अनुभव – स्वप्नेश देवारे
एखाद्या जगेबद्दल आपण बऱ्याच दा ऐकले ले असते. तुमच्या इथे ही अश्या काही जागा असतील जिथे हमखास अपघात होतात. पण त्या जागे बद्दल चे गूढ कोणालाही माहीत नसते. असाच हा एक भयाण अनुभव..
प्रसंग नोव्हेंबर २०१७ चा आहे. मी मुंबईत एका खूप मोठ्या हॉटेल मध्ये कामाला होतो. माझी ड्युटी प्रत्येक आठवड्याला बदलायची. म्हणजे रोटेशनल शिफ्ट. त्या दिवशी काही कारणामुळे माझ्या हॉटेल मधल्या एका शेफ ला गावी जावे लागले. त्यामुळे माझी महिनाभर सेकंड शिफ्ट होती. मी राहायला कल्याण ला आहे. माझ्यासोबत रात्री माझे काही हॉटेल चे सहकारी ही असायचे. आम्ही शिफ्ट संपली की एकत्र च निघायचो. त्या दिवशी ही आम्ही सगळे एकत्र कल्याण ला जाण्यासाठी ट्रेन पकडली. स्टेशनवर उतरल्यावर रात्रीच्या गाड्या पुढील प्रवासासाठी बंद असतात. त्यामुळे आम्ही घरून बाईक घेऊन यायचो आणि स्टेशन जवळ पार्क करायचो. माझे मित्र प्रवीण, अरुण आणि ऋषिकेश काही अंतर सोबत असायचे कारण घराचा रस्ता एकच होता. पण माझे घर स्टेशन पासून गावत आहे, जवळपास १२ किलोमिटर त्यामुळे पुढच्या रस्त्याला मी एकटाच असायचो.
त्या दिवशी बराच उशीर झाला होता. जवळपास १.३० वाजले होते. अमावस्या असल्यामुळे अंधार ही गडद जाणवत होता. रस्त्यावर वर्दळ ही दिसत नव्हती. साधारण अर्धा प्रवास पूर्ण झाला होता म्हणजे ५-६ किलोमिटर अंतर पूर्ण केलं होत. मी नेहमीच्या ठिकाणी त्या वळणावर पोहोचलो. त्या वळणावर वडाची मोठी झाडे आहेत. ते वळण इतके विचित्र आहे की तिथे हमखास अपघात होतात. म्हणजे आम्ही दार महिन्याला तिथे अपघात झाल्याच्या बातम्या ऐकतच असतो. मी मात्र नेहमी प्रमाणे बाईक चा वेग कमी करत तिथून जाऊ लागलो. तसे मला त्या रस्त्यावर एक पांढरा रंगाच्या पोशाखात एक माणूस जाताना दिसला. खूप जुन्या काळातला पोशाख परिधान केला होता. पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा. आणि डोक्यावर तशीच पांढरी टोपी. सुरुवातीला वाटले की वाहन मिळाले नसेल म्हणून चालत जात असावा. पण नंतर माझ्या लक्षात आले की या आधी रस्त्यावर मला कोणीही दिसले नाही आणि एकही वाहन नजरेस पडले नाही. त्यात आता पावणे दोन व्हायला आले असतील.
