आपण राहत असलेल्या ठिकाणी सगळे काही ठीक भासत असले तरीही कधी कधी त्या जागेत काय दडून बसले असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. बहुतेक वेळा आपण गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेत नाही आणि मग असे काही भयानक अनुभव वाट्याला येतात जे आपल्याला कायमची शिकवण देऊन जातात.  असाच हा एक भयाण अनुभव..

अनुभव – निहार पाटील

अनुभव साधारण ३-४ वर्षांपूर्वीचा आहे. कोविड आणि लॉक डाऊन च्या आधीचा. आम्ही एका सोसायटी मध्ये राहायचो. आई मला नेहमी बोलायची की संध्याकाळ नंतर सोसायटीच्या मागे जाऊ नको आणि मी नेहमी या ना त्या कारणाने तिचे बोलणे टाळायचो. मला चांगलेच आठवतेय नवरात्री चे दिवस होते, त्यामुळे आम्हा मित्रांनी रात्री जागरण करायचे ठरवले. आधी बिल्डिंग च्या मागे बसून गप्पा करू आणि संपूर्ण रात्र तिथेच घालवू असे ठरले. पण मग खायला ही काही हवे असे एक जण बोलला आणि मग काय.. नॉन वेज चा बेत झाला. आम्ही जवळपास तीन सव्वा तीन पर्यंत गप्पा केल्या आणि आणलेले नॉन वेज खाल्ले. साडे तीन च्या सुमारास आम्ही सगळे घरी आलो. मला खूप झोप आली होती म्हणून मी बाहेरच्या खोलीत च सोफ्यावर झोपून गेलो. काही वेळाने अचानक आई आली आणि मला उठवू लागली. मी झोपेच्या ग्लानीत होतो.

ती मला म्हणाली की मागच्या बाजूला कपडे सुखवायची क्लिप पडली आहे ती जाऊन घेऊन ये. मी झोपेत असल्यामुळे जरा रागातच म्हणालो “ अग ही काय वेळ आहे का आणायची.. ? मी सकाळी जाईन. आता मला झोपू दे “ पण ती ऐकतच नव्हती. सतत म्हणत होती की “ जा लवकर उठ आणि घेऊन ये “. शेवटी मी नाईलाजाने उठलो आणि घरातून बाहेर आलो. डोळ्यांवर प्रचंड झोप होती त्यामुळे जणू एखादे स्वप्न पाहतोय की काय असे वाटत होते. नवरात्री असल्यामुळे बिल्डिंग च्या आवारात देवी बसवली होती पण इतक्या रात्री मांडवात कोणी नसल्याने सगळे अगदी ओस पडले होते. मी बिल्डिंग च्या मागे आलो. डोळे चोळत च चालत होतो. पण का कोण जाणे मला वेगळेच जाणवत होते. माझ्या प्रत्येक पावला सोबत एक वेगळीच चाहूल भासू लागली. जसं कोणी तरी माझ्यावर नजर ठेऊन आहे. या आधी मला असे कधीच जाणवले नव्हते. 

एक तर तीन सव्वा तीन होत झाले होते त्यामुळे सगळी कडे शुकशुकाट पसरला होता. वातावरण प्रत्येक क्षणाला गूढ बनत चालले होते. तितक्यात एक थंडगार हवेची झुळूक अंगाला स्पर्शून गेली. मी एकदम शहारलो. तितक्यात मला क्लिप दिसली. मी पटकन ती उचलली आणि माझ्या फ्लॅट च्या खिडकीत बघायला वर पाहिलं. मला वाटले की आई उभी असेल मला पाहत असेल पण ती बहुतेक झोपायला निघून गेली होती. तसे माझे लक्ष नकळत बिल्डिंग च्या टेरेस वर गेलं. तर तिथे कोणी तरी उभ होत. मनात विचार डोकावून गेला की अश्या अवेळी कोण असेल. पण वेळेचे गांभीर्य लक्षात घेता मी बघून न बघितल्या सारखे केले आणि पुन्हा जायला निघालो. मी जशी चालायला सुरुवात केली तसा आजू बाजूला अंधार गडद होऊ लागला. जणू काही सोसायटी मध्ये लाईट गेली आहे. वातावरणातला गारवा खूप वाढला होता.

