अनुभव – पावन म्हात्रे

मी सध्या राहायला मुंबईला आहे.. मी साधारण ११ ते १२ वर्षांचा असेन.. मी मूळचा साताऱ्याचा. आमचे गाव आता बऱ्यापैकी डेवलप आहे पण त्या काळी ते अगदीच खेडे गाव होते. कसल्याच सोयी सुविधा नसलेले. तेव्हा आम्ही शेती करायचो. माझा मित्र अलंकार याच्या शेतावर वस्ती लागायची. गावात वीज नसायची त्यामुळे संपूर्ण रात्र गडद अंधारात च घालवावी लागायची. साहजिकच कंदील किंवा दिवा वैगरे असायचा सोबत पण त्याने कितीसा फरक पडणार. आम्हाला भुतांच्या गोष्टी करायला खूप आवडायचं. म्हणून मग मित्राची आजी आम्हाला वेग वेगळ्या गोष्टी सांगायची. मी ही त्यांच्याकडे गोष्ट सांगण्यासाठी हट्ट करायचो. त्या दिवशी मी सहज म्हणून मित्राकडे झोपायला गेलो होतो. तेव्हा आजीने आम्हाला एक विचित्र गोष्ट सांगितली जी मला अगदी आज पर्यंत लक्षात राहिली. त्या वेळी जाणवलेली भीती अगदी आजही तशीच मनात घर करून आहे.

गोष्ट गावातल्याच एका तरुणाची. त्याच नुकताच लग्न झालं होत आणि नोकरीच्या शोधात शहरात आला होता. कसलेही व्यसन नव्हते त्याला. शिक्षण चांगले झाले असल्याने त्याला काही दिवसातच चांगली नोकरी मिळाली. तसे लगेच एक भाड्याचे घर राहायला घेतले आणि आपल्या बायकोला ला ही शहरात बोलावून घेतले. सगळे काही सुरळीत चालू होते. या सगळ्यात दीड ते दोन वर्ष उलटली. त्याची आर्थिक परिस्थिती ही आता चांगली झाली होती. पण नंतर मात्र हळु हळू गोष्टी वेगळ्याच वळण घेऊ लागल्या. लग्नाला २ वर्ष होऊन गेली तरी त्यांना मूल होत नव्हत. त्यामुळे त्याच्या घरून सतत त्याला आणि त्याच्या बायकोला बोललं जायचं. या एका कारणामुळे ती गावी जाणे ही टाळू लागला. 

तो जिथे नोकरी करत होता तिथल्या वरिष्ठांची बदली झाली आणि एक नवीन व्यक्तीला नेमले गेले. तो व्यक्ती स्वभावाने इतका विचित्र होता की सतत सगळ्यांना बोलत असायचा. काम झाले नाही की सगळ्यांसमोर शिवी गाळी करून अपमान करायचा. इतकेच नाही तर काम पूर्ण करण्यासाठी संपूर्ण रात्र थांबवून घ्यायचा. हा त्याच्या अश्या वागण्यामुळे खूप वैतागला होता. त्याच्या स्वभावात ही बदल झाला होता. सतत चिडलेला असायचा. घरी आल्यावर रोजच भांडण व्हायचं. त्यामुळे ना कामावर मन शांत असायचं, ना घरी गेल्यावर. शेवटी आठवडा भराची सुट्टी टाकून त्याने गावी जायचं ठरवलं. म्हणजे थोडे दिवस का होईना पण यातून सुटका मिळेल. पण गावी गेल्यावर ही आई वडिलांचे सुरू झाले.

नातवाचे तोंड बघायला मिळेल का आम्ही जिवंत असे पर्यंत की नशिबात नाही आमच्या, काही प्रयत्न सुरू आहेत का की अजुन फक्त विचार च करताय अस बोलून सतत हिणवत होते. काही दिवस आराम मिळेल असा विचार करून आला होता पण इथे ही त्याला सतत बोललं जायचं. याच कारणामुळे एके दिवशी घरात खूप कडाक्याचे भांडण झाले आणि विकोपाला गेले. रागारागात तो गावाच्या वेशीवर असलेल्या नदीवर गेला आणि आत्महत्या करून सगळेच कायमचे संपवायचे ठरवले. अश्या वेळी नेहमी कोणाशी बोलून मन मोकळं करायचं असतं पण त्याच्याशी बोलण्यासाठी कोणीही नव्हत. मन घट्ट केले आणि नदीत उडी घेणार तितक्यात मागून आवाज आला “ थांब.. काय झालंय “ एका अनपेक्षित आवाजाने तो थांबला. त्याने बाजूला वळून पाहिले. एक साठी ओलांडलेला माणूस उभा होता. पेहराव काहीसा वेगळा होता. भस्माने माखलेले शरीर, केसांच्या लांब जटा जणू एखादा अघोरी असावा. 

