अनुभव माझ्या सोबत आमच्या गावी घडला होता. गावी आमच्या घरा समोरच माझे चुलत काका, त्यांची बायको आणि दोन मुली रहायच्या. म्हणायला गेलं तर जून कौलारू घर होत त्यांचं. त्यांची मोठी मुलगी माझ्याच वयाची होती. आम्ही जवळच राहत असलो तरीही त्यांच्याकडे जास्त येणं जाणं नव्हत. त्यामुळे बोलणं ही क्वचितच व्हायचं. गाव बऱ्यापैकी मागासलेले होते. विजेचा ही काही पत्ता नसायचा. अगदी अनियमित, वीज कधी येईल कधी जाईल काहीच सांगता यायचे नाही. त्या काळी गावी सरकार तर्फे मोफत शौचालय बांधून देण्याची योजना राबविण्यात आली होती. गावकऱ्यांनी त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला. त्यातच काकांनी शौचालयच बांधकाम चालू केलं. शौचालय बांधायला कॉन्ट्रॅक्टर ने मजूर नेमले होते जे एक एक करत सगळी कामे करायचे. जे कामगार आले होते, त्यातल्या एका मजुर मुलावर काकांच्या मुलीचं प्रेम जडल. काही दिवसात च त्यांचं प्रेम प्रकरण खूपच पुढे गेलं. त्यामुळे अवघ्या काही आठवड्यात त्यांनी काम संपताच पळून जाण्याचा निर्णय घेतला.

कारण काका हे मान्य करणार नाहीत याची तिला कल्पना असावी. त्याचे काम पूर्ण होताच ती काकींचे सर्व दागिने आणि घरातील होते ते पैसे घेऊन त्या मुलासोबत पळून गेली. तिच्या घरच्यांना किंवा आम्हाला कसलीच माहिती नव्हती. त्यामुळे ती कुठे निघून गेली याचा पत्ताच नव्हता. घरच्यांनी बराच शोध घेतला पण ती काही सापडली नाही. बराच अवधी उलटला. काही महिन्यांनी ती घरी आली तेव्हा सगळा प्रकार कळला. घरी येऊन तिने सांगितले की ती गरोदर आहे आणि त्या मुलाने तिची जबाबदारी घेण्याचे नाकारले आहे. घरच्यांनी नाचक्की होईल म्हणून हे त्यांनी जवळच्या नातेवाईकांशिवाय इतर कोणालाच सांगितले नाही. पण या पुढे खूप वाईट घटना घडली. एके दिवशी काका काकी घरी नसताना तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. असा प्रकार घडल्यामुळे खरी गोष्ट पुर्ण गावात वाऱ्या सारखी पसरली. संपूर्ण गाव या गोष्टी ने हादरले. काही महिन्यातच तरुण मुलगी गेल्याच्या दुःखाने काका सुद्धा हृदय विकाराच्या झटक्याने गेले. या सगळ्या गोष्टी ला वर्ष उलटून गेलं होत. आणि आम्ही सगळे गणेशोत्सवासाठी गावी आलो होतो.

बाप्पांचे आगमन व्हायला 3 दिवस बाकी होते. त्या काळी मी गावी लवकरच उठुन विहिरी वर पाणी आणायला जायचे. म्हणजे आमचा दिनक्रम ठरलेला असायचा. त्या दिवशी ही मी पहाटे 5 वाजता उठले, अंघोळ केली आणि पाणी भरायला काही भांडी घेऊन घरा बाहेर पडले. मी आमच्या अंगणात असेन. पहाटे ५ वाजले असल्यामुळे नीट से उजाडले ही नव्हते. त्यामुळे बऱ्यापैकी अंधार होता. महीत नाही का पण माझ लक्ष त्या काकांच्या घरा कडे गेलं आणि मी तिथे पाहतच राहिले. त्या बांधलेल्या शौचालया जवळ मला एक मुलगी उभी दिसली. केस मोकळे सोडून  पाठमोरी होती आणि त्या घरा कडे पाहत होती. मी आधी विचार केला की इतक्या पहाटे ही कोणती मुलगी अशी बाहेर उभी आहे.