अचानक सगळी कडे धुके पसरू लागले. जो आकार मी काही वेळा पूर्वी टेरेस वर पाहिला होता तो आता मला माझ्या समोर दिसू लागला. मी प्रचंड घाबरलो. मी तिथून धावत सुटलो पण मला मार्गच दापदात नव्हता इतके धुके दाट झाले होते. शेवटी मी घाबरून एका कोपऱ्यात बसून राहिलो. पण पुढच्या मिनिटाला माझ्या बाजूला पाहिलं तर एक बाई बसलेली दिसली. नव्वारी साडी घातली होती. लांबसडक केस जे चेहऱ्यावर पसरले होते. मी तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागलो तसे झटकन मान करून तिने वर पाहिले. त्या केसांमधून मला फक्त तिचे लाल भडक डोळे दिसले आणि माझी बोबडीच वळली. मी घाबरून जोरात ओरडायचा प्रयत्न करू लागलो पण माझ्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. मी हात पाय मारत राहिलो आणि मला जाग आली. पाहिले तर मी माझ्या घरीच होतो. म्हणजे जे सगळे घडले ते स्वप्न होते. 

घड्याळात वेळ पाहिली तर बरोबर ३.४० झाले होते. मी तसाच झोपून गेलो. या स्वप्ना बद्दल कोणाला काहीच सांगितले नाही. मी ठरवले होते की आता पुन्हा बिल्डिंग च्या मागच्या बाजूला जायचे नाही. पण मित्राच्या सांगण्यावरून मी पुन्हा तिथे गेलो. साधारण दहा साडे दहा ला मी घरी आलो आणि झोपून गेलो. त्या रात्रीच्या तुलनेत मी आज लवकर आलो होतो. माझे वडील आत बेडरूम मध्ये झोपले होते आणि आई गावी गेली होती. मी उशिरा आल्यामुळे बाहेर सोफ्यावर च झोपून गेलो. रात्री कधी तरी मला जाग आली आणि जाणवले की माझ्यावर कोणी तरी नजर ठेऊन आहे. मी हलकेसे डोळे उघडुन पाहिले तर तिचं बाई माझ्या समोर उभी दिसली. मी उठून पाळायचा प्रयत्न केला पण माझे संपूर्ण शरीर जणू जखडून ठेवले होते. मला साधे हलता ही येत नव्हते. ती बाई हळु हळू माझ्या जवळ येऊ लागली. तिने माझा पाय खेचला आणि जोरात ओढले.

मी घाबरून देवाचे नाव घेऊ घेतले आणि जोरात उठून देवघराच्या दिशेने धावत सुटलो. पुन्हा एकदा डोळे उघडले. पुन्हा एकदा भयानक स्वप्न. फरक फक्त एवढाच होता की आता मी सोफ्यावर नाही तर खरंच देवघरात होतो. पण मग हे स्वप्न होते की सत्य. काही कळायला मार्ग नव्हता. आता मात्र मी आई ला सगळा प्रकार सांगायचा ठरवला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आई येणार होती. संपूर्ण दिवस एकच विचार डोक्यात घोळत होता. कधी एकदा आई येतेय आणि तिला सगळे सांगून मोकळा होती असे झाले होते. संध्याकाळी ती घरी आली तसे मी तिला २ दिवसांपासून घडतं असलेले भानायक प्रसंग आणि स्वप्न सांगितले. ती मला खूप ओरडली. पण नंतर शांत होत समजावून सांगू लागली. नवरात्री ला आपले देव बांधलेले असतात म्हणून त्याला घट बसवणे असे म्हणतात. या काळात वाईट शक्ती मोकळ्या फिरत असतात. म्हणून शक्यतो या दिवसात मध्य रात्री नंतर बाहेर फिरायचे नसते. 

मी इतक्या दिवसांपासून बिल्डिंग च्या मागे जाऊ नकोस त्याला एकच कारण आहे. तुम्ही जिथे रात्री बसून गप्पा मारता, खेळता आणि कधी कधी नॉन वेज वैगरे आणून खायला बसता ती जागा चांगली नाही. आपण या सोसायटी मध्ये राहायला येण्या पूर्वी इथे राहणाऱ्या एका बाई ने टेरेस वरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. तुम्ही जिथे बसता ना.. त्याच जागेवर पडून तिचे डोके फुटले होते. त्या भागात संपूर्ण रक्ताचा सडा पसरला होता. म्हणून च मी इतके महिने झाले सतत सांगायचे की मागच्या बाजूला जाऊ नका.. मला च नाही तर आपल्या सोसायटी मधल्या बऱ्याच लोकांना तिचं अस्तित्व जाणवत. काहींना तिचा भास होतो तर काहींना ती दिसते सुद्धा. हा सगळा प्रकार आई कडून कळल्यावर मात्र त्या भागात साधे फिरकणे ही मी कायमचे बंद केले. 

Leave a Reply