ही गोष्ट आहे २००४ ची. अनुभव माझ्या आईसोबत घडला होता. मी तेव्हा ९ वर्षांची असेन. दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर आम्ही सगळे 2 महिने गावी जायचो. आमचे कुटुंब तसे खुप मोठे होते म्हणजेच ३० जणांचे. रोज रात्री जेवल्यानंतर आम्ही सगळी भावंडे बाहेर गप्पा मारत बसायचो. माझी आई व काकू रोज रात्री जेवल्यानंतर बाहेर शतपावली मारायला जात असत. आमचे घर रस्त्याच्या जवळच असल्यामुळे त्या दोघी रोज रात्री तिथेच चालायला जात असत. एके दिवशी जेवण आटोपून आईने काकू ला हाक दिली आणि घरातून बाहेर गेली. मी घरात आजी सोबत गप्पा मारत बसले होते. २०-२५ मिनिटे झाली असतील, आजी आणि मी आम्ही दोघी उठून बाहेर आलो. तेव्हा पाहतो तर काय काकू बाहेर अंगणात खुर्चीवर एकटीच बसली होती. आजीला जरा आश्चर्यच वाटल कारण रोज रात्री त्या दोघी सोबत जात असत.

मग आज ही एकटीच इथे का बसली आहे असा विचार आजीच्या मनात आला. आजीने जवळ जाऊन काकू ला विचारले, काय ग, तु का नाही गेलीस आज. तेवढ्यात काकू म्हणाली, “अहो आई मी एकटीच कुठे जाऊ, कारण वहिनी तर घरातच आहेत ना? आज तर त्या मला बोलवायलाच नाही आल्या. त्यांचीच वाट पाहत मी थांबले आहे. मला वाटले कामे उरकली नसतील त्यांची अजुन, म्हणून आज जायचे नसेल.” तिचे ते बोलणे ऐकून आजीला जरा विचित्र च वाटले. तिला एक वेगळाच संशय येत होता. तिने पटकन बाहेर ठेवलेल्या चपला घातल्या आणि रस्त्याच्या दिशेने पटापट चालू लागली. घरापासून काही अंतर पुढे चालत गेल्यावर तिला आई कोणासोबत बोलत असताना उभी दिसली. अंधार असल्यामुळे आणि झाडी झुडूपांचा परिसर असल्यामुळे समोर कोण आहे ते नेमक दिसत नव्हत. त्यामुळे आजी तिच्या जवळ चालत जाऊ लागली. 

पण ती आईच्या जवळ जात असताना तिला काही तरी वेगळेच जाणवत होत, त्यामुळे आजीने एका झुडपाच्या आड लपून बघायचे ठरवले. ती बघत असतानाच समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला दिसले की, माझी आई तिथे कोणाशी तरी गप्पा मारत आहे. पण नीट निरखून पाहिल्यावर तिला कळले की तिथे आईच्या समोरच काय तर आजुबाजूला कोणीही नाहीये. ते सारे पाहून आजीला खुप भीती वाटू लागली पण तिच्या कडे दुसरा पर्याय नव्हता. सगळे बळ एकवटून आजी आईजवळ गेली व जास्त काही न बोलता फक्त एवढेच म्हणाली की, अगं लवकर घरी चल, तुझ्या वडिलांचा फोन आलाय, आपल्या लॅन्डलाईन वर. कारण आजीला कळून चुकले होते की जर इथे जास्त काही बोलत बसलो तर आमच्या दोघींचे काही खरं नाही. आजी आईला पटकन घरी घेऊन आली व घडलेला सर्व प्रकार घरी सांगितला. तेव्हा पासून आजपर्यंत माझी आई त्या भागात कधीच रात्री जात नाही.

Leave a Reply