊ लागले. तिला उठताही येत नव्हते. आम्ही कसे बसे सावरत तिला धरून उभे केले. मी पिशवी घ्यायला खाली वाकलो तर ती पिशवी तिथे नव्हती. अगदी आत्ता काही क्षणापुर्वी तिच्या हातात ती पिशवी होती मग ती गेली कुठे..? मी सुमित कडे पाहिले. आम्हाला दोघांना कळून चुकले की हा प्रकार साधा नाही. 

आता मात्र आम्ही त्या ठिकाणी क्षणभर ही थांबलो नाही. आम्ही वर येऊन पोहोचलो. पण आमचा दुसरा ग्रुप.. तो तिथे नव्हता. कॅम्प ही अर्धवट च बांधला होता. मी त्यांना फोन करायचा प्रयत्न केला पण तिथे मोबाईल ला नेटवर्क नव्हते. आम्ही दोघांचा ग्रुप करून तिथेच वरच्या भागात त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. पण ते कुठे ही दिसत नव्हते. मला कळायला मार्ग नव्हता की सगळे ठरलेले असताना हे असे अचानक कॅम्प सोडून कुठे निघून गेले. शेवटी कंटाळून आम्ही पुन्हा कॅम्प जवळ आलो आणि ठरवले की आता इथेच थांबून त्यांची वाट पाहायची. तितक्यात आम्हाला हाका ऐकू आल्या. ते आम्हाला आवाज देत होते. मी सुमित ला म्हणालो की आपलाच ग्रुप दिसतोय.. आम्ही चौघेही त्या अंधाऱ्या दिशेने चालू लागलो. काही मिनिट चालल्यावर आम्हाला ते नजरेस पडले. ते त्या टेकडीच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन बसले होते.

तसे आम्ही त्यांना आश्चर्याने विचारले “तुम्ही कॅम्प सोडून इथे काय करताय..?.. सुरुवातीला ते काहीच बोलले नाही. बहुतेक खूप घाबरले असावे. पण नंतर एक मित्र सांगू लागला.. “तुम्ही गेल्यानंतर आम्ही कॅम्प बांधायला सुरुवात केली पण आम्हाला विचित्र भास होऊ लागले. आमच्या कानात कोणी तरी आमचेच नाव घेत होते. अगदी कानाजवळ.. पण कोणीही दिसत नव्हते. आणि मलाच नाही हे अगदी सगळ्यांना जाणवले. हिला तर मागून कोणी तरी जोरात धक्का दिल्यासारखे जाणवले आणि आम्ही तिघेही तिच्या समोर उभे होतो. तिथे राहणे आम्हाला ठीक वाटले नाही म्हणून आम्ही इथे आलो.”.. त्याचे बोलणे ऐकून आम्ही सुन्न च झालो. पुढे काय करायचे हा प्रश्न आम्हाला सतावू लागला. एव्हाना रात्रीचा १ वाजत आला होता. तितक्यात काही कुत्रे कॅम्प च्या दिशेला पाहून भुंकू लागले. विचार केला की सरळ कार घेऊन इथून निघावे पण कार ची चावी कॅम्प जवळ पडलेल्या बॅग मध्ये होती. 

कोणाचीही तिथे जाण्याची हिंमत नव्हती. जाण्याची काय पण नुसते टॉर्च मारून त्या दिशेने पाहायला ही कोणी तयार नव्हते. पण तिथे जाण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता कारण संपूर्ण रात्र तिथे थांबणं शक्य नव्हत. आता मात्र आम्ही ठरवले की काहीही झाले तरी वेगळे व्हायचे नाही, एकत्र राहायचे आणि य सगळ्या प्रकाराला एकत्र सामोरे जायचे. आम्ही आठही जण उठलो आणि कॅम्प च्याच दिशेने चालू लागलो. काही मिनिटात आम्ही तिघे येऊन पोहोचलो भीतीने अंगावर शहारे येत होते. आम्ही पाहिले की खायला आणलेल्या सगळ्या गोष्टी, व्हिस्की च्याच बाटल्या सगळे गायब झाले होते.. आम्ही चावी असलेली बॅग आणि हाताला येईल ते सामान उचलले. आणि तिथून चाल मांडली. पण इतक्यात आमची सुटका होणार नव्हती याची आम्हाला साधी कल्पनाही नव्हती. 

