अनुभव – अनिकेत मोहिते

ही घटना २०१५ ची आहे. त्या वेळेस मी इंजिनिअरिंग ला होतो. मी राहायला मुंबई ला आहे. फेब्रुवारी महिना होता. आणि आम्ही काही मित्रांनी आमच्या बाईक घेऊन लाँग राईड ला जायचे ठरवले. आम्ही एक ९ जण, ६ मुलं आणि ३ मुली. लाँग राईड साठी शिर्डी ला जायचे ठरले आणि सगळा प्रवास बाईक वर करणार होतो. सगळे रात्री ९ ला ठरलेल्या ठिकाणी जमलो आणि एकत्र निघालो. माझ्या ३ मित्रांची लग्न जवळपास ठरली होती, त्यामुळे त्यांच्या सोबत त्यांच्या बायका ही होत्या. माझ्या सोबत माझा चुलत भाऊ आणि आमच्यातला एक मित्र बाईकवर एकटाच होता. आम्ही सगळे अगदी मजा करत राईड ला सुरुवात केली. कसारा घाट लागण्याआधी थांबून जेवून घेऊ असे ठरले. त्यामुळे आम्ही एका धाब्यावर थांबून जेवण करून घेतले. तिथून निघे पर्यंत मध्य रात्र उलटून गेली होती आणि आम्ही घाट चढायला सुरुवात केली. माझ्या मित्रांचा भूत प्रेत यांवर विश्वास नाही पण मला मात्र काही अनुभव येऊन गेले होते. त्यात कसारा घाटात ही आले होते पण मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून रस्त्यावर नीट लक्ष ठेऊन ग्रुप सोबत च गाडी चालवत होतो. 

काही वेळात आम्ही घाट ओलांडून पुढे आलो. बघता बघता नाशिक चा टोल नाका क्रॉस करून थोडे पुढे येऊन थांबलो. तिथं एकाने बाईक थांबवल्या मुळे सगळ्यांनी बाईक स थांबवल्या. तसे माझा एक मित्र मला म्हणाला “अन्या.. मला एक शॉर्टकट माहित आहे ज्याने आपण लवकर पोहोचू. मला कळून चुकले की हा त्या गावातून नेणार आहे ज्याचे नाव व किस्से मी खूप ऐकून होतो. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की आपण आहोत त्याच मार्गाने प्रवास करू. पण तो काही ऐकेना. मी मागे बसलेल्या वहिनीला ही बोललो पण त्यांनी ही ऐकले नाही. त्याने त्याची गाडी चालू केली आणि मला म्हणाला की तू येतोस तर चल आम्ही चाललो त्याच रस्त्याने. इतके बोलून तो निघून ही गेला. त्याच्या मागोमाग बाकीचे ही निघाले. मला समजवत माझा चुलत भाऊ म्हणाला की तू कसलाही विचार करू नकोस, काही नाही होणार. चल त्याच मार्गाने. तसे ही ते आता पुढे निघून गेलेत. त्याचे म्हणणे ऐकून मी बाईक स्टार्ट केली आणि जरा वेगात च घेतली.

काही वेळात त्या सर्वांना गाठले. तितक्यात एक जण म्हणाला चला शर्यत लावू.. हे ऐकताच मी सगळे विसरून बाईक वेगात घेतली आणि सगळ्यांना मागे टाकत बरेच पुढे आलो. रस्ता अगदीच निर्मनुष्य होता त्यात गडद अंधार. स्ट्रीट लाईट असून नसल्यासारखे होते. माझ्या मागोमाग त्याच मित्राची बाईक होती ज्याने या मार्गाने यायला सुचवले होते. मी बाईक चा वेग कमी करत त्याच्याशी गप्पा मारू लागलो. त्याला विचारले की लग्न कधी ठरले आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळण्या आधी मी समोर पाहिले आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. रस्त्याच्या कडेला कोणी तरी बाई उभे असल्याचा भास झाला. घाबरायचे कारण म्हणजे त्या परिसरात वस्ती नव्हती आणि गेल्या तासाभरात आम्हाला त्या मार्गावर कोणीही दिसले नव्हते. मी स्वतःला च समजावले की मला नक्कीच भास झाला असेल. मी पुन्हा त्या दिशेला पाहिले पण तिथे कोणीही नव्हते. मी मित्राला काहीच न बोलता बाईक चा वेग वाढवून पुढे आलो कारण मला त्या भागातून लवकर निघायला हवे असे वाटले. 