हा माणूस नक्की कुठून चालत आला असेल. विचार आला की गाडी थांबवून विचारावे कुठे जायचे आहे. पण नंतर एक महत्त्वाची गोष्ट आठवली. जेव्हा मी नवीन नवीन नोकरी ला लागलो होतो तेव्हा घरच्यांनी बजावून सांगितले होते की रात्री प्रवास करताना रस्त्यात बाईक थांबवायची नाही. मी पटकन भानावर आलो. तसा ही आधीच खूप उशीर झाला होता. त्या माणसाकडे दुर्लक्ष करत मी तिथून थेट घरी आलो. साधारण १५ दिवस उलटले असतील. मी असाच शिफ्ट संपवून रात्री घरी परतत होतो. वेळ तीच होती दीड पावणे दोन ची. त्या वळणावर आलो आणि पुन्हा तो माणूस दिसला. क्षणार्धात मला या आधीचा प्रसंग आठवला. अगदी तसाच पोशाख. फरक फक्त इतकाच होता की या वेळी तो त्या वळणावर रस्त्याकडे ला बसला होता. माझ्या मनात एक अनामिक भीती दाटून आली होती. पण विचार केला की असे घाबरून काय होणार आहे. हिम्मत करून मी गाडी त्या वळणावर थांबवली आणि त्याच्या दिशेने पाहू लागलो. तितक्यात डोळ्याचे पाते लवते न लवते तो उठला आणि माझ्या दिशेने धावत येऊ लागला.
मी गाडीचा ब्रेक लाईट लावला आणि त्या लालसर उजेडात गाडीच्या आरश्यात पाहिले. ते दृश्य बघून माझ्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. हातापायाला कंप सुटू लागला. त्या माणसाला डोळे, नाक, ओठ काहीही नव्हत. अगदी सपाट चेहरा. तो माणूसच आहे की अजुन काही.. मी क्षणाचाही विलंब न करता बाईक चा स्टार्टर मारला आणि तिथून सुसाट निघालो. अवघ्या एका मिनिटात माझ्या गाडीचा वेग ताशी ८० किमी झाला. काळीज भीतीने जोर जोरात धडधडत होत. आपण नक्की काय पाहिलं. काय होत ते. नकळत माझे लक्ष पुन्हा एका साईड मिरर मध्ये गेले आणि माझे सर्वांग शहारले. स्टिअरिंग वरून हाताची पकड सैल होऊ लागली. कारण ते जे काही होत ते माझ्या बाईक मागे अती प्रचंड वेगात धावत येत होत. काय दुर्बुद्धी सुचली आणि त्या वळणावर याला पाहायला थांबलो. मी स्वतःला सावरू लागलो. मनातल्या मनात देवाचा धावा करू लागलो. माझ्या घरा जवळच्या नाक्याजवळ दत्त मंदिर आहे. तिथे लवकरात लवकर पोहोचायचे होते. साधारण २ किलोमिटर माझा पाठलाग होत राहिला.
जसे मी त्या दत्त मंदिराजवळ आलो तो एका क्षणार्धात दिसेनासा झाला. मी नाक्यावरून वळून गाडी घरासमोर आणली आणि तशीच टाकून घरात धाव घेतली. जोर जोरात दरवाजा वाजवू लागलो. आई ने दरवाजा उघडला आणि माझी अवस्था पाहूनच मला विचारू लागली ” काय झालं एव्हढ्या जोरात दरवाजा वाजवायला.. आम्ही किती घाबरलो..” मी मात्र काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. त्या रात्री मी झोपू शकलो नाही. डोळे बंद करायचा प्रयत्न जरी केला तरी तो प्रसंग आठवायचा. दुसऱ्या दिवशी मी ताप येऊन आजारी पडलो होतो. घडलेला सगळा प्रकार मी हिम्मत करून घरच्यांना सांगितला. तेव्हा वडील म्हणाले “तुला माहितीये मी सकाळी कामाला जातो.. काही दिवसांपूर्वी तो मला आणि माझ्या नेहमीच्या रिक्षावाल्याला दिसला होता. पण त्या प्रकाराबद्दल अजुन जास्त काही माहीत नाही..” आई ने मला देवाचा अंगारा लावला. आजही मी त्या रस्त्यावरून प्रवास करतो. फरक फक्त इतकाच आहे की ते वडाचे झाड रस्ता रुंदीकरणा मध्ये कापण्यात आले आहे. पण कधीही रात्री अपरात्री तिथून गेलो की मला तो प्रसंग नेहमी आठवतो.