पण तितक्यात मला वर्ष भरा पूर्वीचा प्रसंग आठवला आणि माझ्या पाया खालची जमीनच सरकली. सर्वांगाला घाम फुटला. मी दबक्या पावलांनी पुढे चालत गेले तसे फक्त तिरक्या नजरेने माझ्या कडे पाहिले. माझी भीती खरी ठरली. ती दुसरी तिसरी कोणी नसुन माझ्या चुलत काकांची तीच मुलगी होती जिने वर्ष भरापूर्वी स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. काकांच्या म्हणजे तिच्या घराकडे एकटक पाहत होती. मी कसलाच विचार न करता हातातली भांडी तिथेच अंगणात टाकून उलट फिरले आणि घरात पळाले. थेट येऊन अंथरुणात शिरले. सर्वांग भीती ने थरथरत होत. काय पाहिलं यावर विश्वास बसत नव्हता. त्या दिवशी कोणालाच काही सांगितले नाही. संपूर्ण दिवस घरात च बसून काढला. रात्री मी लवकर झोपून गेले. पण काही केल्या त्या रात्री मला झोप लागत नव्हती. कदाचित पहाटे घडलेल्या प्रसंगामुळे असेल. तरीही मी अंथरुणात पडून राहिले होते. 

रात्री २ च्या सुमारास कसल्याश्या आवाजाने जाग आली. अंथरुणातून उठण्याची अजिबात इच्छा नव्हती पण तरीही त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागले तसा तो आवाज स्पष्ट होऊ लागला. कोणीतरी रडत असल्याचा आवाज होता तो. जो माझ्या खोलीच्या खिडकी बाहेरून येत होता. मी सकाळचा प्रसंग आठवून खूप घाबरले. आई बाबांना उठविण्याचा विचार केला पण नंतर वाटले की उद्या सांगेल. बऱ्याच वेळा नंतर तो आवाज बंद झाला आणि खटकन असा खिडकीचा आवाज झाला. मी घाबरून पांघरूण घेऊन डोळे बंद केले आणि झोपायचा प्रयत्न करू लागले. आणि माझ्या डाव्या बाजूला तसाच रडण्याचा आवाज येऊ लागला. आता मात्र माझी सहन शक्तीच संपली होती. डोकं सुन्न झालं, अंगातला सगळा त्राण च संपला होता.

ओरडायचा प्रयत्न केला पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता. मी हळूच डोळे उघडुन पाहण्याचा प्रयत्न केला तर ती मुलगी माझ्या अगदी उश्या शी बसून रडत होती. अधून मधून मला बोलवत होती. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि या सगळ्या प्रकारात भीती मुळे मला भोवळ आली. माहीत नाही किती तास मी बेशुद्ध होते. सकाळी कधी तरी आई ने तोंडावर पाणी मारून उठवले तेव्हा मी दचकून उठले. कदाचित आई ने बराच वेळ मला उठवण्यासाठी हाका मारल्या असाव्यात. त्या दिवशी घरात शुभ कार्य होत, गणपती बसणार होते म्हणून मी कोणाला काहीच सांगितले नाही. विचार केला की नंतर सांगेल घरात जो पर्यंत गणपती बसले होते त्या दिवसांत मला तसले काहीच जाणवले नाही. पण गणपती विसर्जनानंतर मी आई बाबांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. 

घडलेल्या विचित्र गोष्टी ऐकून ते सुद्धा थोडे घाबरले. आम्ही गाव देवीच्या मंदिरात जाऊन तिथल्या पुजाऱ्यांना हे सगळे सांगितले. त्यांनी मला देवीचा अंगारा दिला आणि रात्री झोपताना उशाखाली ठेवायला सांगितले. त्या नंतर मला कधीच तस जाणवलं नाही. पण गावात विचारल्यावर कळले की ती मलाच नाही पण गावातल्या बऱ्याच जणांना रात्री अपरात्री त्यांच्या घराजवळ दिसते. आज त्या गोष्टीला जवळपास ६ ते ७ वर्ष झाली पण आजही कधी गावी गेली की त्या घराकडे पाहण्याची साधी हिम्मत ही होत नाही. आणि चुकून लक्ष गेलं की घडलेला सगळं प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. 

Leave a Reply