मला या आधी प्रवासात घडलेले सगळे विचित्र प्रकार आठवू लागले. तितक्यात मागून जोरात हाक ऐकू आली “अनिकेत गाडी थांबव.” मी करकचून ब्रेक मारला आणि मागे वळून पाहिले. मित्राच्या बाईक वरचा ताबा सुटला होता आणि तो रस्त्यावरून आतल्या भाग जात होता. त्याने जेमतेम बाईक सावरली. तितक्यात त्याच्या मागून अचानक कुठून तरी एक ट्रक आला आणि वाऱ्याच्या वेगात निघून गेला. ती रस्त्याच्या बाहेर होता म्हणून वाचला नाही तर त्याचे काही खरे नव्हते. मला कळलेच नाही की तो ट्रक इतक्यात आला कुठून. कारण आम्ही या मार्गाला लागल्यापासून हे बहुतेक पाहिले वाहन असावे जे आम्हाला दिसले. आम्ही ठरवले की बाकी मित्र येई पर्यंत त्यांची वाट बघू. ते काही मिनिटात मागून आले तसे आम्ही त्यांना घडलेला प्रकार सांगितला. पण ते म्हणाले की आम्हाला असा कोणताच ट्रक ओव्हरटेक करून गेला नाही. आम्ही सगळेच जरा गोंधळलो. ही सगळी चर्चा चालू असतानाच माझ लक्ष माझ्या सोबतच्या मित्राच्या मागे बसलेल्या वहिनी कडे गेले. ती एकदम गप्प बसली होती. 

मला वाटले की ती जरा घाबरली असेल. आम्ही काही मिनिट थांबून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा मित्राने हाक दिली.. तसे मी थांबलो त्यावर मित्र म्हणाला की आम्ही दोघे तुझ्या सोबत बसतो, तुझ्या भावाला माझी गाडी चालवू दे.. मी ठीक आहे म्हंटले तसे ते दोघं माझ्या सोबत बसले आणि की गाडी चालवायला सुरुवात केली. माझ्या मित्राने त्याच्या बायको सोबत बोलायला सुरुवात केली जी बऱ्याच वेळा पासून काहीच बोलली नव्हती. बहुतेक त्याला ही हे जाणवले होते. तितक्यात तिसऱ्यांदा मित्राने हाक दिली आणि की पुन्हा गाडी थांबवली. कारण तो जवळजवळ ओरडला च आणि आम्हाला वाटले की त्याला काही तरी झाले. मी पटकन बाईक थांबवली आणि खाली उतरून मागे पाहू लागलो. वहिनी मात्र भलत्याच दिशेला रस्त्याच्या पलीकडे टक लाऊन पाहत होती. बहुतेक तिथे काही तरी होत, जे आम्हाला नाही पण तिला नक्कीच दिसत होत. 

तितक्यात तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. आम्ही घाबरून तिला उठवायचा प्रयत्न करू लागलो. मित्राने तोंडावर पाणी शिंपडले तसे तिला शुद्ध आली. तो मागचा मित्र का ओरडला हे विचारायला मी विसरूनच गेलो. त्या नंतर आम्ही एक क्षण ही तिथे थांबलो नाही. सगळे एकत्र निघालो आणि तिथून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे असताना वहिनी मला सांगू लागली. तू गाडीचा वेग वाढवून पुढे निघून गेलास तेव्हा मला रस्त्याकडे ला एक बाई दिसली. तू तर पुढे निघून गेलास पण ती बाई आमच्या बाईक मागे बराच वेळ धावत होती. खूप ओरडायचा प्रयत्न केला पण मी इतकी घाबरले होते की तोंडातून आवाजच फुटत नव्हता. 

Leave a Reply