तो व्यक्ती म्हणाला “ जीव देऊन काय मिळणार आहे..? “ तो एकदम शहारला. आपण काय करत आहोत हे याने कसे ओळखले असा विचार करून झटकन मागे झाला. त्याने एक एक करत सगळ्या समस्या त्याच्या समोर सांगून टाकल्या. त्यावर तो अघोरी म्हणाला “ माझ्याकडे एक उपाय आहे पण तो सरळ नाही.. माझा पेहराव पाहून तुला कळले असेल की मी साधा सुधा व्यक्ती नाही मी एक अघोरी आहे, स्मशानात वेग वेगळ्या प्रकारच्या विधी करून मी काही सिद्धी प्राप्त केल्या आहेत. माझा एक ही उपाय आज वर वाया गेला नाही.. “ कसलाही विचार न करता त्याने सगळ्या समस्यांवर उपाय काय आहे हे विचारले. त्या अघोरी ने त्याचा हात धरला आणि वेशी वर असलेल्या एका स्मशानात घेऊन आला. तिथे पसरलेल्या राखेत आपल्या जवळच्या लाकडाच्या काठी ने एक चौकोन आखला आणि त्यात बसायला सांगितले. त्याच्या झोळीतून काही सामान काढून समोर ठेवले आणि मंत्रोच्चार सुरू केला.

तो तरुण हा सगळा प्रकार अचंबित होऊन पाहतच राहिला. त्याने झोळीतून एक काचेची बाटली काढली ज्यात दुधासारखे दिसणारे द्रव्य होते. तो अघोरी म्हणाला “ ही बाटली सांभाळून ठेव.. दोन किंवा तीन वर्षांच्या मेलेल्या मुलाचा देह शोधून तुला हे पाजावे लागेल. त्या नंतर तो दर अमावस्येला तुझ्या कडे येईल. तेव्हा तुला त्याला यातले दूध पाजावे लागेल. दूध पाजल्यानंतर तुझी इच्छा त्याला सांग, तुला काय हवेय ते सांग. तू जे मागशील ते तुला मिळेल.. “ इतके बोलून झाल्यावर त्याने मंत्रोच्चार थांबवला. त्या आघोरीला पैसे देऊ केले पण त्याने ते नाकारले आणि तिथून निघून गेला. ती दुधाची बाटली घेऊन घरी यायला निघाला. तितक्यात समोरून एक अंत यात्रा येताना दिसली. एका तीन वर्षाच्या लहान मुलाला देवाज्ञा झाली होती. त्याचे प्रेत स्मशानात आणण्यात आले आणि त्यावर विधी केले गेले. 

काही वेळानंतर त्याला स्मशाना च्या मागच्या बाजूला मेलेल्या लहान मुलांना पुरण्याची जागा होती तिथे पुरले गेले. तो बरेच तास तिथे लांब उभा राहून सगळे पाहत होता. सगळ्यांची जाण्याची वाट पाहत होता. दोन अडीच तासानंतर ते सगळे निघून गेले. तसे याने पटकन जाऊन त्या पुरलेल्या देहाला बाहेर काढले. आपल्या मांडीवर घेत त्याचे तोंड उघडले आणि त्या बाटली तले काही थेंब दूध ओठांवर ओतले. तसे त्या मुलाचे प्रेत अचानक ते दूध जिभेने चाटू लागले. तो एकदम घाबरला आणि ते प्रेत तसेच टाकून गावाच्या दिशेने धावत सुटला. घरी आला आणि थेट झोपून गेला. बायको विचारात होती पण तो जे भयानक कृत्य करून आला होता त्या बद्दल त्याला सांगता ही येत नव्हत. थेट दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि बायकोला म्हणाला की आजच आपल्याला पुन्हा शहरात जावे लागेल. मिळेल ती एस टी पकडुन ते शहरात आले.

संपूर्ण दिवस तो बायकोशी काहीच बोलला नाही. घरातच बसून होता. रात्री जेवताना बायको फोन वर बोलत होती तेव्हा कळले की आज रात्री अमावस्या सुरू होतेय. तो एकदम दचकला. कारण त्या अघोरी ने सांगितल्या प्रमाणे तो मुलगा आज त्याच्याकडे येणार होता. मनात एक वेगळीच चलबिचल सुरू झाली. कसे तरी जेवण उरकून तो झोपायला गेला पण काही केल्या झोप लागत नव्हती. घड्याळाच्या ठोक्यांचा आवाज आज जास्तच जाणवत होता. १२ वाजून गेले आणि अचानक दारावर एक हलकी थाप पडली. तो खाडकन उठून बसला. काळीज भीतीने जोर जोरात धड धडु लागले. भास झाला की खरंच दारावर थाप पडली या विचारात असतानाच पुन्हा एक थाप जाणवली आणि त्याचा भ्रम दूर झाला. आता मात्र त्याला काही सुचेनासे झाले. त्याने आपल्या बायकोला उठवून सगळा प्रकार सांगितला. तिला विश्वास बसत नव्हता पण बऱ्याच प्रयत्नानंतर तिला पटले. 

