अनुभव – दीपा मावलीकर

त्या दिवशी आम्ही गप्पा करत बसलो होतो. तेव्हा आमच्या दाजिंनी त्यांना आलेला हा जीवघेणा अनुभव सांगायला सुरुवात केली.

गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मी साधारण १५ वर्षांचा होतो. मला शाळेत जायला अजिबात आवडायचे नाही म्हणून जे काम मिळेल ते करायचो. तेव्हा एका कॉलेज चे बांधकाम सुरू होते तिथे हेल्पर चे काम मिळाले होते. आम्ही जवळपास २० मुलं होतो. मी आणि माझे काही मित्र. माझ्या घरापासून ते तसे बरेच लांब होते. म्हणजे २५-३० किलोमीटर त्यामुळे रोज येणे जाणे परवडत नव्हते. त्यामुळे मालकाने आमची राहण्याची आणि जेवणाची सोय त्याच ठिकाणी केली होती. 

आम्ही सगळे एकाच गावातले असल्यामुळे मित्रांसारखेच होतो म्हणून मी ही त्याच्या सोबत तिथे राहायला गेलो. आम्हाला राहायला २ खोल्या दिल्या होत्या. एका खोलीत १० मुलं. काम जोरात सुरू झाले होते. सकाळी काम सुरू झाले की संध्याकाळी ५ पर्यंत चालायचे. कॉलेज च्या मागच्या बाजूला रेल्वे चे रूळ होते. त्यामुळे रात्री ट्रेन च्या आवाजाने नेहमी जाग यायची. रूळ ओलांडून थोडे पुढे चालत गेले की तिथे एक दर्गा होता.

तरुण पोरं असल्यामुळे काम झाल्यानंतर खोली मध्ये थांबायला कोणालाच आवडायचे नाही. त्यामुळे आम्ही मित्र नेहमी फिरायला जायचो. त्या रात्री ही मी आणि माझा एक मित्र असे दोघेच बाहेर पडलो. आम्ही कॉलेजच्या मागच्या बाजूला रेल्वेच्या रुळावर चालत होतो तितक्यात मित्राला त्याच्या नावाने हाक ऐकू आली. आम्ही दोघांनी मागे वळून पाहिले पण अंधारात कोणीही दिसत नव्हते. मित्राला वाटले की आमच्यापैकी कोणी असेल म्हणून तो अंधाराच्या दिशेने चालत निघाला. तोपर्यंत मी बराच पुढे आलो आणि पुन्हा वळून त्याच दिशेने चालत गेलो. थोड्या वेळाने मित्र ही समोरून आला आणि पुन्हा तो आवाज आला. या वेळेस तो आवाज आमच्या दोघांच्या मधून आला होता. 

हा प्रकार काय आहे हे मित्राला कळायला वेळ लागला नाही कारण तो हे सगळे जाणून होता. तो म्हणाला की इथून निघायला हवे. खोलीत आल्यावर त्याने मला सांगितले पण मी ते हसण्यावर नेले. रात्र झाली होती. आम्ही सगळे जेवण आटोपून झोपलो होतो. काम करून थकल्यावर जी झोप लागते ना ती वेगळीच असते. सकाळी डोळे उघडले तेव्हा समोरचा दरवाजा उघडा होता. मी आजूबाजूला पाहिले तर सगळे अजुन गाढ झोपेत होते. मी सगळ्यांना उठवून विचारले की बाहेर कोण गेले होते. दरवाजा कोणी उघडा ठेवला रात्री. पण कोणीही सांगायला तयार नव्हते. 