आमच्यात ली जी मैत्रीण काही वेळा पूर्वी पाय घासरून पडली होती ती अचानक वेगळ्या आवाजात बोलू लागली. शिव्या देऊ लागली. मला कोंबडी द्या, दारू द्या असे बोलू लागली. आता मात्र आम्हा सगळ्यांची चांगलीच जिरली. हे सगळे खूप भयंकर होते. तिला आम्ही धरून ठेवले होते. कारण ती बाजूच्या त्या गर्द झाडीत जाण्याचा प्रयत्न करत होती. आम्ही पुरते फसलो होतो. तिला सोडून जाणे ही शक्य नव्हते. तिथे थांबलो तर आमच्यापैकी कोणाला काय होईल हे सांगता येणार नव्हत. इतक्यात सुमित ला काय वाटले माहित नाही. तो म्हणाला आपण कुत्रांच्या जवळ जाऊन थांबू. तसे ही आमच्या कडे काही पर्याय देखील नव्हता. आम्ही तिला तसंच खेचत त्या बाजूला घेऊन गेलो. तशी ती अजून शिव्या देऊ लागली. एका मुलीच्या हातावर ती चावले सुद्धा.

पण जसे आम्ही त्या कुत्र्यांजवळ पोहोचलो तशी ती एकाएकी बेशुद्ध झाली. आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. तिच्या वर पाणी मारून तिला उठवायची आमची हिम्मत नव्हती. आम्ही सगळे भीतीने आणि झालेल्या धावपळीमुळे खूप थकून गेलो होतो. या मंतरलेल्या भागातून बाहेर पडण्याची ताकद उरली नव्हती. वेळेचे भान राहिले नव्हते. आम्ही तिथेच आडोसा बघून थोड्या वेळ बसलो. बसल्या बसल्या आमचा कधी डोळा लागला कळलेच नाही. पहाटे ५ च्या सुमारास आम्हाला जाग आली. आता बऱ्यापैकी उजेड झाला होता. पण तिथे ते कुत्रे नव्हते. आता ती मैत्रीण सुद्धा उठली पण तिचे वागणे नीट वाटत होते.. फक्त रडत होती. तिला धीर देत आम्ही राहिलेले सामान घेण्यासाठी कॅम्प जवळ गेलो. तर तिथे ते दोघेही कुत्रे बसले होते.

आम्ही आमचा सामान आवरलं. कॅम्प पुन्हा पॅक केला आणि कार कडे निघालो. ते दोन्ही कुत्रे आम्हाला कार पर्यंत सोडायला आले. मला खरंच त्यांचं कुतूहल वाटत होत. आम्ही तिथून ५-१० मिनिटे ड्राईव्ह करून गावातील एका चहाच्या दुकानावर थांबलो. काल संध्याकाळ पासून काहीही खाल्ले नव्हतं. त्यामुळे भुकेने जीव व्याकूळ झाला होता. त्या टपरीवर चहा, बिस्कीट जे काही मिळेल ते खाऊन थोडी भूक भागवली. पण मध्येच माझी मैत्रीण पुन्हा रडू लागली. तिला घडलेला प्रसंग आठवला असावा. तेव्हा त्या तपरीवाल्याने विचारपूस केली. आम्ही घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. तेव्हा त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या.. ते म्हणाले त्या टेकडीवर आणि तलावाच्या भागात अनेक अतृप्त आत्मे आहेत. काल रात्री अमावस्या लागणार होती. 

अमावास्येच्या आदल्या रात्री तलावावर दिवा लावून उतारा दिला जातो. तिथे असलेल्या आत्म्यांसाठी उतारा देताना मांस आणि बिडी अश्या गोष्टी दिल्या जातात. तिथे असलेल्या राखणदारासाठी लावला दिवा ही जातो. अमावास्येला तिथे गावातल कोणीही जात नाही. आणि समजा तिथे कोणी गेलेच आणि अडकलेच तर कुत्रे मदत करतात. वाट दाखवतात. गावातले लोक म्हणतात की कदाचित रखवालदाराचं त्यांना पाठवतो. सगळे थकलेलो असल्यामुळे, जवळचं एक हॉटेल बघून तिथे आम्ही आराम केला आणि संध्याकाळी घरच्या वाटेला लागलो..

Leave a Reply