या सगळ्यात अर्धा तास उलटून गेला होता आणि दारावर थापा पडणं सुरूच होत. ते दोघं ही उठून बाहेरच्या खोलीत गेले आणि हळूच दार उघडल. खाली लक्ष गेलं आणि ते दोघे ही हादरले. त्याच्या डोळ्यांवर तर विश्र्वासच बसत नव्हता. कारण त्याच लहान मुलाचा देह त्याच्याकडे पाहून हसत होता. त्याचे डोळे बन होते पण जणू तो सगळ काही पाहू शकत होता. तो मुलगा आशेने त्याच्याकडे पाहू लागला. पटकन त्याने आपल्या खिशातून ती दुधाची बाटली काढली आणि काही थेंब त्याच्या ओठांवर टाकले. जिभेने आत ओढत त्याने एक स्मित हास्य केलं. तसे पटकन त्याने सांगायला सुरुवात केली.. मी जिथे नोकरी करतो तिथे मला खूप त्रास होतो. माझे वरिष्ठ मला खूप त्रास देतात, काम करून ही खूप अपमान सहन करावा लागतो, तू कर काही तरी.. त्याने पुन्हा एकदा स्मितहास्य केलं आणि निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला आणि कामावर गेला. गेल्या गेल्या त्याला बातमी कळली की आज सकाळी त्याच्या वरिष्ठांचा अपघातात मृत्यू झाला. काय करावं काही सुचत नव्हत. काल रात्री चा प्रसंग आणि आता सकाळी ही बातमी. तो अस्वस्थ झाला. तो दिवस जेमतेम कसा तरी काढला. घरी आला. काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता कारण राहून राहून मन खात होत. आपण कोणाच्या तरी मृत्यूला जबाबदार आहोत यासाठी. दोन ते तीन दिवस असेच गेले. या सगळ्यात त्याचे प्रमोशन झाले आणि हळु हळू त्याला या गोष्टीचा विसर पडला. आता तो फक्त अमावस्ये ची. प्रत्येक वेळी काही तरी वेगळं मागायचा आणि या ना त्या कारणाने ते त्याला मिळायचे. एकदा तर तो गावी आला आणि घरी सगळा प्रकार सांगितला. त्यामुळे च या सगळ्या गोष्टी शेजारी आणि गावातल्या लोकांना कळल्या. या सगळ्यात तो हे विसरून गेला होता की त्या बाटली मधले मंतरलेले दूध संपल्यावर मग तो काय करणार. पण नियतीच्या मनात काही तरी भयंकर लिहून ठेवले होते. 

एका अमावस्येच्या रात्री त्या मुलाच्या प्रेताला दूध पाजत असताना त्याच्या हातातून बाटली सटकली आणि खाली पडून फुटली. ते प्रेत खाली सांडलेले दूध चाटू लागले. तसे घाबरून दरवाजा त्याने बंद केला. त्याला लक्षात आले की ही वेळ आपल्यावर येणार होती याचा आपण विचारच केला नव्हता. दुसऱ्या दिवशी थेट गावात गेला आणि त्या अघोरी माणसाचा शोध घेऊ लागला. पण तो अघोरी त्याला सापडलाच नाही. कोणाची मदत घेऊ तेच कळत नव्हते त्याला. शेवटी तो हताश होऊन घरी आला. आत पुढच्या अमावस्येला काय होणार याची भीती मनात घर करू लागली. काही दिवस राहिले होते पण कोणाची मदत मिळत नव्हती.. गावात त्याच्या आई वडिलांनी ही सगळी कडे विचारपूस करायला सुरुवात केली होती. तसे त्यांना एका जाणकार व्यक्ती कडून उपाय मिळाला. दुसऱ्याच दिवशी ते त्या व्यक्ती ला घेऊन शहराकडे निघाले. पहाटे तिथे पोहोचले आणि पाहतात तर काय.. दोघांनी ही गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी येत्या अमावास्ये ची वाट च पाहिली नाही. त्या आधीच आपले जीवन संपवले होते. अस म्हणतात की अश्या अघोरी आणि काळ्या जादूची मदत घेणाऱ्यांचा असाच दुर्दैवी मृत्यू होतो..

Leave a Reply