हा प्रकार रोज घडू लागला. आम्ही रात्री झोपताना दरवाजा नीट लाऊन झोपायचो आणि सकाळी तो सताड उघडा असायचा. मला शंका होती की आमच्यापैकी कोणी तरी हे नक्की करतेय पण सांगत नाहीये. म्हणून त्या रात्री आम्ही झोपायचे नाटक केले. आम्ही अगदी टक लाऊन दरवाज्याकडे पाहत बसलो होतो. मध्य रात्र उलटली आणि एका क्षणाला सगळे शांत झाले. दाराची कडी हळु हळु सरकत उघडू लागली आणि दरवाजा हळूच उघडला गेला. आम्हाला आमच्या डोळ्यावर विश्वास च बसत नव्हता. जे पाहिले ते नक्की काय होते. 

ती रात्र आम्ही तशीच जागून काढली. सकाळी सगळे सांगू लागले की आपण काम सोडून आपल्या घरी परत जाऊ पण मी सगळ्यांना कसे बसे समजावले. दुसऱ्या दिवशी काम आटोपून आम्ही पुन्हा खोलीत आलो. जेवण आटोपून आम्ही झोपायची तयारी केली. भीतीपोटी कोणाला झोप लागत नव्हती पण कामामुळे सगळेच थकले होते म्हणून काही वेळात सगळ्यांना गाढ झोप लागली. पुन्हा मध्य रात्री मला एका लहान मुलाच्या आवाजाने जाग आली. बहुतेक तो खोली बाहेर येऊन खेळत होता. मी उठलो आणि दार उघडून बाहेर नक्की कोण आहे हे पाहायला गेलो. 

बाहेर खरच एक लहान मुलगा खेळत होता. रात्री २ वाजता अश्या भयाण रात्री हा मुलगा एकटा खेळतोय हे पाहून माझी चांगलीच तंतरली. मला भीतीने घाम फुटू लागला होता. मी मित्राला हाक माराय चा प्रयत्न करत होतो पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता. तो मुलगा धावत वरच्या मजल्यावर जाऊ लागला तसे मी ही नकळत त्याच्या मागे जाऊ लागलो. इथे खोलीत माझ्या एका मित्राला जाग आली तेव्हा कळले की मी खोलीत नाहीये. त्यांनी माझी शोधाशोध करायला सुरुवात केली. मला हाका मारायला सुरुवात केली. एक जण गेट बाहेर जाऊन मला पाहून आला आणि येताना त्याचे लक्ष वर गेले. वरचे दृश्य पाहून तो प्रचंड घाबरला. 

मी सगळ्यात वरच्या मजल्यावर ते ही रेलिंग वर उभा राहून त्याच्या कडे पाहत होतो. मित्रांना बोलवून त्याने आरडा ओरडा सुरू केला पण मी मात्र माझ्याच धुंदीत होतो. मला कसलेही भान राहिले नव्हते. काही मित्र धावत वर आले आणि मला मागे ओढून खाली न्यायला लागले. पण माझ्या शरीरात १० माणसांना पुरून उरेल इतकी शक्ती संचारली होती. ते ८-१० जण असूनही मला सांभाळू शकत नव्हते. त्यांनी भरपूर प्रयत्नानंतर मला कसे बसे खाली आणले. काही केल्या ते मला आवरू शकत नव्हते. त्याच अवस्थेत ते मला त्या दर्ग्यात घेऊन गेले. जसे मला कळले की मला तिथे घेऊन जात आहेत मी मोठ्याने ओरडू लागलो. 

मला खरंच कळत नव्हते की हे माझ्या सोबत काय होतय. दर्ग्यात गेल्यावर मला तिथल्या एका बाबांनी उदी लावली तसे मी शांत झालो. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथल्या गस्तीवर असलेल्या माणसाला विचारले तेव्हा तो म्हणाला की इथे काम सुरू होण्या आधी एका बाईचा आणि मुलाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून रात्री अपरात्री ते लोकांना दिसतात. त्याचे बोलणे ऐकल्यानंतर आम्ही त्याच दिवशी ते काम सोडून आमच्या घरी आलो. आज इतकी वर्ष उलटली पण तो प्रसंग अजूनही अंगावर शहारे आणल्याशिवाय राहत नाही. 

Leave a Reply